प्रत्येक क्षण अविस्मरणीय करताना How to make every moment memorable?

प्रत्येक क्षण अविस्मरणीय करताना How To Make Every Moment Memorable?

How to make every moment memorable?दररोज चालणे माझ्या दिनक्रमाचा एक भाग आहे. दिवसभरासाठी ऊर्जा आणि उत्साह देण्याची एक जीवनदायी शक्ती चालण्यामधून आपल्याला मिळते. शरीराला मिळणारे अन्न हेच आपले पोषण करत असते असे नाही, तर चालता चालता आजूबाजूच्या निसर्गाचे नाद आणि निनाद, ध्वनी आणि प्रतिध्वनी ऐकत ऐकत चालले की निसर्गाचे आपण एक अपत्य आहोत आणि त्याच्या कुशीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर सुखद अनुभव येतो; तो मनस्वीपणे घेतला की चालणे खऱ्या अर्थाने फलदायी होते असे मला वाटत आले आहे.

आज सकाळीच घरातून बाहेर पडलो. रस्त्याने चालू लागलो. एकेक पाऊल पुढे पडत होते.चालता चालता मी थबकलो. एक पाऊल म्हणत होते सा दुसरे रे तिसरे ग चौथे म …. असे करत सा रे ग म प ध नी सा अश्या सप्तसुरांचे सरगम कानी पडत होते. पुन्हा परतून सा नि ध प म ग रे सा हे सरगम ऐकू येत होते. मला प्रत्येक पावलाला सप्तसुरांचे मधुर संगीत ऐकू येत होते. पावलांचा आवाज मी यापूर्वी कधीही इतका काळजीपूर्वक ऐकला नव्हता. पण प्रत्येक क्षणी आजूबाजूच्या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट आपल्या कानी पडते हे माझ्या नव्यानेच लक्षात आले.

सकाळी चालायला जाताना आजूबाजूला नजर टाकली. रस्त्याच्या कडेच्या गवतावर पाण्याचे प्रेम दिसले. शुभ्र मोत्यांच्या माळा विखुरलेल्या आहेत असेच वाटले. मोत्यांची पखरण मनाला मोह पाडीत होती. शेजारीच केळीचा नुकताच लावलेला बाग होता. केळीच्या पानांवर पावसाचे पडलेले पाणी मोत्यांची शेती पिकवत होते की काय असेच वाटले. यामुळे त्यांना मी सहज हात लावून पाहिला तर पटकन जमिनीवर ते निघून गेले. मातीत मिसळून गेले. सौंदर्य हे दुरून पाहायचे असते; त्याला हात लावायचा नसतो याची एका क्षणात मला अनुभूती आली.

केळीचे छोटे रोपटे, त्याची काही जमिनीला टेकलेली पाने मातकट झालेली होती. त्यावरची पाने मात्र हिरवीगार आणि मध्येच चॉकलेटी रंगाची नक्षी तयार करून टवटवीतपणा शाबूत ठेवून होती. सर्वात वरची गोरीगोमटी पाने तर वेगळ्याच प्रभावाने वाऱ्यावर डोलत होती. केळीचा सरळ गेलेला छोटासा कोंब ताठपणे उभा होता. त्या पानांवर पावसाचे पडलेले पाणी शुभ्र मोत्यांची जणु पखरण केल्याप्रमाणे दिसत होते. हे सौंदर्य त्याक्षणी मी अनुभवत होतो.

बाजूलाच उसाचे रान होते. वाऱ्याची आलेली झुळूक अंगावर झेलत असताना त्यांच्या मधून निर्माण होणारी आवाजाची खरखर,पानांचे वाऱ्यावर डोलणे जणू काही त्या खरखर आवाजाच्या संगीतावर ती पाने नाचून दाद देत होती.

रस्त्यामध्ये काही गोगलगाईचा चिकट रस्ता दिसत होता. कोणाच्यातरी पायाखाली चिरडून मेलेल्या गोगलगाया मृत्यूचे हृदयद्रावक संगीत आळवीत होत्या असेच वाटे. काही कीटक रस्त्यात मरून पडलेले दिसले. त्यांनी हे जीवन संगीताची तार जीवनावरच्या अवघड वाटेवर शेवटची एकदा छेडलेली होती असे वाटले.

रस्त्याकडेच्या एका मोकळ्या वावरात तीन-चार टिटव्या टिव टिव टिवाट करीत होत्या. मध्येच येणाऱ्या जाणाऱ्याकडे रागाने धावून जात; येणाऱ्याला तुमचे येणे मला आवडले नाही हे दाखवत असाव्यात. मध्येच काही पक्षी सूर मारत एखाद्या झाडावर जाऊन बसत होते. एखादी खरोखरची शिट्टी वाजवावी तशी शिट्टी वाजवणारा एक पक्षी केळीच्या पानावर बसून आपली शिट्टी मनमुरादपणे वाजवत होता. विजेच्या तारांवर लालबुड्याची जोडी शेजारी शेजारी बसून एकमेकांकडे पाहत पाहत निःशब्दपणे बोलत होती. काय बोलत असतील ते? काय असावी त्यांची भाषा? त्यांचा होणारा मूक संवाद ऐकण्याचे देवदुर्लभ कान त्यांनाच लाभले आहेत.माणसाने फक्त पहायचे आणि अंदाज लावायचे.

एक भले मोठे आंब्याचे झाड… डेरेदार आणि पालेदार वाढलेले.आपल्या अंगाखांद्यावर अनेक पक्ष्यांचा संसार घेऊन ते उभे होते. अनेकांना घरे देताना त्या वृक्षाला होणारा आनंद ते शांतपणे अनुभवत होते. ते फक्त देत होते. पक्ष्यांना घरटी देत होते; कीटकांना खायला देत होते;माणसांना प्राणवायू देत होते; पाहिजे तितकी फळे देत होते आणि दातृत्वाचा आनंद जीवनभर अनुभवत ऊन, वारा, पावसात ताठपणे पाय रोवून उभे होते.

मध्येच तीन-चार पोपट आपला विशिष्ट आवाज करीत बाभळीच्या एका फांदीवर येऊन बसले. त्यातला एक जण झाडाच्या ढोलीत बसला. क्षणभर आपल्या पिलांना अन्न घेऊन भेटायला आलेली ही पोपटांची मादी असावी. थोड्यावेळाने बाहेर येऊन पुन्हा भरभर आकाशामध्ये वेगवेगळी वळणे घेत किलबिलाट करत मनसोक्त विहार करत होता. त्याचे ते विहार करणे पाहुन मीही पक्षी असतो तर किती बरे झाले असते असेच वाटले. पोपटांचे विहरणे मला माणूस असण्यापेक्षा पक्षी असण्याला आनंद अधिक असतो हेच जणू दाखवीत होते. मला त्यांचा हेवा वाटला.

रस्त्याच्या कडेला असलेला केळीचा बाग…
“केळीच्या बागा मामाच्या, पिवळ्या घडांनी वाकायच्या” हा अनुभव देत होत्या. ही कविता सहजपणे आठवायला लावीत होत्या.मला ही कविता खूप आवडे. काही केळी पिकलेल्या असल्याने त्यांचा वास डोळ्यांपेक्षा जिभेला जास्त मोहवित होता. अनेक पक्ष्यांचे उदरभरण त्यावर चालत होते. येणारे जाणारे सुद्धा केळी तोडून खात होते. अर्धवट पिकलेले केळीचे घड केळीच्या बागेचे सौंदर्य अधिकच खुलवत होते.

सूर्य उगवलेला असल्याने त्याची पिवळी सूर्यकिरणे अंगावर झेलत झेलत मी आणि शेजारची शेती सकाळच्या त्या जीवन आनंददायी करणाऱ्या वातावरणात सुखेनैव विहरत होतो. सकाळचा सूर्यप्रकाश माणसाला किती आरोग्यदायी असतो हे विज्ञानाने सांगितले आहे. पण त्याही आधी तो किती आनंददायी आणि सुखावणारा असतो हे सर्व सृष्टी सहज सोप्या भाषेत न बोलता सांगताना दिसत होती. सृष्टीचे हे निःशब्द बोलणे कानाला आणि मनाला तृप्त करणारे होते. हे सृष्टीसंगीत चालता चालता मला अनुभवायला येत होते.

मध्येच आमच्या शेजारच्या रॉकी कुत्र्याचा आवाज आला. रॉकीचा आवाज खूप दमदार आहे. किलोमीटरच्या पुढेही त्याचा आवाज जातो. तसे जर तो भुंकू लागला तर जवळ असताना नको नको वाटते. पण दूरवर गेल्यावर रॉकीचा आवाज आपले लक्ष घराकडे वेधत होता.

मध्येच एक दुचाकी त्या रस्त्याने गेली. तिने माझी समाधी थोडी भंग पावली. माझीच नाही तर तारेवर, केळीवर, उसावर, आंब्याच्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांचे तीकडे लक्ष गेले. काही पक्षी घाबरल्याने उडाले. त्यांनी जागा बदलली. काही मात्र धीटपणे तसेच बसून राहिले.

आता पावसाचे सहज ढगातून निसटून आलेले काही तुषार अंगावर येत होते. ते काही फक्त माझ्याच अंगावर येत होते असे नाही, मलाच आनंद देत होते असे नाही, तर आजूबाजूच्या शेतांना, त्यातील वनस्पतींना, झाडाझुडपांना सुखद गारवा देऊन आनंदाचे तरंग निर्माण करीत होते. पावसाळ्यात ही मजा अनुभवता येते.

वरती आकाशात ढगांची दाटी होती.पांढरे,काळे, आणि भुरकट ढग वार्‍याच्या तालावर डोलत होते.मोठ्या मोठ्या आकाराचे ढग मुक्तपणे विहरत होते. ढगांमध्ये असलेले काही झाडांचे आकार, काही प्राण्यांचे आकार अक्राळविक्राळ होते. त्यातून निळेशार आकाश डोकावत होते. सूर्यालाही झाकून ठेवण्याची ढगांची ती शक्ती आकाशालाही झाकत होती की काय असेच वाटले.एखाद्या तांदळाच्या शुभ्र भाकरीप्रमाणे सूर्य मधूनच तोंड बाहेर काढत होता. ऊन पाडत होता. जणू त्या भास्कराला ही आपली प्रभा घेऊन सृष्टीच्या आनंदामध्ये हर्षभरीत होऊन सहभागी व्हायचे असावे.

खाली पायाकडे पाहिले तर मुरमाचा आणि खडीचा रस्ता होता. मला वाटले फक्त सजीवसृष्टीच आपल्याला आनंद देत नाही तर निसर्गाचा निर्जीव घटक दगडही आपले चालणे आल्हाददायी करत असतो. त्याचे हे देणे सृष्टीच्या इतर जिवांइतकेच मूल्यवान वाटते.

सारी सृष्टी आपल्याला काही ना काही सतत देत असते. सृष्टीच दान किंवा निसर्गाचे देणे हे अपरिमित असते. निसर्गराजा हा दातृत्वाचा उत्कट आविष्कार करण्यात मग्न आहे. याचा अनुभव घेत असताना सृष्टीचे सौंदर्य हे फक्त वरवरचे नसून अगदी हृदयाच्या गाभ्यातून असते हे लक्षात येते.

सकाळच्या उन्हामध्ये फिरताना प्रत्येक क्षण अविस्मरणीय होत होता.प्रत्यक्ष वर्तमानात जगताना घडणाऱ्या सूक्ष्म हालचाली अनुभवणे यात एक औरच मजा असते.

आजूबाजूच्या निसर्गाकडे पाहता पाहता सृष्टीचे मनमुक्त विहार करणे अनुभवता आले तर चालणे अधिक सुंदर होते. अधिक जीवनदायी होते. याचा अनुभव जरा मोकळेपणाने घेता आला; तर साधे चालणे सुद्धा किती आनंददायी असते हे आपण अनुभवू शकतो.

अवश्य वाचा

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध

प्रयत्नांती परमेश्वर Nothing is impossible

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment