वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध Essay on Vrikshavalli amha soyari vanachare

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध Essay on Vrikshavalli amha soyari vanachare

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध Essay on Vrikshavalli amha soyari vanachare

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती “संत तुकाराम महाराज यांनी वरील ओळी लिहिलेल्या आहेत. निसर्गाशी संत तुकाराम किती एकरूप झाले होते हे त्यातून दिसून येते. निसर्ग हा त्यांना एखाद्या जवळच्या नात्यातील व्यक्तीसारखा वाटत होता. वृक्षवेली, जंगलातील वनचरे ,पक्षी हे त्यांना आनंद देत होते.

निसर्ग हा सर्वव्यापी आहे. आपण निसर्गाचे घटक आहोत. निसर्गातच आपला जन्म झाला. आपण निसर्गाच्या अपत्य आहोत. मग निसर्गातील झाडे, झुडपे, वेली, जंगलातील पशू-पक्षी हे सर्व आपल्याला नातलगांप्रमाणे वाटले पाहिजेत.

पडक्या किल्ल्याचे मनोगत वर मराठी निबंध

आपण जेव्हा सहलीला जातो एखाद्या अभयारण्याला भेट देतो. एखादे धरण पाहतो. एखाद्या सुंदर बागेला भेट देतो. तेव्हा तेथील निसर्ग पाहून आपले मन रमून जाते. निसर्ग चित्र आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसते. निसर्गरम्य परिसर पाहून आपण भारावून जातो. या निसर्गामध्ये आपल्याला प्रचंड आनंद देण्याची अनंत शक्ती आहे.

प्रत्येक वृक्ष आपल्याला उपयोगी असतो. प्रत्येक वृक्ष आणि वेल दिवसभर प्राणवायूची भर पर्यावरणात टाकत असते. कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेत असते. त्यामुळे माणूस आणि विविध प्रकारचे पशुपक्षी यांचे जीवन सुसह्य होते. पृथ्वीवरील उष्णतामान नियंत्रित राहते.

बैलपोळा मराठीत निबंध

विविध प्रकारच्या वृक्षांच्या मुळापासून फळापर्यंतचा भाग किती उपयोगी आहे; हे आयुर्वेदाने दाखवून दिलेले आहे. आजचे जग पुन्हा आयुर्वेदाकडे वळाले आहे. प्रत्येक झाडाचे मूळ हे उपयुक्त असते. फक्त आपल्याला त्याचा उपयोग माहीत असला पाहिजे. असे एक संस्कृत वचन आहे.

कवी केशवसुत म्हणतात,
“वृक्ष ओढे वनराजी,वृत्ती रमे तेथे माझी”
जिथे जिथे वृक्ष असतात; निर्झर असतात; अशा ठिकाणी माझ्या चित्तवृत्ती फुलतात. मन आनंदाने भरून येते. निसर्ग मानवाचा जन्मदाता आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात माणूस गेला की त्याला आनंद होत असतो. निसर्गाचे ते अद्भुत लावण्य पाहून कविता करण्याची स्फूर्ती येते.

निसर्गाच्या देण्याला मर्यादा नाही. माणसाने या निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे. निसर्गाचा मित्र आणि कन्या पुत्र बनून राहिले पाहिजे. कारण निसर्ग आपला माता, पिता, बंधू ,सखा सर्व काही आहे.

पृथ्वीवरचा निसर्ग हा लक्षावधी वनस्पतींनी आणि प्राणी यांनी भरून गेलेला आहे. पृथ्वीसारखी जीवसृष्टी अजून कोणत्याही ग्रहावर आढळून आलेली नाही. प्रचंड अशी जैवविविधता आपल्याला भरभरून देत असते. पण आज अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. किमान आहे तो निसर्ग आपण जपला पाहिजे.

निसर्ग आपल्याला अनंत हस्ताने अनंत असे दान देत असतो. हे दान आपण घेतो. सर्व पशुपक्षीही घेतात. पशुपक्षी मात्र त्यांच्या बुद्धीप्रमाणे आणि नैसर्गिक उपजत प्रवृत्तीने निसर्गाचे संवर्धन करताना आढळतात. मानवाने निसर्गाचे केवळ दान न घेता आपण काहीतरी निसर्गाचे देणे लागतो; या भावनेने निसर्गाचे ऋण मानून निसर्ग वाढवला पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे.

निसर्ग म्हणजे केवळ वृक्ष नव्हेत. तर नद्या, ओढे, डोंगर, माळराने, टेकड्या, पशुपक्षीही आहेत. निसर्गातील हे सर्व घटक आपापल्या परीने निसर्गाचे संवर्धन करीत असल्याचे दिसून येते. माणसाने सुद्धा आपल्यापरीने निसर्गाचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

आज आपण पाहतो की,निसर्गावर माणसाने आक्रमण केले आहे. माणसाने विविध प्रकारची यंत्रे शोधली आणि निसर्गावर त्या यंत्रांच्या आधाराने फार मोठे आक्रमण करीत आहे. निसर्गात कृत्रिमपणे बदल घडवून आणीत आहे. पृथ्वीवरील निसर्ग झाडेझुडपे, प्राणी, पक्षी धोक्यात आले आहेत. त्यांचे पुन्हा संवर्धन होणे गरजेचे आहे.

आपण कधी कधी म्हणतो कि निसर्ग माझा सोबती. सोबती म्हणजेच मित्र व आपल्या मित्राला आपण जपले पाहिजे. आपल्या निसर्ग बांधवांची, झाडे, झुडपे आणि पशुपक्ष्यांची मानवाने काळजी घेतली पाहिजे. मानव हा निसर्गाचा घटक असून शिवाय सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी अधिकच आहे.

माणूस सोडला तर निसर्गाचे लचके तोडणारा कोणताही प्राणी आपल्याला आढळणार नाही. कोणताही पशुपक्षी त्याच्या कृतीने निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करीत असलेला दिसून येईल. पण माणसाच्या बाबतीत मात्र तसे नाही. माणसाचा हव्यास निसर्गाचा घास घेत आहे. हे फार दुर्दैवी आहे.

सरकारतर्फे अनेक योजना व उपक्रम वृक्षारोपणासाठी राबवले जातात. अनेकदा वृक्ष लावलेही जातात. संवर्धनही होते. परंतु समाजाने सुद्धा याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सरकारच्या उपक्रमांना सहकार्य केले पाहिजे. रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी समाजाची आहे.

राजस्थानमध्ये बिश्नोई समाजाने वृक्षतोड होऊ नये म्हणून चिपको आंदोलन केले होते. झाडे झुडपे नष्ट होऊ नये म्हणून त्या लोकांनी जो लढा दिला तो आता जगभर प्रसिद्ध झाला आहे. निसर्गाविषयी इतकी कळकळ आपल्या सर्वांमध्ये निर्माण व्हावी.

5 जून ला पर्यावरण दिन असतो आणि आपण सर्वजण निसर्गाचे गोडवे गातो. पर्यावरण संरक्षणाच्या प्रतिज्ञा घेतो. भाषणे ठोकली जातात. निबंध लिहिले जातात. पण वर्षातले राहिलेले 364 दिवस आपण फक्त निसर्गाकडून घेत राहतो. परतफेड विसरतो. हे योग्य नाही.

“कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी ”
असे म्हणणारे संत सावतामाळी निसर्गाशी एकरुप झालेले दिसतात. “ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा” असे आपल्या अभंगातून म्हणणारे संत चोखामेळा आपले निसर्गप्रेम आपल्या अभंगातून व्यक्त करतात. निर्झरास, श्रावणमास अशा कवितांमधून बालकवींनी निसर्गाचे केलेले वर्णन किती अप्रतिम आहे.

आपण शाळेमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, संत सावतामाळी, बालकवी, कुसुमाग्रज यांच्या कविता अभ्यासत आलो आहोत या सर्व कवी आणि लेखकांना निसर्ग किती हवाहवासा वाटत होता हेच आपल्याला दिसून येते. यांना निसर्गाविषयी जे वाटत होते त्या त्यांच्या भावभावना आपल्या अंतःकरणात खोल रुजल्या पाहिजेत.

तुम्ही जे मागाल ते निसर्ग तुम्हाला भरभरून देईल; परंतु तुमच्या हव्यासाला निसर्ग पूर्ण पडणार नाही.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” हा संत तुकारामांचा अभंग खूप मार्मिक आहे.निसर्गाच्या सानिध्यात असणारा आनंद संत तुकाराम महाराजांनी अनुभवला त्याप्रमाणे आपल्याला हवा असेल. तर संत तुकारामांनी सांगितलेल्या अभंगाचा अर्थ आपल्या जीवनात उतरवला पाहिजे.

Essay on Vrikshavalli amha soyari vanachare

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment