प्रयत्नांती परमेश्वर Nothing is impossible

प्रयत्नांती परमेश्वर Nothing is Impossible

प्रयत्न वाळूचे कण, रडता तेलही गळे ।

Nothing-is-impossible

प्रयत्नांती परमेश्वर Nothing is impossible

असे संत एकनाथांनी म्हणून ठेवलेले आहे. प्रयत्नाने अगदी तुम्ही वाळूचे कण जरी पीठासारखे दळून काढले किंवा पिळून काढले तर त्यातून तेलही निघू शकते. Nothing is impossible असेच म्हणायचे आहे. इतकी शक्ती प्रयत्नांमध्ये आहे.त्यामुळे प्रयत्न हे खूप मौल्यवान असे रत्न आहे. हेच त्यांना या गोष्टीतून सांगायचे असेल.

संत तुकाराम महाराज निबंध

या जगामध्ये प्रयत्नाने साध्य होणार नाही असे काहीच नाही. त्यामुळे प्रयत्नांवर जोर द्यावा. हे प्रयत्न सातत्यपूर्ण असावेत.प्रयत्न कधीही सोडू नये. प्रयत्नांवर कोणी नकारात्मक बोलला तर त्याचा फार विचारही करू नये.कारण प्रयत्न ही एक सकारात्मक इच्छेची परिणती आहे.

संत रामदास म्हणतात,
यत्न तो देव जाणावा,
यत्नेविण दरिद्रता ।

यत्न म्हणजेच प्रयत्न. प्रयत्न हे रत्न आहे. रामदास स्वामी म्हणतात की, प्रयत्न हाच देव जाणा आणि प्रयत्न करत राहा. प्रयत्नाने तुम्ही तुमच्या परिस्थितीवर मात करू शकता. कोणत्याही संकटाचा सामना करु शकता. प्रयत्न न करणारा माणूस आळशी समजला जातो.त्याच्याकडे दारिद्र्य येते. प्रयत्नाशिवाय राहणारा माणूस दरिद्रता निर्माण करतो आणि प्रयत्न करणारा माणूस श्रीमंतीकडे वाटचाल करतो हेच खरे.

प्रयत्नांती परमेश्वर

मराठीमध्ये असलेली ही म्हण खूप प्रचलित आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणजेच प्रयत्नाने परमेश्वरही तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. प्रयत्न करणाऱ्या माणसाला परमेश्वर दर्शन देतो. एक प्रकारे प्रयत्न करीत राहणारा माणूस हा यशाचा मालक बनतो. म्हणून प्रयत्न सातत्याने करीत राहावे. प्रयत्नाला पर्याय नाही आणि त्यातल्या त्यात सातत्यपूर्ण प्रयत्न ही यशाची प्रत्येक पायरी ओलांडताना गरजेची बाब आहे.

Try try but don’t cry

ट्राय ट्राय बट डोन्ट क्राय असे इंग्रजीत एक म्हणीसारखे वाक्य आहे. प्रयत्न करा. प्रयत्न करा. रडत बसू नका. कुढत बसू नका. हे त्यातून सांगायचे आहे.नकारात्मक विचार न करता प्रयत्न करीत राहा. विनाकारण तक्रार करीत राहू नका. मला अमुक गोष्ट मिळाली नाही,अमुक मित्राने मदत केली नाही, अशी संधी मिळाली नाही असे विचार करेल बसणे म्हणजे एक प्रकारे तुमचे रडणेच आहे. अशा रडक्या माणसाला प्रयत्न रुपी देव भेटण्याची शक्यता नाही.

उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी न मनोरथेन ।
न सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ती मुखे मृगः ।।

संस्कृत भाषेतील हे सुभाषित फार पूर्वीपासून भारत देशात प्रचलित आहे. उद्यमेन म्हणजेच उद्योगाने कोणतेही कार्य तडीस जाते. उद्योगप्रिय माणसाचे कोणतेही काम अडून राहत नाही. फक्त विचार करीत राहणे म्हणजेच एक प्रकारचे स्वप्नरंजन करीत राहणे. हे आळसाचे लक्षण आहे. स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उद्योग केला पाहिजे.

वनराज सिंह म्हणजेच जंगलाचा राजा जर स्वस्त बसून राहिला तर त्याच्यासाठी आयती शिकार कधीही मिळत नाही. त्याच्या मुखामध्ये अन्नाचा घासही पडणार नाही. म्हणजे तुम्ही कितीही मोठे असा पण उद्योगप्रियता तुम्हाला तुमचे इप्सित साध्य मिळवून देऊ शकते. अर्थात तुमच्या प्रयत्नाला महत्त्व आहे हे त्यातून अधोरेखित होते.

गरिबातील गरीब व्यक्तीला मिळालेले एक प्रकारचे ईश्वरी वरदान म्हणजेच प्रयत्न होय. प्रयत्नाने कोणती गोष्ट साध्य होणार नाही असे नाही. त्यामुळे प्रयत्नाला पर्याय नाही. आपली कल्पकता वापरून आपण प्रयत्न केले पाहिजेत.एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला तर आपल्याला निश्चितच उपाय सापडतात.

असाध्य ते साध्य, करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत तुकाराम महाराज यांनी सर्व समाजाला अतिशय शक्तिशाली विचार दिले. त्यामध्ये वरील दोन ओळींचा समावेश होतो. असाध्य म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कारण अशक्य गोष्टही शक्य करण्यासाठी तुमचे प्रयत्न झाले तर ती साध्य होते. तुमच्या निरंतर प्रयत्नाने सर्व शक्य होते.असेच संत तुकारामांना सांगायचे आहे.

बहुतांश लोक अशा प्रेरणादायक विचारांकडे पाठ करतात. हे विचार आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रयत्न केला तर असाध्य असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला तुम्ही मिळवू शकता. संत तुकाराम हे एक परखड विचार मांडणारे व्यक्तिमत्व होते. किराणा मालाचे दुकान असलेले संत तुकाराम हे पुढे आपले महान व्यक्तिमत्व समाजासमोर घेऊन आले. विठ्ठलाचे निस्सीम भक्ती असणारा हा महापुरुष आपल्या अभंगगाथेने आजही अमर आहे. प्रेरणादायक विचार आपल्याला देत आहे.

Nothing is impossible

फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट म्हणत असे की अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशातच नाही. म्हणजेच प्रयत्नाने सर्व काही साध्य होऊ शकते. अशक्य काहीच नाही. Nothing is impossible असेच त्याला म्हणायचे आहे.

महात्मा गांधी हे सुरुवातीला एक अतिशय साधे व्यक्तिमत्त्व होते. पण स्वतःच्या निरंतर उद्योगाने त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये भारताला एक महान नेतृत्व दिले. ते त्यांच्या उद्योगप्रिय स्वभावामुळेच. दृढनिश्चय करून आपण प्रयत्नरत राहिले पाहिजे हेच यातून आपण शिकू शकतो.

एक छोटीशी मुंगी आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की,ती सतत आपल्या उद्योगामध्ये मग्न असते. एवढीशी छोटी मुंगी पण किती मोठे वारूळ तयार करते. मुंगी सतत प्रयत्न करणाऱ्या प्राण्यांची प्रतिनिधी आहे. मुंगीचे उदाहरण आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारले पाहिजे.

प्रयत्न किंवा उद्योगीपणा याला कोणताही पर्याय नाही. तुमच्या आयुष्यात प्रयत्नाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होणार नाही. प्रयत्नांमध्ये मात्र सातत्य असले पाहिजे.  सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यावर यश हे मिळतेच. सातत्यपूर्ण प्रयत्न करताना आपल्या प्रयत्नांवर दृढविश्वास ठेवा. सकारात्मक भावनेने प्रयत्न करा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.

Never Give up

प्रयत्न कधीही अर्धवट सोडू नका. आरंभशूर व्यक्ती सुरुवातीला प्रयत्न करते आणि कायमचा ब्रेक घेते. हाती घेतलेले कार्य सोडून देते.त्यामुळे कार्याची हानी होते. असे नको एकदा हाती घेतलेले कार्य हाती घेऊ ते तडीस नेऊ या वृत्तीने केले तर ते निश्चितच पूर्ण होईल. यात शंकाच नाही. कोणतेही काम पुढे न ढकलता प्रयत्न करीत राहा. Never Give up हा मंत्र लक्षात ठेवा आणि कामाला लागा यश तुम्हाला नक्कीच मिळेल.

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment