नागपंचमी हा सण का साजरा करतात? Why we celebreate nagpanchami ?

नागपंचमी या सणाविषयी माहिती

Why we celebreate nagpanchami ?

Why we celebreate nagpanchami ? श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षातील पंचमीला नागपंचमी हा सण असतो. श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मियांच्या सणांची पर्वणीच असते. नागपंचमीच्या सणाने याची सुरुवात असते. या सणाच्याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

नागपंचमी हा सण का साजरा करतात?

नागपंचमी या सणाविषयी दोन कथा किंवा आख्यायिका प्रसिद्ध आहेत. एकदा एक शेतकरी आपली जमीन नांदत असतो. नांगरत असताना त्याच्या नांगराच्या फाळाने एका नागिनीची तीन पिल्ले मरण पावतात. त्यामुळे नागिन आणि नाग देवता शेतकऱ्यावर चिडते. त्याच्यावर हल्ला करण्याच्या बेतात असते.त्यावेळी शेतकऱ्याची बायको वारुळाजवळ जाऊन नागाची दूध आणि साळीच्या लाह्या अर्पण करून पूजा करते आणि आपल्या नवऱ्याचे जीवदान त्याच्याकडे मागते. ती म्हणते की तु माझा भाऊ आहेस; तूच माझ्या सौभाग्याचे संरक्षण कर. मी तुझी तशीच दरवर्षी पूजा करीत जाईन. जमीन नांगरताना काळजी घेईन. त्या दिवसापासून दरवर्षी नागपंचमी हा सण साजरा होत आहे. हीआख्यायिका सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.
श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून गोकुळावरील फार मोठे संकट दूर केले होते. श्रीकृष्ण सुरक्षित वर आले होते. तेव्हापासून हा सण साजरा केला जातो असे समजले जाते.

नागपंचमीचा सण कसा साजरा करतात?

नागपंचमीच्या सणाच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने हिंदू लोक सर्पराज नागाची पूजा करतात. नागाची पूजा करुन नागाला प्रसन्न करून घ्यायचे असते. सर्व सासुरवाशीन नवविवाहिता मुलींसाठी या सणाचे महत्त्व खूपच आहे. दरवर्षी नागपंचमीचा सण केव्हा येतो याची वाटच सासुरवाशीन मुली पाहत असतात. आपला भाऊ आपल्याकडे माहेरी नेण्यासाठी येईल आणि आपण माहेरी जाऊ, एक हक्काची सुट्टी आपल्याला मिळेल असे या नवविवाहितांना वाटत असते. त्या आपल्या भावाची वाट पाहत असतात. नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नाग दिसला नाही तरी नागाचे घर वारूळ पूजले जाते. वारूळ नसेल तर भिंतीवर वारूळ व नागाचे चित्र काढले जाते आणि त्याचीच पूजा केली जाते. नागोबाला साळीच्या किंवा जोंधळ्याच्या लाह्या, दूध,शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ,कापूस वाहून पुरणपोळी व कानवल्याचा नैवद्य दाखवला जातो. घरात हे नाग नरसिंहाचे चित्र लावून त्याची पूजा केली जाते.

पारंपारिक खेळांची मजा

नागपंचमीच्या दिवशी अनेक पारंपारिक खेळाची मजा आबालवृद्ध मंडळी घेत असतात. झिम्मा, फुगडी, झोके खेळणे,पिंगा,घोडा-चुईफुई,काटवटकाना, फेर धरणे इत्यादी खेळ अतिशय मौजेने खेळले जातात. आपल्या माहेरी आलेल्या नवविवाहीत मुली त्या दिवशी आपले सासरचे अनुभव एकमेकींना सांगतात. आपल्या भावनांना मोकळीक करून दिली जाते.नाग महिलांचा भाऊ समजला गेला आहे. आपल्या भाऊरायाला प्रसन्न ठेवून आपला माहेरचा पाठिंबा कायमस्वरूपी एक प्रकारे ते अक्षय ठेवत असतात.

बत्तीस शिराळा येथील नागपंचमी

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमी या उत्सवासाठी फार प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असणारे लोक गट करून नागपंचमीच्या अगोदर नागांना पकडून आणीत असत. नागपंचमीच्या दिवशी शंभर-सव्वाशे नागांची मिरवणूक निघत असे. पूर्वीच्या काळी हे प्रमाण कमी होते. या ठिकाणच्या लोकांची खरेतर नागांना त्रास होऊ नये; अशीच इच्छा असे आणि त्याप्रमाणे ते परंपरेने नागपंचमी साजरी करत. परंतु नंतर यामध्ये काही अनिष्ट प्रथांचा शिरकाव झाला. अनिष्ट प्रथांमुळे नागांना याचा त्रास होऊ लागला. यामुळे काही वन्यजीवप्रेमी, निसर्गप्रेमी मंडळींनी न्यायालयाकडे धाव घेतली.  न्यायालयांमध्ये यावर विचारमंथन होऊन 2002 पासून अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांवर बंदी आणली आहे. परिणामी आता नागांना पकडणे, त्यांचे प्रदर्शन करणे, मिरवणूक काढणे या प्रकारांना पूर्णपणे आळा बसला आहे.

अंधश्रद्धा आणि नागपंचमी

अंधश्रद्धा म्हणजे आंधळेपणाने वैज्ञानिक दृष्ट्या विचार न करता ठेवलेला विश्वास होय. काळाच्या ओघात मानवी संस्कृती जसजशी विकसित होऊ लागली,तशी देशोदेशींच्या संस्कृतींमध्ये काही न काही आख्यायिका निर्माण होऊन अनेक सण-उत्सव निर्माण झाले आहेत. हे सण उत्सव पारंपारिक पद्धतीने लोक साजरे करतात. आधुनिक काळामध्ये विज्ञानाचा अभ्यास होऊ लागल्यानंतर या प्रथा आणि परंपरामधील फोलपणा लक्षात येऊ लागला आहे. नागपंचमी हा सण साजरा करताना त्यामध्ये काय अंधश्रद्धा आहेत हे आता सर्वांना ठाऊक आहे. असे असले तरीही मानव हा उत्सवप्रिय प्राणी आहे. नव्याने आता नवे सण निर्माण होणे तसे कठीण आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने सण साजरे केल्याने मानसिक औदासिन्य कमी होते. नागपंचमीच्या सणाचा विचार केला तर यामध्ये स्त्रियांचा जास्त सहभाग असतो किंवा तो स्त्रियांचा सण आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
नागाची पूजा करणे ही अंधश्रद्धा असेलही पण यानिमित्ताने सासुरवाशीन नवविवाहिता, महिलावर्ग एकत्र येऊन विविध प्रकारचे खेळ खेळतो. गाणी गायली जातात. एकमेकांशी गप्पा मारल्या जातात.आपले सुख दुःख एकमेकांना सांगितले जाते.यातून मानसिक ताण कमी होण्यास फार मोठी मदत होते. आजच्या आधुनिक काळामध्ये डिजिटल समाज माध्यमे वापरली जातात. जग खेड्यासारखे झाले आहे. पण माणूस माणसापासून दुरावत आहे. त्यादृष्टीने अंधश्रद्धांना बाजूला ठेवून अशा प्रकारचे सण – उत्सव साजरे करणे हेच हिताचे ठरते.

वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून नागपंचमी कशी साजरी करता येईल?

नागपंचमीच्या आख्यायिकांचा विचार करता, वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे यासाठी नागपंचमीच्या दिवशी नांगरायचे नाही, खणायचे नाही, जिवांना इजा होईल असे काही करायचे नाही. अशीसुद्धा परंपरा आहे . यातून निश्चितच एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला गेला आहे असे म्हणायला वाव आहे. नागपंचमीच्या दिवशी सापांच्या विविध प्रजाती विषयी सर्वसामान्य लोकांना ज्ञान होण्यासाठी प्रदर्शन आयोजित करता येईल. त्याचप्रमाणे सापांवर आधारित विविध प्रकारचे डॉक्युमेंट्री, व्हिडिओ दाखवता येतील. सापांविषयीचे असणारे
गैरसमज आणि अज्ञान या निमित्ताने आपण दूर करू शकतो. यासाठी या सणाचा वापर विज्ञान विषयक आस्था असणाऱ्या विज्ञान प्रेमींनी निश्चितच केला पाहिजे.

सारांश

सारांश रूपाने, असे आपल्याला म्हणता येईल; की नागपंचमी सारखे सण मोबाईलसारखी डिजिटल खेळणी एका बाजूला ठेवून धुमधडाक्यात आणि अतिशय आनंदाने साजरे केलेच पाहिजेत. सण-उत्सव हे जीवन जगण्याचा आनंददायी मार्ग दाखवणारे दिशादर्शक दिपस्तंभ आहेत असे मला वाटते.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment