स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi

भारत देशाच्या आधुनिक इतिहासातील एक सुवर्णपान म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते महामानव, समाजसुधारक, क्रांतिकारक महान कवी आणि स्वातंत्र्य युद्धातील नेतृत्व म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर ( Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi ) होय.“तुजसाठी जनन ते मरण, तुजसाठी मरण ते जनन” असे आपल्या मातृभूमी विषयी निर्व्याज प्रेम असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आजच्या काळामध्ये सुद्धा भारतीयांना मार्गदर्शक ठरतात.

जाज्वल्य देशभक्ती बरोबरच प्रगल्भ प्रतिभाशक्ती, प्रेरक वक्तृत्व, तत्वनिष्ठ हिंदुत्ववादी राजकारण, क्रांतिकारी नेतृत्व आणि कर्तृत्व असणारे, धर्माभिमान व विज्ञानवादी समाज सुधारक अशा अनेक उच्चतम गुणांचा समुच्चय असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक शतपैलू व्यक्तिमत्व होते.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीची पताका खांद्यावर घेऊन ब्रिटिशांच्या छाताडावर थयथय नाचणाऱ्या या महान क्रांतिकारकाचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. इसवीसन 1898 यावर्षी इंग्रजांनी चाफेकर बंधूंना रँडच्या खुनाबद्दल फासावर चढवले. चाफेकर यांच्या अतुल्य बलिदानाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनामध्ये देशभक्तीची धगधगती अग्निज्वाला प्रज्वलित झाली.घरातील देवी समोर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी भारत मातेला स्वातंत्र्याचा अभिषेक घालण्यासाठी मारिता मारिता मरेल अशी प्रतिज्ञा घेतली.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन Swatantryaveer Savarkar Gaurav Din

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापन करण्याचे त्यांच्या मनाने घेतलं आणि मित्रमेळा ही संघटना महाविद्यालयामध्ये असताना त्यांनी स्थापन केली. या संघटनेचे पुढे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेमध्ये रूपांतर झाले.सावरकर इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी गेले त्या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मार्गदर्शनामध्ये इंडिया हाऊस याठिकाणी सावरकरांनी भारत देशातून आलेल्या तरुणांना क्रांतिची दीक्षा दिली. क्रांतीचे तत्वज्ञान सावरकरांनी आपल्या भाषेमध्ये अतिशय ओजस्वी शब्दांमध्ये मांडले आहे.सावरकरांनी अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर या ग्रंथामधून भारतीयांचा इंग्रजांविरुद्ध झालेला हा संघर्ष म्हणजे एखादे बंड नसून तो स्वातंत्र्याचा लढा होता हे दाखवून दिले आहे.

या पुस्तकाने भारतामध्ये हजारो तरुणांच्या मनामध्ये क्रांतीची ज्वाला भडकली.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकारक विचार आचार आणि नेतृत्वामुळे ब्रिटिश सरकार भडकले. सावरकरांना त्यांनी बॅरिस्टरची सनद नाकारली. परंतु देशाच्या स्वातंत्र्यापुढे बॅरिस्टर नावाची पदवी सावरकरांना तुच्छ वाटली. सावरकर हे क्रांतीकारकांचे शिरोमणी आहेत हे ब्रिटिश सरकारच्या लक्षात आले. कोणताही पुरावा नसताना जुलमी इंग्रज सरकारने सावरकरांना दोन जन्मठेपेची म्हणजेच 50 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.भारताच्या अंदमान बेटावर सावरकरांना ही शिक्षा भोगावयाची होती. या बेटावर होणारी शिक्षा म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा असे त्याकाळी समजले जात असे.

अंदमान बेटावरील सेल्युलर जेलमध्ये सावरकरांनी अतिशय कष्टामध्ये दिवस काढले. सावरकर अंग काठीने कृश होते. असे असले तरी ते काटक होते. अंदमान बेटावरील सेल्युलर जेलमध्ये सावरकरांनी कमला नावाचे महाकाव्य लिहिले. त्या ठिकाणच्या देशभक्त कैद्यांना सावरकरांनी साक्षर केले.पुढे भारतीय जनतेच्या दबावामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानच्या कारागृहामधून सशर्त सुटका झाली.

रत्नागिरी येथे त्यांना नजरकैदेत ठेवले गेले. कोणतेही राजकीय कार्य करावयाचे नाही. अशी अट सरकारने त्यांना घातली. सावरकर तुरुंगातील छळामुळे थकले होते. याठिकाणी त्यांना आराम भेटणार असे वाटत असले तरी सावरकर हे स्वस्थ बसणारे व्यक्तिमत्व नव्हते. रत्नागिरीमध्ये असताना सावरकरांनी जनसामान्यांमध्ये असलेल्या अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता याविरुद्ध बंड पुकारले.

भारतामध्ये असलेल्या तत्कालीन हिंदू धर्मामध्ये अनेक चालीरीती आणि परंपरा होत्या. या चालीरीती आणि परंपरा ह्या देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीमध्ये बाधक ठरत होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून चुकीच्या परंपरा चालीरीती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता यांची चिकित्सा करून समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी आवाहन केले. धार्मिक बाबींना वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिलेच द्रष्टे समाजसुधारक आणि विचारवंत होते.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे महान कवी होते.कविमनाच्या या क्रांतिकारक नेतृत्वाने मराठी भाषेला ललामभूत ठरतील असे महान ग्रंथ दिले आहेत. अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, सहा सोनेरी पाने, काळे पाणी, माझी जन्मठेप, जात्युच्छेदक निबंध, संन्यस्त खड्ग, कमला, हिंदुपदपादशाही अशी एकापेक्षा एक सरस पुस्तके सावरकरांनी लिहिलेली आहेत.ही सर्व पुस्तके देशभक्तीने प्रेरित होऊन लिहिली गेली आहेत. प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावीत अशी प्रेरणादायी पुस्तके आहेत.

सन 1938 च्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अध्यक्ष होते. या ठिकाणी अध्यक्ष पदावरील भाषणांमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लेखण्या मोडा आणि बंदुका उचला असे आवाहन साहित्यप्रेमी समाजाला केले. यामागील उद्देश केवळ स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यासाठीचे प्रयत्न हाच होता.

“ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला” हे सावरकरांनी लिहिलेले एक अजरामर असे आर्त भावगीत आहे. तर “जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे” हे अजरामर असे स्वातंत्र्यदेवीचे स्तोत्र आजही प्रत्येक भारतीयाला देशभक्तीची आणि देशप्रेमाची प्रेरणा देत आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक स्वाभिमानी नेतृत्व होते. देशाभिमान त्यांच्या नसानसात भिनलेला होता.

क्रांतिकारक कार्य करत असताना त्यांना मृत्यूची भीती कधीही वाटली नाही. मृत्यू हा माझा दास आहे असे ते म्हणत असत. “अनादी मी अनंत मी अवध्य मी भला, जिंकील रिपू कोण ऐसा जगती जन्मला” असे ते आपल्या काव्यात्म भाषेत म्हणत असत.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या 83 व्या वर्षी 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी अन्नत्याग करून अनंतामध्ये स्वतःला विलीन करून घेतले. महाभारतातील पितामह भीष्माचार्यांप्रमाणे सावरकर इच्छामरणी ठरले आणि मृत्युंजय झाले. असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

अशाप्रकारे सावरकरांचे एक चरित्र म्हणजे भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत.अशा या थोर स्वातंत्र्यवीराचे वर्णन करताना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर श्री. रमण यांनी अतिशय मार्मिक शब्द वापरले आहेत. ते म्हणतात,”सावरकर म्हणजे मानवजातीला सत्यप्रकाश दाखवणारा एक अत्यंत तेजस्वी आणि जातिवंत हिरा आहे.”

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment