सूर्य उगवला नाही तर निबंध Surya Ugavala Nahi tar

सूर्य उगवला नाही तर निबंध Surya Ugavala Nahi tar

सूर्य उगवला नाही तर निबंध Surya Ugavala Nahi tar

सूर्य उगवला नाही तर….. ही कल्पनाच मन शहारुन टाकणारी आहे. खरे तर दररोज सूर्य उगवत नसतो. तो आहे त्याच ठिकाणी असतो.आपली पृथ्वी त्या भोवती फिरत असते. त्याभोवती फिरता-फिरता स्वतःभोवती फिरते. म्हणून सूर्याचे भासमान सूर्योदय आणि सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळतात. असे असले तरी सूर्य हा पृथ्वीवरच्या जीवनाचा जनक आहे. सूर्य हा पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा असा पिता आहे की त्याच्याशिवाय पृथ्वीवरील जीवन ही कल्पना आपण करू शकत नाही.

सूर्य पंचमहाभूतांपैकी अतिशय महत्त्वाचा शक्तिशाली आणि चैतन्यदायी भाग आहे.सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे.पृथ्वीवर जी काही उर्जा आहे ती सूर्याचीच देणगी आहे. सूर्य उगवला नाही तर ना शक्ती राहील ना चैतन्य राहील. पृथ्वीवरील जीवन हे दगडाप्रमाणे जड होऊन जाईल, निष्प्राण होऊन जाईल.

पंच महाभूते

सूर्य जर उगवलाच नाही तर दिवस नसेल.सर्वत्र काळ्याकुट्ट अंधकाराने भरलेली भयानक रात्र असेल. ही रात्र इतकी भयावह असेल की ती पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची काळरात्र ठरेल. मानवाने तयार केलेले विविध प्रकारचे ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प हळूहळू बंद पडतील. त्यामुळे कुठेही लाईट नसेल इंधन हळूहळू संपून जाईल. इंधन संपल्यामुळे प्रकाश संपून जाईल आणि प्रकाश संपल्यावर जीवन नष्ट होईल.

सूर्यामुळे सर्व वनस्पतींचे प्रकाश संश्लेषण घडून येते.वनस्पती अन्न तयार करतात. वनस्पतींना प्राणी, माणसे खातात आणि माणसाचे व प्राण्यांचे जीवन सुखकर होते. सूर्य नसेल तर हळूहळू सर्व झाडे पिवळी पडतील.त्यांच्यातील अन्न घटक संपून जाईल.अन्नघटक संपल्यामुळे फक्त पाणी आणि जमिनीतील मूलद्रव्य शोषण करून झाडे टिकणार नाहीत.ती मरायला सुरुवात होईल.सूर्य उगवलाच नाही तर, सूर्यप्रकाशाच्या साह्याने होणारी प्रकाश संश्लेषण क्रिया पृथ्वीवर कुठेही होणार नाही.प्रकाश संश्‍लेषण क्रिया मधून बाहेर पडणारा प्राणवायू बाहेर येणे बंद होईल. पृथ्वीवर कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रचंड प्रमाण वाढेल. ऑक्सिजन संपत चालल्यामुळे प्रचंड गुदमरल्यासारखी अवस्था होईल. प्राण्यांचे जीव यामध्ये पटापटा जातील. कोणत्याही युद्धाशिवाय प्रचंड प्राणहानी होईल. या प्राण्यांमध्ये माणूसही असेल.

सूर्य उगवलाच नाही तर प्रकाशामुळे तयार होणारे जीवनसत्व तयार होणे बंद होईल. डी जीवनसत्व अभावी माणसाच्या शरीरात कितीही कॅल्शियम असले तरी त्याला उभे राहता येणार नाही. इतकी त्यांच्या हाडांची अवस्था बिकट होईल. माणूस हा उभा राहू शकणार नाही. डी जीवनसत्वामुळे सर्व प्राण्यांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होते. प्रतिकार क्षमता निर्माण होण्याची प्रक्रिया बंद झाल्याने पटापटा प्राणी आणि माणसे मरतील .

सूर्य उगवलाच नाही तर…. पाण्यापासून बाष्प तयार होणार नाही. त्यामुळे ढगांची निर्मिती होणार नाही. वारे सुटणार नाहीत.पाऊस पडणार नाही. कोणताही ऋतू असणार नाही. परिणामी पृथ्वीवरील जीवन फार थोड्या अवधीत नष्ट होईल.सूर्य उगवला नाही तर …..पहाट होणार नाही.पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येणार नाही. कोंबड्याचे आरवणे ऐकायला येणार नाही. पहाटेची भक्ती गीते कोणीही ऐकणार नाही. दिवस नसल्याने कामगारांना कामावर जाता येणार नाही. शेतकऱ्यांना शेतात जाता येणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाही. बस, रेल्वे, विमाने सर्व प्रकारची वाहतूक यंत्रणा ठप्प होईल.

सूर्यामुळे पृथ्वीवर उबदार वातावरण राहते.परंतु सूर्य नसेल तर पृथ्वीवरील हे उबदार वातावरण नष्ट होईल. सर्वत्र थंडीचा जोरदार कडाका होईल. तापमानाच्या नीचांकी पातळीचे भयावह विक्रम होतील.शीतयुग पुन्हा अवतरेल आणि त्यामध्ये संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होऊन जाईल.

पावसाळ्यामध्ये एखाद्या दिवशी जर सूर्य ढगाळ वातावरणामुळे दिसला नाही. तर आपला जीव कासावीस होतो. पण सूर्य उगवला नाही तर काय होईल. याची फक्त कल्पनाच केलेली बरी.सूर्य उगवला नाही तर…. माणसाला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधावा लागेल. आजच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा विचार करता असा ग्रह शोधणे मानवाला अजूनही अशक्य कोटीतील बाब आहे. त्यामुळे असे होणे शक्य नाही. चीनमध्ये एक सूर्य बनवण्याचा प्रयोग झाला आहे. अशा प्रकारचे प्रयोग जगभर करावे लागतील आणि सूर्याची जागा भरून काढावी लागेल.

सूर्याचे किरण पृथ्वीवर पोहोचायला साधारणता पाचशे सेकंद लागतात. अर्थात ते पृथ्वीवर सतत असतात. काही भागात नसतात. त्या ठिकाणी रात्र असते. ज्या भागात असतात त्या ठिकाणी दिवस असते इतकाच फरक असतो.

माझी वसुंधरा माझी जबाबदारी निबंध Mazi Vasudhara Mazi Jababdari

सूर्याला समानार्थी शब्द मित्र असा आहे. मित्र म्हणजे सूर्य. सूर्य हा असा मित्र आहे की तो नसेल तर पृथ्वीचा मित्र हरवेल आणि या मित्राशिवाय पृथ्वी जगणार नाही.थोडक्यात सांगायचे तर, माणसाला जितकी हवेची, पाण्याची आवश्यकता आहे. तितकीच सूर्याच्या ऊर्जेची आवश्यकता आहे. सूर्य उगवलाच नाही तर जीवन संपेल आणि पृथ्वीचे अस्तित्व हे एखाद्या निष्प्राण ग्रहासारखे होऊन जाईल.

प्रदूषण एक गंभीर समस्या Pradushan Ek Gambhir Samasya

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment