मराठी एक राजभाषा भाषण Marathi Ek Rajbhasha Bhashan

मराठी एक राजभाषा भाषण Marathi Ek Rajbhasha Bhashan

मराठी एक राजभाषा भाषण Marathi Ek Rajbhasha Bhashan

लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य बोलतो मराठी

असे मराठी बोलणारा… मराठी भाषा मातृभाषा असणारा महाराष्ट्रीय माणूस सातत्याने आपल्या मनामध्ये गुणगुणत असतो.कारण मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे.दरवर्षी आपण कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा करत असतो. मराठी भाषा ही सुमारे 2200 वर्षांचा इतिहास असलेली ….एक ऐतिहासिक समृद्ध वारसा लाभलेली भाषा आहे. ही भाषा मराठी माणसांचा एक अस्मितेचा मानबिंदू आहे.

मराठी असे आमुची मायबोली
जरी आज राजभाषा नसे

असे एकेकाळी कवी माधव जुलियन यांनी म्हटले होते.१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून “१ मे” हा दिवस  मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी ‘मराठी राजभाषा अधिनियम १९६४’ सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला.

कवी मुकुंदराज आणि ज्ञानेश्वरांपासून मराठी भाषा ही साहित्याने अलंकृत झालेली एक समृद्ध आणि वैभवशाली परंपरा असलेली भाषा आहे. मराठी भाषेत वारकरी संतांनी खूप मोठ्या प्रमाणात साहित्यरचना केलेली आहे. कवी मुकुंदराजांचा विवेकसिंधू ,संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थदीपिका,महानुभाव पंथाचा ग्रंथ लीळाचरित्र मराठीत आहे.

महाराष्ट्रात एकेकाळी सुलतानांच्या गुलामगिरीत राहिलेल्या तत्कालीन लोकांनी मराठी भाषा ही जनमानसामध्ये जिवंत ठेवली. संत महात्म्यांनी तिला वाङ्मयामध्ये अतिशय मोलाचे स्थान दिले. छत्रपती शिवरायांनी सुद्धा मराठी भाषेमधून आपला पत्रव्यवहार सुरू केला. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये फारसी, अरबी भाषांमधून पत्र व्यवहार होत असे. परंतु छत्रपती शिवरायांनी हा लौकिक मराठी भाषेला प्राप्त करून दिला. राजव्यवहारकोश या ग्रंथाची रचना मराठी भाषेत करून मराठी भाषेला राज्य व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून दिले. स्वराज्य हवे तर स्वभाषा हवी असा जणू काही कानमंत्र संपूर्ण महाराष्ट्रालाच छत्रपती शिवरायांनी त्या काळात घालून दिला.

पुढे भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत खितपत पडलेला असताना सुद्धा महाराष्ट्रातील समाज सुधारकांनी आपले वांङ्मय मराठी भाषेत निर्माण करून मराठी भाषेला अधिकच ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. ज्ञानप्रकाश,केसरी, सुधारक,सकाळ,नवाकाळ , पुढारी अशा अनेक वृत्तपत्रांनी मराठी भाषेचा गौरव वाढवला. महात्मा फुले यांनी समाज सुधारणा करत असताना मराठी भाषेमध्ये लोकांच्या भाषेमध्ये ग्रंथ निर्मिती तयार केले आणि सामान्य सामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये लेखन केले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला लिहून मराठी भाषा ही कशी धारदार आहे हे दाखवून दिले.

आज मराठी ही आपली राजभाषा आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बोलली जाणारी मराठी भाषा ही महाराष्ट्रीय माणसाचा एक अस्मितेचा मानबिंदू आहे. गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू अशा राज्यांमध्ये सुद्धा मराठी भाषा बोलली जाते. जगामधील दहाव्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी भाषा संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे.

मराठी भाषेचा इतिहास हा अतिशय प्रेरणादायी असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नाणेघाटामध्ये मराठी भाषेत लिहिलेला शिलालेख आढळतो. त्याचप्रमाणे गोमटेश्वर येथे सुद्धा मराठी भाषेमध्ये असलेले शिलालेख मराठी भाषेला ऐतिहासिक वळण देतात.

छत्रपती शिवरायांच्या काळापासून मराठी भाषा पेशव्यांच्या काळात सुद्धा दरबारी भाषा म्हणजेच राजभाषा म्हणून ओळखली जात होती. संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचे प्राबल्य मराठ्यांचे साम्राज्य निर्माण झाले, तेव्हा मराठी भाषेला एक वेगळाच सुवर्णकाळ प्राप्त झाला होता.

आधुनिक काळातील वाङ्मयामध्ये कवी केशवसुतांपासून कुसुमाग्रजापर्यंत असलेल्या प्रत्येक कवींनी आणि साहित्यिकांनी मराठी भाषेला एक सुंदर आणि दैदिप्यमान वारसा निर्माण करून दिलेला आहे.

१ मे १९६० पासून मराठी भाषा ही अधिकृत महाराष्ट्राची राजभाषा झाली आणि मराठी भाषिकांचा आनंद अगदी उच्च श्रेणीवर पोहोचला. आज मराठी भाषेचे महत्त्व पाहिले तर मराठी भाषा राजभाषा म्हणून अतिशय शोभून दिसत आहे.

मराठी एक राजभाषा असल्याने तिचे महत्व महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यालयापासून तर मंत्रालयापर्यंत सर्व दूर पोहोचलेले आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या नसानसात भिणलेली भाषा आहे.

मराठी ही अभिजात भाषा असून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या मदतीने केंद्र सरकारकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा असा एक प्रस्ताव दिलेला आहे. आजही जरी त्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नसली तरीसुद्धा मराठी भाषा ही अभिजातच आहे. हे महाराष्ट्राच्या मराठी भाषिकांनी काळाच्या ओघात शतकानू शतके सिद्ध केले आहे.

आपण सर्व मराठी भाषिक मंडळी मराठी भाषेचा हा दैदिप्यमान वारसा जिवंत ठेवण्यास नक्कीच समर्थ आहोत. या मराठी भाषा दिनानिमित्त आपण सर्वांनी मराठी भाषा ही भविष्याची ज्ञानभाषा राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत.

मराठी भाषा ही महाराष्ट्राचा सर्वोच्च असा मानबिंदू आहे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये असलेला एक ज्वलंत हुंकार आहे. आपण तो जपला पाहिजे, जोपासला पाहिजे आणि पुढील पिढ्यांसाठी आपण संवर्धित केला पाहिजे.

मराठी एक राजभाषा भाषण Marathi Ek Rajbhasha Bhashan

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment