मराठी भाषा दिन Marathi Bhasha Din

मराठी भाषा दिन Marathi Bhasha Din

मराठी साहित्यातील दैदीप्यमान रत्न अशी ख्याती असणारे कवी, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज होत. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या साहित्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या संस्कृती क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान दिले. कुसुमाग्रजांच्या या योगदानाला अनुलक्षून महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी२०१३ पासून मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ सुरू केला. एक मात्र खरे की मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यामध्ये गल्लत होण्याची शक्यता आहे.१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून “१ मे” दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज हे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे आणि मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावणारे लेखन करणारे एक प्रतिभावंत साहित्यिक होते. कुसुमाग्रजांचे साहित्य म्हणजे मराठी वागण्यातील उच्चकोटीचे वैभव किंवा संपताच आहे असे म्हणावे वाटते. मराठी साहित्याला दुसरे ज्ञानपीठ पारितोषिक कुसुमाग्रजांनी मिळवून दिले. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये स्वैर मुशाफिरी करून सुद्धा त्यांचा मूळ पिंड हा कवीचा होता.

राष्ट्रीय विज्ञान दिन वर निबंध 28 February National Science Day

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपण सर्वजण मराठी भाषा दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करीत असतो. मराठी भाषा ही प्राचीन समृद्ध आणि गौरवशाली परंपरा असलेली भाषा आहे. सातवाहन राष्ट्रकूट आणि अनेक मराठी राजे यांनी मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला इतिहासकारांनी केलेल्या संशोधन आणि अभ्यासानुसार दोन ते अडीच हजार वर्षांपासून मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या खुणा महाराष्ट्र आणि देशभर आढळून येतात. अडीच हजार वर्षांच्या ऐतिहासिक कालखंडामध्ये अनेक संतांनी, साहित्यिकांनी, कलावंतांनी, संशोधकांनी आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये मराठी बोलणाऱ्या देणाऱ्या वाचणार्‍या सर्वसामान्य माणसांनी सुद्धा मराठी भाषा समृद्ध करण्यात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे.

मराठी भाषा गौरव दिन

संत चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथाने मराठी भाषेला आपली धर्मभाषा मानले. महानुभव पंथाची वांङ्मय निर्मिती ही मराठी भाषेत झाली आहे.तर संत ज्ञानेश्वरांनी “माझा मराठीचा बोलु कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके” अशा शब्दात मराठी भाषेचे मोठेपण मराठीजनांना तेराव्या शतकामध्ये सांगितले.

एकेकाळी संस्कृत भाषा याची भारतामध्ये ज्ञानभाषा म्हणून आपली भूमिका निभावत होती. त्यानंतर मराठीसारख्या भाषेमध्ये मुकुंदराज,संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ, संत रामदास, संत तुकाराम, संत नामदेव यासारख्या संतांनी फार मोठं वांङ्मय मराठी भाषेत निर्माण करून मराठी सुद्धा ज्ञानभाषा आहे हे दाखवून दिले. संस्कृत भाषेला महत्त्व दिले जात असताना सुद्धा संत एकनाथांनी,” संस्कृत देवे केली आणि मराठी काय चोरापासून झाली?” असा रोकडा सवाल त्याकाळात विचारला होता.

एकेकाळी कवी माधव ज्युलियन यांनी “मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे” असे म्हटले होते परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्र हे राज्य स्थापन झाले 1 मे 1960 पासून महाराष्ट्राची राजभाषा मराठी झाली.

मराठी भाषेविषयी बोलताना कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात,
“हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू।
वसे आमचा मात्र हृदय मंदिरी।
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे ।
हिला बैसवू वैभवाच्या शिरी ॥”

कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषेबद्दल कृतज्ञतापूर्वक बोलतात. आम्ही मराठी भाषेचे मराठी पुत्र आहोत. मराठी आमच्या हृदयामध्ये आहे. मराठीला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू आणि मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवू असे म्हणून मराठी जनांचा स्वाभिमान हा कसा सार्थ आहे. असेच कुसुमाग्रज आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला सांगू पाहतात.

कविवर्य सुरेश भटांनी मराठी भाषेचे गौरव लिहिले आहे ते म्हणताना प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहात नाही.
” लाभले आम्हास भाग्य बोलतो।
मराठी हलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥”

मराठी भाषेचे हे गौरव गीत ज्या कलाकारांनी गायले आहे, त्या कलाकारांना शतशः धन्यवाद द्यावेत आणि हे गीत पुन्हा पुन्हा ऐकावे आणि धन्य व्हावे.

आजची मराठी भाषा ही ज्ञानसंपन्न ज्ञानभाषा आहे. मराठी भाषेबद्दल कोणताही न्यूनगंड मनात बाळगण्याची गरज नाही. मराठी भाषा बोलताना कोणताही कमीपणा वाटणे हे आपल्या खालच्या दर्जाच्या मानसिकतेचे लक्षण आहे. मराठी भाषेतील मुकुंदराजांपासून ते वेगवेगळ्या कालखंडातील कोणतेही मराठी साहित्य वाचले तर आपल्या लक्षात येईल की मराठी भाषेमध्ये प्रचंड शक्ती आहे.मराठी ही केवळ बोलण्याची भाषा नसून एक साहित्याची आणि ज्ञानभाषा आहे. धर्मभाषा सुद्धा आहे. आणि खरे तर मराठी भाषा ही अभिजात दर्जा असणारी भाषा आहे.

जगामधील दहाव्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख आज केला जातो. तो प्रत्येक मराठी भाषिकांसाठी आणि महाराष्ट्रीय माणसासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.

संगणक आणि मोबाइल यामध्येसुद्धा मराठी भाषा अतिशय चांगल्या प्रकारे वापरता येते. आंतरजालावर कुठेही जात मराठी भाषा वापरण्यास काहीच अडचण येत नाही. ऑनलाइन व्यवहारांमध्ये सुद्धा मराठी भाषा हळूहळू पाऊल टाकत आहे. त्याचप्रमाणे एटीएम सारख्या बॅंकांच्या मशीनवर सुद्धा मराठी भाषा वापरली जाते. महाराष्ट्रामध्ये तालुका आणि जिल्हा न्यायालयाचे काम मराठी भाषेतून चालते मराठी भाषेमध्ये दर वर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. मराठी भाषेत उपलब्ध असणारे कोश वांङ्मय ही जगातील कोणत्याही भाषेइतके समृद्ध आणि विशाल आहे.

भारत देशांमध्ये सर्वाधिक ग्रंथालय महाराष्ट्रात आहे मराठी ही ज्ञानभाषा आणि न्याय व्यवहाराची भाषा बनवण्यामध्ये निश्चितच आपण यशस्वी झालो आहोत. त्यामुळे मराठीबाबत न्यूनगंड बाळगणे हे अत्यंत चुकीचे आहे. इंग्रजीसारख्या भाषेचे महत्व कमी लेखून चालणार नाही आणि मराठी भाषेचे महत्व आपल्या पद्धतीने आपण वाढवले पाहिजे कारण ती आपली माय मराठी मातृभाषा आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment