रक्षाबंधन वर मराठी निबंध awesome essay on rakshabandhan in Marathi

रक्षाबंधन वर मराठी निबंधawesome essay on rakshabandhan in Marathi

रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीने जगाला दिलेला फार मोठा उत्सव आहे. जगभरात या सणाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. भाऊ आणि बहिणीच्या  नात्याला अधिक सौंदर्य देणारा हा सण आहे. पवित्रता वाढविणारा सण आहे .हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेला हा सण येतो. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी समुद्रकिनाऱ्या लगत राहणारे लोक समुद्राला नारळ अर्पण करतात.समुद्राची पूजा करतात.

श्रावण महिना म्हणजे सण आणि उत्सवाच्या आनंदाची खूप सुंदर अशी भेट देणारा सण आहे.  या महिन्यातील नागपंचमीच्या सणानंतर बरोबर दहा दिवसांनी म्हणजे पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण येतो. सासुरवाशीण नवविवाहिता यांना आपल्या माहेरी जाण्याची, आपल्या भावाला राखी बांधण्याची संधी भेटते.

पावसाळा सुरू झाला की आषाढ महिना संपवून श्रावण महिना केव्हा येतो असे प्रत्येक बहिणीला होते. कारण श्रावण महिन्यात तिचा आवडता सण रक्षाबंधन असतो. रक्षाबंधन या सणाला नारळी पौर्णिमा,  राखी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा असेही म्हणतात. वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असला तरी या सणाचे  महत्त्व आगळेवेगळे राहते.

राखीच्या सणाच्या वेळी पंधरा दिवस अगोदर भारतीय सैन्यातील जवानांना संपूर्ण देशातून  महिला राखी पाठवतात. शाळेतील मुलीसुद्धा राखी घेऊन आपल्या शाळेच्या वतीने राख्या पाठवतात. सीमेवर आणि इतर ठिकाणी असलेले सर्व सैनिक ही राखी अतिशय आनंदाने आपल्या उजव्या हातावर बांधतात. त्यामुळे त्यांना अधिकच जोश येतो. आपल्या बहिणीने पाठवलेली राखी त्याला देशाच्या संरक्षणाची आठवण करून देते.

रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशी अतिशय उत्साह सर्वत्र निर्माण झालेला असतो. या उत्साहाने एक वेगळेच चैतन्य समाजात निर्माण होते. मनाला आलेली मरगळ झटकली जाते.

रक्षाबंधनच्या दिवशी सर्व  मुले मुली छान कपडे घालतात. आपल्याला आवडणारा छान स्वयंपाक केला जातो. छान रांगोळी काढतात.  पाठ ठेवतात. पाठावर भाऊ बसतो. औक्षणासाठी ताट तयार केले जाते. बहिण आपल्या भावाचे  औक्षण करते. बहीण त्याला ओवाळते. त्यानंतर सुंदरशी राखी बांधते. साध्या सुतापासून किंवा रेशीमपासून राखी बनवतात. याशिवाय चांदी, सोने अशा धातूंचा वापरही राखीसाठी केला जातो.  आपापल्या आवडीनुसार राखी घेतली जाते. नंतर भाऊ आपल्या बहिणीला सुंदर अशी भेट देतो. शिवाय पुढच्या वर्षी तुला कोणती भेट हवी असे विचारतो.

रक्षाबंधनला केवळ सख्ख्या बहिणीनेच भावाला राखी बांधायची असे काही नसते.चुलत, मावस,बहिण सुद्धा भावांना राखी बांधते.एवढेच काय तर आपण एखाद्या व्यक्तीला भाऊ मानून त्यालाही राखी बांधू शकतो. हे मानलेले नाते सुद्धा अधिकच सुंदर असते. त्यामुळे समाजामध्ये आणखी काही भाऊ बहिणींची नाती तयार होतात आणि सुरक्षितता वाढते.

राखी प्रेम, स्नेह यांचे बंधन आहे. भाऊ बहिणीच्या प्रेमळ आणि पवित्र नात्याचे प्रतिक आहे.राखी किती भारी घेतली यापेक्षा भाऊ बहिणीच्या नात्याची जोपासना किती केली याला महत्व आहे.

रक्षाबंधन हा सण तसा खूप प्राचीन आहे. देव आणि राक्षस यांचे मोठे युद्ध चालले होते.त्यावेळी इंद्राणीने  इंद्र राजाच्या हातामध्ये त्याचे संरक्षण व्हावे म्हणून धागा बांधला होता.हा धागा म्हणजे इंद्राचे रक्षण व्हावे म्हणून एक बंधन होते.तेव्हापासून हा सण साजरा होतो असे म्हणतात. अभिमन्यूचे रक्षण व्हावे म्हणून कुंतीने त्याला राखीचा धागा बांधला होता.

श्रीकृष्णाची एकदा बोट कापले,  तेव्हा द्रौपदीने आपल्याकडील वस्त्राने त्याची जखम बांधली होती. श्रीकृष्णांनीसुद्धा कौरवांनी द्रौपदीला त्रास दिला तेव्हा तिचे संरक्षण केले.

सन 1535 मध्ये मेवाडची राणी कर्णावती हिने हुमायून बादशाहाला राखी पाठवली होती. संग्रामसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा आश्रित बहादुरशहा याने राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला होता.  तेव्हा राणीने त्यावेळच्या हुमायुन बादशहाला पत्र पाठवले. त्याबरोबर राखी पाठवली आणि संरक्षणासाठी साकडे घातले. हुमायून बादशहाने सुद्धा ते राखीचे पवित्र बंधन म्हणून मेवाडच्या राणीचे संरक्षण केले.

म्हणजेच रक्षाबंधनचा सण धर्माच्या पलीकडे गेलेला सण आहे. याला धर्माचे बंधन नाही.  त्यामुळे तो सर्व धर्मियांनी एक मानवतेचा सण म्हणून साजरा करायला हरकत नाही. यात जर कोणता धर्म असेल तर तो फक्त मानवता होय.

भारतामध्ये फार पूर्वीपासून रक्षण होण्यासाठी हातामध्ये धागा बांधण्याची परंपरा आहे. तो धागा आपल्या बहिणीने बांधला तर भावाचे संरक्षण होणार व्यवस्थेचे संरक्षण करणार कारण तिने तिच्या भावाच्या संरक्षणासाठी परमेश्वराकडे मनोभावे प्रार्थना केलेली असते.

मला रक्षाबंधनचा सण खूप आवडता.या सणाला जी मजा येते ती इतर सणाला नाही. सर्व बहिणी आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी धडपडत असतात आणि भाऊ राखी बांधून घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यात एक वेगळीच मजा आहे.बहिणीला हवी ती भेट देण्यात भावांना वेगळा आनंद भेटतो. बहिणीलाही हवी ती भेट मागण्याचा आणि घेण्याचा हक्क असतो.

आपली बहिण व इतर सर्व स्त्रिया  या बहिणीप्रमाणे मानून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक पुरुष भाऊ म्हणून घेतो.  तेव्हा जे  सामाजिक सुरक्षिततेचे वातावरण तयार होते.ते  खुपच प्रेरणादायी असते.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment