माझी आई निबंध मराठी Essay on my mother in Marathi for class 10

माझी आई निबंध मराठी Essay on my mother in Marathi for class 10

ऐसी कळवळ्याची जाती,
करी लाभाविन प्रीती॥
– संत तुकाराम
जगामध्ये आई हे असं नाते आहे की त्या नात्यातून आई आपल्या मुलांवर जी प्रेम करते त्यात कुठलाही स्वार्थ नसतो. आई इतके निस्वार्थी प्रेम या जगात करण्याचे सामर्थ्य कुणालाही नाही.  असे म्हणतात आत्मा आणि ईश्वर या दोन्ही शब्दांची सुरुवातीची अक्षरे घेऊन आई हा शब्द तयार झाला असावा. इतकी आईची महती वर्णन केली जाते. परमेश्वराला प्रत्येक लहान बाळाची काळजी घेण्यासाठी जाता येत नाही, म्हणून त्याने आईला निस्वार्थ प्रेमाची जणूकाही गुरुदीक्षा दिली आहे.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
तिन्ही जगाचा स्वामी अर्थातच परमेश्वर हा अनादि, अनंत आहे. त्याचा कुणीही निर्माता नाही. म्हणजे त्याला आई नाही. आईविना तो एक प्रकारे भिकारी आहे असे कवीला म्हणायचे असावे. असे असले तरी आई हे नाते त्यानेच निर्माण केले आहे.
आपल्याला थोडीशी जरी वेदना झाली दुःख झाले तरी आपण आई गं असे म्हणतो.  इतकी आई आपलं सतत संरक्षण करीत असते. एखाद्या घारीप्रमाणे ती कुठेही असली; तरी तिचे लक्ष आपल्या मुलावर असते. आपले मूल मुलगा आहे की मुलगी आहे असा विचार तिचा नसतो.

आपल्या सर्वच मुलांवर आईसारखेच प्रेम करू शकते ही एक वेगळीच शक्ती आईकडे आहे. इतकेच काय तर जे मूल सर्वात अशक्त किंवा निर्बल असते.  त्याच्यासाठी तिचा जीव सतत तीळतीळ तुटत असतो.
आई मुळे आपल्याला हे सारे जग दिसते. आई आपल्याला जग दाखवते. आईच आपला गुरु असते. आई एखाद्या कल्पतरूप्रमाणे आपल्याला सर्व काही देते. आईकडे असलेला कळवळा आणि प्रेम याला उपमा नाही.आईच्या प्रेमाला उपमा नसते. आईचे प्रेम हे आईच्या प्रेमासारखेच असते.
आई आपल्या मुलांसाठी किती अपार कष्ट करते. नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटामध्ये असलेला बाळ जेव्हा जन्माला येतो; तेव्हा त्याला पाहण्यासाठी तिचे डोळे आतुरलेले असतात. त्याही अगोदर पोटात असतानाच  ती त्या बाळावर अनुपमेय असे प्रेम करते. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यासाठी किती किती करावे लागते हे आईलाच ठाऊक. आई इतके बाळासाठी कोणीही करू शकत नाही हेच खरे.

जोपर्यंत मूल चांगले चालत नाही, बोलत नाही, सुदृढ होत नाही तोपर्यंत आईचे आपल्या बाळावर प्रचंड लक्ष असते. त्या बाळाची काळजी घेण्यामध्ये आईचा सर्व वेळ जातो. एखाद्या परमेश्वराच्या भक्ताप्रमाणे त्या भक्ताचे जसे देवाकडे लक्ष असते; त्याच्याहीपेक्षा आईचे आपल्या बाळावर सदोदित लक्षात असते.

आई आपल्या बाळाला नवा देह देते. तो देह आईचा असतो.  नुसता देह देत नाही तर त्या देहाचे भरण-पोषण करून त्याला मोठे करते. संस्कारांची न संपणारी शिदोरी बाळाला देते.  स्वतः उपाशी राहून त्या बाळाला ती सर्व काही देते. वेळ पडली तर अक्षरशः भीक मागण्याचीही तिची तयारी असते.

जगातील सर्व भाषांतील कवींनी आईची महती वर्णन केली आहे.  अनेक कादंबरीकार आणि महाकवी आईची महती वर्णन करताना दिसून येतात. सानेगुरुजींसारखा मातृभक्त श्यामची आई सारखी पुस्तक लिहून आईचे गुणगान करतो. असे प्रत्येकालाच जमेल असे नाही. परंतु आईचे उपकार अनंत असतात. हे आपण जाणून असतो.प्रभू श्रीरामाची आई कौसल्या, श्रीकृष्णाची आई यशोदा, छत्रपती शिवरायांची आई जिजामाता आणि साने गुरुजींची आई यशोदा या जगप्रसिद्ध माता आहेत.

सकाळी उठल्यापासून आपल्या बाळाची चौकशी करून आई कामाला लागते.  आपल्या बाळाला काय खायला हवे याचा आधी विचार करते आणि मगच स्वयंपाकाला लागते. त्याचे अंघोळ कपडे घालणे,त्याला अभ्यासासाठी बसवणे, जेवण देणे, शाळेला पाठवणे हे करता करता तिचे प्रेम ओसंडून वाहत असते. जसा गाईला पान्हा येतो आणि ती त्या वासराला आंजारते गोंजारते त्याप्रमाणे आपल्या बाळाला जवळ घेऊन गोंजारत असते. आईचे प्रेम हे शब्दातून व्यक्त होते असे नाही तर तिच्या प्रत्येक कृतीतून ते व्यक्त होत असते.

एखाद्या दिव्याप्रमाणे वात्सल्य आणि माया ममतेचे तेल घेऊन स्वतःला जळता जळता आपल्या बाळाला प्रेमरूपी प्रकाश देते आणि संस्कार संपन्न बनवते. आपले मूल मोठे व्हावे आणि आपल्या संस्काराप्रमाणे त्याने वागावे त्याला कुणीही नावे ठेवू नयेत असे तिला वाटते.

आपले दुडुदुडु धावणारी मुल पाळण्यात असते तेव्हा त्या बाळासाठी ती अंगाईची गाणी म्हणते. त्याला समजू लागल्यावर कितीतरी गोष्टी सांगते. कितीतरी गाणी त्याच्यासाठी म्हणते. फक्त आपल्या दुधावरच नाही तर वाणीच्या संस्काराने ती आपल्या मुलाला भरवित असते.
जगभर अनेक शाळा, विद्यालय, विद्यापीठे आहेत परंतु आईच्या शिक्षणाचे संस्कारपीठ फक्त आपल्या घरातच उपलब्ध आहे. या संस्कार पीठामध्ये आईच्या शिक्षणाने मुल खऱ्या अर्थाने सुसंस्कारीत होते आणि शिकते. आईसारखे शिक्षण देण्याची क्षमता कोणत्याही शिक्षकांमध्ये उपलब्ध नाही.

प्रत्येकालाच आई असते. आईशिवाय कोणीच नसते. परंतु जेव्हा आई आपल्यातून जाते तेव्हा आईचे महत्व अधिकच कळते. सर्व नाती असतात परंतु आईचे नाते आईला काळाने आपल्या उदरात घेतले तरी नजर आणि अमर राहते. आई असताना आपल्याकडे सर्व काही आहे अशीच भावना असते. परंतु शरीराने जेव्हा ती नसते तेव्हा आपल्याकडील सर्वस्व नष्ट झाले की काय असे वाटते. इतके आईचे अस्तित्व आपल्यासाठी जीवन समृद्ध करणारे आहे.

अशी ही आई प्रेमाची साक्षात देवता आहे. वात्सल्याचा महासागर आहे. म्हणून तिला वात्सल्यसिंधू आई असे म्हणतात.

आई या शब्दाला जननी, माता, माई, जन्मदात्री,माऊली असे अनेक समानार्थी शब्द  मराठीत आहेत. परंतु त्यातील माऊली हा शब्द मराठी भाषेत आहे. या शब्दाला जगात तोड नाही. आई आणि माऊली एकच परंतु माऊली या शब्दाने तिचे केलेले वर्णन अनुपमेय असे आहे.

भारतीय संस्कृती मातृपूजा करणारी आहे. आईच्या शब्दावर चालणारी मुले कधीही मागे पडत नाहीत. म्हणून आईचा शब्द कधी मोडू नये; तिच्याशी वाद घालून आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करणे  म्हणज  मन दुखवण्याचा सारखे आहे.

मातृदेवो भव असे भारतीय संस्कृती म्हणते कारण भारतामध्ये आई-वडिलांच्या सारखे दैवत कोणतेही नाही असे मानतात. आई हे कोणत्याही तिर्थक्षेत्रापेक्षा महान असे तीर्थक्षेत्र आहे. आई वडिलांची सेवा करणारा भक्त पुंडलिक होता. त्याच्या सेवेने अमाप अशा पुण्याची संपत्ती निर्माण झाली. परमेश्वरावर भार झाला म्हणून त्याला हवे ते देण्यासाठी स्वतः परमेश्वर विठ्ठल होऊन युगे अठ्ठावीस आजही पंढरपुरात उभा आहे.

आईवडिलांची सेवा ही केवळ आपले कर्तव्य भावना म्हणून न करता त्याहीपलीकडे जाऊन त्यांच्या प्रेमाचा ऋणानुबंध ठेवून केली पाहिजे. आई-वडिलांना कधीही विसरू नका. विसरलात तर तुमच्या सारखे करंटे कोणीही नाही. जगातील सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरलात तरी चालेल; सगळी नाती विसरलात तरी चालेल; परंतु आईचे प्रेम आणि सेवा कधीही विसरू नका. कारण प्रेमच मानवी संस्कृतीचा सारांश आहे आणि हे प्रेम म्हणजे काय असतं हे आईने आपल्याला आपल्या जन्मापूर्वीच गर्भात असल्यापासून शिकवलेले आहे.

अनंत आकाशाचा कागद केला,सात महासागरांची शाई केली,  सर्वोच्च अशा हिमालयाची लेखणी केली तरीही आईची महती वर्णन करणे अशक्य आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment