विजयादशमी दसरा वर निबंध Vijayadashami Essay in Marathi

विजयादशमी दसरा वर निबंध Vijayadashami Essay in Marathi

Vijayadashami-Essay-in-Marathi

विजयादशमी  दसरा वर निबंध Vijayadashami Essay in Marathi

“दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा दसरा”
या सणाबाबत असलेली ही काव्यपंक्ती आपल्याला सांगून जाते की दसऱ्यासारखा आनंददायी असा कोणताच सण नसेल.इतके दसरा या सणाचे महत्व भारतीय जीवनामध्ये आहे.

दसरा हा सण अश्विन महिन्यामध्ये शुद्ध दशमीला असतो अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र घटस्थापना करून सुरू होते. दहाव्या दिवशी दसरा असतो. याच दिवशी दुर्गा मातेने महिषासुर राक्षसाला ठार केले.  नऊ दिवस नऊ रात्री हे भयानक युद्ध चालले होते. महिषासुरासारख्या राक्षसी शक्तीला नष्ट करून त्याच्या भ्रष्ट व्यवस्थेचा अंत करून देवीने विजय संपादन केला तो दिवस म्हणजे विजयादशमी दसरा होय.

अनंत चतुर्दशी व्रत व महात्म्य

नवरात्रामध्ये देवीची स्थापना करून मोठ्या प्रमाणात नवरात्रीचा सण संपूर्ण भारतामध्ये अतिशय आनंद आणि धुमधडाक्यात साजरा होत आला आहे.  अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाते. नऊ दिवस हा उत्सव चालतो आणि विजयादशमीला या सणाचा शेवट होतो.

विजयादशमीच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. रावणाच्या वधाने एका दुष्ट प्रवृत्तीचा अंत झाला. त्यामुळे हा दिवस अतिशय आनंदाचा समजला जातो.

हिंदू धर्मामध्ये जे साडेतीन मुहूर्त आहेत त्या शुभमुहूर्तांपैकी विजयादशमी अर्थात दसरा हा एक पूर्ण मुहूर्त आहे. या दिवशी अनेक नवीन गोष्टी लोक सुरू करतात. नवीन व्यवसाय सुरु करणे,खरेदी करणे, सोने खरेदी करणे,गाडी खरेदी करणे इत्यादी साठी हा दिवस शुभ समजला जातो.

व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या वह्यांची पूजा दसऱ्याच्या दिवशी करतात. विद्यार्थी आपल्या वह्या आणि पुस्तके यांची विद्या देवी सरस्वती म्हणून पाटीवर एक सरस्वतीचे चित्र काढून पूजा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा दसरा हा सण आणखीन आनंदाचा ठरतो.

गुरुपौर्णिमा निबंध मराठी

दसरा या सणाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांचे बॉयलर प्रदीपन असते. दसऱ्यानंतर पावसाळ्यात आलेले पीक काढतात. त्यामुळे ते दिवस सुगीचे दिवस समजले जातात.  खरा आनंद दसऱ्याच्या सणामुळे आणखी वाढतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर दरवर्षी दसरा या सणानंतर सीमोल्लंघन करण्याचे ठरवले.त्यानुसार स्वराज्यामध्ये दसऱ्याला शस्त्रास्त्रांची पूजा करून परमुलखात जाऊन युद्ध सुरू करण्याची परंपरा निर्माण झाली. त्यामुळे दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस असे म्हटले जाते.

दसर्‍याच्या दिवशी लोक ठिकाणी शहरांमध्ये शोभायात्रा काढतात. शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनही भरवले जाते. इतिहास कालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन पाहणे ही एक चांगली संधी जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी असते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध

दसऱ्याच्या दिवशी लोक पुरणपोळीचे मिष्ठान्न जेवण बनवतात. पुरणपोळी हा महाराष्ट्राचा खास पदार्थ आहे.

फार पूर्वीपासून या दिवशी राजे लोक युद्धाची सुरुवात करत. सीमोल्लंघन करणे असे त्याला म्हटले जाई.या दिवशी आपल्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांची पूजा करतात. याच दिवशी अर्जुनाने  शमीच्या वृक्षावरून  आपली शस्त्रास्त्रे पुन्हा बाहेर काढली. पांडवांचा अज्ञातवास संपला आणि त्यांनी कौरवांविरुद्ध लढण्यासाठी रणशिंग फुंकले.

दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या झाडाची पाने एकमेकांना सोने म्हणून वाटली जातात.  गावातील मंदिरासमोर एक आपट्याच्या झाडाची मोठी फांदी उभी केली जाते. त्याची यथाविधी पूजा केली जाते आणि मग ती पाने उपस्थित लोक तोडून घेतात.हे एक प्रकारचे सोने लुटण्याचा असते. त्यानंतर ही पाने एकमेकांना सोने म्हणून दिली जातात. देवाला वाहिली जातात.

आपट्याच्या झाडाची पाने का वाहिली जातात? याविषयी एक पौराणिक कथा सांगितली जाते.

फार प्राचीन काळी रामायणाच्या ही अगोदर भारतामध्ये वरतंतू नावाचे एक ऋषी राहत होते. ते आपल्या शिष्यांना गुरुकुल पद्धतीने ज्ञानदान करत होते.त्यांच्याकडे शेकडो शिष्य शिकण्यासाठी येत.ज्ञान मिळवत.विद्या मिळवत. आणि शेवटी त्यांना गुरुदक्षिणा देऊन विद्याच्या फलश्रुतीसाठी आशीर्वाद मागत.

गुरुदक्षिणा दिली की आपली ज्ञान आणि विद्या फळाला येईल अशी त्यामागे एक श्रद्धा आहे. वरतंतू ऋषींना एक शिष्य होता.  त्याचे नाव कौत्स. हा कौत्स एका गरीब आई-वडिलांचा मुलगा होता. त्याने वरतंतू ऋषींच्या आश्रमात राहून खूप काही विद्या मिळवली.

विद्या आणि ज्ञान मिळाल्यानंतर वरतंतू ऋषींच्या शिष्याने आपल्या गुरूंनी आपल्याकडे काही गुरुदक्षिणा मागावी असा हट्ट धरला.  परंतु कौत्साची स्थिती पाहून त्यांना काही गुरूदक्षिणा नको असे वाटले.  परंतु कौत्साच्या हट्टामुळे वरतंतू ऋषींनी त्याला 14 कोटी सुवर्णमुद्रा मला गुरुदक्षिणा दे म्हणून सांगितले.

वरतंतू ऋषीचे आशीर्वाद घेऊन कौत्स गुरुदक्षिणा अर्थात 14 कोटी सुवर्णमुद्रा मिळवण्यासाठी बाहेर पडला.  त्यावेळी अयोध्येमध्ये रघु नावाचा राजा राज्य करीत होता. रघु राजा अतिशय दानशूर म्हणून जगप्रसिद्ध होता. त्याच्याकडे जाऊन आपण सुवर्णमुद्रांची व्यवस्था गुरु दक्षिणेसाठी करावी असे कौत्साला वाटले.म्हणून तो अयोध्याला गेला.

रघुराजाच्या दरबारामध्ये कौत्स गेल्यानंतर त्याने चौदा लक्ष चौदा कोटी सुवर्ण मुद्रा यांची मागणी केली. दरबारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला काहीही न देता पाठवणे रघुराजाला नीती आणि धर्म संमत वाटत नव्हते. त्यामुळे त्याने कौत्साला 14 कोटी सुवर्णमुद्रा देण्याचे कबूल केले.

रघुराजाने नुकताच एक मोठा यज्ञ केला होता. या यज्ञामध्ये त्याने सारी संपत्ती दान करून टाकली होती. त्यामुळे त्याच्याकडे काही शिल्लक नव्हते. त्यामुळे त्याने देवांचा खजिनदार कुबेराकडे सुवर्णमुद्रांची मागणी केली. मात्र कुबेराने सुवर्णमुद्रा देण्यास सहमती दाखवली नाही.

त्यामुळे रघुराजाने स्वर्गावर आक्रमण करण्यासाठी सैन्याला आज्ञा दिली. ही वार्ता ऐकून इंद्र राजा घाबरला. त्याने अयोध्येच्या नगर वेशीजवळ असलेल्या आपट्याच्या झाडावर आकाशातून कोट्यावधी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडण्याची कुबेराला आज्ञा केली.त्यानुसार कुबेराने केले.

इंद्र राजाने रघुराजाला स्वप्नात सांगितले की नगर वेशीच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या झाडाला जवळ कोट्यावधी सुवर्णमुद्रा मी ठेवल्या आहेत. त्या तुला घे आणि आक्रमण करू नकोस.

दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना त्या आपट्याच्या झाडाचे जवळ सुवर्णमुद्रांचा पर्वतप्राय ढिग दिसला.  राजापर्यंत ही बातमी गेली. राजाने कौत्साला यातून तुला पाहिजे तेवढ्या सुवर्णमुद्रा घे असे सांगितले.  कौत्साने त्याला आवश्यक असलेल्या चौदा कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि तो गुरुदक्षिणा देण्यासाठी परंतु ऋषींकडे निघून गेला.

आपट्याच्या झाडाला जवळ शिल्लक असलेल्या कोट्यावधी सुवर्णमुद्रा रघुराजाने लोकांना नेण्यास सांगितले. लोकांनी अक्षरशः त्या सुवर्णमुद्रा मोठी झुंबड करून लुटलेल्या त्याबरोबर आपट्याची पाने सुद्धा नेली. लोकांना इतका आनंद झाला की त्यांनी सुवर्णमुद्रा आणि आपट्याची पाने एकमेकांना वाटली. तेव्हापासून आपट्याची पाने एकमेकांना सुवर्णमुद्रा म्हणून देण्याची प्रथा पडली आहे.

दसऱ्याच्या सणाच्या दिवशी आपट्याच्या झाडांच्या फांद्यांची मोठ्या प्रमाणात तोड होते. निसर्गाचे अपरिमित असे नुकसान होते. मग आपण हा सण साजरा करताना आपल्या परंपरांना फाटा दिला पाहिजे की काय असे वाटते.

पर्यावरणाचे रक्षण करावे म्हणून जगभरामध्ये किमान 33 टक्के वने असली पाहिजेत हे वास्तव आहे. त्यासाठी मला असे वाटते की या दिवशी प्रत्येक गावाने किमान शंभर आपट्याची झाडे लावली पाहिजेत.निसर्ग हा मोठा दाता आहे. परंतु निसर्गाचे नुकसान करणे योग्य नाही.

दसरा म्हणजेच विजयादशमी होय.या दिवशी आपल्यातील अज्ञान, अंधश्रद्धा, भेदाभेद, विविध प्रकारचे विकार यावर विजय मिळविण्याची आपण शपथ घेतली पाहिजे.  तसा संकल्प केला पाहिजे.

ज्या प्रेमाने आपण एकमेकांना आपट्याची पाने सुवर्ण मुद्रा म्हणून वाटतो, तितक्याच प्रेमाने निसर्गाचे संरक्षण केले पाहिजे आणि समाजातील प्रत्येक घटकाला मदत केली पाहिजे.

दसऱ्याला हिंदीमध्ये दशहरा असेही म्हणतात. दश म्हणजे दहा. दहातोंडे असलेल्या रावणाला प्रभू रामचंद्रांनी मारले म्हणून दसरा हे नाव विजयादशमीला शोभते.

देवीने दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला. म्हणूनही दशमीचा मुहूर्त विजयादशमी म्हणून ओळखला जातो.

विजयादशमीच्या दिवशी ठिकाणी रावणाचे पुतळे करून रावण जाळण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रावणाचा पुतळा जाळणे हे त्यामानाने सोपे काम आहे. परंतु आपल्यामधील विविध प्रकारच्या नकारात्मक प्रवृत्तींची या दिवशी जरा बेरीज करून विचारपूर्वक त्यांचा अंत करण्याची प्रतिज्ञा आपण केली पाहिजे असे मला वाटते.

दसरा सण संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरील जिथे जिथे हिंदू लोक आहेत. त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे या सणानंतर बरोबर वीस दिवसांनी दिवाळी येते.

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment