वदनी कवळ घेता Vadani kaval Gheta Shlok

वदनी कवळ घेता Vadani kaval Gheta Shlok

वदनी कवळ घेता Vadani kaval Gheta Shlok या तीन शब्दांनी सुरुवात असणारे दोन श्लोक मराठी भाषेमध्ये आढळतात. दोन्ही श्लोक अत्यंत अर्थपूर्ण असून त्या श्लोकांचा भावार्थ अतिशय सुंदर आहे. हा भावार्थ समजून घेत असताना या श्लोकांचा आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये आपण सहजगत्या वापर करू शकतो आणि आपल्यातील मानवी सहज स्वभावातील कृतज्ञता बुद्धी जागृत ठेवू शकतो.

वदनी कवळ घेता हा श्लोक कोणी लिहिला.

पहिला श्लोक वदनी कवळ घेता Vadani kaval Gheta Shlok सुप्रसिद्ध संत रामदास स्वामी यांचा आहे.

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥

वदनी कवळ घेता श्लोक भावार्थ

हा श्लोक सर्वांना माहित आहे या श्लोकाने महाराष्ट्रातील सर्व हरिभक्त परायण हिंदूधर्मीय लोक सर्वसाधारणपणे जेवणाच्या पंक्तीची सुरुवात करत असतात. अन्नदाता परमेश्वर हा आपला परमपिता असल्याने त्याचे स्मरण जेवणाच्या वेळी करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक आध्यात्मिक भाव या श्लोकातून प्रकट होतो. आता परमेश्वर तर प्रत्येकाला सहज भेटत नाही.

धर्मशास्त्राप्रमाणे परमेश्वर प्राप्तीसाठी विविध साधने शास्त्रकारांनी आणि साधुसंतांनी वर्णन केलेली आहे. ही सर्वच साधने सर्वसामान्य माणसाला सोपी वाटत नाहीत.असे असले तरी मनुष्यप्राणी त्या परमपिता परमेश्वराचा भक्त या नात्याने काही ना काही त्याच्याप्रती कृतज्ञता सातत्याने व्यक्त करत आला आहे. परमेश्वर प्राप्तीची साधने कठीण आहेत.परंतु त्याच्याप्रती ऋणांकित राहून कृतज्ञता व्यक्त करणे हा मानवाचा सहज स्वभाव मानला पाहिजे. आणि हे सहज होऊ शकते.

परमेश्वराचे नाम घेणे हे काही फार कष्टाचे आणि आर्थिक दृष्टीने न परवडणारे काम अशी काही गोष्ट नाही. नाम हे फुकाचे म्हणजे सहज घेण्यासारखे आहे. त्यासाठी कुठली किंमत मोजावी लागत नाही. फक्त भाव लागतो. असे समर्थ रामदासांना या ठिकाणी म्हणायचे आहे.

अन्न हे पूर्णब्रह्म असून आपले जीवन व्यवस्थित चालावे, शरीराची धारणा व्हावी,यासाठी त्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण निसर्गाचे अपत्य आहोत.हा निसर्ग आपल्याला एका दात्याच्या भूमिकेतून सतत अन्न व इतर वस्तू देत असतो.त्याच्याप्रति आपण कृतज्ञता ठेवली पाहिजे.हा एक प्रकारचा यज्ञच आहे. आपण निसर्गाकडून घ्यावे आणि निसर्गाच्याप्रती पुन्हा काही देणे लागतो म्हणून केवळ सद्भाव प्रगट न करता पर्यावरणाची जपणूक करावी. असाही एक अर्थ यामधून निघतो असे माझे मत आहे.

वदनी कवळ घेता सारखा दुसरा श्लोक

दुसरा श्लोक विद्यार्थीवर्गाच्या जास्त परिचित असलेला असा आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व सानेगुरुजी यांनी अनेक धडपडणारे कार्यकर्ते निर्माण केले. त्यांच्या जाण्यानंतरही अनेक सेवाभावी आणि सेवाव्रती कार्यकर्ते महाराष्ट्राला सानेगुरुजी कथामालेच्या माध्यमातून खूप काही देत आले आहेत. आणि साने गुरुजींचे कार्य सर्वसामान्य माणूस आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते करत आले आहेत.

सानेगुरुजी कथामातेलेचे कार्यकर्ते हा श्लोक जिथे जाईल तिथे सर्व विद्यार्थ्यांना अतिशय आवडीने सांगून त्या श्लोकाचा प्रचार करत आलेले आहेत. श्लोक पुढीलप्रमाणे:-

वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे |
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे।
कृषीवल-कृषीकर्मी राबती दिनरात |
श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात |
करुनी स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल |
उदर भरण आहे चित्त होण्या विशाल ||

हा श्लोक कोणी लिहिला?

ही रचना सानेगुरुजी कथामाला कार्यकर्ते रामचंद्र इनामदार यांची आहे. सानेगुरुजी कथामालेच्या संस्कार शिबिरांमध्ये सर्वधर्मिय मुले असत. त्यांना म्हणण्यासाठी १९७१ साली खालापूर इथे कथामाला शिबीर होते, तेंव्हा हा श्लोक त्यांनी रचला. सानेगुरुजी कथामालेमार्फत या श्लोकाचा प्रसार, प्रचार महाराष्ट्रभर शाळाशाळांतून व विद्यार्थी वसतिगृहातून झाला.

आपण अन्न घेत असताना आपल्या मातृभूमीचे स्मरण ठेवावे. आपली मातृभूमी आपल्यासाठी कायमच वंद्य आहे. या वंदनीय आणि प्रातःस्मरणीय मातृभूमीचे स्मरण आपल्यातील देशभावना निश्चितच जागृत ठेवेल. आणि सहज आपल्या देशबांधवांचे स्मरण आपण बंधुत्वाच्या नात्याने करावे.

आपले शेतकरी बांधव शेतामध्ये राबत असताना आपल्या देश बांधवांकडून आपल्या कष्टाचे स्मरण व्हावे; अशी कुठेतरी अन्नदाता या भूमिकेतून मनोभूमिका दिसून येते. आणि हे काही चुकीचे नाही, योग्यच आहे. आज शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती पाहिली तर आपल्याला या अन्नदात्याबद्दल करुणा उत्पन्न होते. परंतु शेतमालाच्या थोड्याशा जादा भावाबद्दल आपण कुरकुर करताना दिसून येतो. शेतमालाचा भाव हा शेतकरीभावाच्या दृष्टीने अतिशय निर्णयाक ठरतो.

आपले शेतकरी बांधवच नव्हे तर अनेक ठिकाणी काम करणारे कामगार किंवा श्रमिक या वर्गाबद्दल आपल्याला या श्लोकामधून कृतज्ञता व्यक्त करता येते.

आपण जे अन्न सेवन करत असतो त्यामध्ये असणारे कृषीवल म्हणजे शेतकरी बांधवांचे कष्ट किंवा आपण ज्या विविध वस्तूंचा वापर करत असतो त्या निर्माण करण्यामागे असणारे श्रमिक वर्गाचे कष्ट यांचे स्मरण सहजगत्या हा श्लोक म्हणताना होत असते.

आपण ज्या सेवा उपभोगतो त्या निर्माण करण्यामागे असणाऱ्या कष्टकऱ्यांचे कष्ट आपण आठवावे. आपण कृतज्ञता व्यक्त करावी आणि मोठ्या उदार अंतःकरणाने त्यांच्याप्रति मानवतेचा सद्भाव ठेवून ऋणांकित राहावे. म्हणजेच त्यामुळे आपले चित्त किंवा मन मोठे होण्यास मदत होईल.

वदनी कवळ घेता Vadani kaval Gheta Shlok

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी निबंध Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari

  • श्री.तुकाराम गायकर
Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment