मुलांसाठी खेळण्यांचे महत्त्व Toys for kids

मुलांसाठी खेळण्यांचे महत्त्व Toys for Kids

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही छंद असला पाहिजे छंदांमुळे माणसाचे जीवन हे अधिक आनंददायी आणि मानसिकदृष्ट्या निरोगी होते.माणसाला आपल्या अभिरुची प्रमाणे जेव्हा आपल्या अंतः प्रेरणेला वाट करून देता येते; तेव्हा तो अधिक सुखी किंवा समाधानी असतो. प्रत्येक लहान मुलाला खेळाची अतिशय आवड असते.

प्रत्येक गोष्टीत खेळ शोधत असते. त्याला काहीही द्या. ते त्याबरोबर खेळते. ते प्रत्येक गोष्ट खेळायला मागते. कारण प्रत्येक गोष्टीबरोबर आपण खेळले पाहिजे ; असे त्याचे मन त्याला प्रेरणा देत असते. म्हणून लहान मुलांना जास्तीत जास्त खेळणी दिली; की ती खुश होतात.

नंतर लहान मुले विशिष्ट खेळण्यात बरोबर जास्त खेळतात.तिच तिच खेळणी खेळतात. काही खेळणी ती बाजूला करतात आणि ठराविक खेळण्याबरोबर खेळत असतात. यातून आपण त्यांच्या अंतःप्रेरणेचा शोध घेऊ शकतो. हा शोध मात्र निरीक्षण पूर्वक आणि काळजीपूर्वक घेतला पाहिजे. कारण त्यातून पुढे आपल्याला त्या मुलाचा छंद कोणता असणार आहे याचा बराचसा स्पष्ट अंदाज घेता येतो.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

मराठी भाषेमध्ये एका अतिशय सुंदर म्हण आहे; ती म्हणजे,” मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.” आता पाळण्यातले पाय पाहून म्हणजेच त्या मुलाच्या आवडीनिवडी पाहून आपण त्याला त्याच्या आवडीनुसार पुढे नेऊ शकतो. अर्थातच त्याच्या आवडीनुसार त्याचा स्वभाविक कल जोपासला, म्हणजेच एक प्रकारे त्याच्या छंदांना आपण वाट करून दिल्यासारखे होईल.मात्र सावधपणे हे काम केले पाहिजे.

सध्याच्या डिजीटल जगामध्ये सर्वत्र विविध प्रकारच्या खेळण्याची रेलचेल झालेली आहे. आज ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा माध्यमांचा उपयोग करून घरबसल्या खेळणी मागवू शकतो आणि आपल्या मुलाचे छंद जोपासला मदत करू शकतो.

खेळण्यांची निवड

खेळणी निवडताना मात्र आपण काळजीपूर्वक निवडली पाहिजेत. कारण आपण आपल्या वयानुसार मुलांचा विचार करून जमणार नाही तर आरोग्यदृष्ट्या आणि कुठलाही धोका निर्माण होणार नाही. अशा प्रकारचे खेळणे त्याच्या समोर ठेवले पाहिजे किंवा निवडली पाहिजेत.मुले खूप जिज्ञासू असतात आणि मुलांच्या जिज्ञासापूर्वक प्रश्नांचा विचार केला, तर आपण थक्क होऊन जातो,असे प्रश्न मुले विचारतात.

जे प्रश्न कोणत्याही माणसाला मोठेपणी कधीही पडू शकणार नाही असे प्रश्न त्याला लहानपणी पडलेले असतात. खरेतर हे ज्ञानार्थी प्रश्न पडणे हे मानव जातीच्या अतिशय प्रगत मेंदूचे हे एक असामान्य वैशिष्ट्य आहे. ज्या मुलाला खेळणी आवडत नाहीत असे बालक या जगात शोधूनही सापडणार नाही. मुलांचे प्रश्न सुरुवातीला निश्चितच खेळण्यांविषयी असतात.

खेळण्यातून शिक्षण

कोणतेही शिक्षण हे मुलांना खेळता खेळता मिळाले पाहिजे.क्रिडन पद्धती पूर्णपणे खेळणे या विषयावर आधारित आहे. मुले खेळता खेळता जितके शिकू शकतात तितके ते कशातूनही शिकू शकत नाहीत. हे सत्य आहे. प्रत्येक खेळण्यामध्ये काहीना काही विज्ञान दडलेले असते. हे विज्ञान त्या मुलाला माहीत करून घ्यायचे असते. मात्र आपण पालक बऱ्याचदा त्याच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करतो. त्याच्या खेळण्याच्या मागणीकडे सुद्धा आपण बरेचदा दुर्लक्ष करीत असतो. हे दुर्लक्ष त्याच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारे आहे हे आजच्या मानसशास्त्राने सिद्ध केलेले आहे.

काही वर्षांनंतर मूल जेव्हा शालेय जीवनात प्रवेश करते; तेव्हा भाषा, गणित हे विषय शिकते. शालेय जीवनामध्ये मुलाने प्रवेश केला म्हणून त्याच्या खेळण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करता कामा नये. या उलट त्याला त्याच्या अभ्यासाचे विषय समजून घेण्यासाठी त्या दृष्टीने खेळणी पुरवली पाहिजेत.

शालेय जीवनामध्ये मुलाने फक्त अभ्यासाचे विषय शिकावेत आणि आता सर्व काही विसरुन पालकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण कराव्यात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुलांवर निश्चितच चांगले संस्कार करत असताना; मुलांच्या वयाला अनुसरून खेळणी पुरवली पाहिजेत. ही खेळणी त्याच्या अभ्यासाला पूरक पुरवली पाहिजेत.

अंगणवाडी आणि खेळणी

अंगणवाडीमध्ये मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी ठेवली पाहिजेत. आपण पाहतो की, आपल्या अंगणवाड्यांमध्ये ठराविक प्रकारच्या दोन-चार खेळण्याच्या पलीकडे काहीही नसते. अंगणवाडीमध्ये जर विविध प्रकारची खेळणी ठेवायची झाल्यास आपण सरकारच्या अनुदानाकडे लक्ष ठेवून राहतो. सरकार काय करते? असा प्रश्न आपण नेहमीच विचारतो. पण सरकार काय करते यापेक्षा आपण काय करतो? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्या प्रश्नातच दडलेले आहे हे दिसून येते. आपण प्रत्येक पालकाने मुलांसाठी खेळणी घेण्याचे ठरवले असते.

आपले मुले अंगणवाडीत आहेत त्या अंगणवाडीचा विचार करता आपण सुद्धा काही खेळणी अंगणवाडीला भेट दिली. तर तिथे असणाऱ्या सर्वच मुलांचा खेळण्यातून होणारे शिक्षण अधिक चांगले होईल. म्हणून प्रत्येक पालकाने अंगणवाडीला जर खेळणी दिली तर खूप छान होईल.

इयत्ता पहिली मध्ये मुल जेव्हा दाखल होते; तेव्हा सुद्धा त्याला आपल्या अंगणवाडीची आठवण होते. घराची आठवण होते. खेळण्याची आठवण होते. आईची आठवण होते. छोटे किंवा मोठे भावंड असेल तर त्याची आठवण होते. काय कारण असेल बरे याचे? माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार त्या पहिलीतील मुलांना खेळण्याचं वय संपलं की काय अशी भिती तयार होते आणि शाळेच्या चार भिंतीच्या आत मानसिकदृष्ट्या ते गुदमरून जाऊ लागते. कारण आता त्याचा खेळण्यातून निर्माण होणारा आनंद संपत चालला आहे.याची त्याला तीव्रपणे जाणीव होऊ लागते हे चांगले नाही.

त्यामुळे इयत्ता पहिली,दुसरी या वर्गांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात खेळणी ठेवावीत असे माझे मत बनले आहे आणि मला वाटते की हे मत मानसशास्त्रीयदृष्ट्या निश्चितच योग्य आहे. म्हणून माझ्या शिक्षक बंधू भगिनी आणि पालक मित्रांना विनंती आहे की मुलांना ती पहिली दुसरी मध्ये असती तर शाळेमध्ये खेळती ठेवा यातच त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्याचा मूलमंत्र किंवा किल्ली दडलेली आहे.

मला सद्धा लहानपणापासून खेळणी खूप आवडतात.खेळणी आणि मी यांचं नातं खूप जवळच आहे. हळूवार असे आहे. मला खेळणी आजही आवडतात. पण लहानपणी जितकी आवड होती तितकी आता नाही. असे असले तरी मुलांना खेळणी भेटत राहावीत.अशीच माझी नेहमी सदिच्छा असते. त्यामुळे कोणाकडे मी भेटायला गेलो तर जाताना खाऊ बरोबर सुंदर खेळणी सुद्धा घेऊन जातो.

कोणत्याही मुलाला खेळणे आवडणे अगदी सहाजिकच आहे. मुलांना खेळणी मिळणे हा त्यांचा एक प्रकारे जन्मसिद्ध हक्क आहे.  लहान मुलांचे पालन पोषण करताना त्यांच्या भावनिक बुद्धीचा विकास होणे अतिशय गरजेचे आहे. केवळ आपण बुद्ध्यांक तपासून मुलांचा बुद्धिमत्तेचा धांडोळा घेत असतो.पण मुलांचा भावनांक तपासून त्यांची भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. खेळणी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील असे मला वाटते.

शाळेतील मुलांसाठी खेळणे मिळावेत यासाठी मला एक उपक्रम सुचवावा असं वाटतं.  शाळेमध्ये एक खेळण्याची पेटी असावी.या पेटीमध्ये खेळणी ठेवली जावीत.ही खेळणी मुलांसाठी उपलब्ध करून द्यावीत. विविध प्रकारचे खेळ खेळण्यांच्या द्वारे घेतले जावेत. खेळातून होणारा बौद्धिक आणि भावनिक विकास मुलांच्या सर्वांगीण विकासाला अतिशय सहाय्यक ठरेल यात शंकाच नाही.

शाळेमध्ये वाचन पेटी, गणित पेटी, विज्ञान पेटी या आवश्यक मानले गेले आहेत. या पेट्यांमध्ये विविध प्रकारची खेळणी समाविष्ट केली तरी चालू शकते. वाचण्यासाठी शिक्षकांना जी कसरत करावी लागते ती थोडी कमी होईल आणि शिकणे आनंददायी होईल. गणित समजण्यासाठी संख्या ज्ञान होण्यासाठी विविध खेळण्यांचा वापरही होऊ शकतो.

यात्रेमध्ये मुले गेली की खेळणी शोधत असतात. त्यांना खेळण्यांचे दुकान पाहायचे असते. त्यांना इतर गोष्टींशी काहीही घेणे देणे नसते. यातून हेच स्पष्ट होते की मुले खेळण्यासाठी आसुसलेली असतात.मग पालकाने मुलांच्या या वृत्तीला हेरून काही शैक्षणिक खेळणी मुलांच्या हाती घेऊन दिली पाहिजे.

लहानपणी भातुकलीचा खेळ खेळला जातो यामध्ये अनेक पात्रे असतात. ही पात्रे मुले जिवंत करतात.  त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणतात. त्याद्वारे विविध कृती करतात. ही त्यांच्या भावी आयुष्यातील भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची पायाभरणी असते.

थोडक्यात मुलांना विविध प्रकारची खेळणी मिळाली की मुलांचा भाव आणि भावनांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment