सुजाण पालकत्व निबंध Sujan Palakatwa

सुजाण पालकत्व निबंध Sujan Palakatwa

सुजाण पालकत्व निबंध Sujan Palakatwa

ज्याप्रमाणे माळी बागेमध्ये एखादे रोप लावतो, त्याला आवश्यक खत पाणी देतो; ते चांगले फुलावे- फळावे यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करतो. त्याप्रमाणे एखादा व्यक्ती मग ती आई असो की वडिल असो की अन्य कोणी असो, आपल्या पाल्याला प्रेमाने मोठे होत असताना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या देतो. मग ते मूल एखाद्या सुंदर वृक्षाप्रमाणे मोठे होते.यासाठीचे जाणतेपणाने होणारे सर्व तऱ्हेचे प्रयत्न म्हणजे सुजाण पालकत्व होय.

मुलाचा पालक हा त्याचा मालक नसून एक नैसर्गिक प्रेरणेने निर्माण केलेला सुजाण विश्वस्त असतो. असे माझे प्रामाणिक मत आहे. मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलाची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे व्हावा; अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. आपले मूल सुंदर विचार-आचारांनी मोठे व्हावे; त्याला जीवनात यश मिळावे असे प्रत्येक पालकाला वाटते. आणि त्यासाठी तो माया, ममता, वात्सल्य, प्रेम यांनी या मुलाला अधिकाधिक अलंकृत करण्याचा प्रयत्न करतो.

सूर्य उगवला नाही तर निबंध Surya Ugavala Nahi tar

आजच्या आधुनिक काळामध्ये सुजाण पालकत्व ही एक निकडीची गरज होत चालली आहे. तंत्रज्ञानाच्या झगमगाटामध्ये आपली मुले हरवत चालली आहेत की काय अशी काळजी होताना दिसून येते. पालकांना दिवसेंदिवस आपल्याला मुलाची काळजी वाटत राहते. कारण आपण मुलाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी फारशी सुजाणपणे काळजी घेत नाही. त्यामुळे सुजाण पालकत्व निर्माण होणे गरजेचे आहे.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईलसारखी वस्तू आपल्या घरात आल्यानंतर मुले त्यावर विविध प्रकारचे गेम खेळत असतात. पालकही त्याकडे सुरुवातीला कौतुकाने पाहतो. परंतु हळूहळू ते मूल मोबाईलच्या आधीन कसे होऊन जाते हे त्यालाही कळत नाही. परंतु वेळीच सावध झाले आणि जाणतेपणाने मुलांच्या हातात मोबाईल किती वेळ राहिला पाहिजे हे जर समजून घेतले; तर पालकांना मुलाच्या भवितव्याची चिंता राहणार नाही. वाईट सवयी लागताना त्यामागील मानसशास्त्र समजून घेतले तर मुले आणि पालक दोघांचेही जीवन सुरळीत चालेल.

मानसशास्त्र

आजच्या धकाधकीच्या काळामध्ये मुलांवर अनेक प्रकारे अत्याचार आणि जुलूम जबरदस्ती होत असते. आपल्या पाल्याकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्याची त्यादृष्टीने सुरक्षितता होते आहे काय? सुरक्षित आहे का यावर लक्ष ठेवले पाहिजे.

मुलांची सर्जनशीलता वाढण्यासाठी पालकांनी त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्याच्यासाठी चित्रकलेची वही द्यावी; चिखल खेळू द्यावा;त्याला इतर मुलांबरोबर खेळू द्यावे; घरामध्ये भिंतींवर विनाकारण काढलेल्या रेघोट्या ही त्याची सर्जनशीलताचा आहे हे विसरू नये.

प्रत्येक मुलाला शेकडो प्रश्न पडत असतात. मूल आपल्या पालकांना सतत प्रश्न विचारत असते.त्या प्रश्नांची उत्तरे पालकांनी निश्चित दिली पाहिजेत.चुकीचे उत्तर देण्यापेक्षा प्रश्नांची उत्तरे शोधता येतील किंवा येतात.हेही त्या मुलांना दाखवून दिले पाहिजे.विनाकारण मुलांवर ओरडत राहिले तर मुले तुम्हांला प्रश्न विचारणार नाहीत. माणूस हा बुद्धीशील प्राणी असल्यामुळे जिज्ञासा ही एक सहज प्रवृत्ती असते. प्रश्न विचारणे ही एक मानसिक गरज सुद्धा आहे. पालकांच्या अनास्थेमुळे मुलांची प्रश्न विचारण्याची मूलभूत प्रवृत्ती नष्ट होऊ शकते. हे त्याच्या बौद्धिक विकासासाठी अतिशय मारक ठरते. हे सुजाण पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.

मूल मोठे होत असताना मुलाच्या वाढीचा आणि विकासाचा मुख्य साक्षीदार त्याचा पालक असतो. मूल एखाद्या सुंदर रोपट्याप्रमाणे वाढावे अशी जर आपली इच्छा असेल तर मुलाचे अतिलालन बंद केले पाहिजे. अतिलालन म्हणजे अवास्तव लाड किंवा फाजील लाड होत.अतिलालन म्हणजे मुलाला जी गोष्ट पाहिजे ती प्रत्येक गोष्ट त्या मुलाच्या कुठल्याही संघर्षाशिवाय हातात देणे.मुलाला कुठलाही संघर्ष न करता प्रत्येक गोष्ट मिळाल्याने त्याच्यामध्ये काही मनोविकृती निर्माण होण्याची शक्यता असते.

पालकाला वाटते की मी जो लहानपणी संघर्ष केला आहे तो माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये. परंतु मुलाला थोडाफार तरी संघर्ष करायला लावला तर भावी आयुष्यात ते संघर्ष करेल. परंतु संघर्षाशिवाय वाढलेले मुल समाजामध्ये आवश्यक संघर्ष न करता प्रत्येक गोष्ट मिळवायला जाईल आणि दिशाहीन होऊन जाईल. संघर्षाची प्रेरणा त्याच्यामधून नष्ट होईल.

मुलांना नकाराची सवय पालकांनी लावली पाहिजे. मी म्हणतो ती प्रत्येक गोष्ट मला लगेच मिळते. असे मुलाला वाटत असते आणि मुलाला त्या गोष्टीची सवय लागते. परिणामी नकार पचवण्याची शक्ती एक मानसिक शक्ती आहे; ती मुलांमध्ये विकसित होत नाही. थोडक्यात सांगायचे तर मुलाला पालकाने आवश्यक त्या ठिकाणी नकार दिला पाहिजे. जीवनामध्ये यश आणि अपयश येत असते.मात्र अपयश पचवताना त्याच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण न होता ते मूल आशावादी आणि सकारात्मक राहिले पाहिजे. याची पुरेपूर काळजी पालकांनी घेतली पाहिजे.

प्रत्येक मुलाचे मन एखाद्या टीपकागदाप्रमाणे असते. ते आजूबाजूला चाललेल्या प्रत्येक गोष्टीतून, घटनांतून बऱ्याच गोष्टींचे ग्रहण करत असते. आजूबाजूला चाललेली प्रत्येक गोष्ट ही सत्य आहे; असे त्याचे मत असते. त्यामुळे बऱ्याचदा पालक आपापसात वाद घालतात. वादाचे रूपांतर भांडणातमध्ये होते.या सर्व गोष्टीला मूल साक्षीभावाने पाहता-पाहता त्याच्या मध्येसुद्धा वाद घालणे,भांडणे अशा प्रवृत्ती निर्माण होतात. पालकांनी सुजाणपणे या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे.

मुलांचा विकास प्रेमळ वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे होतो. प्रत्येक मुलाला पालकांकडून प्रेमाची फार मोठी गरज असते. प्रेम आणि सद्भावाच्या सकारात्मक वातावरणात वाढलेले मुल भावी आयुष्यात सहज यशस्वी होते. मुलांच्या मुलांच्या फक्त अभ्यासातल्या विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा मुलांच्या भावनिक बुद्धीकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे हे वेळीच ध्यानात घेतले पाहिजे.

आपण म्हणतो की मुलं ही देवाघरची फुले आहेत. त्यांना फुलाप्रमाणे जपले पाहिजे. फुलाप्रमाणे जपणे म्हणजे काय? असा प्रश्न आपण कधी आपल्याला विचारला आहे का? फुलाप्रमाणे जपायचे म्हणजे त्याला सुखावत असणारी प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी निर्माण करून त्याला चार भिंतीच्या आत कोंडून ठेवणे नव्हे. तर फुलांमधील निर्व्याज प्रेम आणि निरपेक्ष भावनेने आजूबाजूला सुगंध देण्याची वृत्ती मुलांमध्ये निर्माण व्हावी.मुले सद्गुणांचा फुललेला सुगंधी गुच्छ बनावे असे वाटत असेल तर पालकालाही अनेक गुण आत्मसात करावे लागतात. तरच ते पालकत्व सुजाण म्हटले जाईल.

श्यामची आईमध्ये साने गुरुजींनी आईचे किती वर्णन केले आहे. आईच्या ममतेचे ते महाकाव्य आहे. प्रत्येक आईला आणि वडिलांना श्यामची आई मधून खूप काही शिकण्यासारखे आहे. चांगले काम करण्यासाठी मुलांना आपण सदोदित प्रेरणा दिली पाहिजे. वाईट कामाची मुलांना लाज वाटली पाहिजे. हे श्यामची आई मधून सुजाण पालक शिकू शकतात. शरीराला घाण लागली तरी चालेल पण मनाला घाण लागू देऊ नकोस हे श्यामच्या आईचे वाक्य अतिशय बोलके आहे.

प्रत्येक मुलाला चांगल्या संस्कारांचे बाळकडूही कुटुंबातीलच मिळत असते. याशिवाय वाईट संस्कारांचेही बाळकडू कुटुंबातून मिळू शकते. याची पुरेपूर जाण सुजाण पालकांनी ठेवली पाहिजे. पालकांचे सद्गुण मुलांमध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि दुर्गुण सुद्धा. त्यामुळे पालकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

एखाद्या मुलाचे पालकत्व मिळणे हा एक प्रकारचा बहुमानच आहे. असे असले तरी हा बहुमान चांगल्या प्रकारे हाताळला पाहिजे. म्हणजेच पालकत्व हे सुजाण निर्माण झाले पाहिजे.प्रत्येक पालकांना आपले मूल प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावे असे वाटते. परंतु त्याची तयारी प्रामुख्याने कुटुंबातूनच होत असते ही सुजाण पालकांनी विसरून चालणार नाही.

प्रत्येक मुलाची भाषा, त्याने प्रत्येक प्रसंगात दिलेली प्रतिक्रिया, मुलाने प्रत्येक गोष्टीत दाखवलेली आस्था आणि अनास्था या पालकांकडून मिळालेल्या बऱ्यावाईट प्रकारच्या देणग्याच आहेत असे मानावे लागते. त्यामुळे पालकांची भाषा, त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या आस्था आणि अनास्था या कशा असल्या पाहिजेत? यावर यावर सुजाण पालकांनी निश्चित विचारमंथन केले पाहिजे. पालकांमधील सकारात्मकता मुलांमध्ये येत असते. त्यामुळे पालकांचे विचारही सकारात्मकच असावेत. जेणेकरून मूल सकारात्मक विचारांचे पाईक होते.

प्रत्येक मूल हे वेगळे असते.त्यामुळे आपल्या मुलाची तुलना इतर मुलांबरोबर न करता, त्याला त्याच्या मार्गाने त्याच्या सहजप्रवृत्ती आणि कलानूसार शिक्षण मिळाले तर त्या मुलाचा बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक विकास सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होत असतो.

एकूणच काय सुजाण पालकत्व निर्माण झाले तर सुजाण मुले निश्चितच निर्माण होतील. यात शंकाच नाही आणि ही आजच्या धकाधकीच्या काळामध्ये अतिशय महत्त्व आलेली बाब आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

2 thoughts on “सुजाण पालकत्व निबंध Sujan Palakatwa”

Leave a Comment