स्वातंत्रदिनासाठी प्रभावी भाषण speeches on Independence Day in Marathi

स्वातंत्रदिनासाठी प्रभावी भाषण speeches on Independence Day in Marathi

speeches on Independence Day in Marathi

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो,
आज आपण स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत.त्या स्वातंत्रदिनाबद्दल मी थोडसं बोलणार आहे. आपण स्थिर चित्ताने ऐकाल अशी माझी अपेक्षा आहे.

भारताला जे स्वातंत्र्य मिळालं त्याची तारीख होती 15 ऑगस्ट 1947. हा दिवस भारताच्या इतिहासात येण्यासाठी भारतीयांना प्रचंड मोठा संग्राम आणि संघर्ष करावा लागला. या संघर्षाची कथा आणि गाथा इतिहासाच्या पानोपानी आपल्याला वाचायला मिळेल. आपण इतिहासाचे वाचन केले पाहिजे.

ज्या ब्रिटिश लोकांपासून आपला देश स्वतंत्र झाला ते ब्रिटीश किंवा इंग्रज लोक भारतापासून सातासमुद्रापलीकडे इंग्लंड नावाच्या छोट्याशा देशांमध्ये राहत होते. इतक्या दूरवर येऊन त्यांनी हा देश पादाक्रांत केला आणि या देशावर दीडशे ते दोनशे वर्ष राज्य केले. या देशाची अपार संपत्ती मनमानेल तशी लुटून नेली. भारत देशाची लुटलेली अगणित संपत्ती वापरून औद्योगिकरणाच्या बळावर इंग्लंड राष्ट्र समृद्ध झाले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटी भाषणे

इंग्रजांना हे कसे शक्य झाले? इंग्रजांनी या देशावर राज्य कसे प्रस्थापित केले?कोणती कारणे यासाठी महत्त्वाची ठरली? कोट्यावधींचा हा देश; राम, कृष्ण यांचा हा देश; एका परकीय सत्तेचा गुलाम कसा बनला? याचा इतिहास रोमांचकारी असून भारतीयांनी त्यामधून आजही बोध घेण्यासारखा आहे.

असे सांगितले जाते की १४०० वर्षांपूर्वी भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश आणि महासत्ता होता. भारताइतकी प्रचंड संपत्ती आणि विद्वानांची खाण जगामध्ये कुठेही नव्हती. थोडक्यात भारतामधून सोन्याचा धूर निघत होता. भारताची ही किर्ती जगभर पसरली होती. त्यामुळे संपत्तीच्या आकर्षणामुळे जगभरातील सत्ताधीश भारतातील संपत्ती आपल्या देशात लुटून कशी नेता येईल याचाच विचार करत होते. त्यामध्ये मोगल, अफगाण, सिद्धी, फ्रेंच, पोर्तुगीज आणि इंग्रज होते.

इंग्रज आणि अनेक परकीय लोक या देशात आले. आणि हा देश व्यापारासाठी उत्तम असे धोरण सुरुवातीला त्यांनी ठेवले. परंतु त्यांचे उद्देश भारतीयांना त्यांनी कधीही समजू दिले नाहीत.ते व्यापारासाठी आले होते असे समजने ही फार मोठी चूक होती. ते केवळ भारतावर राज्य करून भारतातील अगणित संपत्ती लुटून आपल्या देशाचे खजिने भरण्यासाठी या ठिकाणी आले होते.

मोगल बादशहाकडून व्यापाराच्या सवलती इंग्रजांनी मिळवल्यानंतर इंग्रज विविध ठिकाणी आपल्या वखारी स्थापन करून व्यापारी पेठा सजवू लागले. व्यापार करून संपत्ती मिळवू लागले. आपल्या व्यापारासाठी त्यांनी वखारी उभारल्या व खरे यांच्या संरक्षणासाठी त्यांनी बरोबर शिपाई बाळगले.चांगल्या प्रकारची शस्त्रास्त्रे बाळगली.

जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे इंग्रजांनी आपली वखार मोठी करत नेली. सैन्य वाढवत नेले. अधिकाधिक इंग्रज शिपाई त्यांनी भारतात आणले. इंग्रजांचा हा कावा भारतीयांच्या लक्षात यायला फार मोठा उशीर झाला होता. फक्त आणि फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांसारख्या परकीयांना ओळखले होते आणि त्यांच्या मर्यादेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या राजांपासून इंग्रज नेहमी सावध असत. इंग्रजांना छत्रपती शिवरायांनी वेळोवेळी अद्दल घडवली होती आणि त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे म्हणून त्यांच्यावर धास्ती निर्माण केली होती. जरब निर्माण केली होती.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नेहमी आपल्या वखारीचा आढावा घेऊन सतत कुठे ना कुठे भारताचा प्रदेश बळकावण्याच्या प्रयत्नात असे.

भारत हा देश वेगवेगळ्या जातींमध्ये आणि वेगवेगळ्या सत्ताधीशांच्या भांडणांमध्ये कसा विभागला गेला आहे. हे इंग्रजांनी बरोबर ओळखले होते. त्यामुळे ते भारतावर राज्य करू शकले.

1761 मध्ये झालेली पानिपतची लढाई यामुळे मराठी साम्राज्याचे फार मोठे नुकसान झाले होते. मराठी साम्राज्याला प्रचंड नुकसान सोसावे लागल्यामुळे मराठ्यांची दहशत कमी झाली होती. त्याचप्रमाणे बक्सारची आणि प्लासीची लढाई या दोन्ही लढायांमधून इंग्रज बंगालमधून आपले मनसुबे साध्य करत होते.

मराठे, टिपू सुलतान यांच्याबरोबरच्या युद्धामधून इंग्रजांनी विजय मिळवले भारतीय राज्यकर्त्यांना फोडा आणि झोडा, साम-दाम-दंड-भेद अशा प्रकारच्या नीती वापरून इंग्रजांनी निष्प्रभ केली. भारतामध्ये छोट्या मोठ्या लढाया करून आणि भांडणे लावून सत्ता स्थापित केली.

केवळ भारतच नाही तर ब्रह्मदेश, श्रीलंका, अफगाणिस्तान पर्यंत इंग्रजांची अमर्याद होती. हिंदुस्तान काबीज केल्यानंतर इंग्रजांनी येथील लोकांचा अतिशय चतुराईने वापर करून घेतला. भारतीयांना इंग्रजांनी स्वतःचे राज्य करता यावे म्हणून कारकून निर्माण करणारे शिक्षण दिले. भारतीय लोकांना सैन्यामध्ये प्रवेश दिला आणि त्याद्वारे स्वतःच्या साम्राज्याचे त्यांनी संरक्षण केले.

जगातील अनेक राष्ट्रांमध्ये इंग्रज सत्ताधीश होते. इंग्रजांचे जगभर जेवढे साम्राज्य होते तेवढे कोणत्याच परकीय सत्तेचे नव्हते. असे म्हणतात कि इंग्रजांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता. इतके ते जगभर पसरलेले होते.

1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये आपल्या भारतीय सैनिकांनी प्रचंड पराक्रम गाजवला. पण केवळ जलद संदेशवहन आणि काही फितूर लोकांमुळे इंग्रज विजयी झाले.

संपूर्ण भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला.इंग्रजांनी हवे तसे या देशाला लुटले. हिंदुस्तान लुकण्यासाठी त्यांनी त्यांना हव्या त्या सुविधा निर्माण केल्या. रेल्वे, पोस्ट, तारखाते,विमान वाहतूक, रस्ते हे इंग्रजांनी भारतीयांच्या सेवेसाठी कधीही सुरू केले नव्हते. तर भारतामधून कच्चामाल इंग्लंडला पाठवणे. येथील संपत्ती इंग्लंडला पाठवणे याच एकमेव उद्देशासाठी या सुधारणा केल्या होत्या. हे ध्यानात घेतले पाहिजे.

इंग्रजांनी भारतात आणलेले शिक्षण हे भारतीयांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी कधीच नव्हते. इंग्रजांच्या साम्राज्याचा प्रचंड मोठा डोलारा सांभाळण्यासाठी इंग्रजांना हवे असलेल्या कारकुनांच्या आणि नोकरांच्या गरजेपोटी इंग्रजांनी भारतीयांना शिक्षण दिले हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

पण शिक्षण हे एका भयानक वाघिणीचे दूध असते आणि हे दूध पिला तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. हे इंग्रजांच्या लक्षात आले भारतीय लोक शिकून विद्वान झाले आणि त्यांच्या लक्षात आले की आपला देश फोडा आणि झोडा या नीतीने बळकावला गेला आहे. आपले दारिद्र्य आणि दुःख संपवण्यासाठी केवळ आणि केवळ आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे… स्वातंत्र्य पाहिजे… हे भारतीयांच्या लक्षात आले. आणि ज्यांच्या ते लक्षात आले त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने देश स्वतंत्र करण्याची चळवळ आरंभिली.

ज्यांना शस्त्र घ्यावे वाटत होते, त्यांनी शस्त्र उचलले. वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक यासारख्यांनी सैन्य जमून इंग्रजांशी लढा दिला. हा लढा क्रांतिकारकांचा होता. इंग्रजांना ठेचून काढत, खजिने लुटणे आणि सैन्य ताकद वाढवून छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे स्वराज्य निर्माण केले त्याप्रमाणे पुन्हा इंग्रजांच्या ताब्यातून देश स्वतंत्र करून एतद्देशीयांचे राज्य स्थापन करणे. हा त्या लोकांचा मुख्य उद्देश होता. छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांची मूळ प्रेरणा होती.

क्रांतिकारकांनी त्यांच्या परीने आपल्या जीवनाची होळी करत इंग्रजांशी दोन हात केले. परंतु हे प्रयत्न कुठेतरी अपुरे पडत आहेत; हे शिक्षणाने विद्वान झालेल्या भारतीयांच्या लक्षात येत होते.

1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. इंग्रजांनी भारतीयांमधील असंतोष या संघटनेद्वारे कमी होईल म्हणून सुरुवातीला तिला बळ दिले. परंतु लोकमान्य टिळक, लाला लजपतराय,बिपिनचंद्र पाल यासारख्या जहाल नेत्यांनी राष्ट्रीय सभेला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी राष्ट्रीय सभेला उभे केले. त्यामधूनच इंग्रजांशी लोकशाही मार्गाने परंतु जहाल मार्गाने लढून स्वातंत्र्य मिळविण्याचे जोरदार प्रयत्न केले.

केवळ अर्ज विनंत्या न करता, मवाळ भूमिका न घेता इंग्रजांना जेरीस आणायचे असेल, तर जहाल मार्ग स्वीकारला पाहिजे हे त्यांचे मत होते. या युगाला टिळक युग असे इतिहासात म्हटले जाते.1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य टिळक परलोकवासी झाले. त्यांच्या निधनाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची फार मोठी हानी झाली.

त्याच वेळी महात्मा गांधींसारखा एक सोज्वळ प्रवृत्तीचा आणि चतुर बुद्धीचा नेता भारतीयांना लाभला. सविनय कायदेभंग, असहकार आंदोलन, छोडो भारत यासारखी मोठी आंदोलने करून इंग्रजांशी लढा देण्याचे फार मोठे प्रयत्न महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झाले. महात्मा गांधींनी जनसामान्यांना स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केले. त्यांना त्यामध्ये प्रचंड यशही मिळाले.

याच वेळी भारतामध्ये भगतसिंग, सुखदेव,राजगुरू, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही इंग्रजांविरुद्ध फार मोठी क्रांती चळवळ राबवली. खुदीराम बोस सारखे हजारो क्रांतिकारक यामध्ये सामील झाले. इंग्रजांचे त्यांनी मुडदे पाडले.त्यांना सळो कि पळो करून सोडले.

महान क्रांतिकारक रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांशी लढण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाचा अतिशय खुबीने वापर केला. दुसरे महायुद्ध चालू असताना इंग्रज सैन्यातील भारतीयांना आपल्या सैन्यात घेतले. जपान सारख्या देशाचा उपयोग करून आझाद हिंद सेनेची स्थापना केली. भारतीय सैनिक घेऊन सुभाषचंद्र बोस देशाच्या सीमेवर येऊन ठाकले इंग्रजांशी लढा सुरू केला.

दुसरे महायुद्ध इंग्लंड राष्ट्रासाठी अतिशय भयानक ठरले.जर्मन सैन्याने इंग्लंड देशाची राखरांगोळी केली होती. जपानी सैन्याने इंग्रजांच्या ताब्यातील अनेक देश आपल्या सैन्यबळावर पादाक्रांत केले होते. याशिवाय आझाद हिंद सेनेसारख्या सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भारतीय सैन्याने इंग्रजांना भारतावर राज्य करणे आता शक्य नाही हे दाखवून दिले होते. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आता आपल्याला हिंदुस्तानवर राज्य करणे शक्य नाही. हे इंग्रजांच्या लक्षात आले आणि भारतीय स्वातंत्र्याची पहाट झाली.

परंतु देशांमध्ये मुस्लिम लीग सारख्या जातीयवादी, भेदभाववादी नालायक संघटनेने मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये प्रचंड मोठी फूट निर्माण केली होती. मुस्लिम लीग स्वतंत्र पाकिस्तान मागत होती. नाईलाजाने हिंदुस्थानची फाळणी झाली.आणि तो सोन्याचा दिवस उगवला. इंग्रजांकडून हिंदुस्तानी लोकांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपले स्वातंत्र्य हिसकावून घेतले.

“मंगल मंगल त्रिवार मंगल
पावन दिन हा धन्य अहो
भारत प्यारा स्वतंत्र झाला
जय बोला जय बोला हो”
अशी गाणी लोक गावू लागले. भारत प्यारा स्वतंत्र झाला. भारतावर असलेली इंग्रजांची जुलमी राज्यवट संपुष्टात आली. तोच हा परम पावन मंगल दिन म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन होय. या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 

अवश्य वाचा

लोकमान्य टिळक छोटी भाषणे

महात्मा गांधींवर मराठी भाषणे

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment