लोकमान्य टिळक भाषण Speech on Lokmanya Tilak

लोकमान्य टिळक भाषणSpeech on Lokmanya Tilak

 

अध्यक्ष महोदय, गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो !

आज लोकमान्य टिळकांची जयंती, लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यासाठी आपण येथे जमलेला आहोत.लोकमान्य टिळक हे भारताचे महान सुपुत्र होते.रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या छोट्याशा गावी लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला.त्यांचे वडील गंगाधर शास्त्री संस्कृत भाषेचे जाणकार होते. लोकमान्यांना लहानपणी बाळ या टोपण नावाने हाका मारीत. त्यांचे मूळचे नाव केशव असे होते.परंतु बाळ हे नाव जास्त प्रसिद्ध झाले. म्हणून आपण लोकमान्य टिळकांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे आहे असे सगळीकडे वाचतो. लोकमान्य टिळकांना लहानपणापासूनच गणित या विषयाची खूप आवडत होती.सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुणे येथे आपले उच्चशिक्षण घेतले. त्यांना त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर हा मित्र भेटला.दोघेही अतिशय बुद्धिमान मित्र होते. प्रथम राजकीय सुधारणा कराव्यात की सामाजिक सुधारणा कराव्यात याबाबत दोघांमध्ये सारखी चर्चा होत असे. लोकमान्य टिळक जहाल विचाराचे होते. लोकमान्य टिळकांना प्रथम भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले पाहिजे.मग सामाजिक सुधारणांकडे आपण लक्ष देऊ असे वाटे. त्यामुळे त्यांनी राजकीय सुधारणा अर्थात भारताचे स्वातंत्र्य या गोष्टीला अधिक महत्त्व दिले आणि स्वातंत्र्य संग्राम मध्ये उडी घेतली.

लोकमान्य टिळकांनी लोक एकत्र यावेत म्हणून शिवजयंती आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सामूहिक रित्या साजरे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोक एकत्र आले टिळकांच्या लोक जागृतीच्या कार्यात त्यामुळे गोष्टीचे साहाय्य झाले.
त्यावेळचा भारत देश हा एखाद्या थंड गोळ्याप्रमाणे पडला होता. स्वातंत्र्याविषयी लोकांना फार  आस्था दिसून येत नव्हती. परंतु लोक अस्वस्थ होते. अशा वेळी लोकमान्य टिळक पुढे आले आणि लोकांमधील अस्वस्थतेला चेतवून त्याचे एका मोठ्या राजकीय चळवळीत राष्ट्रीय कांग्रेसच्या साह्याने रूपांतर केले. आणि पाहता पाहता इंग्रज सरकारविरुद्ध देशभर फार मोठे आंदोलन उभे राहिले. लोकमान्य टिळकांनी केसरी हे वृत्तपत्र मराठीतून आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीतून सुरू केले. या वृत्तपत्रातून लोकमान्य टिळक अग्रलेख लिहीत असत. केसरीतून इंग्रज सरकारवर जहाल टीका केली जात असे. त्यामुळे त्या वेळचे राज्यकर्ते इंग्रज लोकमान्य टिळकांवर संतापून असत. लोकमान्य टिळकांना एखाद्या प्रकरणात अडकवून डांबावे अशी इंग्रज सरकारची इच्छा होती.
सन 1897 च्या सुमारास पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. प्लेगची साथ नियंत्रणात आणण्यासाठी पुण्याला  Rand इंग्रज अधिकार्‍याची नेमणूक झाली. हा इंग्रज अधिकारी लोकांना खूप त्रास देत असे. त्यामुळे चाफेकर बंधूंनी त्यांना ठार केले.अशातच लोकमान्य टिळकांनी ”सरकारचे डोके ठिकाणावर आहे?” ” काय राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे .”अशा प्रकारचे जहाल टीका करणारे अग्रलेख केसरी या वर्तमानपत्रात लिहिले.परिणामी इंग्रज सरकारने लोकमान्य टिळकांवर खटला दाखल करून त्यांना अटक केली आणि तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली
तुरुंगात असतानाही लोकमान्य टिळक अनेक ग्रंथांचे सखोल वाचन करीत असत.त्यांना वाचनाची खूप आवड होती.त्यामुळे नरकातही मी चांगल्या ग्रंथांचे स्वागत करीन असे ते म्हणत असत. लोकमान्य टिळकांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. सिंहगड किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी त्यांचा हा संशोधनाचा व्यासंग चालत असे. आर्क्टिक होम इन वेदाज, ओरायन यासारखे जगप्रसिद्ध ग्रंथ लोकमान्यांनी सिंहगड किल्ल्यावर लिहिले. खरेतर लोकमान्य टिळकांना गणित या विषयाची जास्त आवड होती. स्वातंत्र्यकाळात जर ते जन्माला आले असते तर गणिती म्हणून घेण्यात त्यांना जास्त आनंद वाटला असता असे ते एकदा म्हणाले होते. पुढे मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी हिंदूंच्या धर्मग्रंथावर भाष्य करणारा गीतारहस्य हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.
त्यावेळच्या काँग्रेसमध्ये असणारे लोक हे नेमस्त विचाराचे होते. अर्ज आणि विनंत्या करून इंग्रज सरकारकडून भारतीयांना काही फायदे मिळवून द्यावेत. सुधारणा कराव्यात अशा विचारांचे ते होते. परंतु लोकमान्यांना हे मान्य नव्हते. इंग्रजांकडून आपले राजकीय स्वातंत्र्य पहिले मिळवले पाहिजे.”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” अशी लोकमान्य टिळकांची गर्जना होती. अर्थात त्यानुसार त्यांचे कार्य चालत असे.
त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांनी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार ,राष्ट्रीय शिक्षण अशा प्रकारची चतुसूत्री लोकांपुढे ठेवलीआणि स्वदेशी बाबत जागरूकता निर्माण केली.ठिकाणी परकीय मालाच्या होळ्या पेटवल्या गेल्या इंग्रज सरकार टिळकांवर पेटून उठले. त्यातच चिरोल नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांने  लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणून त्यांचे नकारात्मक चित्र रंगवले. त्यातूनच पुन्हा एकदा टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली.टिळकांसारखा  इंग्रजांना देशभक्त भारतात ठेवणे परवडण्यासारखे नव्हते.त्यांनी लोकमान्यांना ब्रह्मदेशातील मंडाले या ठिकाणी ठेवले. दूर देशांमध्ये राहूनही लोकमान्यांनी याठिकाणी गीतारहस्य या ग्रंथाचे लेखन करण्यासाठी भारतातून पुस्तके मागवली. आपला असा व्यासंग ठेवून त्यांनी त्या ठिकाणी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

टिळक युग

लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान हे फार मोठे होते.भारतीय स्वातंत्र्य संग्रामात यांचा सिंहाचा वाटा होता असे म्हणता येईल. एका सामान्य कुटुंबातील मुलगा गाव सोडून पुण्याला येतो काय, त्या ठिकाणच्या वातावरणात डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेतो काय, सामाजिक आणि राजकीय सुधारणा यातून राजकीय सुधारणा निवडतो काय, आणि भारतीय स्वातंत्रसंग्रामामध्ये उडी घेउन इंग्रजांना सळो की पळो करून सोडतो काय, अनेकवेळा तुरुंवास भोगूनही इंग्रजांना पुरून उरतो काय, जहाल आणि मवाळ या वादामध्ये जहालवादाचे नेतृत्व करून भारतातील सर्व क्रांतिकारक आणि सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाने भारावून टाकतो काय, ही गोष्ट सामान्य नाही. त्या काळच्या या भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील चळवळीच्या  त्या युगाला टिळक युग असे म्हटले जाते ते यामुळेच.

बहुआयामी व्यक्तिमत्व

लोकमान्य टिळक हे शिक्षक, पत्रकार,विचारवंत,ग्रंथकार, व्यासंगी संस्कृत पंडित, गणिती,स्वतंत्र चळवळीतील लोकप्रिय नेता होते. लोकमान्य टिळक हे जागतिक कीर्तीचे महापुरुष होते. त्यांचे कार्य स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने त्याचप्रमाणे लोकांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीने  असामान्य असे होते.

समारोप

असे हे लोकमान्य टिळक आता थकले होते. मुंबई येथे असताना एक ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे देहावसान झाले लोकांना प्रचंड दुःख झाले.लोक शोक करत होते. लोकमान्यांची अंत्ययात्रा निघाली. लक्षावधी लोक त्यामध्ये सामील झाले .

‘असा मोहरा झाला, पुढे कधी होणार,

बाळ टिळक हे नाव जगात, गर्जत राहणार”

असे लोक म्हणू लागले.लोक प्रचंड दुःख करीत होते. त्यावेळी महात्मा गांधींनी लोकांना समजावून सांगितले; “लोकमान्य टिळक आपल्यातून देहाने जरी गेले असले तरी त्यांच्या कार्याने आणि विचाराने अमर झाले आहेत.”
अशा या लोकमान्यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी माझे शब्द थांबवतो.

जय हिंद !

जय महाराष्ट्र !!

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment