शिक्षक पुरस्कार,शिक्षक आणि वशिलेबाजी Shikshak Puraskar

शिक्षक पुरस्कार,शिक्षक आणि वशिलेबाजी Shikshak Puraskar

शिक्षक पुरस्कार म्हटले की लोक आज वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहू लागलेत असे वाटते. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यामार्फत दरवर्षी शेकडो शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देत असताना अनेकदा चुकीच्या पद्धतीने पुरस्कार मिळवण्यासाठी डावपेच आखले जातात आणि पुरस्कार प्राप्त करून घेतला जातो. याची चर्चा नेहमीच खासगीत होत असते किंबहुना लोक अशी चर्चा आवडीने करत असतात.

आदर्श शिक्षक पुरस्कार

भारतातील शिक्षण व्यवस्थेबाबत नेहमीच चर्चा होत असते. शिक्षणव्यवस्थेतील गुण आणि दोष यांच्यावर लोक आपले मत तावातावाने मांडत असतात. शिक्षणव्यवस्थेला पर्यायी उपचार करून बरे केले पाहिजे. असे अनेकांचे मत असते.

व्यवस्था कशीही असली तरी शिक्षक मात्र आपले विद्यार्थी पाहून वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करत असतात. विद्यार्थ्यांचा अध्ययनाचा मूलभूत मार्ग पाहून विद्यार्थी अधिकाधिक बोधात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक पातळीवर सर्वांगीण विकास कसा साधेल याकडे प्रयोगशील शिक्षकांचे जातीने लक्ष असते. यासाठी थॉमस अल्वा एडिसनने विजेचा दिवा शोधण्यासाठी प्रयत्न केले;त्याप्रमाणे शिक्षक अक्षरशः हजारो प्रयत्न करून विद्यार्थी आणि शाळेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात, हे सत्य नाकारून चालणार नाही.

चांगले काम करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना पाठीवर शाबासकीची थाप हवी असते.ही एक मानसिक गरज आहे असे समजले तरी चालेल. समाज आणि शासकीय व्यवस्था यासाठी आपापल्या पातळीवर अशी शाबासकीची थाप देण्याचा प्रयत्न पुरस्काराच्या रूपाने करीत असते. आता पुरस्कार म्हटला की स्पर्धा आलीच.

दर वर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिन… डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिन देशभर साजरा होतो. अशा प्रसंगी देशातील सर्व स्तरातील गुणवंत शिक्षकांना गौरवण्याची परंपरा आपल्याकडे आहे. शिक्षकांना गौरव आणि सन्मान देणे हा भारतीय परंपरेचा भाग आहे. परंतु यासाठी निवड करताना शासकीय व्यवस्थेला काही नियमांचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. अर्ज मागवले जातात. अर्जासोबत केलेल्या कामाचा तपशील व्यवस्थित नोंदवला जातो. जोडलेल्या तपशीलाप्रमाणे काम आहे की नाही हे पाहण्यासाठी शाळांवर पर्यवेक्षण यंत्रणेतले अधिकारी जातात. प्रत्यक्ष तपासणी करून आपला अभिप्राय नोंदवतात. आणि पुरस्कारांसाठी मूल्यांकन होत असताना दिलेले गुण लक्षात घेऊन पुरस्कारांची नावे निश्चित केली जातात.

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन

व्यवस्था आली की व्यवस्थेचे गुण आणि दुर्गुण दोन्ही हातात हात घालून येतात. काही कर्मचारी अर्थात शिक्षक यांना आपले कौशल्य वापरून पुरस्कार मिळवण्याची घाई असते ते मागच्या दाराने आपल्या अदृश्य हाताचा वापर करून पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी काही यशस्वी होतात. याठिकाणी शासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांच्या वजनाचा वापर केला जातो आणि पुरस्कार प्राप्ती साद्य केली जाते….असे लोकांना वाटते आणि हे घडूही शकते. हे नाकारता येणार नाही. असे असले तरी पुराव्यानिशी सिद्ध करता येणार नाही हेही तितकेच खरे. ही नकारात्मक बाजू चर्चा करताना मांडून लोक चर्चा करतात आणि समस्त शिक्षक वर्गालाच दोष देतात हे बरे नाही.

काही शिक्षक बंधू भगिनी पुरस्काराच्या प्राप्तीसाठी नकारात्मक मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न करता करता आपल्यातील स्वत्व आणि सत्व गमावून बसतात. परिणामी समाजाच्या आरशामध्ये त्यांचे प्रतिबिंब अतिशय विकृत पद्धतीने दिसून येते. हे शिक्षकांनी टाळले पाहिजे. नाही तर आपलीच विकृत प्रतिमा आपली वैरी ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि समस्त शिक्षक वर्ग आपल्यामुळे पुन्हा पुन्हा बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही.

5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन 5th October World Teachers Day

शिक्षण व्यवस्थेत एक अतिशय महत्त्वाचा आणि पायाभूत घटक म्हणजे शिक्षक होय. शिक्षकाचा शिक्षण व्यवस्थेशी जो संबंध आहे तो निर्णायक संबंध आहे. शिक्षक पुरस्कारांवरून शिक्षकांवर दोषारोप करत बसण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेला अधिकाधिक चांगले स्वरूप देण्यासाठी समाजाने आपली निश्चित अशी भूमिका बजावली पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे.

प्रत्येक शिक्षक हा त्याच्या समोरील बसलेल्या मुलांच्या दृष्टीने आदर्श आणि गुणवंत असतो. शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्हावे आणि गुणवत्तेचा मार्ग प्रशस्त करीत राहावा. आपले विद्यार्थी आपल्या समोर आपल्यापेक्षा कित्येक पटीने वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे होत असताना पाहण्याचे भाग्य लाभणे. यापेक्षा मोठा पुरस्कार कोणताच नसेल. आणि आपला कोणताच विद्यार्थी जीवनाच्या कोणत्याच क्षेत्रात यशस्वी न होता, दुरावस्थेत जिवन जगत असेल तर…. शिक्षकाच्या जीवनात यापेक्षा कोणताच मोठा कलंक किंवा दुर्भाग्य नाही मग त्याला कितीही पुरस्कार मिळालेले असोत.

५ सप्टेंबर शिक्षक दिन भाषणे

पुरस्काराची किंवा शाबासकीची थाप ही देणाऱ्याने सहजरीत्या अगदी नैसर्गिकरित्या आणि घेणाऱ्याने अनपेक्षितरित्या मिळवली की तिचा आनंद गगनात मावणार नाही इतका मोठा असतो.

पुरस्कारामुळे एक प्रकारची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. पुरस्कारामुळे ती अधिक वाढते हे ध्यानात घेतले पाहिजे.ती जबाबदारी म्हणजे पुरस्काराला सार्थ असे आपले दररोजचे जीवन आणि आदर्श वर्तन असले पाहिजेत. आपले प्रत्येक वर्तन समाज आणि विद्यार्थी पाहत असतो. आपल्या पुरस्काराला आपण पात्र आहोत की नाही हे सुद्धा समाज वेळोवेळी तपासत असतो.त्यामुळे खरोखरच आपण आदर्श आहोत की नाही हे आपल्या मनाशी विचारले पाहिजे. आपण पुरस्काराला पात्र ठरण्याची शक्यता असेल तरच पुरस्काराची मागणी करावी. नाहीतर वशिलेबाजीच्या या मलिन गंगेत चुकूनही पाय टाकू नये.

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment