सानेगुरूजी Saneguruji

सानेगुरूजी Saneguruji

साने गुरुजी  Saneguruji यांचे नाव माहीत नसलेली मुले किमान महाराष्ट्रात तरी नसतील. इतके साने गुरुजी आज आपल्या सर्वांना परिचित झालेले आहेत. लहान मुलांशी साने गुरुजी वागताना फुलांपेक्षा कोमल होणारे परंतु देशकार्य करताना वज्रापेक्षाही कठोर बनणारे असे होते.

आपल्या गोड गोड गोष्टींनी मुलांचे मनोरंजन करीत प्रभूशी नाते जोडणारे साने गुरूजी  यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 या दिवशी दापोली तालुक्यातील पालगड या छोट्याशा गावी झाला. साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते.

साने गुरुजींचे वडील हे खोत होते त्यांच्याकडे खोतीचा कारभार होता. त्यामुळे ते तसे सुरुवातीला आजोबांच्या काळामध्ये श्रीमंत होते. परंतु पुढे पुढे त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीत त्यांची परिस्थिती खालावली आणि गरिबी आली गरिबीतही आपले सत्व आणि तत्व न विसरणारे हे साने गुरुजींचे कुटुंब खूपच वेगळे होते.

साने गुरुजींच्या मनावर त्यांच्या आई-वडिलांनी विशेष करून त्यांच्या आईने अतिशय उत्तम संस्कार केले होते. त्यांच्या आईचे नाव यशोदा असे होते. आपल्या आईचे संस्कार ते आयुष्यात कधीही विसरले नाहीत.आपल्या आईचे आपल्या वर असणारे ऋण सुद्धा साने गुरुजी कधीही विसरले नाहीत. त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहून आईची महती सर्वांपर्यंत पोहोचवली आहे.

साने गुरुजींच्या घरच्या गरिबीमुळे पालगड दापोली औंध पुणे इत्यादी ठिकाणी अतिशय कष्ट करून त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. सन 1922 मध्ये बी.ए.उत्तीर्ण झाले. पुढे सन 1924 यावर्षी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर च्या तत्त्वज्ञान मंदिरामध्ये त्यांनी काम करीत एम.ए.ही पदवी मिळवली.

त्यानंतर सानेगुरुजी अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम पाहू लागले. प्रताप हायस्कूलमध्ये येथील वस्तीगृहाची व्यवस्था सुद्धा ते पाहत असत. वसतिगृहातील मुलांची आईच्या ममतेने ती काळजी घेत असत. वस्तीगृहातील सर्व मुले साने सरांच्या प्रेमाने ही सुसंस्कारित झाली. साने गुरुजींच्या जीवनातील मूलमंत्र म्हणजे आईच्या प्रेमाने प्रत्येक मुलाकडे वात्सल्य भावनेने पाहत.

वसतिगृहातील मुलांमध्ये रमता रमता त्या काळामध्ये त्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, पंडित जवारलाल नेहरू इत्यादी थोर पुरुषांची जीवन चरित्र लिहिली.

साने गुरुजी यांच्या जीवनावर महात्मा गांधींचा फार मोठा प्रभाव होता किंबहुना महात्मा गांधी सानेगुरुजींचे आई नंतरचे दुसरे गुरु होते असे म्हणता येईल. गांधीजींनी सत्याग्रहाची चळवळ भारत देशामध्ये सुरू केली होती. ते दिवस चळवळीचे होते. 1930 साली गांधीजींनी देशभर मिठाचा सत्याग्रह सुरू केला इंग्रजांच्या अन्यायकारक कर पद्धतीविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाची हत्यार उपसले होते.

सारा देश इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठला होता.साने गुरूजींना सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध गांधीजींच्या सत्याग्रहात सामील होण्याची तीव्र इच्छा होती. एरंडोलच्या सभेमध्ये साने गुरुजींनी अतिशय प्रभावी भाषण करून लोक जागृती केली. त्यामुळे साने गुरुजींना पोलिसांनी अटक करून धुळ्याच्या तुरुंगात ठेवले.

साने गुरुजींना पंधरा महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली.  तुरुंगवास भोगत असताना साने गुरुजींनी खूप लेखन केले. पुढे साने गुरुजींना त्रिचनापल्लीच्या तुरुंगामध्ये ठेवले गेले. सक्तमजुरीची शिक्षा भोगत असताना सुद्धा त्यांनी अनेक स्फूर्तीगीते, कथा, कादंबऱ्या, नाटके लिहिली. श्यामची आई, रामाचा शेला, मोलकरीण, क्रांती, आस्तिक अशा कादंबऱ्या साने गुरुजींनी लिहिलेला. त्या अतिशय गाजल्या साने गुरुजींनी आपल्या लेखनाने देशभक्ति आणि संस्कार याद्वारे मुलांवर फार मोठे संस्कार घडविण्याचे कार्य केले.

“खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे,” ही साने गुरुजींची प्रार्थना अतिशय प्रसिद्ध आहे. प्रत्येक शाळेमध्ये ही प्रार्थना अतिशय आवडीने म्हटली जाते. महाराष्ट्रातील कोणती शाळा अशी नसेल की जिथे ही प्रार्थना म्हटली गेली नसेल. या प्रार्थनेतून आपल्याला साने गुरुजींचा जीवन विषयक दृष्टिकोन दिसून येतो. जगामध्ये प्रेम करणे,हा एकमेव धर्म असून इतर धर्म हे केवळ त्या प्रेमरुपी धर्माचीच वैविध्यपूर्ण रूपे आहेत.

“करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे”
असे साने गुरुजी यांचे प्रांजळ मत होते. साने गुरुजी मुलांमध्ये अतिशय रमत असत. आपला जन्म हा भारतमातेची सेवा करण्यासाठी झाला आहे असे ते म्हणत असत. गुरुजींची आई गेल्यानंतर त्यांनी आपली आई म्हणजेच भारत माता आहे असे मानले.

1932 मध्ये सानेगुरुजींची धुळ्याच्या तुरुंगामध्ये रवानगी झाली.त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आचार्य विनोबा भावे हे सुद्धा होते. धुळ्याच्या तुरुंगामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भगवद्गीतेवर प्रवचने दिली. भगवद्गीतेवरील हे प्रवचन दर रविवारी असे. सानेगुरुजी या प्रवचनाचा शब्द न शब्द कागदावर उतरवून घेत असत. लिहिल्यानंतर विनोबांकडून तपासून घेत असत. पुढे या प्रवचनांचे एक पुस्तक गीता प्रवचने या नावाने प्रसिद्ध झाले. सानेगुरुजी नसते तर महाराष्ट्र किंवा भारत एका महान पुस्तकाला मुकला असता. साने गुरुजींचे आपल्यावर हे फार मोठी उपकार आहेत.

साने गुरूजींचे श्यामची आई हे पुस्तक अतिशय संस्कारपूर्ण पुस्तक आहे. हे पुस्तक वाचले आणि कोणाच्या डोळ्यात पाणी आले नाही असे कधी होणार नाही. आई म्हणजे काय असते आणि आईचे संस्कार कसे असतात यावर साने गुरुजींनी आपले हृदय त्या पुस्तकामध्ये मोकळे केले आहे. हे पुस्तक म्हणजे पुन्हापुन्हा वाचावे आणि आपण सुसंस्कारित व्हावे असेच आहे.एक प्रकारची संस्काराची पवित्र गंगा या पुस्तकातून वाहत आहे आणि आपण त्यातून स्नान करुन पवित्र होत आहोत असेच वाटते.

1942 साली आठ ऑगस्टला गांधीजींनी मुंबईच्या गवालिया टँक वरील मैदानावरून इंग्रजांना चले जाव,  छोडो भारत असा आदेश दिला.सारा देश गांधीजींच्या करेंगे या मरेंगे , अभी नही तो कभी नही या घोषणेने पेटून उठला. सानेगुरुजी सुद्धा छोडो भारत आंदोलनामध्ये सामील झाले. 42 चे आंदोलन जोरदार होते. इंग्रजांना देशभक्तांनी सळो कि पळो करून सोडले. दुसऱ्या महायुद्धाचा काळ असतानासुद्धा भारतीयांनी इंग्रजांच्या नाकीनऊ आणले. बेचाळीसच्या चळवळीत साने गुरुजींनी भूमिगत राहून आपले कार्य अतिशय नेटाने केले.

सन 1941 मध्ये साने गुरुजींनी भारतीय संस्कृती हा अतिशय सुंदर ग्रंथ लिहिला. या ग्रंथामधून साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीची थोरवी पटवून दिलेली आहे. प्रत्येक भारतीय परंपरा, सण-उत्सव, मूल्ये यामागे असलेली सात्विक आणि तात्त्विक भूमिका साने गुरुजींनी अतिशय सोप्या, सहज आणि ओघवत्या भाषेमधून स्पष्ट केली आहे.हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे इतके प्रभावी आहे.

1930 मध्ये त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना साने गुरुजींना आंतरभारतीची कल्पना सुचली. त्रिचनापल्लीला असताना दक्षिण भारतातील भाषांशी आणि भाषिकांशी गुरुजींचा संपर्क आला. त्या भागातील विविध परंपरा,  चालीरीती त्यांना परिचित झाल्या. त्यांना असे वाटले की भारतातील विविध भागातील लोकांच्या भाषा एकमेकांनी जाणून घेतल्या पाहिजेत.त्यासाठी इतर भाषांचा परिचय आपण करून घेतला पाहिजे. प्रांतीयता आणि भाषिकवाद यामुळे कमी होईल; राष्ट्रीय एकात्मतेला या गोष्टीचा फायदा होईल. त्यामुळे त्यांनी आंतरभारतीची स्थापना केली.

साने गुरुजींनी भारताची सेवा करता यावी म्हणून काँग्रेस अंतर्गत राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. राष्ट्रसेवा दलाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने देशभर लोक जागृती केली.

साने गुरुजींनी पत्री हा काव्यसंग्रह लिहिला आहे. त्यामध्ये देशभक्तीपर कवितांचा समावेश आहे. या अशा साहित्यामुळे साने गुरूजींना इंग्रजांनी अटक केली आणि तुरुंगामध्ये टाकले. एवढेच काय तर पत्री या काव्यसंग्रहाच्या प्रती सुद्धा इंग्रज सरकारने जप्त केल्या.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दलित समुदायाला प्रवेश मिळावा.यासाठी साने गुरुजींनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. मंदिर प्रवेशावर लोक जागृती व्हावी म्हणून साने गुरुजींनी 1940 यावर्षी महाराष्ट्रभर दौरा केला. आमरण उपोषण केले.त्यांच्या कार्याला आणि तळमळीला यश आले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले झाले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साने गुरुजींनी आपल्या तत्त्वांना मान्यता देणारा आणि शोभणारा अशा समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला. यावरून एक लक्षात येते, की साने गुरुजींचे विचार हे समाजवादी होते. लोकशाही समाजवाद हा साने गुरुजींच्या विचारांचा गाभा होता.

सन 1948 मध्ये साने गुरुजींनी साधना नावाचे साप्ताहिक सुरु केले. साधना साप्ताहिकात त्यांनी आपले विचार समाजामध्ये मांडण्यास सुरुवात केली. हे मासिक आजही सुरू आहे. आजही समाजाला प्रबोधनात्मक विचार देत आहे.

साने गुरुजी हे ध्येयवेडे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याभोवती अनेक धडपडणारे तरुण गोळा झाले. यामध्ये ग. प्र. प्रधान, एस. एम.जोशी, मधु दंडवते, ना.ग.गोरे, प्रकाशभाई मोहाडीकर, राजा मंगळवेढेकर, यदुनाथ थत्ते अशी काही नावे सांगता येतील.

असे हे साने गुरुजी एक साहित्य प्रेमी व्यक्तिमत्त्व होते. साने गुरुजींनी आपल्या आयुष्यात जवळजवळ 80 पुस्तके लिहिली. ही सर्व पुस्तके त्यांनी मानवतेच्या आणि प्रेमाच्या धर्मासाठी लिहिली असे म्हणता येईल. तसे म्हणण्यासाठी झाला आहे.

साने गुरुजींनी 11 जून 1950 या दिवशी आपली जीवन यात्रा स्वेच्छेने संपविली.

अवश्य वाचा.

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी

योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद Awesome essay on swami Vivekananda in Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment