वाचन प्रेरणा दिन Reading Motivation Day

वाचन प्रेरणा दिन Reading Motivation Day

दरवर्षी 15 ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिन महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.या निमित्ताने आपण सध्याच्या काळामध्ये वाचनाचे महत्त्व आणि वाचन कला या विषयी जाणून घेऊया.

सध्याचे युग डिजिटल युग असले तरी या युगामध्ये वाचनकला Art of reading अतिशय महत्त्वाची कला सिद्ध होत आहे. वाचण्याची कला अगर नसेल तर आपल्या ज्ञानाला मर्यादा पडतात. कोणताही विद्यार्थी आज वाचन करणारा ज्ञानार्थी असेल तर त्याची प्रगती उत्कृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.

27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन 27 February Marathi Bhasha Gaurav Din

माणसाला वाचनासाठी पुस्तके लागतात. पुस्तकांचा मुख्य फायदा असा की आपण ती आपल्याबरोबर कुठे घेऊन जाऊ शकतो. खरेतर आजकाल मोबाईलवरही वाचनाची सुविधा निर्माण झाली आहे. पण पुस्तक वाचणे हे मोबाईल पाहण्याच्या दुष्परिणामांपासून आपल्याला वाचवते.

जगातले जवळजवळ 80 टक्के ज्ञान ग्रंथात बांधलेले सापडेल. पुस्तकांचे वाचन हे आपले ज्ञानाबरोबर मनोरंजन करते. त्यामुळे ग्रंथ मैत्री आपल्या प्रगतीची दालने खोलण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ग्रंथ वाचण्याची गोडी पाश्चात्त्यांकडून भारतात आली. भारतामध्ये पूर्वी साक्षरतेचे प्रमाण मर्यादित होते. त्यामुळे पुस्तकांचे वाचन अतिशय मर्यादित होते.पूर्वीच्या काळी लोकांकडे असलेल्या साक्षरतेचा अभाव आजही भारताला मागे खेचत आहे.

Reading,Writing and Arithmetic यांना पाश्चात्य लोकांनी थ्री आर म्हणून गौरव करताना reading चा क्रम अग्रभागी ठेवला आहे. समर्थ रामदासांनीही “प्रसंगी अखंडित वाचीत जावे” या उक्तीनुसार हेच सत्य सांगितले आहे.

काही लोक फक्त परीक्षेत पुरते वाचतात. काहीजण To kill time म्हणजे वेळ घालवण्यासाठी वाचतात. तर काही लोक Escape from life म्हणून वाचतात. आपल्या जीवनातील समस्यांना ग्रंथांमध्ये काहीजण उत्तर शोधतात.नाटके,कथा, कादंबऱ्या असे वांङ्मय वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद काही लोक घेतात. काहींचे वाचन हे त्यांच्या व्यवसायाकरिता म्हणून होत असते. अर्थात त्यामुळे ते मर्यादित असते.

एखादे लहान मूल जेव्हा वाचायला शिकते, तेव्हा ते रस्त्याने जाताना येताना दिसेल ती पाटी वाचत राहते. वाचता वाचता त्याचा वाचूनच सराव होतो. आणि कुठे काय आहे हे त्याला माहीत होते. कोणत्या दुकानाचे नाव काय आहे आणि त्या दुकानात काय मिळते याचे सहज चालता-चालता ज्ञान त्या मुलाला होत असते. म्हणजेच वाचनातून ज्ञानाचा मार्ग किती सहजगत्या जात असतो हे आपल्याला दिसून येईल.

कोणत्याही व्यक्तीची वयाच्या सोळाव्या वर्षी वाचनाची अभिरुची पक्की होत असते. बाविसाव्या वर्षी जीवनातील व्यवसायाला उपयुक्त असे बरेचसे वाचन त्याचे झालेले असते. 35 वयानंतर माणूस मनाच्या साऱ्या खिडक्या उघडून पाहतो. त्यांची साप्ताहिक खरेदी विविध विषयांच्या मराठी, इंग्रजी मासिके, वर्तमानपत्रे,पाक्षिके यांची असते. पन्नाशी ओलांडल्यानंतर ज्ञानाच्या ओढीची जागा मात्र मनःशांतीची निकड घेते.लोक अध्यात्माच्या दिशेने जाऊ लागतात. अध्यात्मविषयक पुस्तकांची खरेदी वाढत जाते.

वाचन ही एक कला आहे. वाचन ही संगीतासारखीच तन्मयतेने करण्याची गोष्ट आहे.एखाद्या हार्मोनियम वादकाची बोटे जशी पेटी वरून फिरताना सूर, ताल, लय यांचा विचार करून योग्य तिथे संथ,योग्य तिथे मध्यमगती आणि योग्य तिथे जलद गतीने फिरतात. त्याप्रमाणे वाचकाचे होत असते.

असे म्हणतात की माणूस संभाषणातून हजरजबाबी होतो. परंतु वाचनाने माणसाच्या संवादाला अर्थपूर्णता येते. संवादामध्ये भाषा शैलीचा विचार केला तर, त्या व्यक्तीच्या वाचनाचा प्रचंड प्रभाव आणि परिणाम त्याच्या बोलण्यावर झालेला असतो. म्हणजेच माणसाचे बोलणे समृद्ध करण्याची वाचनामध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे.

नॅशनल बुक ट्रस्टच्या सर्वेनुसार भारतात 23 टक्के लोक करमणुकीकरता, 21 टक्के लोक शिक्षणासाठी, 23 टक्के लोक माहिती मिळवण्याची उत्सुकता पुरी व्हावी म्हणून,18 टक्के लोक आपल्या व्यवसायासाठी आणि 15 टक्के लोक आध्यात्मिक वाचन करतात. वाचनाच्या या सर्वेचा विचार केला तर लोक काय वाचतात आणि कशासाठी वाचतात हे आपल्या लक्षात येईल.

वाचन करताना वाचकांनी काही पथ्ये पाळणे अतिशय जरूरीचे असते.पुस्तक आणि डोळे यामध्ये साधारणत 30 सेंटीमीटरचे अंतर असणे आवश्यक आहे. वाचन करताना आपल्या डोळ्यावर प्रकाश येण्याऐवजी तो पुस्तकावर असावा. बुबुळांची सौम्य हालचाल व्हावी. पाठीला पोक काढून वाकून वाचू नये.

अंधूक प्रकाशात वाचन नये. त्याचप्रमाणे रेडिओ, टीव्ही लावून ऐकत वाचू नये.बडबड चालते त्याठिकाणी वाचत बसू नये. संगीत ऐकतही वाचू नये. कोणताही व्यत्यय असताना वाचलेले फारसे लक्षात राहत नाही किंवा आकलनही होत नाही. वाचन ही एकट्याने,मुक्याने आणि शांततेत करण्याची क्रिया आहे. इतर लोक बडबड करत असतात तेव्हा, वाचनाचा वेग 66 टक्क्यांच्या आसपास मंदावतो.

वाचन करताना आपले आकलन कसे होत आहे याचा विचार करून वाचले पाहिजे. नुसतेच भारंभार वाचण्यापेक्षा आकलनाच्या अंदाजांचा विचार करून वाचले तर ते जास्त फायदेशीर आहे. जे वाचायचे आहे ते मध्ये मध्ये न गाळता वाचावे. म्हणजे लिहिणाऱ्याने काय लिहिले आहे याचे पूर्णतः आकलन आपल्याला होऊ शकते. त्याचा दृष्टिकोन आपल्याला समजू शकतो.

चांगल्या वाचकाचा वेळ एका मिनिटाला साधारणतः ४५० शब्द इतका असतो.आपणही आपल्या वाचनाचा वेग मिनिटाला किती आहे हे घड्याळ लावून पडताळून पाहिले पाहिजे. वाचनाचा वेगाला आकलनाचे योग्य परिमाण देऊन प्रसंगी अखंडित वाचीत जावे.

लॉर्ड बेकन यांच्यामते,
काही पुस्तके वाचून वाचून पचवण्याकरिता असतात. काही चघळायची असतात. काही गिळायची असतात. काही चव घेऊन लगेच थुंकून टाकायची असतात. “

काय वाचले पाहिजे आणि काय नंतर केले पाहिजे हे मोजक्याच शब्दात लॉर्ड बेकनने सांगितले. माणूस काय वाचतो आणि कसे वाचतो या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. जिज्ञासापूर्तीसाठी आणि मनोरंजनासाठी होणारे वाचन आनंददायक असते. तितकेच अभ्यास म्हणून केलेले वाचन हे शिस्तपूर्वक करून इच्छित यश मिळविण्यासाठी दूरगामी परिणाम करणारे असे असते.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment