प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व भाषण Prathmik Shikshanat Matrubhasheche Mahattwa

प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व भाषण Prathmik Shikshanat Matrubhasheche Mahattwa

प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व भाषण Prathmik Shikshanat Matrubhasheche Mahattwa

येथे जमलेल्या माझ्या सर्व बाल मित्रांनो, आज कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा करत असताना मातृभाषेचे प्राथमिक शिक्षणात असलेले महत्त्व आपल्यापुढे मी सांगणार आहे.

आपण दरवर्षी २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करत असतो. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि ही आपल्या प्राथमिक शिक्षणात असणे किती गरजेचे आहे हे आज आपल्याला लक्षात येणं फार महत्त्वाचे आहे.

प्राथमिक शिक्षणामध्ये मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कोणतीही मातृभाषा ही मुलाची अगदी गर्भात असल्यापासूनची एक प्रतिसादाची भाषाच असते. जन्माला आल्यानंतर मुलाला आईकडून किंवा कुटुंबाकडून जी भाषा मिळते तीच त्याची मातृभाषा असते.मातृभाषेतून मिळालेले शिक्षण हे नैसर्गिक शिक्षण म्हटले जाते.

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून मिळाले की मुलांच्या शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होतो. मुलाला एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. त्याची अभिव्यक्ती अधिक चांगल्या पद्धतीने होते. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असेल तर मुलांच्या शाळा गळतीचे प्रमाण म्हणजेच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होते. शिक्षणाच्या प्रवाहातून मुले बाहेर फेकली जात नाहीत.

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि गुणवत्ता वाढण्यासाठी मातृभाषेतून मिळणारे शिक्षण ही एक फार जबरदस्त गोष्ट आहे. आपली स्वतःची भाषा संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण होणे ही एक काळाची गरज आहे.

जगात अक्षरशः हजारो भाषा आहेत. परंतु आपली जी मातृभाषा असते ती आपल्याला शिक्षणामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये शिकण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. शास्त्रीय पद्धतीने विचार केला तरी कोणतीही मातृभाषा शिक्षणासाठी सर्वोत्कृष्टच असते. कारण शिक्षण घेण्यासाठी आपल्याला अवगत असलेली भाषा ही सर्वात उपयोगी ठरते.

आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये इंग्रजी भाषेच्या शाळांचे पेव फुटलेले असताना तर मराठी किंवा मातृभाषेतून असणारे शिक्षण ही फार मोठी गरज असल्याचे जाणवते. मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हे सहज असते. मातृभाषेतून मिळणारे शिक्षण प्रत्येक मुलाच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचते. कारण मातृभाषेतूनच मूल विचार करते. इतर भाषांमधून विचार करण्याची शक्ती त्याला इतक्या लहानपणी प्राप्त झालेली नसते. जगातील सर्वच प्रगत देशांमध्ये असलेले शिक्षण हे मातृभाषेतून आहे हे पालकांनी समजून घेतले पाहिजे.

ज्या भाषेमध्ये शाळेत येण्यापूर्वी त्या मुलाने हजारो शब्द अवगत केलेले असतात. तीच भाषा जर त्याच्या प्राथमिक शिक्षणाची जर झाली तर त्याला हा प्राथमिक शिक्षणाचा मार्ग अगदी सहज आणि सोपा होऊन जातो. मातृभाषेची वळणे, तिची शब्दरचना ही मुलाला शालेय प्राथमिक शिक्षणापूर्वीच समजलेली असते. त्यामुळे लेखन, वाचन, संभाषण या क्रिया अगदी सहज होऊन जातात.

मातृभाषेतून किमान प्राथमिक शिक्षण मिळणे ही प्रत्येक मुलाची एक मूलभूत अशी प्राथमिक गरज असते. अनेक शास्त्रीय संशोधनामधून हे सिद्ध झाले आहे की प्रत्येक मूल आपल्या मातृभाषेतून शिकले तर शिक्षणाची सर्वच क्षेत्रे सहजरित्या काबीज करू शकते. मग ते शिक्षण कोणत्याही प्रकारचे असो विज्ञानाचे असो, इंजिनिअरिंगचे असो, वैद्यकीय असो की अन्य कोणतेही असो.

आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भांबावलेल्या प्रत्येक पालकांनी मातृभाषेमध्ये शिक्षण आपल्या मुलांना देणे हे अतिशय निकडीचे बनलेले आहे. प्राथमिक शिक्षणाचा खराखुरा पाया मातृभाषेच्या सहज चालत्या बोलत्या मार्गाने निर्माण झालेला असला तर पुढील शिक्षण मग ते उच्च शिक्षण असो की अन्य कोणतेही असो.

म्हणून असे म्हणावेसे वाटते की संपूर्ण जगामध्ये मातृभाषेतून सर्व मुलांना किमान प्राथमिक शिक्षण तरी मिळावे. असे म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ज्याला ते मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि जर ते मातृभाषेतून मिळाले तर तो गर्जना किंवा डरकाळी फोडत आपल्या जीवनाचा संघर्ष सहजरित्या पार करेल.

आईच्या मुखातून येणारे शब्द लहान मूल आत्मसात करते.ज्याप्रमाणे आईचे दूध हे अगदी बाळाचे पहिले अन्न असते. ते त्याची शारीरिक गरज भागवते. त्याप्रमाणे त्याच्या जीवनासाठी एक मानसिक गरज म्हणून त्याचे शिक्षण मातृभाषेतून होणे तितकेच महत्त्वाचे ठरते.

मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हे नैसर्गिक शिक्षण असते. निसर्गतः मुल स्वतःच शिकत असते. शिक्षक त्याला केवळ मदत करणारे असतात. म्हणून त्यांना आपण सुलभक म्हणतो.

मानसशास्त्रात अनेक संशोधने झाली आणि या सर्व संशोधनांनी एकच आणि एकच निष्कर्ष काढला की मुलाचे किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे. आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगाच्या या भुलभुलैय्यामध्ये मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण ही अतिशय महत्त्वपूर्ण मानसिक गरज झालेली आहे; हे आपण ओळखले नाही तर उद्याच्या जगातील आपली मुले ही नुसती मातृभाषेलाच पारखी होणार नाही तर संपूर्ण मातृभाषिक समुदायाला ती दुःख देणारी ठरतील.

मातृभाषेतून मिळणारे शिक्षण ही काळाची गरज आहे. म्हणून सांगावेसे वाटते की शिकायचे असेल तर मातृभाषेतून शिका कारण आपला मेंदू मातृभाषेतून शिकण्यासाठी सिद्ध झालेला आहे; तयार झालेला आहे.

प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व भाषण Prathmik Shikshanat Matrubhasheche Mahattwa

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment