प्रदूषण एक समस्या निबंध Pradushan Ek Samasya

प्रदूषण एक समस्या निबंध Pradushan Ek Samasya

प्रदूषण एक समस्या Pradushan Ek Samasya

सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. या तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या युगाची सुरुवात अग्नीच्या शोधापासून झाली. अग्नीच्या शोधानंतर मानवाची दिवसेंदिवस वेगाने प्रगती होत आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात विज्ञानाची वेगवान प्रगती झाली. नवनवे शोध लागू लागले. नवनवे तंत्रज्ञान शोधले जाऊ लागले आणि या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अचाट प्रगती बरोबर माणूस निसर्गापासून दूर जात जाऊ लागला.

या प्रगतीबरोबरच आपल्या निसर्गाची प्रचंड हानी होऊ लागली आणि अनेक घातक पदार्थ निर्माण झाल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. ग्लोबल सारख्या भयावह समस्येची निर्मिती हे त्यातीलच एक. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने पृथ्वीचे वातावरण, जलावरण आणि भूपृष्ठ प्रदूषित झाले. प्रदूषणामुळे मानवच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टी एका मोठ्या भयानक संकटाला सामोरे जात आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे.

विविध प्रकारची प्रदूषके हवेत मिसळल्यामुळे हवा अतिशय दूषित झाली आहे. भारतातील मुंबई दिल्ली नागपूर कलकत्ता चेन्नई अशा महानगरांमध्ये या प्रदूषणामुळे माणसांचे जीवन अतिशय धोकादायक झाले आहे. औद्योगिकरणामुळे नद्यांमध्ये अतिशय विषारी रसायने मिश्रित असलेले घातक पदार्थ सोडले जात आहेत. त्यामुळे नद्यांमधील जलचर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती यांचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास औद्योगिक क्रांती हे फार मोठे कारण आहे.

प्रदूषणाचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत. हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण. याशिवाय आणखी प्रदूषणाचे काही प्रकार आहेत; ते म्हणजे किरणोत्सारी प्रदूषण आणि भू प्रदूषण.

1)हवा प्रदूषण Air Pollution


हवेच्या प्रदूषणाला वायू प्रदूषण असेही म्हणतात. हवेमध्ये विविध प्रकारची प्रदूषके मिसळल्यामुळे हवेबरोबर त्यांचे अभिसरण सुरू होते आणि हवेतील पाण्याच्या वाफेवर प्रदूषकांची अभिक्रीया होते. यातून तयार झालेले पदार्थ अत्यंत घातक असतात. श्वसनात वापरल्या जाणाऱ्या हवेबरोबर आपले नियंत्रण नसते आणि त्यामुळे विविध प्रकारचे फुप्फुसांचे रोग होत असतात. याशिवाय वनस्पतींच्या वाढीवरही त्याचा खूप मोठा घातक परिणाम होतो.

हवा प्रदूषणाची कारणे Causes of air pollution

आज-काल वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. वाहनांच्या धुरामुळे धून कार्बन डाय-ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साइड,गंधक, शिसाचे कण यासारखे विषारी प्रदूषके बाहेर पडतात. खतांचे कारखाने आणि शीतकरणगृहातून अमोनिया सारखा वायू बाहेर पडतो. कारखान्यातील इंधनांच्या जलन प्रक्रियेमुळे धुरके बाहेर पडतात. त्यामुळे हवा प्रदूषित होते. यासारख्या अनेक कारणांमुळे हवा प्रदूषित होते.

हवेच्या प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे. त्यामुळे महापूर,वादळे यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.या प्रदूषणामुळे माणूस आणि इतर सर्व सजीवांच्या आरोग्यावर विघातक कसा परिणाम होतो. हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर होणारा परिणाम फारच भयानक आहे. दमा, डोकेदुखी, श्वसनसंस्थेचे विकार, पक्षाघात, कॅन्सर, डोळ्यांचे आजार यासारखे विकार देखील या प्रदूषणामुळे बळावतात.

2)जल प्रदूषण Water Pollution

सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी पाणीही अत्यंत आवश्यक असणारा महत्त्वपूर्ण घटक आहे पाण्याचे नैसर्गिक आणि रासायनिक गुणधर्म घेऊनच वनस्पती व प्राणी यांची वाढ होत असते. म्हणजे ते केवळ पाण्यावर जगतात. त्यामुळेच पाण्याला जीवन असेही म्हणतात. पाण्याच्या नैसर्गिक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म मध्ये फेरफार झाल्यामुळे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनमानावर अतिशय प्रतिकूल परिणाम झालेला आहे. अशा प्रकारचे जे प्रदूषण आहे, त्यालाच जलप्रदूषण असे म्हणतात.

अनेक ठिकाणी माणसे ,नदी, तलाव ,सरोवरे, धरणे यासारख्या जलाशयात भांडी व कपडे धुणे, जनावरे धुणे, आंघोळ करणे यासारख्या प्रक्रिया करतात. त्यामुळे पिण्यायोग्य असलेले पाणी सुद्धा प्रदूषित होते. अनेक ठिकाणी कारखान्यातील सांडपाणी, घरातील सांडपाणी, शहरातील मैला प्रक्रिया न करता जलाशयात सोडला जातो. त्यामुळे त्यातील घातक पदार्थांमुळे पाणी विषारी बनते. म्हणजेच त्याचे प्रदूषण होते.

पिकांच्या रक्षणासाठी विविध प्रकारची घातक कीटकनाशके वापरली जातात. तणनाशके वापरली जातात. त्यामुळे त्यातील विषारी घटक पाण्यामध्ये विरघळले जातात. समुद्रातून खनिज तेलाची वाहतूक होते.त्यावेळी जहाजातून तेलाची गळती झाल्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर त्याचा तवंग निर्माण होतो. त्यामुळे जलचरांचे जीवनमान धोक्यात येते. अशा प्रदूषित पाण्यामुळे मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो प्रदूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे रोग आणि आजार होतात. त्यामध्ये प्रामुख्याने कावीळ, पटकी, कॉलरा, विषमज्वर, जठराचे रोग, आतड्यांचे रोग होतात.

3)ध्वनि प्रदूषण Sound pollution

आवाज ऐकणारास ज्या वेळेला एखाद्या आवाजाने त्रास होतो. त्याला गोंगाट म्हणतात.अशा प्रकारच्या त्रासदायक आणि अपायकारक आवाजाचे ध्वनिप्रदूषण म्हटले जाते.

मोठ्याने लावलेली लाऊड स्पीकर,टीव्ही,टेपरेकॉर्डर, बेंजो, डीजे यांमुळे ध्वनिप्रदूषण होते. मिक्सर, वॉशिंग मशीन, ग्राइंडर यामुळेसुद्धा ध्वनिप्रदूषण तयार होते. मोठमोठ्याने वाजणारी घंटा,भांडणारे शेजारी हेसुद्धा ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत असतात. बस, रिक्षा,मोटारी, विमाने, रेल्वे यामुळे उच्च प्रतीचा ध्वनी तयार होतो. तो ध्वनी अतिशय घातक असे ध्वनिप्रदूषण तयार करतो.

ध्वनिप्रदूषण

ध्वनी प्रदूषणामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. फार वेळ मोठा ध्वनी कानावर आदळल्याने कायमचा बहिरेपणा येऊ शकतो.ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो, एकाग्रता भंग पावते, हृदयाचे ठोके वाढतात, डोळ्यांचे बाहुल्यांचे प्रसरण होते. फुफ्फुसावर ध्वनिप्रदूषणाचा फार घातक परिणाम होतो. संशोधनात असे आढळले आहे की ध्वनिप्रदूषणामुळे नैराश्य येते. याशिवाय विविध प्रकारचे मनोविकार सुद्धा होतात.

4)किरणोत्सारी प्रदूषण Pollution of radiation

किरणोत्सारी प्रदूषण हे सर्वात धोकादायक समजले जाते.विविध प्रकारचे किरणोत्सर्ग करणारे रेडियम, पोलोनियम,युरेनियम असे रासायनिक पदार्थ यामध्ये समाविष्ट होतात. अमेरिकने दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे किरणोत्सर्गी प्रदूषणाचा फार मोठा भयानक परिणाम जपानला भोगावा लागला.

किरणोत्सारी प्रदूषणामुळे कर्करोग, अनुवंशिक रोग, त्वचा रोग, गुणसूत्रांचे रोग निर्माण होतात. किरणोत्सारी प्रदूषणामुळे अनुवंशिक दोष निर्माण होतात.

प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी उपाय योजना

सर्व प्रकारच्या प्रदूषणाचे घातक परिणाम यांची जाणीव शालेय जीवनातच करून दिली तर ते अतिशय दूरगामी विधायक परिणाम करणारे ठरेल. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होणे गरजेचे आहे. कारखान्यांमधील सांडपाणी यावर पुनर्प्रक्रिया केली पाहिजे.साखर कारखान्यांनी खतांचे कारखाने यामधून बाहेर पडणारी मळी यावर पुनर्प्रक्रिया करून मानवी उपयोगाचे पदार्थ तयार केले पाहिजेत. प्लास्टिकचा वापर मर्यादित प्रमाणात केला पाहिजे. मानव आणि आपल्या गरजा मर्यादित ठेवून लालसा कमी केली तर बऱ्याच प्रमाणात सर्वच प्रकारच्या प्रदूषणावर नियंत्रण येईल.

विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी सुरू असणारे लाऊडस्पीकर कमी आवाजात चालू ठेवले पाहिजेत किंवा बंद ठेवले तरी चालतील. वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम जगभरामध्ये राबवला पाहिजे. जलसाठे स्वच्छ व विनाप्रदूषित राहण्यासाठी स्थानिक पातळीवर काम झाले पाहिजे. वाहनांना असलेले कर्कश ध्वनी असणारे हॉर्न न ठेवता कमी आवाजातील ध्वनी ठेवले पाहिजे. इलेक्ट्रिक आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे.

अशाप्रकारे आपण विविध प्रकारच्या प्रदूषणाचा अभ्यास करून प्रदूषण होऊ नये; यासाठी जाणीव जागृती निर्माण केली; तर आपली ही पृथ्वी अधिक सुंदर आणि जीवन जगण्यासाठी अनुकूल होईल.

प्रदूषण एक समस्या Pradushan Ek Samasya

अवश्य वाचा.

माझी वसुंधरा माझी जबाबदारी निबंध Mazi Vasudhara Mazi Jababdari

सूर्य उगवला नाही तर निबंध Surya Ugavala Nahi tar

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment