पडक्या किल्ल्याचे मनोगत वर मराठी निबंध Padakya Killyache manogat

पडक्या किल्ल्याचे मनोगत वर मराठी निबंध Padakya Killyache manogat

पडक्या किल्ल्याचे मनोगत वर मराठी निबंध Padakya Killyache manogat                  काय ते दिवस होते बहरलेले! जेव्हा मी तरुण होतो. माझ्या भिंती मजबूत होत्या. आजूबाजूला माझ्या रखवालदांराची ये-जा होती.

कोणे एके काळी तुतारी, नगारे यांचे आवाज निनादत होते. रणशिंग वाजत होते. पाने, फुले, तोरणे यांची रेलचेल होती. सर्वांचे माझ्याकडे लक्ष होते. मी सजलेला आणि गजबजलेला होतो.

बैलपोळा मराठीत निबंध

संध्याकाळ होताच माझे बुलंद दरवाजे माझे रक्षक लावून घेत. खडा पहारा सर्व बुरुज आणि माच्यांवर सुरू असे. प्रत्येक दरवाजावर त्या त्या पाळीचे सैनिक माझ्या रखवालीसाठी जातीने उभे असत. “जागते रहो” असे म्हणून आपल्या मशाली तेजाळत उभे होते .

माझा रखवाल किल्लेदार माझ्या सगळ्याच गोष्टींची काळजी घेत असे. गडावरील प्रत्येकाची काळजी घेत असे. कुठे भिंत कोसळली, कुठे वीट पडली, कुठे दगड निखळला. तर लगेच दुरुस्ती होत असे.ही दुरुस्ती म्हणजे एखाद्याला जखम झाल्यानंतर त्याची माया ममतेने काळजी घेत, दवापाणी करावे अशीच होती.

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्तवर मराठीत निबंध

माझी निर्मिती झाली तो क्षण तर माझ्या आयुष्यातला अभूतपूर्व आहे. सुवर्णाक्षरांनी नोंद घेण्यासारखा क्षण होता. त्या आठवणीही माझ्या स्मरणात अगदी ताज्या आहेत.

स्वराज्याची निर्मिती करत असताना रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे माझ्याकडे लक्ष गेले. सह्याद्रीच्या बेलाग कडे, कातळ यांनी बनलेला मी पाहताच त्यांना वाटले की हा साधासुधा डोंगर नसून स्वराज्याच्या रक्षणासाठी उभा असलेला धैर्यवंत सेनापतीच आहे. महाराजांना पाहताच मी क्षणभर स्तब्ध झालो. त्यांच्यापुढे नम्रपणे उभा राहिलो.

छत्रपती शिवरायांनी माझ्या बांधकामासाठी आपले कुशल कारागीर लावले. प्रचंड धन यासाठी वापरले. गडावर तीन टाकी खोदली, तलाव बांधला, देवीचे मंदिर बांधले. मोठे मोठे महाल बांधले, वाडे बांधले, बाजारपेठ वसवली. शस्त्रागाराची निर्मिती केली. सैनिकांसाठी रहायला जागा बांधली. हत्तीखाना, पागा, तबेला बांधला. गाईंसाठी गोशाळा बांधली.

प्रत्येक बुरुजावर टेहळणीसाठी जागा होत्या. त्याच प्रमाणे छोट्या छोट्या तोफा सुद्धा ठेवलेल्या होत्या. येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी धर्मशाळा बांधली. एक सुंदर शिल्प ज्याप्रमाणे घडवतात त्याप्रमाणे माझी बांधणी झाली.

स्वराज्याच्या संरक्षणासाठी बुलंद आणि बेलाग असा किल्ला म्हणून स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज माझ्याकडे पाहत होते. आणि गडावर असलेले सर्व मावळे माझ्या संरक्षणासाठी कणखरपणे पाय रोवून उभे होते.

स्वराज्याचा इतिहास माझ्यासारख्या रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड,सिंहगड, राजगड अशा किल्ल्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही स्वराज्याच्या इतिहासात माझ्या सारख्या गडकोटांचे महत्व टिकून होते.

सन 1818 मध्ये मराठी साम्राज्याचा शेवट झाला. आणि माझ्या सर्व दुर्ग बांधवांसहित आम्ही इंग्रजांच्या ताब्यात गेलो. पुन्हा या गड किल्ल्यांचा उपयोग करून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या लढवय्या वीरांनी स्वराज्याचा उद्योग करू नये. म्हणून तोफा लावून इंग्रजांनी आम्हाला जमीनदोस्त केले. आमच्या तटबंद्या उद्ध्वस्त झाल्या, बुरूज ढासळले, दरवाजे तोडले गेले, महाल,वाडे जमीनदोस्त झाले.

गडावरची रयत हुसकावून देण्यात आली. आता कोणीही गडावर राहीनासे झाले. देवीचे मंदिर होते. तिची पूजा करायलाही गडावर कोणीही येऊ नये इतकी इंग्रजांची धास्ती होती. सगळीकडे गवत माजले. जंगली प्राणी फिरू लागले. घुशी आणि उंदरांनी माझ्या उरल्यासुरल्या वास्तूंना उध्वस्त करायला सुरुवात केली. अतिशय भग्न स्थितीमध्ये माझे आवशेष आजही पडून आहेत.

हळूहळू काही पर्यटकांची पावले माझ्याकडे पडू लागली आहेत. काही लोक मौज-मस्ती साठीसुद्धा येथे येतात. मौज मस्ती साठी आलेले लोक इथे येऊन कचरा करतात. आपली नावे माझ्या बुरुजावर लिहितात. पडक्या वाड्यांच्या भिंतीवर लिहितात. काय त्यांना अधिकार आहे? किती ही कृतघ्नता ? लोक गडावर येऊ लागले आहेत. पण कृतघ्न वृत्तीने नको त्या गोष्टी करत आहेत.

एक मात्र बरे झाले. गडाजवळच्या गावातील लोक आता माझ्याकडे येतात.त्यांनी देवीचे मंदिर खोलले आहे. दररोज त्या ठिकाणी दिवा लावला जातो. साफसफाई झाली आहे. परंतु माझे गेलेले इतिहासप्रसिद्ध रूप आता राहिले नाही. त्यामुळे मनाला अतिशय खिन्नता आली आहे.

देश स्वतंत्र झाला.स्वराज्य पुन्हा आले. पण माझ्याकडे लक्ष देण्यासाठी आता कोणाला वेळ आहे असे दिसत नाही. माझे पडके बुरुज आणि उध्वस्त वाड्यांचे अवशेष तसेच पडून आहेत. मला कोणी सावरेल असे वाटत नाही.

बरोबरच आहे म्हणा गरज सरो वैद्य मरो अशी जणू काही संस्कृती आहे. काळाचा महिमा आहे.असा माझा समज होत असेल तर तो काही खोटा नाही हेच खरे. हो पण एकदा एक दुर्गप्रेमी माणूस मला भेटला होता. त्याच्याकडे मी माझे दुःख व्यक्त केले.त्याला माझ्याबद्दल खूपच आपुलकी होती. तो मला असे म्हणाला की, आता आम्ही काही मित्र येऊन या ठिकाणी पडक्या वाड्याचे आणि बुरुजांचे अवशेष पूर्वस्थितीला आणून देणार आहोत.

बरेच दिवस झाले पुन्हा तो आला नाही. मी त्याची वाट पाहत आहे तो नक्की येईल. काही काही किल्ल्यांवर दुर्गप्रेमी मंडळी जाऊन संशोधन करतात. दुरूस्तीची कामे करतात. ऐतिहासिक दिन साजरे करतात. साफसफाई करतात.त्यांच्यासारखे शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नक्कीच माझ्याकडे येतील. दुर्गप्रेमींसाठी तर मी माझे बाहू पसरून उभा आहे. मला भेटायला या असे मुकपणे मी सांगत आहे.

माझा इतिहास तुम्हाला माहित असेल किंवा नसेलही पण माझ्या गडावरच्या प्रत्येक दगडाला आणि चिऱ्याला तो नक्कीच माहित आहे.माझा इतिहास गौरवशाली आहे.माझा इतिहास तुम्हाला फार माहीत नाही.हे सांगणे म्हणजे तुम्ही लिहिलेल्या इतिहासाचा अपमान आहे असे समजू नका. कारण तुम्ही लिहिलेला इतिहास माझ्या समजुतीप्रमाणे अपुरा आहे.

ज्याला ज्याला छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्य विषयी अभिमान आहे.तोच आम्हा साऱ्या दुर्ग कोटांकडे लक्ष देईल. जर कोणी या इतिहासाबद्दल अनभिज्ञ राहून कृतघ्नपणा दाखवतील त्यांच्यासाठी इशारा देतो की पारतंत्र्याच्या बेड्या तुमच्या पायामध्ये पडल्याशिवाय राहणार नाहीत.जागे व्हा.

प्रत्येक गडाचा इतिहास आणि त्याचे इतिहासातील स्थान हे दीपस्तंभाप्रमाणे आहे. जेव्हा तुम्ही ते अभ्यासाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपला इतिहास अतिशय गौरवशाली आणि अभिमान बाळगण्यासारखा आहे. आणि त्यामध्ये किल्ल्यांचे स्थान अतिशय मोलाचे आहे.

जेव्हा छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहासाचा अभिमान पूर्वक वाचून गडकोटांचा समृद्ध असा वारसा जतन करण्याची बुद्धी सर्वांना होईल तो सोन्याचा दिवस असे मला वाटते.

पडक्या किल्ल्याचे मनोगत वर मराठी निबंध Padakya Killyache manogat

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment