माझे जीवन my life

  • माझे जीवन my life

आज माझा 45 वा वाढदिवस आहे. खरेतर आयुष्यातील ही पंचेचाळीस वर्षे फार थोडी वर्ष आहेत असे म्हणता येणार नाही. माझा जन्म जुन्नर तालुक्यातील पाचघर या डोंगरांनी वेढलेल्या गावामध्ये झाला. पाचघर हे गाव मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. खरेतर गाव म्हणजे इतके ते मोठे नाही ती एक छोटीशी वाडी आहे. हे पाचघर या नावातूनच लक्षात येण्यासारखे आहे.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या पाचघरवाडीत माझा जन्म दहा जुलै 1976 या दिवशी झाला. माझी जन्मतारीख ही खरीखुरी जन्मतारीख नाही. परंतु असे असले तरी ती खरी मानून माझे सर्व काही चालले आहे. माझ्या गावाबद्दल मला अतिशय अभिमान आहे.
आज जेव्हा वयाची 45 वर्षे पूर्ण होत आहेत; तेव्हा थोडेसे आजपर्यंतच्या आयुष्याचे सिंहावलोकन करण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
मी माझ्या आईवडिलांचे चौथे अपत्य. तत्कालीन लोकांना आपला संसार हा गोकुळाप्रमाणे भरलेला असावा असे वाटे. मला एकही सख्खी बहीण नाही. तीन भाऊ आहेत. मी सर्वात धाकटा. त्यामुळे आईचा लाडका सर्व भाऊ माझ्यावर माया करत. वडिल अतिशय धार्मिक आणि अध्यात्मिक विचाराचे आहेत.त्यांचे संस्कार मला आयुष्यभर पुरणार आहेत. माझे लहानपण पण अतिशय मजेत गेले
बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणण्याइतपत नक्कीच ते आनंदात गेले.
इयत्ता सातवी पर्यंतचे माझे शिक्षण माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. सातवीपर्यंतचे माझे दिवस खूप आनंदात गेले. अभ्यास म्हणून फारसा कधी करावा लागला नाही आणि माझे शिक्षक सुद्धा आम्ही फार अभ्यास करावा याबद्दल कधीही आग्रही दिसून आले नाही. मात्र प्रत्येक शिक्षकाने आमच्यावर चांगले संस्कार केले आणि संस्कारांची शिदोरी आयुष्यभरासाठी पुरेल एवढी दिली.
शाळेत असताना आम्ही मुले खूप खेळत. शाळा म्हणजे अभ्यासाचे केंद्र नसून खेळण्याचे मैदानच आहे असेच आम्हाला वाटे. गुरुजी जे काही शिकवत ते त्यावेळी आम्ही जमेल तेवढे आत्मसात करीत असू. पुढे मोठे होऊन आम्हाला काहीतरी व्हायचे आहे, करायचे आहे असे आमच्या कधीही ध्यानीमनी नव्हते. आजकालच्या मुलांना मात्र बालवाडीपासून अभ्यासाचा प्रचंड तगादा मागे लागलेला असतो. तसा मात्र आम्हाला नव्हता. त्यामुळे सारी मौजच मौज होती. जमेल तेवढा अभ्यास करणे आणि मौजमजा एवढाच आमचा दररोजचा ठरलेला कार्यक्रम असे. तो कधीही चुकत नसे. ते दिवस फार फार फार सुखाचे होते. असे दिवस पुन्हा आयुष्यात येणार नाहीत.
इयत्ता सातवी नंतर मात्र आयुष्याची दिशा बदलत गेली. ओतूर सारख्या मोठ्या गावात आठवीपासूनचे शिक्षण चैतन्य विद्यालय ओतुरमध्ये सुरू झाले. अभ्यास करायचा असतो आणि अभ्यास करून आपण कोणीतरी मोठे व्हायचे असते असे मला इथे आल्यावर इतर विद्यार्थ्यांकडून आणि गुरुवर्यांकडून लक्षात आणून दिले गेले. असे म्हणावे लागेल. इतका याबाबतीत मी अडाणी होतो.
त्यामुळे मी अभ्यासाला लागलो परंतु या मोठ्या गावातील विद्यार्थी सुरुवाती सुरुवातीला माझ्याशी फटकून वागत. कोणी आपल्या हुशारीची, बुद्धीची शेखी मिरवे तर कोणी आपल्या कमावलेल्या चतुरपणाची. असे असले तरी हळूहळू मी त्यांच्या मध्ये रमू लागलो. चांगले शिक्षक भेटले आणि शिक्षणातून जीवनाचा कायापालट होऊ शकतो याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. इयत्ता दहावीनंतर डी.एड. केले तर माणूस लवकर नोकरीला लागतो आणि त्याचे दारिद्र्याचे दिवस हटतात. पैशांची समृद्धी येते. नोकरी म्हणून फार कष्ट करावे लागत नाहीत. दिवस मजेत जातात. याचे मला आकर्षण वाटले. त्यामुळे दहावीनंतर डी.एड. करण्याचा निर्णय मनोमन मी घेतला होता. परंतु दहावीत चांगले मार्क मिळूनसुद्धा 1993 साली ही पदविका बारावीनंतर प्रवेशासाठी सरकारने पात्र ठरवली आणि माझे स्वप्न पुढे ढकलले गेले .
बारावीला अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर या ठिकाणी मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. परंतु गणित या विषयासाठी चांगले शिक्षक नाहीत हे माझ्या लक्षात आले. मी माझा निर्णय बदलला आणि पुन्हा कला शाखेकडे मी प्रवेश घेतला. बारावीनंतर डी.एड. केले. शरद अध्यापक विद्यालय हे शिक्षक संघटनेचे होते. पुण्यामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याचा मला फार आनंद झाला होता. त्या निमित्ताने पुणे शहराची ओळख झाली. डी.एडच्या दोन वर्षात पुणे शहर आणि परिसर जेवढा पाहता येईल; अनुभवता येईल तेवढा मी पाहिला. अनुभवला. डी.एड झाल्यानंतर मात्र नोकरीची संधी लवकर मिळेना. पुढे शिक्षण सेवक हे पद आले. निवड मंडळाच्या परीक्षा बंद झाल्या आणि गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरती होऊ लागली. त्यात थोडा मी कमी पडलो. आयुष्यातील सहा वर्ष नोकरीविना गेली. असे असले तरी दरम्यानच्या काळात मी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये इंग्रजी हा मुख्य विषय ठेवून बी.ए. पूर्ण केले . महाविद्यालयात असताना वाचनाचा छंद जोपासला. खरे तर मला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती आणि आहे. महाविद्यालयीन दिवसांमध्ये ग्रंथालय जवळ केले. अनेक पुस्तके वाचून काढली. जिज्ञासा मला स्वस्थ बसू देत नव्हती. तशातच आमचे प्राध्यापक घोळवे सर यांनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षांबाबत मार्गदर्शन करून आम्हाला तिकडे वळण्याचा सल्ला दिला. त्या दृष्टीनेही मी अभ्यास केला. फारसे यश त्यामध्ये आले नाही. परंतु त्यासाठी झालेल्या वाचनाने मला निश्चितच समृद्ध केले. असे आज मी म्हणू शकतो.
पुढे पैशांची अडचण असल्यामुळे लगेच एम. ए.प्रवेश न घेता नोकरी शोधू लागला.
परंतु यश आले नाही.
नोकरी शोधणे फार जिकिरीचे झाले. माझ्यामध्ये फारच असंतोष तयार झाला. परंतु हार मानली नाही.
2003 ते 2004 या वर्षभरात आमदार बाळासाहेब दांगट यांच्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणचा शिक्षक वृंद अतिशय होतकरू होता. जिवाला जीव देणारा होता. एकमेकांवर प्रेम करणारा होता. त्या ठिकाणच्या आदिवासी विद्यार्थ्यांबरोबर मी खूप रमलो. त्यासंदर्भात खूप काही आठवणी आजही माझ्या मनात तळ ठोकून आहेत.
पुढे निवड मंडळाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागला. त्यामध्ये मी अपील केले आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये मार्च 2004 पासून नोकरीस लागलो. खेड तालुक्यातील येणवे बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळा ही माझी नोकरीची पहिली शाळा होय. त्या ठिकाणचे मावळ भागातील ग्रामस्थ, इथे असणारे शिक्षक आजही मला चांगले आठवतात. तेथील आठवणी आजही आनंद देतात. 2004 च्या नोव्हेंबर मध्ये लग्न झाले. आणि आयुष्याच्या वेगळ्या वळणावर मी आलो. मन जपणारी आणि मनाने हळवी पत्नी मला मिळाली. तिलाही नंतर सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये नोकरी मिळाली. परंतु पुणे जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा संधी मिळाल्यानंतर ती नोकरी सोडून पत्नीला पुणे जिल्हा परिषदेत जुन्नर तालुका मिळाला खूप आनंद झाला.
खेड तालुक्यातून बदली करून मी जुन्नर तालुक्यात आलो पांगरी तर्फे ओतूर या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झालो. या ठिकाणी माझे आदरस्थान संजूभाऊ डुंबरे होते. त्यांनी माझ्या नोकरी करण्याबद्दलच्या दृष्टिकोनाला प्रचंड हादरा देऊन; आपण नोकरी कशी केली पाहिजे? शिक्षक म्हणून आपण किती जबाबदारीने काम केले पाहिजे? याची शिकवण आणि संस्कार त्यांनी मला दिले.आजही मी त्यांच्या मार्गदर्शनाने चालतो. दहा वर्षे त्या ठिकाणी नोकरी केल्यानंतर आज मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलमे या ठिकाणी नोकरी करत आहे. दरम्यानच्या काळात शिक्षक पतसंस्थेचे कर्ज घेऊन ओतूर या ठिकाणी जागा घेतली आणि छानसे घर बांधले आहे. शाळेचा पूर्ण कायापालट करून विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा दर्जा उच्च स्तरावर नेण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. बरोबरच्या शिक्षक बंधू-भगिनींना घेऊन मी माझी वाटचाल करीत आहे.
संसारामध्ये असलेल्या अडीअडचणी प्रत्येकाला असतात. तशा मलाही आहे. शरीराच्या कुरबुरी आहेत परंतु माझी दोन मुले अतिशय बुद्धिमान आज्ञाधारक असल्याने माझा वारसा मी त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. तो वारसा नक्कीच ते पुढे नेतील अशी मला निश्चितच खात्री आहे.
आयुष्याच्या या वळणावर मी स्वतःला सुखी आणि समाधानी मानतो.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

5 thoughts on “माझे जीवन my life”

  1. खूप छान माहिती
    माझे बालपण
    माझा शैक्षणिक प्रवास
    माझी नोकरी व त्यासाठी धडपड
    जीवनातील विविध प्रसंग
    वैवाहिक जीवन व मुलांची प्रगती.

  2. छान लेख. आयुष्य कसं असावं याच छान उदाहरण.happy Birthday to you

Leave a Comment