माझा आवडता छंद वाचन निबंध My favourite hobby

माझा आवडता छंद वाचन निबंध My favourite hobby

माझा आवडता छंद My favourite hobby या विषयावर आपण या ठिकाणी निबंध वाचणार आहोत.

My-Favourite-Hobby

प्रत्येकाला एखादा आवडता छंद असलाच पाहिजे. असे माझे मत आहे. कारण छंद आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम सातत्याने करीत असतात. प्रत्येक माणसाला काही ना काही छंद असतो. तसा मला सुद्धा वाचनाचा छंद आहे. माझा आवडता छंद वाचन आहे.

वाचनाचा छंद मी जोपासत असतो. अगदी दुसरीला असल्यापासून दिसेल ते वाचण्याचा छंद मला लागला. माझ्या वडिलांना सुद्धा वाचनाचा छंद आहे. त्यांच्या हातात सतत एखादे पुस्तक असते. घरामध्ये धार्मिक पुस्तकांचा चांगला साठा आहे. वडिलांच्या छंदाकडे पाहून मलाही वाचण्याचा छंद लागला.

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्तवर मराठीत निबंध

वाचनाचा छंद माणसाला समृद्ध बनवत असतो. मला या छंदाने खूप समृद्ध बनवले असे आज मी म्हणू शकतो. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचे वाचनाने मला खूप आनंद दिला आहे. त्याच प्रमाणे माझ्या बोलण्यातून या पुस्तकांचा प्रभाव मला आणि माझ्या बरोबरच्या लोकांना सतत जाणवत असतो.

“दिसामाजी काहीतरी लिहावे,प्रसंगी अखंडित वाचीत जावे.” असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. ते काही खोटे नाही.समर्थ रामदासांच्या या उक्तीप्रमाणे माझे वाचन चालू असते. दररोज किमान पंचवीस पाने तरी मी वाचन करत असतो.त्यामुळे ज्ञानात भर पडते. एकाग्रता वाढते आणि आपल्या मेंदूला चांगला व्यायाम घडतो.

दिवसभरामध्ये काहीना काही लेखन झाले पाहिजे. त्यामुळे लेखनातील शुद्धता, अक्षरांचे वळण चांगले राहते.आपल्या लेखनाच्या सरावाबरोबर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या प्रसंगी अखंड वाचन करावे. पुस्तके वाचता वाचता जीवनाचा ग्रंथ आपण केव्हा वाचायला लागतो हे समजतही नाही.

माझे आवडते शिक्षक निबंध

जीवन खुप सुंदर आहे.जीवनाचा अर्थ कळण्यासाठी पुस्तकांचे वाचन आपल्याला सहाय्य करते. पुस्तकांच्या वाचनाचा छंद जीवनातील कोणत्याही क्षेत्रात आपण असलो तरी अतिशय फायदेशीर ठरतो. वाचनाचे फायदे किती आहेत हे सांगता येणार नाही. पण कोणत्याही क्षेत्रातील माणसाला त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हा छंद अतिशय मौल्यवान मदत करतो.

माझ्याकडे लहानपणी फारशी पुस्तके नसत. घरामध्ये असलेली धार्मिक पुस्तके मला फारशी समजत नव्हती.त्यामुळे माझ्या जिल्हा परिषद शाळेतील पुस्तके आमच्या गुरुजींकडून घेऊन मी वाचू लागलो. गोष्टींची पुस्तके म्हटले इतर इसापनीती, अकबर-बिरबलाच्या गोष्टी, पंचतंत्र अशी पुस्तके मी लहानपणी वाचून काढली. त्याचबरोबर महाभारतातील गोष्टी, रामायणातील गोष्टी, बोधकथा, परिकथा, ऐतिहासिक गोष्टी, शिवाजी महाराजांच्या गोष्टी मी लहानपणीच वाचल्या. मला या वाचनाने आयुष्यभर पुरेल एवढा आनंद दिला.

माझे गाव खेडे गाव आहे. आमची लहानपणची परिस्थिती अतिशय बेताची होती. बाजाराचे गाव दहा किलोमीटर अंतरावर होते. त्याठिकाणी एक पुस्तकांचे खूप छान दुकान होते. मी आईबरोबर पायी पायी चालत त्याठिकाणी जाई. त्या पुस्तकांच्या दुकानात पुढे जाऊन उभा राहून ती मांडलेली पुस्तके मी पहात असे. एकदा तर आईकडे मी पुस्तक घेण्याचा हट्ट केला. आईने तो लगेच पुरवला असे नाही. पण एक दिवस मी हट्ट धरून आईबरोबर बाजारच्या गावी गेलो आणि एक दोन रुपयाचे पुस्तक विकत घेतले.हे मी आयुष्यात घेतलेले पहिले पुस्तक होते.

पुढे हायस्कूलमध्ये गेल्यानंतर तेथील ग्रंथालय मला खुणावू लागले. वर्गामध्ये एक वाचन पेटी कार्यानुभवच्या तासाला आमचे सर घेऊन येत. या पेटीतील पुस्तके आम्ही विद्यार्थी निवडत आणि तासभर आवडीच्या पुस्तकाचे वाचन करीत. तो वाचनाचा तास खूप आनंददायक असे. कोणाला कोणते पुस्तक मिळाले, कोणत्या पुस्तकावर कोणते चित्र आहे, त्या पुस्तकात काय आहे हे आम्ही बघता बघता आमचा आनंद द्विगुणीत करीत.

चैतन्य विद्यालय या हायस्कूलमध्ये असताना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टी लागली की मी ग्रंथपालाकडून चांगली चांगली पुस्तके वाचायला घेऊन जाई. ती पुस्तके मला वाचायला देताना त्या ग्रंथपालांना सुद्धा आनंद होत असे. हायस्कूलमध्ये असताना सुद्धा अशा प्रकारे मी माझ्या वाचनाचा छंद चांगल्या प्रकारे जोपासला.

इयत्ता दहावीमध्ये असताना जानेवारी महिन्यात माझ्या भावाने मृत्युंजय कादंबरी वाचायला आणली होती. महान लेखक शिवाजीराव सावंत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले दानशुर मृत्युंजय कर्णाचे ते चरित्र वाचताना मी दहावीला आहे हे विसरलो. दहावीची पुस्तके बाजूला झाली आणि मला मृत्युंजय कादंबरीची मोहिनी पडली. ती कादंबरी मंतरल्यासारखी मी पूर्णपणे वाचून काढली.

पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर अकरावीला मी माझा वाचनाचा छंद तेथील खूप मोठ्या ग्रंथालयांमध्ये जाऊन जोपासला. कॉलेजचे ग्रंथालय खूप मोठे होते. दररोज पुस्तक बदलले तरी चालत असे. असे असले तरी पुस्तकाच्या लहान-मोठ्या आकारानुसार मी पुस्तक बदलत असे आणि वाचत असे.

बारावी नंतर त्याच महाविद्यालयांमध्ये मी प्रवेश घेतला आता माझ्याकडे खूप वेळ होता कॉलेज सकाळी असे कॉलेज सुटताना मी माझ्या कार्डवर पुस्तके घेईल आणि दिवसभर वाचत बसे वाचताना किती वेळ गेला आणि आपले जेवायचे राहिले काय इतर अभ्यास राहिला काय याचे भानही राहात नसे.

कॉलेजचे दिवस खूप छान होते. हे मला वाचनाच्या छंदामुळे जाणवले. कॉलेजच्या काळामध्ये आचार्य अत्रे यांचे क-हेचे पाणी हे आत्मचरित्र, त्याचे सर्व खंड मी वाचून काढले.त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काळे पाणी, मॅझिनीचे चरित्र, सहा सोनेरी पाने, अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, जात्युच्छेदक निबंध ही पुस्तके मी अतिशय मन लावून वाचली.

मला ऐतिहासिक पुस्तके वाचण्याचा खूप छंद होता आणि आहे. कॉलेजच्या दिवसात ऐतिहासिक पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. अशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा याबद्दल मला आमच्या प्राध्यापकांनी माहिती दिली. त्यामुळे त्यासंदर्भातील ग्रंथही मी वाचू लागलो.

ज्ञानकोशकार केतकर यांचे ज्ञानकोशाचे अनेक खंड मी वाचले. त्याचबरोबर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेले विश्वकोश सुद्धा मी वाचले. कॉलेजच्या ग्रंथालयाच्या शोकेसमध्ये असलेली पुस्तके मी न्याहाळत असे. ही पुस्तके आपण वाचली पाहिजे असे वाटे. एवढेच नव्हे तर ती पुस्तके आपल्या संग्रही असली पाहिजेत असेही मला वाटायचे. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे मी पुस्तके घेऊ शकलो नाही.

परंतु पुढे मला जेव्हा जेव्हा पैसे मिळत, तेव्हा तेव्हा मी यातून चांगले ग्रंथ घेत असे. त्यांचा संग्रह मला श्रीमंत बनवित असे.आता माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. दर महिन्याला मी पुस्तके विकत घेतो. ती वाचत असतो. आता माझे हे छोटेसे वैयक्तिक ग्रंथालय झाले आहे. या ग्रंथांकडे पाहिले तरी मला माझ्या श्रीमंतीची सुखावणारी आनंददायी जाणीव होते.

स्वामी विवेकानंद यांचे अनेक ग्रंथ आम्ही वाचले आहेत. ग्रंथावलीचे काही खंड माझ्या संग्रही आहेत. स्वामी विवेकानंद यांचे रोमा रोला यांनी लिहिलेले चरित्र माझ्या संग्रही आहे. हे पुस्तक मी अनेक वेळा वाचले आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहिलेले स्वामी विवेकानंद हे पुस्तकही मी अनेकदा वाचले आहे. ही पुस्तके वाचल्याने आपल्या जाणिवा समृद्ध होतात हे मी अनुभवले आहे.

साने गुरुजी यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत. त्यांचे भारतीय संस्कृती आणि श्यामची आई हे पुस्तक मला फार आवडते. आचार्य विनोबा भावे यांचे गीता प्रवचने हे पुस्तक आहे. मी अनेकदा आवडीने वाचले आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांचे गीतामृत पुस्तक सुद्धा मी वाचले आहे.

चरित्रपर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा गांधी स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर साने गुरुजी आचार्य विनोबा भावे इत्यादी महनीय व्यक्तींची चरित्रे मी वाचली आहेत.

आत्मचरित्रपर ग्रंथांचे वाचन हे मी करत असतो. महात्मा गांधींचे माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक माझ्या संग्रही आहे. एम. सी. छगला यांचे शिशिरातील गुलाब अर्थात रोझेस इन डिसेंबर हे पुस्तकही मी वाचले आहे. विश्राम बेडेकर यांचे एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे.

कुसुमाग्रजांच्या अनेक काव्यसंग्रह यांचे वाचन करताना मिळालेला आनंद अवर्णनीय आहे.पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी पुस्तकांचे वाचन कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण कमी करणारे ठरते. वि. स. खांडेकर यांची ययाती कादंबरी मी किमान तीन वेळा वाचली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हे कादंबरी आणि त्यात सांगितलेले तत्त्वज्ञान हे जणू माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे असे मला वाटते.

अशाप्रकारे वाचन हा माझा अत्यंत आवडीचा छंद झाला आहे आणि हा छंद जोपासण्याची मला मनापासून खूप आवड आहे. एक वाचक म्हणून प्रत्येक पुस्तकाचा मी ऋणी आहे.

माझा आवडता छंद My favourite hobby

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment