मी एसटी बोलतेय Mi ST Boltey

मी एसटी बोलतेय Mi ST Boltey

मी एसटी बोलतेय Mi ST Boltey

मी एस्. टी. अर्थात तुमची सर्वांची प्रिय लालपरी बोलतेय.आजवर मी कधी बोलले नाही. माझा आवाज तुम्ही कदाचित ऐकला नसेल.आज बोलावे वाटते कारण माझे मन आज फार अस्वस्थ झालेले आहे.माझ्या भावना जर मी व्यक्त केल्या नाहीत तर अस्वस्थता माझा जीव घेईल; म्हणून मला माझ्या भावना व्यक्त कराव्या वाटतात. तेवढेच जरा मोकळे वाटेल.

अवघ्या महाराष्ट्रातील लहान थोरांनी माझा उल्लेख लालपरी असा केला कि मी सुखावून जाते. किती सुखावून जाते म्हणून सांगू? जणू मला खऱ्या परीचे पंख मिळतात असे वाटते. लालपरी शब्दातून माझा किती मोठा गौरव केला आहे.जणू काही महाराष्ट्रभूषण पुरस्कार मला मिळाला आहे.

महाराष्ट्र परिवहन महामंडळ

1 जून 1948 पासून महाराष्ट्रात मी धावू लागले. अनेक स्थित्यंतरे झाली. पण 24 तास माझी सेवा सुरूच आहे. 24 तास सेवा देणारी माझी लेकरे वाहक चालक मला सतत फिरते ठेवतात. पण आज जणू काही दृष्ट लागली. साऱ्या जगावर कोरोनाचे संकट आले. महाराष्ट्र आणि देशभरात टाळेबंदी लाॅकडाऊन झाले आणि माझी फिरती चाके फिरायची बंद झाली.

कोरोनाची पहिली लाट संपली. मी पुन्हा उत्साहाने धावू लागले. पहिल्या लाटेत माझ्या लेकरांचे पगारा भावी हाल झाले. आधीच सगळ्यात माझ्या चालक-वाहकांना पगार कमी. त्यात लाॅकडाऊन… बिचारी मनाने खचू लागली. काही अस्वस्थ झाले, काहींना दुर्धर व्याधी जडल्या, काहींनी आपली जीवनयात्रा संपवली. या दुःखाने सारे विषन्न करणारे हे चित्र माझ्या लेकरांना पहावले नाही. त्यांनी संप पुकारून काम बंद केले. आम्ही सुतकात आहोत असे ते म्हणू लागले. फारच वाईट स्थिती निर्माण झाली.

आता तुम्ही म्हणाल एसटी कामगारांनी संप पुकारून चूक केली आहे. पण सगळा प्रपंच नोकरीवर आणि तुटपुंज्या पगारावर अवलंबून आहे त्यांचा. तो तरी काय करणार? काम शासनाचे आणि सेवा जनतेची, असे असूनही पोटापुरते मिळण्याची अपेक्षा न करणे तुम्हाला तरी योग्य वाटते का?

पगारवाढ मिळाली तरी भविष्याचा प्रश्न फार अंधकारमय आहे. एवढे ते सोपी नाही. भावना अनुभवायची असेल तरी एकदा एसटी कामगार होऊन पहा.आज महाराष्ट्रात सर्वत्र अल्प दरामध्ये प्रवासाची सोय देणारी एसटी सेवा बंद आहे. एखादे गरीब कुटुंब किंवा प्रवासी एसटी बस स्थानकावर आशेने बसलेले दिसतात. तेव्हा जीव तुटतो.डोळ्यात अश्रू तरळतात.

विस्कळीत झालेले जनजीवन केव्हा पूर्ववत सुरू होणार?असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशी विचारत आहेत आणि याचे उत्तर अजूनही कोणाकडे नाही.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यात सर्वात प्रथम पोहोचलेले एकमेव वाहन म्हणजे एस्. टी होय.सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेचे 24 तास भरवशाचे एकमेव साधन म्हणजे एसटी होय. सर्वसामान्य माणसाला आपले वाटणारे एकमेव वाहन म्हणजे एसटी होय.

सूर्य उगवला नाही तर निबंध Surya Ugavala Nahi tar

वाट पाहिन पण एस्. टीनेच जाईन एवढा मोठा विश्‍वास जिंकणारी सेवा म्हणजे एस्.टी होय.महाराष्ट्राच्या लोकजीवनात शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारा अभेद्य पूल म्हणजे एसटी होय.

आज मला अवकळा आली आहे.माझ्या लेकरांचे प्राण लाॅकडाऊन व संपामुळे कंठाशी येऊ लागले आहेत.तुमची लालपरी संकटात आहे. तुमच्यासाठी 24 तास अल्पदरात सेवा देणारी तुमची लालपरी सरकारच्या दयेवर अवलंबून आहे.

माझी एवढी प्रचंड दुर्दशा कधीही झाली नसेल. माझ्या वाहक-चालक लेकरांकडे निश्चितच तुम्ही समानुभूतीने पहाल आणि महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी एसटीची चाके पूर्ववत फिरू लागतील अशी आशा ठेवते.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment