म्हणी व त्यांचे अर्थ Mhani va Tyanche Arth

म्हणी व त्यांचे अर्थ Mhani va Tyanche Arth

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ Mhani va Tyanche Arth

1.अती तेथे माती– कोणत्याही गोष्टीचा केलेला अतिरेक नेहमी नुकसानकारक ठरतो.

2.अति शहाणा त्याचा बैल रिकामा- जास्त शहाणपणाने काम करायला गेले की आपल्या हातून काम बिघडते.

3.अडला हरी गाढवाचे पाय धरी – शहाण्या आणि सुज्ञ माणसाला सुद्धा कधीकधी मूर्ख माणसांची विनवणी करावी लागते.

4.असतील शिते तर जमतील भूते – जेव्हा काहीतरी फायद्याचे असते किंवा आपला भरभराटीचा काळ असला की तेव्हा लोक आपल्या भोवती गोळा होतात.

5.आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी – ज्या ठिकाणी खरोखरच मदतीची गरज असते तेथे ती न पोहोचता इतर ठिकाणी पोहोचणे.

6.आधी पोटोबा मग विठोबा- आधी स्वार्थाचा विचार आणि नंतर इतर परोपकारी विचार किंवा काम करणे.

7.अंथरूण पाहून पाय पसरणे – आपल्या ऐपतीनुसार खर्च करणे.

8.आयत्या बिळात नागोबा– इतर लोकांच्या कष्टांवर आपला स्वार्थ साधून घेणे.

9.इकडे आड तिकडे विहीर -दोन्ही बाजूंनी संकटाच्या परिस्थितीत सापडणे.

10.आपला हात जगन्नाथ– आपले काम यशस्वी होण्यासाठी सतत कष्ट करणे किंवा सोसणे योग्य ठरते.

11. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार जे मुळातच अस्तित्वात नाही त्याची थोडीदेखील अपेक्षा करणे चुकीचे होईल.

12.आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन– कमीत कमी लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा खूप जास्त लाभ होणे

13.इकडे आड तिकडे विहीर– दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.

14.उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – अतीशय उतावळेपणाने मूर्खासारखे वागणे.

15.उचलली जीभ लावली टाळ्याला– विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे.

16.उथळ पाण्याला खळखळाट फार – ज्याच्या अंगातच मुळातच गुण कमी असतात तो माणूस फार बढाया मारतो.

17.एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेच काम पूर्ण न होणे.

18.ऐकावे जनाचे करावे मनाचे – एखादे काम करताना दुसऱ्यांचे मत घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या विचाराप्रमाणे किंवा मताप्रमाणे वागावे.

19.कर नाही त्याला डर कशाला – ज्याच्या कडून काहीच गुन्हा घडलेला नाही त्या व्यक्तीला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही.

20.करावे तसे भरावे – वाईट काम करणाऱ्याला त्या कामाचे दुष्परिणाम भोगावे लागतातच.

21.कामापुरता मामा — गरजेपुरते गोड गोड बोलणारा स्वार्थी माणूस

22.काखेत कळसा गावाला वळसा – हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे आपल्या लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे.

23.कानामागून आली आणि तिखट झाली – एखादी व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने लहान असली किंवा अधिकारने कमी असली असे असून सुद्धा दुसऱ्या व्यक्तीने कमी काळातच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा पटकावणे.

24.काळ आला होता पण वेळ आली नव्हती – एखादे मोठे संकट येऊन सुद्धा त्यातून सहीसलामत बाहेर पडणे

25.कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – एखाद्या क्षुद्र माणसाच्या निंदेमुळे थोर माणसांचे काहीच नुकसान होत नाही किंवा त्यांच्या महानपणात कोणताही कमीपणा येत नाही.

26.कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ – आपलाच माणूस आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे.

27.कोठे इंद्राचा ऐरावत कोठे शाम भट्टाची तट्टाणी– थोर माणसे आणि लहान माणूस यांची तुलना किंवा बरोबरी होऊच शकत नाही.

28.कोळसा उगाळावा तितका काळाच – एखाद्या दुष्ट माणसाबाबत कितीही माहिती मिळवली तरी त्याची अधिकच दृष्ट कृत्ये उजेडात येतात.

29.कोंड्याचा मांडा करुन खाणे – हालाखीच्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान किंवा आनंद मानणे.

30.कोल्हा काकडीला राजी – सामान्य कुवतीची माणसे किरकोळ वस्तूच्या प्राप्तीने सुद्धा आनंद मानतात.

31.खाई त्याला खवखवे -जो मनुष्य वाईट काम करतो त्याच्या मनात सतत धास्ती राहते

32.खाण तशी माती बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा – आई वडिलांप्रमाणेच मुलांची वागणूक असणे.

33.खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – एकतर विलासी जीवन जगणे किंवा फारच कंगाल स्थितीत जगणे.

34.खायला काळ भुईला भार – निरुद्योगी माणूस सर्वांनाच भारभूत होतो.

35.गरजवंताला अक्कल नसते – गरजू मनुष्याला प्रसंगी त्याच्या मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते.

36.गर्वाचे घर खाली – गर्व करणाऱ्या माणसाला शेवटी अपमानित व्हावे लागते

37.गरज सरो वैद्य मरो – आपले काम संपले की उपकार करणाऱ्याला विसरणे.

38.गरजेल तो पडेल काय ?- केवळ बडबड करणाऱ्या माणसाच्या हातून कोणतेही चांगले काम होत नाही.

39.गाढवाला गुळाची चव काय? – अडाणी माणसाला चांगले वस्तुचे मोल कळत नाही

40.गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली – एखादी गोष्ट सहजपणे साध्य झाली तर उत्तम नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे.

41. गुरुची विद्या गुरुलाच फळली – एखाद्याचा डाव त्याच व्यक्तीवर उलटणे.

42. गोगलगाय पोटात पाय – एखाद्याचे खरे स्वरूप वरून लक्षात येत नाही.

43. घरोघरी मातीच्या चुली – सगळीकडे सारखीच परिस्थिती असते.

44. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात कधी ना कधी येईल अधिकार गाजवण्याची संधी मिळत असते.

45. चोराच्या मनात चांदणे – स्वतःचे वाईट कृत्य उघडकीस येईल अशी नेहमीच मनात भीती वाटत राहणे.

46. चोर सोडून संन्याशाला सुळी देणे– खऱ्या अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा होणे किंवा दिली जाणे.

47. चोरावर मोर – एखाद्याच्या कृत्यावर त्याच्यापेक्षा वरचढ कृत्य करून मात करणे.

48. जळात राहून माशाशी वैर करू नये – आपण ज्या माणसांबरोबर राहतो त्या माणसांशी वैरभाव ठेवून राहू नये.

49. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे – दुसऱ्यांच्या अडीअडचणी आपण जेव्हा त्यांच्यासारखाच अनुभव घेतो तेव्हा कळतात.

50. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही नाही – एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कधीच बदलत नाही नाह

51. जे न देखे रवि ते देखे कवि – सततच्या कल्पनाशक्ती मुळे कवी इतरांपेक्षा वेगळे वास्तवाच्या पलिकडचे वर्णन करू शकतो.

52. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी – ज्याने आपल्याला मदत केली त्याची बाजू घेऊन अनुकूल वागावे.

53. झाकली मुठ सव्वा लाखाची – प्रसंगी काही न बोलता मौन पाळून अब्रू राखणे.

54. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही – खूप काही कष्ट केल्याशिवाय मोठेपण मिळत नाही.

55. डोंगर पोखरून उंदीर काढणे- अतोनात कष्ट केल्यानंतर खूपच अत्यल्प फायदा होणे.

56. तळे राखी तो पाणी चाखी- एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केलेली असते तो त्याचा काही ना काही उपभोग घेणारच.

57. ताकापुरती आजी- आपला स्वार्थ साधं यापुरतेच एखाद्याचे गुणगाण किंवा स्तुती करणे.

58. दगडापेक्षा वीट मऊ- मोठ्या संकटापेक्षा लहान संकट केव्हाही आपल्याला सुसह्य वाटते.

59. थेंबे थेंबे तळे साचे- थोडी थोडी बचत केल्यानंतर काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होत असतो.

60. तहान लागल्यावर विहीर खणणे- एखाद्या वस्तूची गरज लागल्यानंतर त्यासाठी धावपळ करत राहणे.

पिल्लूदर्शक शब्द, प्राणी व पिल्ले Animals and their babies

म्हणी

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment