महात्मा फुले स्मृतीदिन Mahatma Phule Smritidin

महात्मा फुले स्मृतीदिन Mahatma Phule Smritidin

विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली।
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
हा आपल्या सगळ्या अनर्थांचा आणि आपल्या समाजाला सर्वर्थाने रसतळास जाण्याचे कारण असणारा महामंत्र ज्या महापुरुषाने दिला; त्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन महात्मा फुले स्मृतीदिन Mahatma Phule Smritidin .महात्मा ज्योतिबा फुले थोर समाजसुधारक आणि स्त्रिया,शुभ्रातीशूद्रांच्या शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.

२८ नोव्हेंबर १८९०रोजी महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व स्वयंस्फूर्तीने समतावाद प्रतिपादणारे, महान समाज क्रांतिकारक, बहुजनांच्या आणि विशेषतः शूद्र समजल्या गेलेल्या अस्पृश्यांच्या किंवा जातींच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाचे खऱ्या अर्थाने एकमेव अग्रदूत म्हणजेच महात्मा ज्योतिबा गोविंद फुले यांचे निधन झाले. या दिवशी झाले.एका युगाचा अंत झाला.काळाच्या कसोटीवर आज पाहिले तर महात्मा फुलेंनी दिलेला समतेचा आणि शिक्षणाचा विचार एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीत मांडला तो एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक म्हणावा लागेल.

Mahatma Phule

ज्योतिराव फुले हे एक बंडखोर वृत्तीचे शैक्षणिक विचारवंत आणि समाज सुधारक म्हणून ओळखले जातात एवढेच नव्हे तर ते बोल घेवडे समाज सुधारक नव्हे तर कर्ते समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. आपल्याला न पडलेला विचार खोडून काढण्याची त्यांची हिम्मत आणि पद्धत ही तत्कालीन महाराष्ट्रीय समाजाला नवीन होती आणि सनातरी विचाराला प्रचंड मोठा हादरा देणारी होती.

एका मित्राच्या लग्नात मिळालेली अपमानास्पद वागणूक हा त्यांच्या जीवनातील एक वळण देणारा प्रसंग म्हणून गणला जातो. परंतु त्यापूर्वी त्यांच्या मनात चाललेले विचारांचे वादळ काय असेल हे आपण केवळ कल्पनेने जाणू शकतो. ज्योतिबा फुले एक प्रखर बुद्धिवादी आणि सनातनी विचारांना धाडसाने नाकारणारा प्रतिभावंत समाज क्रांतिकारक गणले जातात.

ज्योतिरावांना महात्मा ही जी एक उपाधी प्राप्त झाली आहे.पण त्या उपाधीला सर्वार्थाने त्यांनी आपल्या जीवनामध्ये अर्थ दिला होता. आपण महात्मा व्हावे ही त्यांची इच्छा नसेलही परंतु महात्म्याच्या ठाई असणारे सर्व गुण या महान क्रांतिकारकाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आढळून येतात.

मुलींसाठीच्या शाळा शुद्रातील शूद्र मुलांसाठीच्या शाळा विधवा स्त्रियांना काढून दिलेला अनाथआश्रम, अनाथ बालकाश्रम, प्लेगसारख्या रोगामध्ये चालवलेले सेवेचे व्रत आणि अर्थार्जनासाठी केलेले विविध उद्योग बहुजन समाजाला शिक्षण प्राप्त करून देताना तत्कालीन उच्चवर्णीयांना दिलेले आव्हान ही आज आपल्याला सामान्य वाटणारी गोष्ट त्याकाळी असामान्य अशीच होती.

त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना (1873)करून सत्य काय आहे? हे जाणून घेणाऱ्या आणि सत्याचे दर्शन प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाच्या माध्यमातून घडून देण्याचा संकल्प असणाऱ्या महान संस्थेची पायाभरणी करून समाजाला एक वेगळी दिशा देणारे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण केंद्र जणूकाही उघडले होते. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सार्वजनिक सत्यधर्म हा ज्योतिरावांचा ग्रंथ म्हणजे सत्यशोधक समाजाची जिवंत गाथाच आहे. अर्थात ज्योतीरावांच्या पश्चात हा ग्रंथ प्रकाशित झाला.

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा मराठी भाषण Speech on Mulgi Vachava Mulgi shikwa in Marathi

ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘जातिभेदविवेकसार’, इशारा’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ असे ग्रंथ निर्माण करून सनातनी खोटारडेपणावर ज्योतिरावांनी नेमके बोट ठेवून क्रांतिकारक विचारांचे आसूड ओढले आहेत. आजही हे ग्रंथ पुरोगामी विचाराला साथ देतात आणि पुरोगामी विचाराचा ग्रंथरुपी निर्माण केलेला हा दीपस्तंभ समाजाला दिशा देत आहे. त्या काळात पुरोगामी विचारांची इतकी मुद्देसूद पायाभरणी आणि पुरस्कार कोणत्याही विचारवंत म्हणवणाऱ्या आणि समाजसुधारक म्हणून ओळख निर्माण करू पाहणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तीने केली नाही इतके ज्योतिरावांचे कार्य मूलगामी होते.

भारतातील मुलींनी पहिली शाळा 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यामध्ये ज्योतिरावांनी स्थापन केली आणि भारतातील मुलींच्या शिक्षणामध्ये सर्वोत्तम पायाभरणीचे मोलाचे कार्य केले. ही शाळा म्हणजे जणू काही शतकानुशतकांच्या शोषित आणि आर्त किंकाळ्यांना दिलेली एक प्रतिसादरुपी साद होती.

पुरोहितांकडून नाडवल्या जाणाऱ्या बहुजनांसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना ही अन्यायकारक, अत्याचारी आणि गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला आपल्या हक्कांची जाणीव निर्माण करून देणे. या उद्दिष्टाने झाली होती आणि या उद्दिष्टाप्रत हा सत्यशोधक समाज निश्चितच यशस्वी ठरला असे आज म्हणावे लागेल.

स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना ज्योतिरावांनी शिक्षण देऊन शिक्षक बनवले त्यांच्यामध्ये निर्भयता आणली, धाडस आणले. समाजाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही गुण असलेले व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनाने घडले आणि अजरामर झाले. आज पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे आहे. यातच त्यांचे मोठेपण काय होते हे 21व्या शतकातील समाजाने जाणले असे म्हणता येईल.महात्मा फुले (स्मृतीदिन Mahatma Phule Smritidin)

सर्व साक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्थी।।
असे ब्रीद घेऊन निर्माण झालेला सत्यशोधक समाज पुरोहितांविरुद्ध जणूकाही बंड करून उठला. ज्योतिरावांनी बहुजन समाजातील लोकांना पुरोहित म्हणून प्रशिक्षित केले. स्वतः मंगलाष्टके तयार करून ग्रामजोशांना आव्हान दिले. ग्रामजोशांनी कोर्टाचे दरवाजे खटखटवले. परंतु त्या ठिकाणीही ज्योतिराव पुरून उरले आणि बहुजन समाजाच्या बाजूने न्यायालयाचा न्याय्य निर्णय आला. ही घटना वर्ण वर्चस्ववादी आणि वर्णाश्रमवादी मनुवादी समाजाला जोरदार चपराक होती.

ज्योतिराव फुले यांचा संत तुकारामांच्या अभंगांचा गाढा अभ्यास होता.यातून असे म्हणता येईल की ज्योतिराव फुले यांची एक महत्वपूर्ण प्रेरणा म्हणजे संत तुकाराम महाराज होत. अभंगांच्या धरतीवर ज्योतिरावांनी अखंड ही काव्यरचना निर्माण केली. परमेश्वराचे कोणतेही ऐतिहासिक किंवा पौराणिक नाव न उल्लेखिता निर्मिक म्हणून त्यांनी परमेश्वराचा उल्लेख केला हे त्यांचे वेगळेपण सांगता येते.

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले अनोखे आणि आगळे वेगळे क्रांतिकारक व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व असलेले ज्योतीराव गोविंदराव फुले हे एक चिरंजीव प्रेरणास्रोत म्हणून युगानुयुगे गणले जातील यात शंकाच नाही. अन्याय,अत्याचार, गुलामगिरी आणि सामाजिक विषमता या विरुद्ध त्यांनी केलेले बंड ही हजारो वर्ष अन्याय अत्याचारांच्या बळी ठरलेल्या स्त्रियांना आणि शुभ्रातीशूद्र आणि बहुजनांना एक प्रकारे नव्या युगातील नवप्रभात होती.

अशा या अखंड स्फूर्तीच्या जिवंत प्रेरणास्रोताला विनम्र अभिवादन.

महात्मा फुले स्मृतीदिन Mahatma Phule Smritidin

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment