लिंग समानता जोपासणारा समाज निबंध Ling samanata Jopasanara samaj

लिंग समानता जोपासणारा समाज निबंध Ling samanata Jopasanara samaj

लिंग समानता जोपासणारा समाज निबंध Ling samanata Jopasanara samaj

आधुनिक काळातील कोणत्याच क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषापेक्षा कुठेही मागे नाही या उलट ती कांकणभर सरसच काम करते असे दिसून आले आहे. असे असताना स्त्रीला मागे खेचणारा समाज आजही दिसून येतो.तेव्हा स्त्री पुरुष समानता अर्थात लिंग समानता जोपासणारा समाज निर्माण होण्याची गरज ही एक अत्यावश्यक आणि कालोचित गरज प्रखरतेने जाणवल्याशिवाय राहत नाही.

स्त्री ही अबला नसून सबला आहे हे अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. समाजाची अनेक बंधने आणि आणि धर्माच्या अनेक बेड्या असूनसुद्धा स्त्रियांनी वेळोवेळी आपल्या कर्तबगारीने समस्त पुरुष वर्गाची मक्तेदारी विविध क्षेत्रांमध्ये तोडून मोडून फोडून फेकून दिली आहे. स्त्री ही अबला नसून पुरुषांपेक्षा कैकपटीने सहनशील, शक्तिशाली आणि बुद्धिमान आहे.

कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात,
“साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क असतो फुलण्याचा,
जमिनीतला वतन वारसा आभाळभर कोरण्याचा…..”

प्रत्येक कळी फुलू इच्छिते. तो तिचा जन्मसिद्ध हक्क आहे. तसा प्रत्येक मुलीचा फुलण्याचा, आपला वसा आणि वारसा काळाच्या पटावर कोरण्याचा हक्क आहे. तो हक्क तिला निसर्गाने दिला आहे. हा निसर्गदत्त हक्क नाकारण्याचा कोणत्याही समाजव्यवस्थेला अधिकार नाही आणि जबरदस्तीने जर असे समाजव्यवस्था करत असेल तर; त्या समाज रचनेमध्ये क्रांतिकारी बदल होण्याची गरज आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई,अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भारताच्या सुकन्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी टी उषा, करनाम मल्लेश्वरी अशा केवळ थोडक्या नव्हे तर शेकडो-हजारो स्त्रियांनी भारताच्या गौरवामध्ये मोलाची भर टाकली आहे. प्रत्येक पुरूषाची आई, पत्नी, बहीण, मावशी, आजी,मुलगी ही त्या पुरुषाला मोठे करण्यामध्ये आपला सिंहीणीचा वाटा उचलत असते. असे असूनही पुरुषसत्ताक समाजरचनेत स्त्रियांना डावलले जाते;मुलीच्या गर्भाचा गर्भाशयातच खून होतो; हुंड्यासाठी स्त्रियांचा अनन्वित छळ होतो; घरातील मुलालाच शिक्षणामध्ये प्राधान्य दिले जाते; मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते; मुलगी कितीही कर्तबगार असली तरी ती मुलगी आहे असेच म्हटले जाते हे बघितले म्हणजे लिंग समानता निर्माण होणारा समाज ही काळाची गरज आहे असे वाटल्यावाचून राहत नाही.

स्त्रीभृण हत्येच्या समस्येविरुद्ध काम करणाऱ्या डॉक्टर सुधा कांकरिया म्हणतात;
“एक उणे एक होते शून्य,
शून्याकडे प्रवास करू नका,
जगाला वाचवण्यासाठी,
स्त्री जन्माचे स्वागत करा,
स्री जन्माचे स्वागत करा.”

स्त्री जन्माचे स्वागत मनमोकळेपणाने, प्रांजळतेने आणि समानुभूतीने करणारा समाज निर्माण होण्यासाठी समता आणि समानता या मूल्यांनी परिपूर्ण असे डोळस सामुदायिक नेतृत्व निर्माण व्हायला हवे.

परंतु येथे एकिकडे स्री अबला नाही सबला आहे असे म्हणणारा समाज कर्तृत्ववान स्त्रियांचे कर्तृत्व नाकारताना दिसतो. समाज तात्पुरता प्रशंसा करतो आणि दुसरीकडे या मुलींना अजूनही फुलण्याचा हक्कच नाही आणि अस्तित्व राखण्याचाही अधिकार नाही अशीच बुरसटलेली मानसिकता ठेवून स्त्रियांना आपला जन्मजात हक्क नाकारताना दिसून येतो. हे फार वाईट आहे. अजूनही लिंग समभाव ठेवणारी समाजरचना अस्तित्वात येत नाही ही शोकांतिका आहे.

समाज रचनेमध्ये हळूहळू परिवर्तन होत आहे. परंतु यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षण देऊन, जाणीव जागृती करून किंवा कधी कायद्याचा बडगा दाखवून लिंग समानतेचा प्रश्न सोडवायला हवाच. परंतु एकंदरीत पुरुषी मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज मला वाटते. स्रीने सुद्धा आपल्या मुलीला जन्म देण्याचा आपला हक्क बजावण्यासाठी अधिक गंभीर होण्याची गरज आहे.मुलीला शिकण्यासाठी, तिला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, समाजाने एकदिलाने काम करण्याची फार मोठी आवश्यकता आहे.

लिंग समभाव जोपासणारा समाज निर्माण होण्यासाठी शिक्षण ही फार मोठी जबरदस्त शक्ती आहे.शिक्षणाच्या माध्यमातून स्री सर्व क्षेत्रे पादाक्रांत करत आहे. समाजकारण,राजकारण, विमानसेवा, अवकाश प्रवास,पोलीस दल, लष्कर,संशोधन,शिक्षणक्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये स्त्रीने आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. स्री ही पुरुषांची प्रचंड मोठी स्पर्धक निर्माण झाली आहे. असे असताना स्त्रियांना अजूनही कमी लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यासाठी स्त्रियांनी अधिक सक्षम होण्याची गरज आहे. यादृष्टीने स्त्रियांचे सक्षमीकरण आणि सशक्तीकरण अधिकाधिक गरजेचे वाटते.

भारताच्या आधुनिक काळातील कायद्यानुसार स्री ही संपत्तीची समान वाटेकरी आहे. असे असले तरी घराण्याला वारस म्हणून मुलगा हवा, मुलगी कर्तृत्ववान असली तरी मुलगी नको,ही वृत्ती अजूनही समाजात खोलवर रुजलेली दिसून येते. मुलगा कर्तृत्वान नसला तरी तो कुलदीपक समजला जातो. आज एकविसाव्या शतकातही नाईलाजास्तव जन्म द्याव्या लागणाऱ्या मुलीला नकोशी नाव दिले जाते. ही समाजाच्या अधःपतनाची एक ठळक खूण म्हटली पाहिजे. “नकोशीला हवीशी करूया” या सारखी मोहीम चालवावी लागते. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. स्त्री भ्रूणहत्या ही कायद्याने गुन्हा आहे. तरीसुद्धा अनेक ठिकाणी असे गुन्हे घडताना उघडकीस येतात. हे कशाचे द्योतक आहे? हे निश्चितच समाज अजूनही स्रीकडे बुरसटलेल्या, रूढीग्रस्त नजरेने पाहत आहे; याचेच द्योतक असून लिंग समभावाचे शिक्षण प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेला घडवताना किती गरजेचे आहे हेच दिसून येते.

सामाजिकदृष्ट्या स्त्रीचे स्थान हे समान पातळीवर आणण्यासाठी आजही समाजाच्या मुली फक्त शिक्षणावर काम करणे आवश्यक वाटते. समाजाचे शिक्षण हे केवळ समाज माध्यमातून होत नसून ते विविध प्रकारच्या पातळ्यांवर होत असते. समाज शिक्षणासाठी लिंग समभाव मध्यवर्ती ठेवून अभियाने राबवण्याचे गरज मला वाटते.

भारताच्या राज्यघटनेने दर्जाची आणि संधीची समानता प्रत्येक नागरिकाला बहाल केली आहे.असे असताना स्त्रियांच्या बाबतीत दर्जा आणि संधीची समानता अजूनही निर्माण झाली नाही; हे दुर्दैवाने कबूल करावी लागेल. लिंग समभाव असणाऱ्या समाज रचनेला जाणीवपूर्वक संवर्धित करावे लागेल. म्हणजे राज्यघटनेची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होईल आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत स्रिच्या स्वातंत्र्याची नवी सनद समस्त स्त्री वर्गाला भेटेल.

बालिका दिन भाषण Speech on Balika Din

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध Essay on Vrikshavalli amha soyari vanachare

निसर्ग मानवाचा मित्र निबंध Nisarg Manvacha Mitra

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment