शेतकऱ्याचे मनोगत निबंध Essay on shetakaryache manogat in Marathi

शेतकऱ्याचे मनोगतEssay on shetakaryache manogat in Marathi

शेतकऱ्याचे मनोगतEssay on shetakaryache manogat in Marathi

भल्या पहाटेच्या वेळी घरच्या कोंबड्याची छान बांग ऐकू येते. घरामध्ये पहाटे उठणारा पहिला मीच असतो. खरेतर आदल्या दिवशी इतका दमलेला असतो की दुसऱ्या दिवशी गोधडी सोडून उठावे वाटत नाही. पण कामे वाट पाहत असतात.काय करणार?उठून परसाकडे जाऊन येतो. डोळ्यासमोर वावरातली कामे भुतासारखे नाचत असतात.

लवकरच पाऊस येईल पेरणीची तयारी करायची आहे. पुढचे सगळे चित्र मला दिसते. आंघोळ करून, चहापाणी करून कामाला सुरुवात करायची असते. त्यापूर्वी गायी, बैल यांच्याकडे जाऊन येतो. ती तडातड झोपेतून उठतात. आपला मालक आला. आता आपल्याला काहीतरी खायला देईल; म्हणून माना, डोके हलवतात. त्यांच्यापुढे थोडीशी वैरण टाकतो. तोवर रामप्रहर झालेला असतो. बाहेर उजाडलेले असते. आंघोळ करून निघतोय तो बाजूचे भाऊबंदही त्याच तयारीत असतात. एकमेकांची विचारपूस करता करता शेतावर पोहोचतो आणि कामाला जुंपत असतो.

पावसाळा हिवाळा उन्हाळा जसे ऋतू बदलतात तशी कामे बदलतात. कधी नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी, कापणी, मळणी, एक ना दोन …कामेच कामे ! एखाद्या झाडाच्या खोडाला टेकून थोडावेळ गपगार विश्रांती होते. पुन्हा कामाला सुरुवात. संध्याकाळी अगदी दिवेलागणीला घरी परतायचं.

शेतात पिके डोलत असतात.डोलणाऱ्या पिकांबरोबर आमचं मन सुद्धा आशेच्या हिंदोळ्यावर डोलत असतं. शेतात भरपूर धान्य पिकेल ऋण फेडता येईल. राहिलेल्या पैशात वर्षभराची बेगमी होईल. कपडेलत्ते, घराची डागडुजी, सणवार, मुलामुलींची लग्न अशी स्वप्नं डोळ्यांसमोर असतात. लहान माणसांची स्वप्नही लहान. मुलांनी शिकावं, मोठं व्हावं असं आम्हाला सुद्धा वाटते. पण सगळेच दिवस सारखे नसतात. त्यातून शेती तर निसर्गाच्या लहरीवर चालणारी.

एखाद्या वर्षी पाऊस असतो. एखाद्या वर्षी बाजार नसतो.चिंता अगदी नशिबात लिहिलेली.अगतिकपणे भविष्याकडे पाहणे चालूच असते.कर्जाची, नुकसानीची चिंता कायमच पाचवीला पुजलेली. राबराब राबायचे, कष्ट करीत जगायचं. फायद्या-तोट्याची गणित नेहमीच फसायचं. हे असं कायमच चालायचं.

यंदाच बघाना, पाऊस असा पडलाच नाही. दुष्काळाने इतकं थैमान घातलं, की पाण्यावाचून तर तळमळण्याची वेळ आली. तुम्हा शहरातल्या लोकांना ते कळणार नाही. आम्हाला पाणी म्हणजे जीवन. पाण्यासाठी वणवण जेव्हा आम्ही करतो, तेव्हा त्या बातम्या पाहून तुम्ही कदाचित हळहळत असालही. परंतु पाणी वापरताना मात्र तुम्ही किती काळजी घेता हे मी मुंबईत, पुण्यात आल्यावर पाहिलं आहे. गटारांचे ओढे पुढे नदीला जाऊन मिळतात. नदीच गटारगंगा तुम्ही करून टाकली आहे.

जेव्हा धरणावरून शेतीला पाणी सोडायचे असते, तेव्हा सरकार आधी शहरातल्या लोकांना पाणी पुरवायला पाहिजे असे सांगत असते. शेतीला पाणी देताना काळजी सरकार घेते ती शहरातल्या लोकांची. एखाद दुसरा टॅंकर आमच्या गावात येतो. त्यासाठी हाणामारी होते. गुरांना पोटभर पाणीसुद्धा प्यायला भेटत नाही. उन्हाळ्यात माणसांचीच आंघोळीची मारामार… तर त्यांचं काय?

परवाच माझ्या एका मित्राने सदूने झाडाला फास लावून घेतला. लई वाईट वाटले. बिचाऱ्याची मुलगी लग्नाला आली होती. शेतात काही पिकलं नव्हतं. बाजाराला पैसा नाही. आधीचे कर्ज होतेच. बॅंका तगादा लावत होत्या. नवीन कर्ज देत नव्हत्या. हैराण होऊन त्याने स्वतःची सुटका करून घेतली. नको ते जिणं असं त्याला वाटलं असावं.

पण मी हार मानलेली नाही. एका सेवाभावी संस्थेची माणसे गावात आली होती. त्यांनी गावात बंधारे घालून पाणी आडवणे, कमी पाण्यात शेती करणारे ठिबक सिंचन अशा काही गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या. मी आणि माझे मित्र त्यावर काम करायचं असं ठरवतोय.आमचा गाव, आमची शेती आमची माणसं आम्हाला हवी आहेत. स्वतःच्या शेतात पिकलेले धान्य खाताना, गाई गुरांनी भरलेला गोठा आवरताना आम्हाला किती बरं वाटतं म्हणून सांगू!

गावात शिकलेली पोरं शहरात जायचं म्हणत्यात. शेतापासून दूर पळत आहेत. खूप वाईट वाटतं मला. मुलांना शिकून मोठं करायचं. आमची मुल शेतीत रमत नाहीत. गावात चांगला दवाखाना, चांगली शाळा-कॉलेज हवे, रस्ते सुधारायला हवेत. पण काही नाही. गाव पुढारी तसेच भ्रष्टाचारी सगळीकडेच आहेत.गावात विहिरी खोदायच्या, बंधारे घालायचे, सरकारी सोसायटी स्थापण्याची, तिचं काम आपणच पाहायचं. एक ना दोन अनेक स्वप्न मी बघतो.तुमचीही आम्हाला मदत हवीच. तुम्ही कराल असे वाटते.

एकदा फाउंडेशनची लोक गावात येऊन गेली. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांना कधीतरी टीव्हीत पाहिले होते. आमच्या दुःखाची विचारपूस करतात. आर्थिक सहाय्य करतात. तेव्हा वाटतं हेच खरे आमचे भाऊ. पूर्वजन्मीचे आमचे त्यांच्याशी काही तरी नाते असले पाहिजे असेच वाटते.

शेतकरी

आता हेच बघा. माझं शिक्षण थोडेफार झाले. मला वाटते, माझा मुलगा शेतीचे नवीन तंत्र शिकेल. परंतु त्याला शेती करायची इच्छा दिसत नाही. आमच्या खेड्याचे गावपण टिकवले पाहिजे. नवीन सुधारणा नक्कीच आम्ही आणू. एकमेकांना साह्य करू. अशी खूप खूप स्वप्ने आहेत.

कचरा कामगाराचे आत्मकथन Kachara Kamgarache Atmakathan

आमच्या गावातला रस्ता आणि जीवनाचा रस्ता काट्याकुट्यांनी भरलेला आहे. पण तो थोडा थोडा सुधारत छान हिरवागार करायचा आहे मला. कारण मी हाडाचा जिवंत शेतकरी आणि काळ्या आईचा स्वाभिमानी सुपुत्र आहे.

शेतकऱ्याचे मनोगतEssay on shetakaryache manogat in Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment