क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निबंध मराठी Essay on Savitribai phule in Marathi

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निबंध मराठी Essay on Savitribai Phule in Marathi

 

Essay-on-Savitribai-phule in-Marathi

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निबंध मराठी Essay on Savitribai phule in Marathi

थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म  सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामध्ये नायगाव येथे 3 जानेवारी 1831 या दिवशी झाला. त्याकाळी लहानपणीच विवाह करण्याचे प्रथा होती.सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांनी आपल्या अकरा वर्षाच्या कन्येचा विवाह 1840 मध्ये ज्योतिराव फुले तेरा वर्षाच्या मुला बरोबर केला.

संत तुकाराम महाराज निबंध

ज्योतिराव फुलेंनी आपल्या स्री शिक्षणाचा पहिला प्रयोग स्वतःच्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाईंना शिक्षण देऊन केला. सावित्रीबाई जात्याच हुशार आणि जिज्ञासू असल्याने अल्पावधीतच त्यांनी चांगली प्रगती केली. अहमदनगरच्या फरार बाई आणि पुण्यातील मिचेल बाई यांनी सावित्रीबाईंना अध्यापन कसे करावे याचे धडे दिले. पारतंत्र्याचा काळ होता. इंग्रज सरकारचे भारतावर राज्य होते. शिक्षणाचे महत्त्व ज्योतिबा फुले यांनी अचूक ओळखले होते त्यातही ते स्त्रियांच्या शिक्षणाबाबत अधिकच  आग्रही होते.

पुण्यामध्ये हे स्त्रियांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करायची ज्योतिबा फुले यांची इच्छा होती आपल्या पतीच्या इच्छेला आणि विचारांना सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण समर्थन होते त्यांनी ज्योतिबाची भक्कम साथ देण्याचे ठरवले.  1848 मध्ये पुण्यातील तात्या भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्याकाळच्या जुनाट परंपरा व  रूढींना चिकटून राहणाऱ्या लोकांना हे मान्य नव्हते. त्यांनी जोतिबांच्या कार्याला जोरदार विरोध केला.

सनातनी लोक हे फुले दांपत्याच्या शिक्षण विषयक सुधारणांच्या बाबतीत आडमुठी भूमिका घेत होते. त्यामुळे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या दोघांनाही खूप त्रास सहन करावा लागे.

केवळ पुणे परिसरातच नाहीतर सातारा, शिरवळ,नायगाव, माजगाव, तळेगाव ढमढेरे,शिरूर, ओतूर इत्यादी ठिकाणी 18 शाळा फुले दाम्पत्याने सुरू केल्या. मुस्लिम मुलींसाठी सुद्धा स्वतंत्र अशी एक वेगळी शाळा सुरू करण्यात आली. फातिमा शेख, विश्वनाथ थत्ते,वामनराव खराडकर इत्यादींनी शिक्षक म्हणून ज्योतिबा फुले यांच्या शाळांमध्ये काम करण्यासाठी सहकार्य केले.

सावित्रीबाईंना त्यांचे काम करताना नेहमीच वाईट प्रसंगांशी सामना करण्याची वेळ आली.सनातनी लोक त्यांच्यावर दगड, शेण फेकून मारायचे. सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई आपल्या बरोबर दोन साड्या घेऊन जात. शाळेत जाऊन साडी बदलत आणि आपले स्त्री शिक्षणाचे कार्य अधिकच नेटाने आणि हिंमतीने चालू ठेवत. अशाप्रकारे त्यांनी पुणे,सातारा जिल्ह्यामध्ये शाळांचे जाळे निर्माण केले.

फुले दाम्पत्याने अस्पृश्यतेच्या निवारण कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले.त्या काळात दलित समाजाला अतिशय वाईट वागणूक उच्चवर्णीय समाज देत होता. दलितांचा स्पर्श म्हणजे विटाळ मानला जायचा. अस्पृश्य मुलामुलींना शाळेत प्रवेश नसे. सार्वजनिक ठिकाणी पाणवठ्यावर सुद्धा पाणी भरायला मनाई केलेली होती. फुले दाम्पत्याने आपल्या स्वतःच्या घरातील हौद त्यांच्यासाठी खुला केला.

फुले दांपत्य केवळ इतर समाजासाठी आपले प्रागतिक विचार सांगत नव्हते. तर स्वतःचे आचरणात आणणारे जोडपे होते. सावित्रीबाईंना स्वतःचे मूलबाळ नव्हते. त्यांनी एक ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव यशवंत. यशवंतला शिक्षण देऊन डॉक्टर केले. यशवंतचा पुढे आंतरजातीय विवाह सुद्धा घडवून आणला.

सावित्रीबाईंनी आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतला.  अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणताना त्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांच्या मुला-मुलींची लग्न ही स्वतः पुढे पुढाकार घेऊन लावली. समाजाकडून प्रचंड विरोध होत होता. परंतु त्यांनी आपले काम सोडले नाही. याला विरोध केला. गोरगरिबांचे लग्ने कमी खर्चात होऊ लागली.  सावित्रीबाईंनी सगळ्यांना समानतेने वागण्याची शिकवण दिली.

सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह चालू केले. सुविधांना होणाऱ्या मुलांची या मुळे सोय झाली. पुण्याजवळ धनकवडी येथे अनाथ बालकाश्रम सुरू केला. या ठिकाणी गोरगरीब मुलांना मोफत जेवण दिले जाई.

सण 1877 यावर्षी पुणे विभागात दुष्काळ पडला फुले दाम्पत्याने या दुष्काळामध्ये लोकांना मदत करण्याचे ठरवले.त्यासाठी दुष्काळ निधी जमा केला. गोरगरिबांना धान्य आणि शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी जमा केलेल्या निधीचे वाटप त्यांनी केले. गोरगरीब लोकांना दुष्काळ निवारणाच्या कार्यातून मदतीचा अतिशय अनमोल हात सावित्रीबाईंनी दिला.अशा प्रकारे समाजाविषयी त्यांच्यामध्ये कारुण्याची भावना आपल्याला दिसून येते.

महात्मा ज्योतिबा फुले हयात असेपर्यंत सावित्रीबाईंनी आपली खंबीर साथ ज्योतिरावांना दिली. एक पत्नी म्हणून त्यांचे कार्य जबरदस्त आहे. सावित्रीबाईंनी ज्योतिबांचे कार्य हे स्वतःचे कार्य मानले. त्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यामुळे एक प्रकारची क्रांती महाराष्ट्रामध्ये घडून आली. ही सामाजिक क्रांती होती.ही शैक्षणिक क्रांती होती. या शैक्षणिक क्रांतीच्या लढवय्या शूर सेनानी होत्या  सावित्रीबाई फुले. यामुळेच सावित्रीबाईंना क्रांतीज्योती असे सन्मानपूर्वक संबोधन लावण्यात येते.

सन 1897 या वर्षात पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती. इंग्रज सरकार लोकांना औषधोपचार करण्यामध्ये अपुरे ठरत होते. अशा प्रसंगी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला. औषधाअभावी अनेक लोक आपला जीव गमावत होते.

सावित्रीबाईंचा मुलगा यशवंत हा विदेशात होता. तो आता डॉक्टर झाला होता. सावित्रीबाईंनी यशवंतला पुण्याला बोलावून घेतले.  एका माळरानावर यशवंतनी दवाखाना सुरू केला.  रुग्णांना औषधे मिळू लागली. अनेक जण या आजारातून बचावले आणि अनेक जण जीवनाला पारखे झाले. असे असले तरी सावित्रीबाईंनी हार न मानता आपले प्रयत्न सुरूच ठेवले.

सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या मार्गदर्शनाने आणि स्वतःच्या स्फूर्तीने कार्य करणाऱ्या समाजसुधारक होत्या महात्मा फुले यांनी समाजामध्ये विविध प्रकारची सुधारणा व्हावी म्हणून अनेक ग्रंथांची रचना केली. हे ग्रंथ सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिलेले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे सर्व ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत. अत्यल्प अशा किंमतीमध्ये ते सर्वसामान्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिले आहेत.

सावित्रीबाई यांनीसुद्धा कवित्व करून सुबोध रत्नाकर सारखा ग्रंथ लिहिला आणि आपल्या मधील समजिक मूल्यांचे दर्शन घडले समाजाला त्या ग्रंथाद्वारे मार्गदर्शन केले.

1897 च्या प्लेगच्या साथीमध्ये समाज कार्य करीत असताना सावित्रीबाईंना सुद्धा प्लेग एक झाला.  त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले. 10 मार्च 1897 हा तो दिवस. सावित्रीबाईंना 66 वर्षांचे आयुष्यमान लाभले होते. स्री शिक्षणाचे कार्य 1848 पासून सुरू होते.  जवळजवळ पन्नास वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सावित्रीबाईंनी स्री शिक्षण,  अस्पृश्यता निवारण, विधवांना आधार, विधवांचा पुनर्विवाह, बालसुधारगृह, दुष्काळ निवारण निधी, बालविवाहांना विरोध,आंतरजातीय विवाह अशी  अनेक मोठी कार्य केली.

सावित्रीबाई आपल्या कार्याने अमर झाल्या आहेत.त्यांचे विचार  समाजात चांगल्या प्रकारे रूजलेले आहेत. आजच्या स्त्रिया, मुली शिक्षण घेऊन पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत. यामागे सावित्रीबाई फुले यांचे कार्य आहे.

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment