संत तुकाराम महाराज निबंध Essay on Sant Tukaram Maharaj in Marathi

संत तुकाराम महाराज निबंध Essay on Sant Tukaram Maharaj in Marathi

मित्रहो, आज आपण संत तुकाराम महाराज या विषयावर निबंध या ठिकाणी पाहणार आहोत. सहज, सोप्या आणि  सुंदर शैलीतील भाषेमध्ये संत तुकाराम महाराज निबंध Essay on Sant Tukaram Maharaj  in Marathi निबंध देत आहोत.

Essay on Sant Tukaram Maharaj in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक थोर समतावादी संत म्हणून संत तुकाराम महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. आपल्याला लाभलेल्या अल्प आयुष्यामध्ये संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेतील अजरामर अशा संत साहित्यात मोलाची भर टाकली. कधीही भंग न पाहणाऱ्या हजारो अभंगांची रचना करून जनसामान्य मराठी भाविकाला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती कशी करावी याचा सहज आणि सोपा उपदेश केला आहे.

संत तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात येईल देहू या चिमुकल्या गावामध्ये सन १६०८ मध्ये झाला. तुकाराम महाराजांचे वडिलांचे नाव बोल्होबा असे होते. तर आईचे नाव कनकाई असे होते.

संत तुकाराम महाराजांचे कुटुंब हे विठ्ठल भक्त होते. संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा हे संत ज्ञानेश्वर कालीन महान साधू होते. विश्वंभर बाबांनी संत तुकारामांच्या कुळामध्ये विठ्ठल भक्तीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असे म्हणता येईल.

अवश्य वाचा संत ज्ञानेश्वर मराठी निबंध

संत तुकाराम महाराज यांना एक मोठा भाऊ होता, त्याचे नाव सावजी. एक छोटा भाऊ होता त्याचे नाव कान्होबा. संत तुकारामांना दोन बहिणी होत्या.

संत तुकाराम क्षत्रिय मराठा समाजात जन्माला आले होते असे असले तरी ते स्वतःला शूद्र , कुणबी, यातीहिन समजत. अर्थात संत तुकारामांचा जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. “यारे यारे लहानथोर, याती भलती नारी नर” असे म्हणणारे संत तुकाराम हे एक समतावादी थोर पुरुष होते.

संत तुकाराम यांच्या घरामध्ये व्यापार-उदीम या गोष्टीला महत्त्व होते सावकार कि होती हे कुटुंब आपला व्यवसाय अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करीत होते.तुकारामांचा मोठा भाऊ सावजी संन्यास घेऊन घरातून निघून गेला. त्यानंतर कुटुंबातील मोठा मुलगा म्हणून कुटुंबाची जबाबदारी संत तुकाराम महाराज यांच्यावर आली. संत तुकाराम यांनी आपल्यावर आलेली ही जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली.

अवश्य वाचा.वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निबंध Essay on Vrikshavalli amha soyari vanachare

संत तुकाराम यांचे लग्न त्यांच्या वडिलांनी लोहगाव येथील रुक्मिणीशी लावून दिले. लोहगाव येथे तुकाराम महाराजांचे मामाचे गाव होते. आणि सासरवाडी सुद्धा होती. पुढे त्यांची याठिकाणी अनेक कीर्तने झाली. रुक्मिणी किंवा रूखमाई ही तुकाराम महाराजांची पहिली पत्नी पुढे दम्यामुळे अकाली मृत्यु पावली. तिचा पहिला मुलगा सुद्धा अकाली मृत्यू पावला. या दुःखाने तुकाराम महाराज व्याकुळ झाले. तुकाराम महाराज यांचे दुसरे लग्न जिजाई या पुणे जिल्ह्यातील खेडच्या आप्पाजी गुळवे यांच्या मुलीशी झाले. जिजाईचे नाव अवलाई असेही होते. जिजाईपासून संत तुकारामांना महादेव, विठोबा, नारायण आणि काशी, भागीरथी, गंगा अशी सहा मुले झाली.

परंपरागत व्यवसायाची जबाबदारी पार पाडत असताना १६२९,३० आणि ३१ या वर्षामध्ये फार मोठा दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये लोक अक्षरशः देशोधडीला लागले.अन्नान्नदशा करीत दाही दिशा फिरू लागले. संत तुकाराम यांनी आपल्या भावामध्ये आणि स्वतःमध्ये घरातील संपत्तीचे वाटप केले. आपल्या वाटेला आलेली कर्जखते, गहाणखते इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिली. लोकांना एक प्रकारे कर्जमुक्त केले.

संत तुकारामांचा निष्पाप आत्मा आणि कोमल मन पत्नीचा मृत्यू मुलाचा मृत्यू आणि दुष्काळ यामुळे दुःखाने भरून गेले. जगामध्ये परमेश्वर असेल तर त्याने इतके प्रचंड मोठे दुःख माझ्या आणि जगाच्या वाट्याला काय येऊ द्यावे? असा मोठा प्रश्न तुकारामांना पडला. ते विचार करू लागले. जवळच्याच भामचंद्र डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी त्यांनी निर्वाण मांडले. परमेश्वराचा धावा ते अतिशय व्याकूळ अंतकरणाने करू लागले. परमेश्वराचे दर्शन अर्थात आत्मसाक्षात्कार त्यांना याच ठिकाणी झाला.

संत तुकाराम यांना लहानपणीच त्यांच्या घरी आई वडील यांनी उत्तम शिक्षण दिले होते.ते साक्षर होते. त्यांनी हिंदू धर्मातील सर्व प्रमुख ग्रंथांचा अभ्यास आपल्या घरीच केला होता. धर्म साक्षरता त्यांना प्राप्त होती. आपल्या ज्ञानाने आणि प्रत्यक्ष अनुभव आला तुकाराम महाराज हे एक चिंतनशील व्यक्तिमत्व उदयाला आले.

संत तुकाराम गुरु शोधण्यासाठी कुठेही गेले नाहीत. माघ शुद्ध दशमी गुरुवार या दिवशी संत तुकाराम यांना एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये ओतूरच्या बाबाजी चैतन्य यांनी संत तुकारामांना उपदेश केला. राम कृष्ण हरी हा मंत्र दिला. बाबाजी चैतन्य हे ओतूरच्या मांडवी नदीच्या किनारी समाधी घेतलेले एक थोर संत होते.

संत तुकारामांच्या स्वप्नामध्ये जसे गुरू आले तसेच संत नामदेव आणि पंढरीचा विठ्ठल ही आला संत नामदेव आणि विठ्ठलाने तुकारामांना दर्शन दिले. संत नामदेवांनी शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा केली होती. परंतु त्यांच्या हयातीत हे कार्य पूर्ण होऊ शकले नाही. तेव्हा उर्वरित कार्याचा भार संत तुकोबारायांनी पूर्ण करावा असे साकडे त्या दोघांनी त्यांना घातले.

संत तुकाराम हे बुद्धिवादी असले तरी त्यांचा आत्मा हा  का कवीचा होता.त्यांनी अभंगांची रचना करण्यास सुरुवात केली. त्यांचे स्वतःचे विठ्ठलाचे मंदिर होते. त्या मंदिरामध्ये झालेली पडझड त्यांनी दुरुस्त केली. त्या ठिकाणी ते कीर्तन करू लागले. स्वतःचे अभंग गाऊ लागले. भागवत संप्रदायाचे तत्त्वज्ञान समोर बसलेल्या वारकऱ्यांना सुलभ आणि स्पष्ट भाषेत ते सांगू लागले. त्यामुळे जनसामान्य माणसे प्रभावित झाली. त्यांच्या भोवती गोळा होऊ लागली. भगवत भक्तीची वाट सापडल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंदाची एक मोठी लाटच उसळली.

संत तुकाराम उपदेश करताना वेद, उपनिषदे, पुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत अशा ग्रंथातील ऋचा आणि श्लोक यांच्या आधारे जनसामान्य माणसाला त्यातील उद्देश स्पष्ट करून सांगत होते.
“वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा
इतरांनी वहावा भार माथा “
असे त्यांचे स्पष्ट आणि परखड उद्गार आहेत.
“अर्थेविन पाठांतर कासया करावे
उगाची मरावे घोकुनिया “
इतक्या परखडपणे त्यांनी त्याकाळच्या पोथीनिष्ठ पाठांतरवादी कर्मठ लोकांवर टीका केली.

वेदांचा उल्लेख करून संत तुकाराम लोकांना लोकभाषेत सांगताहेत हे त्यावेळच्या ब्राह्मण समाजातील काही धुरीणांना अजिबात आवडले नाही. पुढे तुकारामांचा शिष्य बनलेल्या रामेश्वर भट्टासारख्याने संत तुकारामांची निंदा केली. वेद,  उपनिषदे, संस्कृत भाषा यावर आमची सत्ता आहे. ती आमची मक्तेदारी आहे. इतरांनी त्याच्या वाटे जाऊ नये जाल तर आमच्याशी गाठ आहे. असाच एक प्रकारे त्यांनी संत तुकारामांना इशारा दिला.

परंतु संत तुकाराम हे एक निर्भिड व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या अंगात बंडखोरीचा वारसा होता. संत तुकाराम एक बंडखोरीचा पिंड घेऊन जन्माला आलेले व्यक्तिमत्व होते. संत तुकारामांनी अशा कोणत्याही टीकेला किंवा निंदेला भीक न घालता आपले कार्य अतिशय जोरदारपणे सुरू ठेवले. ” भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी” हे त्यांचे जीवन तत्व होते.

पुढे अनेक ब्राह्मण समाजातील व्यक्तीसुद्धा संत तुकारामांचे शिष्य बनले. यामध्ये बहिणाबाई,निळोबाराय यांचाही समावेश होतो. यातून एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणताही समाज हा कोणत्याही व्यक्तीचा शत्रू नसतो. ब्राह्मण समाज म्हणजे बहुजनांचा शत्रू आहे असे समजण्याचे कारण नाही. तत्कालीन चालीरीती, प्रथा-परंपरा पूर्वग्रह यानुसार कोणताही समाज चालत असतो हेच खरे.

संत तुकारामांची कीर्ती दाही दिशांना सुगंधाप्रमाणे पसरत होती. छत्रपती शिवरायांच्या कानीही ती गेली होती. छत्रपती शिवरायांनी संत तुकारामांना द्रव्य आणि पोशाख यांचा नजराणा पाठवला. परंतु सोने आम्हाला मातीसमान आहे. याची आमच्यासाठी आवश्यकता नसून गोरगरिबांच्या कल्याणासाठी तुम्ही त्याचा वापर करा. असे संत तुकारामांनी उलट उत्तर दिले. अर्थात यामुळे संत तुकारामांचा आदर अधिकच वाढला. त्यांचे निस्पृह मन पाहून शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या भेटीसाठी व्याकूळ झाले.

संत तुकाराम महाराजांनी सुमारे चार हजार पेक्षा जास्त अभंगरचना केली. अर्थात ही अभंगरचना जी म्हणजे वैदिक धर्मा विरुद्ध केलेले बंड आहे असे तत्कालीन ब्राह्मणांना वाटले. त्यांनी हे अभंग इंद्रायणी नदीत बुडवा असे संत तुकारामांना सांगितले. त्यासाठी तुकाराम महाराजांवर दडपण आणले. या वह्या तुकाराम महाराजांनी इंद्रायणीमध्ये बुडवल्या.

परंतु रचलेली अभंग गाथा हाच संत तुकारामांचा आत्मा होता. अभंगगाथा नदीत बुडवल्याने त्यांना अपार असे दुःख झाले. त्याच ठिकाणी इंद्रायणीकाठी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. तेरा दिवस इंद्रायणीत असलेल्या वह्या प्रत्यक्ष पांडुरंगाने वरती आणून दिल्या. असे त्यांच्या जीवन चरित्र मध्ये लिहिलेले आढळून येते.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती” असे म्हणणारे तुकोबराया निसर्गात रमणारे होते. आषाढी कार्तिकीला पंढरीला जावे, एकादशीचा उपवास करावा, सर्वसामान्य वारकऱ्यांना कीर्तनाद्वारे उपदेश करावा, विठ्ठलाचे नाम घ्यावे आणि आनंदाने जीवन जगावे अशा विचारांचे होते.

संत तुकाराम आता अधिकाधिक विरक्त होत चालले होते. त्यांना कोणत्याही प्रापंचिक गोष्टींमध्ये आशा आणि अपेक्षा राहिली नव्हती. ते वैराग्य पूर्ण जीवन जगत होते. चाळीसी नंतर आता आपण हे जग स्वेच्छेने सोडून जावे असे त्यांना वाटू लागले. वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी ९ मार्च १६५० या दिवशी संत तुकारामांचे निर्याण झाले. “आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा” असे म्हणून ते वैकुंठला निघून गेले.

संत तुकाराम वैकुंठाला गेले असले तरी त्यांचा विचार जनसामान्यांमध्ये कायमचा रुजला गेला. आता त्यांची अभंग गाथा लोक गंगेवर तरलेली होती. वैदिकांना त्यांचा विचार मान्य नसला तरी वारकऱ्यांना त्यांचा विचार म्हणजे जीवनाचा सार सर्वस्व होता. आजही वारकरी देहूला संत तुकारामांच्या दर्शनासाठी जातात आणि तुकारामांचा अभंग गाथा डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचतात.

“ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस” असे सार्थ उदगार तुकारामांच्या बाबतीत सत्य झालेले काळाने पाहिले.

 

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment