माझे आवडते शिक्षक निबंध मराठी Essay on my favorite teacher in Marathi

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी Essay on my favorite teacher in Marathi

Essay-on-my-favorite-teacher-in-Marathi

माझी शाळा डोंगरांनी वेढलेल्या एका सुंदर खेड्यात आहे. हे मी पहिली ते सातवी याच शाळेत शिकलो. सात वर्षे म्हणजे आनंदाची आणि आयुष्यभराची शिदोरी मिळवून देणारी ठरली. आम्हाला जे शिक्षक होते ते फार कष्टाळू होते. मला पहिली आणि सातवीला जे शिक्षक होते ते म्हणजे आमचे खेत्री गुरुजी.

आमचे गुरुजी आमच्या गावातच राहणारे होते. त्यामुळे सुट्टी असली तरी त्यांचा आणि आमचा सामना होत असे. म्हणजेच गाठभेट होत असे. ते फार प्रेमळ होते. तितकेच ते कडक शिस्तीचे सुद्धा होते. स्वाभिमानी स्वभाव असल्याने मोडेल पण वाकणार नाही हे त्यांचे ब्रीद होते असे म्हणता येईल.

संत तुकाराम महाराज निबंध

उंचीने थोडे कमी असते तरी तब्येतीने मजबूत होते.सातवीपर्यंतची शाळा असली तरी प्रत्येक वर्गाला शिक्षक आणि पटसंख्या मोठी या गोष्टी शाळेच्या मोठेपणात आणि गौरवात भर टाकणाऱ्या होत्या.

आमचे गुरुजी सोडले तर इतर सर्व शिक्षक बाहेर गावावरून येत असत. गुरुजींचा गावात दबदबा होता. त्यामुळे इतर शिक्षक गुरुजींना घाबरून असत. गुरुजींचे बोलणे सरळ सोपे साधे होते. पण जेव्हा ते रागावल्यावर मात्र त्यांच्या बोलण्यातून त्यांचा जो रुद्रावतार दिसत असे त्याचा अनुभव घेऊनच लोक त्यांच्याशी वागत. एक प्रकारची आदरयुक्त भीती गुरुजींबाबत निर्माण झाली होती.

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी

गुरुजींची शिकवणे म्हणजे एखादे प्रवचनचच असे. त्यांनी एखादी कविता शिकवली की, तिला सुंदर चाल लावून आम्ही ते सांगतील त्या कृती करून म्हणत असत. कविता अभंग धडे शिकवताना त्यातील प्रत्येक शब्द न शब्द हा अर्थपूर्ण होत असे. याशिवाय त्यांनी दिलेली उदाहरणे अतिशय ऐकण्यासारखी असत. अगदी सोप्या भाषेत त्यांनी शिकवलेले आजही स्मरणात आहे.

गुरुजींनी आयुष्यामध्ये शिस्तीला फार महत्व दिले शिस्तीने राष्ट्र घडते आणि जीवन सुद्धा घडते असे ते नेहमी म्हणत असत. हे आता मोठेपणी मला पटलेले आहे. परंतु त्यावेळी बेशिस्तपणा करण्यामध्ये आम्ही मुले पुढे होतो. अर्थात त्याची शिक्षा सुद्धा गुरुजी आम्हाला न चुकता देत. माझ्या आयुष्यात जी काही थोडीफार शिस्त आहे, त्यामध्ये गुरुजींचा वाटा मोठा आहे.असे मला वाटते.

गुरुजींचा स्वभाव प्रेमळ आणि कडक शिस्तीचा होता. म्हणजे अगदी नारळामध्ये जे पाणी असते ते म्हणजे गुरुजींचा प्रेमळपणा. नारळाचे कवच म्हणजे त्यांचा कडकपणा होय.

गुरुजींना स्वच्छतेची आवड होती. टापटीपपणा त्यांच्या अंगामध्ये मुरलेला होता. नीटनेटकी मुले दिसली की त्यांना आनंद होई आणि इतर मुलांना त्याचे उदाहरण ते देत असत. मग त्या नीटनेटक्या मुलाला बक्षीसही ओघानेच ते देत. बक्षीस देण्यासाठी लेमनच्या गोळ्या त्यांच्या खिशातच पुढे बांधून ठेवलेले असत. आम्हालाही त्यांच्याकडून बक्षीस मिळावे असे नेहमीच वाटत असे.
शाळेची चावी गुरुजींच्या घरी ठेवली जात असे.

शाळेची घंटा झाली की मुले पटापट गोळा होत. सफाई न सांगता सुरू करत आणि परिपाठाच्या घंटेची वाट पाहत. शाळेतील परिपाठाला फार शिस्त होती. सगळे काही काटेकोर वेळेनुसार चाले. प्रत्येक वर्गाची परिपाठाचे नियोजन करून दिले होते. जेव्हा आमचा परिपाठ असे, तेव्हा आमची पूर्वतयारी गुरुजी करून घेत. त्यातूनच आम्ही प्रार्थना म्हणायला, गोष्टी सांगायला, कवितांचे सादरीकरण, सुविचारांचा अर्थ सांगणे, दिनविशेष सांगणे इत्यादी गोष्टी अगदी धीटपणे करायला शिकलो. यातूनच आमचे व्यक्तिमत्व घडत होते हे आज लक्षात येत आहे.

आमच्या या खेत्री गुरुजींनी परिपाठामध्ये सांगितलेला पसायदानाचा अर्थ अजूनही माझ्या लक्षात आहे. प्रत्येक ओवीचे अर्थ स्पष्ट करून सांगत. विनोबा भावे यांनी सांगितले एकादशी व्रत आम्ही परिपाठात म्हणत होतो. यातील प्रत्येक शब्द न शब्द अतिशय सुंदर पद्धतीने गुरुजींनी समजून सांगितला होता.

परिपाठामध्ये गुरुजींशी इतर कोणी शिक्षक करते बोललेले माझ्या आठवणीत नाही. दिनविशेष सांगताना त्या प्रसंगाचे वर्णन गुरुजींनी कधीही ढोबळमानाने सांगितले नाही. ते त्याचा अगोदर अभ्यास करत आणि मगच बोलत. अभ्यासाशिवाय बोलणे त्यांनी कधी केले नाही. आपल्या हाताखालची मुले ही जाणती आणि बहुश्रुत झाली पाहिजेत. यासाठी ते हे सर्व करीत.

आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुले होतो. परंतू आम्हाला कधीही गुरुजींनी शेतातील भाजीपाला मला आणून द्या असे म्हटले नाही. उलट ते भाजीपाला विकत घेत असत. वानवळा स्वीकारत नसत. अशा वस्तू स्वीकारल्या की माणूस पुढच्या माणसाची भीड बाळगतो. पण तरीही प्रेमाखातर आमचे आई-वडील गुरुजींना काही ना काही शेतात पिकलेली जिन्नस भेट देत असत.परंतु गुरुजी घरी नसताना.

गुरुजी तसे गोष्टीवेल्हाळ असत. अनेक पौराणिक, ऐतिहासिक गोष्टींचा त्यांच्याकडे खजिनाच असे. त्या गोष्टी सांगण्यात त्यांना रस असे. परंतु प्रसंग पाहूनच ते गोष्टी सांगत. गुरुजींचे वाचन नेहमीच चाले. पुणे, मुंबई किंवा इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले की उत्तमोत्तम पुस्तके ते घेऊन येत.त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा होता.

गुरुजी आणि आमचे वडील यांचा विशेष सलोखा होता. दोघांनाही धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात खूप आवड होती.या समान आवडी मुळे ते एकमेकांना भेटत असत. एकमेकांशी धार्मिक बाबतीत चर्चा करीत असत. श्रावण महिन्यात जेव्हा त्यांच्या घरी पोथी सुरू होई. तेव्हा माझे वडील अर्थ सांगण्यासाठी तिथे जात. पोथीचा अर्थ वडलांनी सांगावा असा त्यांचा आग्रह असे.

त्यावेळी टीव्ही पाहणे म्हणजे चैन समजले जाई. परंतु टीव्हीवरील शैक्षणिक कार्यक्रम आम्ही मुलांनी आवर्जून पाहावेत असे गुरुजींना वाटत असे. त्यामुळे ते शैक्षणिक, ऐतिहासिक, पौराणिक टीव्ही मालिका असल्या की आम्हाला अगदी घरी बोलवायला येत. हे त्यांचे विशेषच असेच म्हटले पाहिजे. एरवी कोणी टीव्ही पाहताना दिसला की मात्र त्याला ते खडसावत.

माझी शाळेतील शिक्षण पूर्ण झाली आणि माध्यमिक शाळेसाठी मी परगावी जाऊ लागलो. माझी ते आवर्जून चौकशी करत असत.गुरुजींना पुढे वेगवेगळ्या ठिकाणी बदली होऊन जावे लागले. असे असले तर तरी आपले माजी विद्यार्थी आणि गाव यांच्याशी असलेला संबंध त्यांनी कधीही तोडला नाही.

गुरुजींशी असलेला ऋणानुबंध आणि त्यांच्या आठवणी आजही मी हृदयामध्ये जपून ठेवलेल्या आहेत. गुरुजी मुळे माझ्या जीवनाला आकार आला आणि माझे जीवन कृतार्थ झाले असे मी समजतो.

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment