मोबाइल शाप की वरदान निबंध मराठी Essay on Mobile advantages and disadvantages

 

मोबाइल शाप की वरदान Essay on Mobile advantages and disadvantage

आजच्या एकविसाव्या शतकात डिजिटल क्रांती झाली आहे. या डिजिटल क्रांतीने प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल दिला आहे. पूर्वी घरात असलेला फोन आता आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. फक्त त्याचे स्वरूप हलते बोलते झाले आहे. परंतु या मोबाईलचे काही फायदे आहेत आणि काही तोटे सुद्धा नक्कीच आहेत.

मोबाईल वापराचे फायदे

डिजिटल क्रांतीमुळे मोबाइल आपल्या हातात आला आहे. त्याचे निश्चितच काही फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे

मोबाईल चालता-बोलता संगणक

पूर्वी फोन म्हणजे दूरवरच्या व्यक्तीशी बोलण्यासाठी असलेले यंत्र होते.मोबाईलने त्या फोनची जागा घेतली आहे. परंतु मोबाईल केवळ दूरच्या व्यक्तीशी बोलण्यासाठी आज वापरला जात नाही. मोबाईल हा चालता बोलता मिनिकॉम्प्युटर झाला आहे. असे म्हणतात की सत्तरच्या दशकातील कॉम्प्युटरपेक्षाही आजचा मोबाईल अतिशय प्रगत असा एक फिरता कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरवर असलेले सगळ्या प्रकारचे कार्य मोबाईल वरून करता येते. मोबाईलवरून बोलता येते आणि साऱ्या जगाशी इंटरनेटने जोडल्यामुळे संगणकाचे सर्व काही कार्य आज आपण मोबाईलवरून करू शकतो. एवढेच काय, एखादा संगणक करणार नाही इतक्या गोष्टी आज तुम्ही मोबाईलवरून साध्य करू शकता.

संदेशवहनाचे वेगवान साधन

मोबाईल हे संदेशवहनाचे अतिशय जलद असे साधन आहे. मोबाईलवरून आपण कोणताही संदेश क्षणार्धात जगभर पाठवू शकतो. हा संदेश लिखित, ध्वनिमुद्रित किंवा चित्रफितीच्या प्रकारांमध्ये सुद्धा आपण पाठवू शकतो. पूर्वीच्या काळी माणसे वेगवेगळ्या साधनांद्वारे संदेशवहन करीत. त्या काळाचा विचार करता, मोबाईलच्या संदेशवहनाचा वेग केवळ अचाट आहे असे म्हणता येईल.

ऑनलाइन शिक्षणाचे माध्यम

वेगवेगळ्या साथरोगांच्या काळात शाळा बंद ठेवाव्या लागतात. त्यामुळे शिक्षण सुद्धा बंद होण्याच्या स्थितीत येते. अशावेळी मोबाईलवर उपलब्ध असणाऱ्या विविध ॲप्सचा वापर करून आज आपण बंद पडलेले शिक्षण सुरू ठेवू शकतो. व्हॉट्सऍप,गुगल मीट, झूम अॅप सारख्या ॲप्सचा वापर करून आजही शिक्षण सुरू आहे. याशिवाय विविध शैक्षणिक अभ्यासक्रम मोबाईलसारख्या साधनाद्वारे जगभरातील कुठच्याही देशांमध्ये शिकणे शक्य आहे.

प्रवासाचा साथी मोबाईल

मनुष्य एक भटका प्राणी आहे.वेगवेगळ्या सहली आणि पर्यटन जगात सतत चालू असते.विविध ठिकाणी माणसाच्या हालचाली प्रवासाद्वारे चालू असतात. प्रवास करीत असताना मोबाईलमध्ये असणारे गुगल मॅप सारखे साधन अतिशय उपयोगी पडते. त्यामुळे आपण प्रवासात मार्ग चुकण्याचा धोका कमी होतो. शिवाय मार्गातील अडथळे आणि सोयी समजतात. परिणामी प्रवास सुखकर आणि बिनधोक होतो.

मोबाईल एक व्यवसायिक संधी देणारी वस्तू

आपल्या हातातील मोबाईल केवळ दूरच्या व्यक्तीशी बोलण्यासाठी न वापरता आपल्या चरितार्थाचे साधन बनू शकतो. हे सिद्ध झाले आहे.वेगवेगळे व्यवसाय करताना मोबाईलचा आज प्रचंड वापर होत आहे. मोबाईलवर आपल्याकडील वस्तू विकण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करता येतात. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या व्यावसायिक ॲप्सवर आपल्याकडील वस्तू विकण्यासाठी फोरम असतात. अनेक व्यावसायिक स्वतःचे एप्लीकेशन बनवून आपल्या व्यवसायात वृद्धी करतात. विविध शैक्षणिक संस्थासुद्धा याचा वापर करताना दिसून येतात. फेसबूक, इंस्टाग्राम, युट्युब यासारखे ॲप्सवर आपल्या वस्तूंचे सादरीकरण करून त्या विकता येतात. मोबाईलची विक्री आणि दुरुस्ती येते. अनेकांना आपला रोजगार मिळाला आहे.थोडक्यात काय तर मोबाईल एक मोबाईल एक व्यावसायिक संधी देणारी वस्तू आहे.

मोबाईल एक करमणुकीचे साधन

पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने खूप वेगळी होती. जिवंत कला लोकांना पाहायला भेटत होती. आधुनिक धावपळीच्या काळात माणसाला बसल्याजागी मनोरंजनाचे साधन म्हणूनच मोबाईल उपलब्ध झाला. युट्युब सारख्या ॲप्सवर नाटक, चित्रपट, वेगवेगळे करमणूक करणारे व्हिडिओ, ज्ञान देणारे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात आहेत.याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप यावरसुद्धा प्रचंड मेसेजिंग चालू असते. त्यामुळेही मोठी करमणूक होते. वेगवेगळ्या ठिकाणी चालणारे लाईव्ह शो घरबसल्या पाहता येतात. त्यामुळे मोबाईल एक मनोरंजनाचे आवडते साधन बनले आहे.

मोबाईल वापराचे तोटे

मोबाईलचे अनेक फायदे असले तरीही त्यामुळे होणारे तोटे सुद्धा आहेत. ती पुढीलप्रमाणे सांगता येतील.

मानसिक व शारीरिक आजार

मोबाईल वापरामुळे अनेक मानसिक व शारीरिक आजार होतात मोबाईलचा अतिवापर हा एखाद्या व्यसनासारखा आहे माणूस थोड्या थोड्या वेळाने मोबाईल मध्ये आलेले संदेश पाहत असतो त्यामुळे त्याचे लक्ष मोबाईल कडे खेळलेले राहते तसेच मान पाठ विकारही मोबाईल वापरामुळे जडतात याशिवाय डोळ्यांचे विकारही मोबाईल वापरामुळे निर्माण होतात मोबाईलच्या चुंबकीय प्रारणे मुळे मेंदूचे विकार सुद्धा जडण्याचा धोका असतो.

मोबाईल वरील गेममुळे मुलांचे आरोग्य धोक्यात

मोबाईल वर वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स खेळायला असतात लहान मुले तासन्तास मोबाईलवर गेम खेळत बसतात याशिवाय आहे काही गेम्स मुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि एकाग्रतेचा हा भाव निर्माण होतो मुलांचे शैक्षणिक बाबींकडे दुर्लक्ष होते परिणामी त्यांच्या करियरला ही धोका निर्माण होतो काही प्रकारच्या मुळे मुलांना जीवही गमवावा लागले आहेत हे अतिशय धोकादायक आहे.

वाचनाचे महत्त्व संपले

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आज इंटरनेटवर शोधले जाण्याची सवय लागली आहे. खरेतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इंटरनेटवर नाही. परंतु ही सवय झाल्यामुळे वाचनाची सवय राहिली नाही. अनेक संदर्भहीन बाबींमुळे आपण शोधलेले उत्तर हे चुकीचे असते हे लक्षातही येत नाही. त्यामुळे अनेक गैरसमज होतात. वाचाल तर वाचाल असे म्हणणाऱ्या वाचन संस्कृतीला या मोबाइल संस्कृतीमुळे पूर्णविराम भेटतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

गुन्हेगारीमध्ये वाढ

मोबाईलचा वापर करून मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. वाईट प्रवृत्तीचे लोक या मोबाईलचा गैरफायदा घेऊन आपले गुन्हेगारी विश्व वाढवत आहेत. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे आर्थिक गुन्हेगारी फोफावत आहे.

तात्पर्य

आधुनिक डिजिटल युगामध्ये मोबाईल सारख्या अतिशय प्रगत तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. असे असले तरीही काही तोटे आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. थोडक्यात काय तर मोबाईल वापराच्या योग्य सवयींचे वळण लावण्याची वेळ आली आहे.

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment