गुरुपौर्णिमा निबंध मराठी Essay on Gurupaurnima in Marathi

गुरुपौर्णिमा निबंध मराठी Essay on Gurupaurnima in Marathi

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंचे स्थान अतिशय पूजनीय मानले गेले आहे. केवळ पूजनीयच नाही तर साक्षात परमेश्वराचे स्थान गुरूला दिले गेले आहे. गुरु पौर्णिमा हा दिवस सर्व गुरूंच्या पूजनाचा दिवस आहे. प्राचीन काळी भारतात गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात असे. या गुरूकुलातील सर्व शिष्य आपल्या गुरूंची पूजा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करत असत आणि आपल्या गुरुंना गुरूदक्षिणा देत असत.

आषाढ महिन्यातील पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते .व्यास ऋषींच्या जन्मदिनाला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. महर्षी व्यासांनी महाभारत, ब्रह्मसूत्रे, अठरा पुराणे अशा मोठ्या संस्कृत ग्रंथांची रचना करून प्राचीन भारतीय संस्कृतीचा गौरवशाली वारसा आपल्या शब्दसृष्टीने अलंकृत केला.

महर्षी व्यासांचे हे ग्रंथ जगभरचे विद्वान वाचतात. साऱ्या जगाला आजही हे ग्रंथ गुरुसारखे ज्ञान देतात. अशा या व्यासांचा जन्मदिन म्हणजेच गुरुपौर्णिमा.

महर्षी व्यास आणि गुरूपौर्णिमेचे महत्त्व

“नमोस्तुते व्यास विशालबुद्धेफुल्लारविंदायत्पत्रनेत्र ।

येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वलितः ज्ञानमय प्रदीपः ॥”

या श्लोकातून महर्षी व्यासांची महती वर्णन केली आहे. महर्षी व्यासांची बुद्धी विशाल होती. अशा या विशाल बुद्धीच्या व्यासांनी भारतामध्ये आपल्या बुद्धीच्या आधाराने ज्ञानदीप प्रज्वलित केला आहे.

या दिवशी महर्षी व्यास यांची पूजा केली जाते.महर्षि व्यास हे गुरु परंपरांचे उद्गाते आहेत. प्रत्येक शिक्षक किंवा गुरुमध्ये महर्षी व्यासांचा अंश गुरु या नात्याने असतो असे समजले जाते. त्यामुळे विविध ठिकाणी विविध क्षेत्रातल्या गुरूंची पूजा या दिवशी केली जाते. गुरूंना गौरविले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये चौदा विद्या आणि चौसष्ठ कला मानल्या आहेत. या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिष्ठाता श्री गणेश आहे आणि या चौदा विद्या आणि चौसष्ठ कला यांचा दाता प्रत्येक गुरू आहे. तो प्रत्येक गुरू हा महर्षी व्यासांची ज्ञानदानाची परंपरा पुढे चालवणारा महर्षी व्यासांचा अंश आहे. या अर्थाने गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून शोभते.

महर्षी व्यासांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने, त्रिकालदर्शी प्रज्ञेने महाभारतादी ग्रंथांची रचना केली. संत ज्ञानेश्वर म्हणतात,
“म्हणोनी महाभारती जे नाही, ते नोहेची लोकी तिही ।

येणे कारणे मनी पाही,व्यासोच्छिष्टं जगत्रय ॥”

महाभारत ग्रंथात जगातील सर्वच विषयांना स्पर्श केला गेला आहे.जवळपास कोणताच विषय सुटला नाही.इतकी व्यासांची प्रतिभा सर्वस्पर्शी होती.त्यामुळेच व्यासांनी सर्व जग उष्टे केले आहे,असे म्हटले जाते.एकप्रकारे महर्षी व्यासांचे गुरूत्व आणि तेही सर्व विषयात आहे. या गुरूत्वाच्या गौरवार्थ व्यासपौर्णिमा साजरी करतात.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत व्यासांचा मागोवा घेत आपण ही श्रीमद्भगवद्गीतेवर भाष्य करीत आहे , असे म्हटले आहे.

गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ

गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंबद्दल आदर वाढविणारा हा एक पवित्र सण मानला जातो. जेव्हा एखादा शिष्य आपले गुरूने दिलेले ज्ञान हे सर्वोच्च स्तरावर संपादित करतो आणि त्या ज्ञानाने भरून जातो. तेव्हा गुरूंना आनंद होतो. हा आनंद खऱ्या अर्थाने गुरुकृपा समजली जाते. तेव्हा खरी गुरुपौर्णिमा साजरी होत असते.

चंद्र जसा कलेकले प्रमाणे रोज मोठा होत जातो, पौर्णिमेला तो संपूर्ण दिसतो, त्याचप्रमाणे गुरु आपल्या शिष्याला कलेकलेने आणि त्याच्या कलाने ज्ञान देऊन त्या क्षेत्रात मोठे करतात. म्हणजेच त्यांची पूर्ण कृपा शिष्याला लाभून तो विद्येमध्ये परिपूर्ण होतो.

गुरू शिष्य परंपरा

भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य परंपरा ही एखाद्या अमरज्योती प्रमाणे अमर झालेली आहे.  गुरु आपल्या शिष्यांना जे शिक्षण ज्ञान किंवा विद्या देतात; ते परंपरेने आणि त्यांच्या तपश्चर्येने त्यांना प्राप्त झालेले असते.  ते ज्ञान पुढच्या परंपरेमध्ये तसेच अखंड दिले जाते. ही ज्ञानदानाची परंपरा हजारो वर्ष अखंड चालू आहे. बृहस्पती हे देवांचे गुरू होते.  शुक्राचार्य हे दैत्यगुरू होते.  भगवान शंकर हे पार्वतीमातेचे गुरु होते. त्यांना आदिनाथ असेही म्हटले जाते.

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य

यातूनच पुढे रे भगवान दत्तात्रेय यांनी मच्छिंद्रनाथांना पुन्हा ब्रह्मविद्या दिली.  त्यानंतर नाथसंप्रदाय निर्माण झाला.  ती परंपरा आजतागायत चालू आहे. या नाथ  परंपरेतील गहिनीनाथ यांनी संत निवृत्तीनाथांना विद्यादान केले.  निवृत्तीनाथांनी संत ज्ञानेश्वर व भावंडांना गुरुमंत्र दिला. यातूनच वारकरी संप्रदायाची नाथपंथाची जोडले गेले. या गुरु-शिष्य परंपरेचे नाते आजतागायत चालू आहे.

भगवान विष्णुने ब्रह्मदेवाला विद्यादान केले. नारदांनी व्यासाला, व्यासांनी शुकदेवाला गुरुमंत्र दिला आणि तेथून पुढे चैतन्य संप्रदाय निर्माण झाला.  संत तुकाराम महाराज संत बाबाजी चैतन्य यांचे शिष्य होते. वारकरी संप्रदायामध्ये या चैतन्य संप्रदायाचे शिष्य निर्माण होऊन त्यामध्ये समाविष्ट झाली. शंकराचार्य यांच्या गुरुपरंपरेचे नातेसुद्धा वारकरी संप्रदायात येऊन पोहोचले आहे. अशा तऱ्हेने वारकरी संप्रदाय हा अनेक गुरू परंपरेशी नाते सांगणारा एक सर्वसमावेशक संप्रदाय आहे.

प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ आणि विश्वामित्र यांनी विद्यादान दिले. श्रीकृष्ण, बलराम, सुदामा यांना सांदिपनी ऋषींनी विद्यादान दिले. श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर विद्यादान केले. त्याच उपदेशाचा भगवद्गीता हा ग्रंथ आजही आपण अभ्यास करतो.  त्यावर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले टीका  ज्ञानेश्वरी सातशे वर्षानंतरही आपण वाचतो.

वेद काळातही अनेक गुरु-शिष्य परंपरा विशाल अशा भरत खंडात  निर्माण झाल्या होत्या. त्या आजही वेदाध्ययन करणार्‍या पाठ शाळांमध्ये दिसून येतात.
केवळ धार्मिक क्षेत्रातच नाही, तर संगीत , वास्तूकला, विज्ञान, शिल्पकला क्षेत्रामध्ये सुद्धा गुरु-शिष्य परंपरा फार मोठी दिसून येते. आजही विविध घराने भारतामध्ये संगीत विद्या गुरु परंपरेने आपले आलेले ज्ञान पुढे देत आहेत. गुरु पौर्णिमा या दिवशी यातील अनेक गुरूंना विविध पुरस्कार देऊन गौरविले जाते.

केवळ भारतातच नाही तर युरोपमध्ये सुद्धा गुरुपरंपरा आहे. सॉक्रेटिसने प्लेटोला ज्ञान दिले. प्लेटोने आपल्याजवळील ज्ञानभांडार  अरिस्टोटलला दान केले.
रामकृष्ण परमहंस यांनी आपल्याकडे असलेले ज्ञान विवेकानंद आदी शिष्यांना दिले. जगभर स्वामी विवेकानंदांचे हजारो शिष्य आजही आहेत. चैतन्य महाप्रभू यांनी स्थापन केलेली चैतन्य परंपरा सुद्धा मोठ्या गौरवाने आजही आपले कार्य करत आहे.

गुरूंचे आजच्या काळातील स्थान

एकविसाव्या शतकामध्ये प्रचंड मोठी डिजिटल क्रांती झाली आणि नव्या पिढीला संगणक हाच आपला गुरू असे वाटू लागला आहे. असे असले तरी संगणकाचे ज्ञान देणारे उच्चविद्याविभूषित गुरु जे  ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतात ते संगणक प्रत्यक्ष देऊ शकत नाही. गुरूंचे महत्त्व आजही टिकून आहे. गुरूंबद्दल असलेला आदर ठेवल्याने त्यांचे कृपा आशीर्वाद  आजही लाभत आहेत.

इतर धर्मातील गुरु-शिष्य परंपरा

हिंदू धर्म व्यतिरिक्त इतर धर्मातही गुरु-शिष्य परंपरा आहे .येशू ख्रिस्ताने आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये या शिष्यांना ज्ञानदान केले. त्या शिष्यांनी आपली गुरुपरंपरा तयार केली .मोहम्मद पैगंबर यांनीही आपल्या बरोबरच्या लोकांना ज्ञान देऊन एक प्रकारे गुरु-शिष्य परंपरा निर्माण केली आहे. बौद्ध धर्मातही गुरू-शिष्य परंपरेला वेगळे स्थान आहे. एकूणच काय तर सर्वच धर्मगुरु परंपरेला मान देतात. एक आदराचे स्थान सर्वच गुरु परंपरांमध्ये धर्मांमध्ये दिसून येते.

संत ज्ञानेश्वर म्हणतात,
श्रीगुरु सारखा असता पाठीराखा
इतरांचा लेखा कोण करी
सद्गुरुसारखा  पाठीराखा असताना  मला  इतर कोणाचीही आवश्यकता नाही. कारण सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने परिपूर्ण होऊन ह्या भवसागरातून निश्चितच करून जाईल अशी खात्री ज्ञानेश्वरांना वाटते.तेच वरील ओळींमधून संत ज्ञानेश्वर यांना सुचवायचे आहे. इतका गुरूंबद्दल संत ज्ञानेश्वरांना आदर आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना शहाजीराजे आणि विशेषतः राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याच्या स्थापना कालखंडात मार्गदर्शन केले. स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलांना बरोबरच्या लोकांना कालबाह्य परंपरांना छेद देऊन स्वराज्य टिकविण्याचे आणि वृद्धिंगत करण्याचे ज्ञान दिले. इथेही एक प्रकारची गुरु-शिष्य परंपरा निर्माण झालेली दिसून येते.

गुरु परंपरेचा कालोचित अर्थ

आधुनिक काळात  विविध तांत्रिक प्रगती प्रचंड झाली असून सारे जग आज संगणकाकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधू लागले आहे. संगणक हे एक निर्जीव यंत्र असून सजीव अशा गुरुंकडे असलेले ज्ञान देण्याची क्षमता संगणक किंवा त्याच्या कोणत्याही कार्यप्रणालीकडे नाही. हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे.

कोणत्याही गोष्टीचे ज्ञान हे शिक्षक किंवा  गुरु ज्या पद्धतीने देऊ शकतात तसे ज्ञान देण्याची क्षमता संगणकाकडे कोणत्याही काळात निर्माण होण्याची शक्यता नाही. याचा अर्थ एकच आहे की आजही गुरूशरण होऊन आपल्या ज्ञानाची पातळी चंद्राच्या कलेप्रमाणे वाढवीत जाऊन ज्ञानाची पौर्णिमा अर्थात पूर्णत्व निर्माण होऊ शकते हे त्रिकालाबाधित सत्य राहिले आहे.

शिष्यत्व पत्करणे यात कोणताही कमीपणा नसून आपल्यातील सुप्त गुणांचा कालोचित विकास करणे आणि जीवनाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची दृष्टी प्राप्त करून जीवन जगण्याच्या आनंद घेणे आवश्यक आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

1 thought on “गुरुपौर्णिमा निबंध मराठी Essay on Gurupaurnima in Marathi”

Leave a Comment