ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध Essay on Granth Hech Guru

ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध Essay on Granth Hech Guru

ग्रंथ हेच गुरु हे सत्य आज संपूर्ण जगासमोर एक त्रिकालाबाधित सत्य म्हणून आले आहे. ग्रंथ हेच गुरु हा फार मोठा सिद्धांत ठरत आहे. कारण सत्य हेच आहे; की ग्रंथांना शरण गेल्याशिवाय कोणत्याही विद्येची प्राप्ती सहजासहजी होत नाही. त्यामुळे ग्रंथ हेच गुरु हा ग्रंथ मंत्र जाणून विद्यार्थी भूमिकेतून मनुष्य खूप काही शिकू शकतो आणि आपल्या जीवनाला हवे तसे सुंदर बनवू शकतो.

भारतीय ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते डॉ.रंगनाथन

टीव्ही, फ्रिज इत्यादी वस्तू घराला कदाचित घरपण देत असतील; परंतु चांगले ग्रंथ घराला शहाणपण देतात. घराला शहाणपण देणाऱ्या ग्रंथामुळे ज्ञान श्रीमंती वाढते हे वास्तव आहे. वाचकाच्या हातात असणारे ग्रंथ त्याचे खरे सोबती असतात. त्याचे मित्र असतात.कोणत्याही प्रसंगात ते वाचकाला सोडून जात नाहीत.

आयुष्यभर सोबत करण्याचे जणू काही त्यांनी व्रत घेतलेले असते.” अज्ञानाच्या अंधारात रात्रींना उजळून टाकण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्ये असते. ग्रंथांच्या त्यातच क्रांतीची बीजे असतात.ग्रंथ आम्हाला माणुसकी आणि शांती शिकवतात. या क्रांतीचे, माणुसकीचे, शांतीचे, नवे नवे वारसदार निर्माण करण्याचे काम ग्रंथ करतात.”
असे कविवर्य कुसुमाग्रज यांनी म्हटलेले आहे.

ग्रंथांमध्ये मानवाचा गुरु होण्याची अफाट क्षमता दडलेली आहे. ग्रंथ हे मानवानेच लिहिलेले आहेत; परंतु असे असले तरी ग्रंथ लिहिणारे किंवा पुस्तके लिहिणारे लेखक, ग्रंथकार हे थोडे असतात. त्यांच्याकडील ज्ञानाचा साठा ते ग्रंथांमध्ये उतरवत असतात. ज्ञानाची साधना करून मिळवलेले ज्ञान ग्रंथांमध्ये ग्रंथीत करून हे ग्रंथकार मानवजातीची फार मोठी सेवा करत असतात.

“पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक असते.”

“पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक असते.”
असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे इतकं पुस्तकांचे महत्त्व त्यांनी जाणले.ग्रंथ किंवा पुस्तके आपल्यासाठी एखाद्या शिक्षका सारखं काम करतात. शिक्षक ज्याप्रमाणे आपल्याला एखादा विषय समजावून देतो; अर्थात त्यानेही संदर्भ ग्रंथ, पुस्तके अभ्यासून आपल्याला ज्ञान दिले असते. परंतु तो आपल्याला सतत सहाय्य करू शकत नाही. आपल्याजवळ थांबू शकत नाही.

मात्र पुस्तके आपल्याला आपल्या जवळ राहून मदत करतात. पुस्तके केव्हाही उघडा वाचा आणि आपले ज्ञान तपासून पहा. आपले ज्ञान दृढ करा. एखाद्या गुरु प्रमाणे त्याला मार्गदर्शन करीत राहतात पुन्हा पुन्हा या ग्रंथांमध्ये आपण गेलो; तर अधिकाधिक ज्ञान माहिती आपल्याला सहज देतात आणि आपल्या जाणिवा समृद्ध आणि परिपक्व करतात.

“चांगल्या पुस्तकांचे स्वागत मी नरकात ही करीन”
असे लोकमान्य टिळक म्हणाले होते. कारण चांगल्या पुस्तकांच्या वाचनातून आपल्याला एक प्रकारचे समाधान आणि आनंद मिळतो. चांगली पुस्तके एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे आपली सोबत करीत असतात आणि ज्याला मित्र असतात त्याला सर्व सुखे प्राप्त होण्याची शक्यता असते.

“दिसामाजी काहीतरी लिहावे
प्रसंगी अखंडित वाचीत जावे”

“दिसामाजी काहीतरी लिहावे
प्रसंगी अखंडित वाचीत जावे”
दिसामाजी म्हणजे दिवसभरात काहीना काही लेखन केले पाहिजे. म्हणजे आपली लेखन क्षमता टिकून राहते. हे लिहिण्याच्या बाबतीत झाले परंतुहे लिहिणेही थोडा वेळ होईल. प्रसंगी अखंडित वाचीत जावे म्हणजेच आपण विविध पुस्तके नेहमी आपल्या वाचनात ठेवावी असे समर्थ रामदास सांगतात.

असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे कारण समर्थ रामदास हे एक ग्रंथशरण गुरु होते. त्यांनी दासबोध हा अतिशय सुंदर ग्रंथ लिहिला. तो पुन्हा पुन्हा वाचला तर आपले ज्ञान प्रचंड वाढते. मराठी सारखी आपली भाषा समृद्ध करायची असेल तर दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, संत तुकारामांचा गाथा एकूणच संत वाड़मय आपल्याला प्रचंड मोठी मदत करत संत वाड़मयाचा अभ्यास म्हणजे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास होय. हे ग्रंथ जर आपल्या जवळ असतील आणि पुन्हा पुन्हा आपण त्या ग्रंथांमध्ये डोकावून पाहिले त्याचे वाचन केले तर आपल्या जीवनाला अतिशय सौंदर्य प्राप्त होईल. हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो.

“वाचाल तर वाचाल”

“वाचाल तर वाचाल”
असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.’वाचाल तर वाचाल’ म्हणजेच तुम्ही भरपूर वाचन केले पाहिजे. म्हणजे तुमच्यामधील अज्ञानाचा नाश होत राहील. अडाणीपणा जाऊन परिपक्वता येईल. सत्य काय आहे हे उमगू लागेल. जीवनाला पुढे नेण्यासाठी ग्रंथ हेच गुरु असे मानून वाचनाचा छंद जोपासण्याचे प्रचंड फायदे आहेत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथप्रेमी होते.वाचनाच्या बळावर त्यांनी जगातील मोठमोठ्या विद्यापीठांमधून अनेक पदव्या मिळवल्या. त्याकाळचा पीडित आणि अन्यायग्रस्त समाज सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीत पिचत पडला होता. त्या समाजाला बाबासाहेबांनी नेतृत्व देऊन हिमालयाएवढे प्रचंड मोठे कार्य केले. ते केवळ विद्येच्या बळावर. आणि ही विद्या डॉक्टर आंबेडकर यांनी ग्रंथांच्या अभ्यासावर मिळवली. समाज गुलामगिरीतून बाहेर काढला. समाजाचे दररोजच मरण बंद केले. समाजाला संजीवनी दिली. म्हणजेच एक प्रकारे वाचवले. यामागे ग्रंथांची फार मोठी भूमिका आहे.

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी

जगामध्ये जी काही महान माणसे होऊन गेली; त्यात सर्वांनी ग्रंथांचा अभ्यास केला होता .ग्रंथ हेच गुरु मानून त्यांनी स्वतःच्या जीवनाचा कायापालट केला आणि समाजाला आदर्श जीवनाची दिशा दिली.

भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे ग्रंथप्रेमी होते. त्यांचे वाचन सतत चालू असे. अहमदनगरच्या तुरुंगात असताना सुद्धा वाचन चालू ठेवून त्यांनी ‘ डिस्कवरी ऑफ इंडिया’, ‘ग्लिमसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ सारखे ग्रंथ लिहिले. साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक ही तुरुंगातच लिहिले. आचार्य विनोबा भावे यांनी आपली गीता प्रवचने तुरुंगात सांगितली.त्याचा पुढे छानसा ग्रंथ झाला.

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध

लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ लिहीत असताना हिंदुस्थानातून ते सतत पुस्तके मागवत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वाचन प्रचंड होते. त्यांच्या वाचनातूनच त्यांनी ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा जाज्वल्य देशभक्तीचा आदर्श मांडणारे पुस्तक लिहिले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यामागे त्यांचे प्रचंड वाचन होते. भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सुद्धा एक आदर्श वाचक आहेत.या सगळ्यांचा अर्थ एकच आहे की वाचन माणसाला समृद्ध बनवते. वाचन म्हणजे एक ग्रंथ शरण होऊन ग्रंथ हेच गुरु मानून चालणे होय.

सारांश

जगातील प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या धर्माची अनुयायी असते. त्या प्रत्येकाने आपल्या धर्माचा ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे आणि निरपेक्ष भावनेने त्यात मांडलेल्या विचारांचे धन अभ्यासले पाहिजे. एवढेच नाही तर इतरही धर्मांचा अभ्यास ते धर्मग्रंथ वाचन केले पाहिजे. त्यामुळे ग्रंथप्रामाण्य मानून चालणारी धर्म आणि त्यामधील सत्य ज्ञान आपल्याला होईल.

शिवाय विविध धर्मांमधील असलेले समानतेचे धागे कोणते आहेत? हे कळेल. सर्वधर्म हे एकाच परमेश्वराकडे जाणारी वेगवेगळे प्रवाह आहे हे समजून येईल. जगातील धार्मिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व वांशिक विषमता दूर करण्याची अफाट ताकद ग्रंथांमध्ये दडलेली आहे. म्हणून ग्रंथांचे वाचन हे फार मोठे साधन आपल्या हाती आहे. तरी ग्रंथ हेच गुरु मानून आपण आपल्या मानवी संस्कृतीचे मस्तक अधिक उंच केले पाहिजे.

ग्रंथ हेच गुरु Essay on Granth Hech Guru  या विषयावरील आपण या ठिकाणी एक निबंध वाचला आपल्याला हा निबंध कसा वाटला. या विषयी आपली मते खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून निश्चित कळवा. धन्यवाद.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment