गणेशोत्सव निबंध मराठी Essay on Ganeshotsav in Marathi

गणेशोत्सव निबंध मराठी Essay on Ganeshotsav in Marathi

भारत देशामध्ये विविध सणाच्या आणि उत्सवांच्या साजरे करण्याचा अतिशय महत्त्व आहे. यामध्ये गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव हा सण फार महत्वाचा आहे.

हिंदू पंचांगाप्रमाणे भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म होतो. त्याच दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना  होते. सार्वजनिक ठिकाणीही गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या धूमधडाक्यात होते.

गणेश चतुर्थीला महासिद्धिविनायकी किंवा शिवा असेही म्हटले जाते.श्री गणेश चतुर्थी येण्यापूर्वी गणेश मूर्तींचे निर्मितीचे काम विविध ठिकाणचे मूर्तिकार मन लावून करत असतात. गणेशाच्या मूर्तीवर शेवटचा रंगाचा हात दिल्यानंतर गणेश चतुर्थीच्या अगोदर पंधरा दिवस मूर्ती बाजारात येतात. लोक आपल्याला हवी ती मूर्ती आवडीनुसार निवडतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत श्रीगणराया घरी येतो.तत्पूर्वी घरीही उत्सवाची पूर्वतयारी झालेले असते. सुंदरशी आरस अगोदरच तयार करून ठेवलेली असते.

घरी आणले की,पाटावरती ठेवण्यापूर्वी गणेशाची षोडशोपचारे पूजा करतात.  पूजा केल्यानंतर एकवीस पत्री अर्पण करतात. विविध स्तोत्रे आणि मंत्रोच्चाराच्या मंगलमय आणि पवित्र वातावरणात गणपतीची स्थापना होते.

सार्वजनिक गणेशोत्सव

सन 1894 सालापासून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. यामागे लोकांना एकत्रित आणून लोकांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी लोक जागृती करणे हा त्यांचा उद्देश होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या महान उद्दिष्टासाठी गणेशोत्सवाचा अतिशय खुबीने वापर करून घेतला. तेव्हापासून भारतात आणि विशेषतः महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये गणेशोत्सव सार्वजनिक रीतीने साजरा केला जातो.

गणेश चतुर्थीच्या आधीच गणेश मंडळे भव्य अशी आरास करून पूर्व तयारी करून ठेवतात. विजेच्या दिव्यांची अतिशय भव्य आणि दिव्य अशी रचना करून आकर्षक पद्धतीने परिसर सजवला जातो. फारच विलोभनीय असे दृश्य निर्माण होते. गणेशोत्सवादरम्यान दहा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केलेले असते. विविध गणेश मंडळी गणरायाची मूर्ती आणून विधिवत मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. गणेशोत्सव साधारणता दहा दिवस चालतो.

सार्वजनिक गणेश मंडळे गणेशोत्सवादरम्यान वेगवेगळ्या जिवंत देखावे याचे आयोजन करतात. पुण्या मुंबई सारख्या शहरातून नव्हे तर महाराष्ट्रातील गावोगावी सुद्धा अशा प्रकारचे देखावे गणेशाच्या मूर्ती लगतच केले जातात. या देखाव्यामधून समाजप्रबोधनाचा धार्मिक जागृतीचा उद्देश साध्य केला जातो. हे देखावे पाहण्यासाठी लोकांची अलोट गर्दी लोटते. काही ठिकाणी अथर्वशीर्षाच्या गायनाचे मोठे नियोजन असते.हजारो लोक यामध्ये सामील होतात.गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्त उपवास करतात.

अनंत चतुर्दशीला गणेशाच्या पार्थिव मूर्तीचे धुमधडाक्यात विसर्जन होते. उत्सवाला उधाण येते उत्साहाला भरती येते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा आवाहनाने गणरायाला निरोप दिला जातो.

श्रीगणेशाची जन्म कथा

गणपती बाप्पा विद्येची देवता समजली जाते. चौदा विद्या आणि चौसष्ठ कला यांचा अधिपती गणपती बाप्पा आहे. पार्वती मातेने श्रीगणेशाला जन्म दिला. स्वतःच्या संरक्षणासाठी महाद्वारावर ठेवले. भगवान शंकर आल्यानंतर दोघांमध्ये थोडा वाद होऊन युद्ध झाले. त्यामध्ये श्रीगणेशाचे मस्तक आपल्या त्रिशुळाने श्रीशंकरांनी उडवले. पार्वतीमाता येऊन अतिशय शोक करू लागली.  त्यावेळी शंकराने आपल्या गणांना आज्ञा देऊन भेटेल त्या प्राण्याचे मुंडके आणायला सांगितले. गजराजाचे मुंडके शंकरांनी गणपतीच्या धडावर ते ठेवले. श्रीगणेश पुन्हा जिवंत झाला.

श्रीगणेशाला खूप मोठे अधिकार आणि वरदाने यावेळी प्राप्त झाली सर्व गणांचा अधिपती म्हणून श्रीगणेशाची नेमणूक झाली.

महाराष्ट्रामध्ये या गणेशोत्सवादरम्यान अष्टविनायकांची यात्रा तीर्थयात्रा लोक करतात. ओझरचा विघ्नहर्ता, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, रांजणगावचा महागणपती, पालीचा बल्लाळेश्वर, मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, महाडचा थेऊरचा चिंतामणी याशिवाय वाई येथील गणपती,  गणपतीपुळे अशीही गणपतीची तीर्थक्षेत्रे आहेत. विदर्भातही पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे अष्टविनायकांची मंदिरे आहेत. तिथे लोक अतिशय भाविकतेने गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून जातात.

मुंबई आणि पुण्यामध्ये मोठ्या गणेश मंडळांनी गणेशोत्सवाचे आयोजन करून सार्वजनिकरित्या सामाजिक उपक्रमांचे नियोजन केलेले असते. पुण्याचा दगडूशेठचा गणपती, कसबा गणपती, हिराबागचा गणपती, तळ्याचा गणपती प्रसिद्ध आहेत.मुंबईतील लालबागचा राजा तर मुंबईकरांच्या हृदयाचा सम्राटच म्हटला पाहिजे.

गणपती ही देवता बुद्धीची अधिष्ठाता आहे. विघ्नांचा नियंत्रक आणि विघ्नहर्ता आहे. त्यामुळे गणेशावर लोकांची अपार भक्ती आहे.कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी त्याची विधिवत पूजा करण्याची प्रथा हिंदू धर्मीयांमध्ये आहे. लोक अथर्वशीर्ष, मंत्र पुष्पांजली, गणपतीची आरती स्तोत्रे अतिशय भाविकतेने गातात.

कोकणामध्ये गणेशोत्सवाचा सण फार महत्वाचा मानला जातो. गणेशोत्सवादरम्यान लोक सुट्टी घेतात. मुंबईतील चाकरमानी गावाला जातात. त्यांच्यासाठी विशेष गाड्या सोडल्या जातात. कोकणात महाराष्ट्रातील इतर भागापेक्षा गणेशोत्सव फार सुंदर पद्धतीने साजरा केला जातो.गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे उत्सवप्रिय माणसांच्या उत्साहाला आलेली मोठी भरती असते.

सर्व प्रकारचे मांगल्य घेऊन गणराया येतो विघ्नहर्त्या गणरायाचे यथासांग पूजा करून लोक गणरायाच्या विसर्जना बरोबर आपल्याकडे येईल दुःख दैन्य दारिद्र्य यांचा नाश होऊन तसे प्रयत्न करतात आणि मोठ्या जड अंतकरणाने गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येईल असे म्हणून निरोप देतात.

इको फ्रेंडली गणेशोत्सव

आधुनिक काळामध्ये सुद्धा हा गणेशोत्सव साजरा केला जाताना पर्यावरणाचा विचार लोक आता करू लागले आहेत लक्षावधी गणेश मूर्तींचे विसर्जन लोक आता यामध्ये करू लागले आहेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पेक्षा शाडूच्या मूर्तींना प्राधान्य मिळू लागले आहे निर्माल्य नदीमध्ये न टाकता त्याचे कंपोस्ट खतासाठी उपयोग केला जात आहे इको फ्रेंडली गणेशोत्सव ही संकल्पना रुजू लागली आहे हे एक पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले चिन्ह आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment