मी पाहिलेला महापूर निबंध Essay on flood in Marathi

 मी पाहिलेला महापूर निबंध  Essay on flood in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण मी पाहिलेला महापूर  Essay on flood in Marathi  या विषयावर निबंध पाहणार आहोत.निबंध वाचा आणि आपल्या निबंधवहीत सुंदर हस्ताक्षरात आपण हा निबंध लिहून घेऊ शकता.

मी पाहिलेला महापूर 

गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातील २३ तारखेची ती भयानक रात्र! आमच्या खेडे गावातील अनेक गावकऱ्यांसाठी अक्षरश: काळरात्र ठरली. (Essay on flood in Marathi)आमचा गाव “मांडवी”नदीच्या काठावर वसलेला! तिच्या कुशीत आमच्या गावाची शेती बहरते. भाजीपाल्याचे सुंदर मळे फुलतात. लहान मोठी मुलं इथेच पोहायला शिकतात. गावातील महिला उन्हाळ्यात विहिरींचं पाणी कमी झालं की, या मांडवी नदीच्याच पाण्यात कपडे धुवायला येतात. गावातील सर्व प्रकारचे पशुपक्षी प्राणी या नदीवर अवलंबून आहेत. तिच्या काठी आमचा गाव मळ्यासारखा बहरला आहे.

आमची ही मांडवी नदी आमच्या गावकऱ्यांसाठी जीवन गंगा होती. तिच्या पाण्यावर आमच्या गावचा प्रत्येक माणूस अवलंबून होता आणि आजही आहे. आमच्या गावचा प्रत्येक माणूस या नदीशी अनन्यभावाने जोडला गेला आहे. मांडवी ही आमच्यासाठी लोकमाता होती. आमच्यासाठी अन्नपूर्णेचे रूप होती.

गावातील सश्रद्ध प्रौढ माणसं स्नान करून हिच्याच पाण्याने सूर्याला अर्घ्य देतात. तरुण मुले हिच्या काठावर फिरायला येतात. अशी ही आमची मांडवी नदी त्या रात्री मात्र नागिणीसारखी फोफावत आली आणि अवघ्या गावाचं जनजीवन काही क्षणात विसकळीत करून गेली. आजही त्या प्रसंगाची आठवण झाली, तरी मन भीतीने घाबरून जातं. निसर्गाच्या भयानक रौद्र रूपापुढे हतबल वाटायला लागते.

त्यावेळेस चार सहा दिवस धुव्वाधार पावसाची अक्षरश: मोठी झड लागली होती. पावसाचं हे रूप आमच्यासाठी तसं नवीन नव्हतं. दरवर्षीच काही दिवस पाऊस असा लागून राहतो. नुकतीच आवणीची कामं झाली होती. शाळा नव्याने सुरू झाल्याने नवी पुस्तके, नवे दप्तर, नवा रेनकोट,छत्री अशी नव्याची नवलाई होती. पाऊस दोन दिवस पडेल अन्‌ हळूहळू नेहमीप्रमाणे पावसाचा भर कमी होईल, असा विश्वास सगळ्यांच्या मनात होता; पण पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हता.

त्या दिवशी तर सकाळपासूनच अंधारून आलं होतं. घरांच्या छप्परावर पावसाचा तडतड आवाज करणारा ताशा जोराजोरात वाजत होता. जोडीला हवाही काहीशी वादळी सुटली होती.काही वेळ पाऊस थोडा मंदावल्यासारखा वाटल्यावर आम्ही मोठ्या उत्साहाने नदीचं पाणी किती वाढलंय, हे बघायला नदीवरील पुलावर गेलो.

नदीच्या काठावर असलेल्या देवळाच्या किती पायऱ्या पाण्यात बुडाल्या, याचं मोजमाप काही लोक करत होते. दुपारी आम्ही तशाच पावसातून भिजत शाळेत पोहोचलो. संध्याकाळी आभाळ इतके दाटून आले होते की, वर्गात काही दिसेना… वर्गामध्ये अंधारून आले होते शाळा चालू ठेवणे शक्य वाटत नव्हते. मुख्याध्यापक सरांनी शेवटी शाळा लवकर सोडली.

आता मात्र पावसाचं लक्षण गावातल्या प्रौढ माणसांना जरा गंभीर वाटू लागलं होते. लवकर जेवून, पांघरुणात गुरफटून पावसाचा आवाज ऐकत आम्ही मुलं लवकरच झोपलो. मध्यरात्री नदीचं पाणी भराभरा भरू लागलं. नदीकाठ ओलांडून गावात कधी शिरलं तेही कळलं नाही.

गावाची बाजारपेठ नदीच्या पातळीवरच असल्याने दुकानांमध्ये पाणी शिरलं. नदीकाठी अगदी लगत राहणारे, कच्च्या झोपड्यांमध्ये राहणारे लोक सैरभैर पळत सुटले. घरातील जमतील तेवढ्या चीजवस्तू घेऊन गावात आले. सर्वत्र एकच गोंधळ माजला होता. सर्वांचीच मोठी धावपळ माजली. लोकांचे चेहरे भीतीने ग्रस्त झालेले दिसत होते. पावसाने अगदी दे माय धरणी ठाय करून सोडले होते.

गावातील जबाबदार मंडळी एकत्र जमली. पुराच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागली. अतिशय भीषण अशा परिस्थितीमध्ये आपण काय केले पाहिजे याबद्दल आपली मते मांडून ताबडतोब नियोजन करू लागली.सर्वप्रथम नदीकाठी घरे असलेली जी मंडळी घाबरून गेली होती, त्यांच्या राहण्याची, आसऱ्याची सोय शाळेचे वर्ग भराभर उघडून केली गेली. गावातील तरुण मुलांनी या संकट काळामध्ये आपले मौल्यवान योगदान देण्याचे ठरवले.

ज्यांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं, तेथील माल शक्यतो वरच्या मजल्यावर किंवा तेथेच उंच ठिकाणी ठेवायला सर्व जण मदत करू लागले. पाणी हळूहळू चढतच होतं. कुणाच्या शेताजवळील घराच्या गोठ्यात गाई-गुरं होती. त्यांना सोडवून आणलं गेलं. शक्‍यतो काहीही जीवितहानी होऊ नये म्हणून गावातील तरुण मंडळी झटत होती. भरीस भर म्हणून वीजपुरवठाही बंद झाला होता. कुठेतरी झाडाच्या फांद्या पडल्या असाव्यात.

पहाट होता होता पाऊस किंचित ओसरला. पाण्याचं रौद्र रूप बघितलेली माणसं भेदरून गेली होती. उजाडल्यावर काही तरुण नदीजवळ जाऊन परिस्थितीचा अंदाज घेऊन आले. गावाला इतर गावांशी जोडणाऱ्या पुलाची पडझड झाली होती. नदीकाठच्या सर्व शेतांत पाणी शिरून रोपांची नासाडी झाली होती.

पाऊस थांबल्यावर पाणी हळूहळू ओसरत गेलं. आम्हीही नदीचा पूर पाहण्यासाठी पुन्हा काठावर गेलो. नदीचं नेहमीचं नितळ पात्र चिखलासारख्या लाल पाण्याने फुफाटत वाहत होतं. मोठमोठ्या झाडांच्या फांद्या प्रवाहाबरोबर जोरात वाहत होत्या. एखाद्या फांदीवर असलेला पाणसाप पाहताना आम्हा मुलांची घाबरगुंडी उडाली होती.

नदीकाठी असणाऱ्या झोपड्यांची पूर्ण पडझड झाली होती. घरात चिखल आणि माती पाहून हताश झालेल्या तेथील कुटुंबीयांच्या डोळ्यांत पाणी होतं. आता कुठे जायचं, पुन्हा कसं उभं राहायचं, हे प्रश्‍नचिन्ह त्यांच्यासमोर होतं.

पण या संकटाच्या वेळी सगळा गाव एकत्र आला होता. अनेक गावांमध्ये लोकांमध्ये मतभेद असतात. असे आमच्या गावात सुद्धा होते. असे असले तरी संकटप्रसंगी एकत्र येऊन काम करण्याची आमच्या गावची वर्षां वर्षांची परंपरा आहे.घराघरातून या लोकांसाठी जेवण गोळा केलं गेलं. अन्न, वस्र, निवारा हरवून गेलेल्यांसाठी कुणी धान्य, कुणी कपडे, पांघरुणं असं जमा करण्याची मोहीम राबवलीजात होती.

धो धो पाऊस सारखा पडतच होता. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता.सर्वत्र पाणीच पाणी झालेले होते; पण पिण्याच्या पाण्याच्या पाइपात चिखल अडकल्याने ‘समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशी अवस्था येते की काय, अशी भीती निर्माण झाली. पण ज्यांच्या विहिरींच पाणी स्वच्छ, सुरक्षित होतं त्यांनी सर्वांना आपल्या इथे पाणी भरण्याची सोय उपलब्ध करून दिली. अशा प्रसंगी त्यांनी दाखवलेले औदार्य कायमस्वरूपी ध्यानात राहते.

शेतकरी आपल्या औषधांकडे जाऊन आपल्या पिकांचे काय नुकसान झाले याचा अंदाज करू लागले. भाताच्या शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. पीके वाहून गेली होती. शेतांना मोठी मोठी भगदाडे पडली होती. अनेक झाडे अक्षरशः कोलमडून आणि उन्मळून पडली होती. काही गुरे नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेली होती. हे नुकसान शेतकऱ्यांसाठी फार मोठे होते.

वीजजोडणी, तात्पुरती पूल दुरुस्ती इत्यादी कामे आता कशी पुढे सरकतील, यासाठी काही लोकांकडून पुढाकार घेतला. तालुक्याचे तहसीलदार साहेब आणि त्यांच्या बरोबर असलेला अधिकारीवर्ग पुराच्या नुकसानीचा अंदाज घेत होता. गावचे सरपंच पोलिस पाटील तहसीलदार साहेबांना झालेली नुकसान दाखवत होते. तलाठी पंचनामे करीत होते. लोकांची सहानुभूतीने विचारपूस करणारे तहसीलदार साहेब भावूक झाले होते.

दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांचे लोक बातम्या दाखवत होते. त्यांचे कॅमेरे, पत्रकार,गाड्या या सर्व ठिकाणी गर्दी करून उभ्या राहिल्या होत्या. वर्तमानपत्रांचे बातमीदार आणि पत्रकार गावभर फिरून नुकसानीचा अंदाज घेत वार्तांकन करण्याचे काम करत होते.(Essay on flood in Marathi)

वेगवेगळ्या गावातून, शहरातून, विविध संस्थांकडून गावाला मदत येत होती. लोकांचा सहानुभूतीचा प्रचंड मोठा ओघ आमच्या गावा साठी निर्माण झाला होता. येणारी मदत तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्या या आदेशानुसार वितरित केली जात होती. लोकांना त्यातून मोठा आधार मिळत होता.पण बाहेरून येणारी मदत वा सहानुभूती प्रासंगिकच असते, हाही अनुभव आमच्या गावाने घेतला.

हळूहळू गाव सावरत होता; पण ज्यांचे संसार उदध्वस्त झाले, अशांसाठी हा निसर्गाचा आघात पेलणं खूप कठीण होतं. गेल्या कित्येक वर्षांत मांडवी नदी अशी कोपली नव्हती, असं गावातल्या जाणत्या माणसांचं म्हणणं होतं. खरंच निसर्गाचा, नदीचा समतोल ढळण्यामागे आपण माणसच कारणीभूत नाही ना, असा विचार करण्याची वेळ या भयंकर प्रसंगाने आणली.

आमच्या गावची मांडवी नदी आमच्यावर कोपली होती; असे म्हणणे मला थोडे चुकीचे वाटते. कारण या अस्मानी संकटापुढे तिचाही नाईलाज होता. शेवटी ती तरी काय करणार?

गावावर असलेले हे संकट आमच्यासाठी फार मोठ्या नुकसानीचे ठरले.मात्र यापुढे नदीच्या पुराची सामना करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा कशी उभारता येईल यावर गावकरी एकत्र आले. नदीच्या बाजूने संरक्षक भिंतीची उभारणी करण्याचे काम आता सुरू होणार आहे.

अवश्य वाचा.

माझी अविस्मरणीय सहल

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्तवर मराठीत निबंध

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment