इको फ्रेंडली गणेशोत्सव Eco friendly Ganeshotsav

इको फ्रेंडली गणेशोत्सव Eco friendly Ganeshotsav

इको फ्रेंडली गणेशोत्सव Eco friendly Ganeshotsav

पर्यावरणाचा विचार करत करून गणेशोत्सव साजरा करणे म्हणजेच इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणे होय. ही माझी सरळ सरळ सोपी व्याख्या इकोफ्रेंडली गणेशोत्सव बाबत आहे.

दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाचे आगमन होणार असते. सर्व लोक अतिशय आनंदाने गणरायाची वाट पाहत असतात मागील वर्षी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणून गणरायाला आपण निरोप दिलेला असतो .या निरोपाची परिपूर्ती होण्याची वेळ आलेली असते.

गणेश चतुर्थी 2021

गणरायाचे आगमन होण्यापूर्वी जवळजवळ महिनाभरापासून गणेशमूर्ती बाजारांमध्ये येतात. विविध प्रकारचे साहित्य त्यानिमित्ताने दुकानांमध्ये विक्रीसाठी लावले जाते. या साहित्याकडे पाहिले तरी असे वाटते की पर्यावरणाची किती मोठ्या प्रमाणात हानी होईल.

मग पर्यावरणाचा विचार करून गणेशोत्सव कसा साजरा करायचा? अगदी सोपे उत्तर आहे, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवता त्याऐवजी शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवाव्यात, थर्माकोलचा वापर बंद करावा, प्लॅस्टिक पूर्णपणे बाजूला करावे. तीन गोष्टी जरी केल्या तरी फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी टाळली जाईल.

गणेश मुर्ती किंवा दुर्गा देवीची मूर्ती बनवताना रासायनिक रंगांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रासायनिक रंगांमुळे मूर्ती अतिशय आकर्षक दिसतात यात शंकाच नाही. परंतु पर्यावरणाचा विचार केला तर हे रासायनिक रंग आपल्या इकोसिस्टीम साठी अतिशय घातक ठरतात. नद्यांमध्ये हे रंग जेव्हा मिसळले जातात.तेव्हा पाण्यातील जलचर अक्षरशः मृत्युपंथाला लागतात. कारण पाणी त्यामुळे विषारी होते.

अनंत चतुर्दशी व्रत व महात्म्य

शाडूची मूर्ती बनवली आणि नैसर्गिक रंगांचा वापर केला, निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून सजावट केली, तर पर्यावरणाची हानी टळेल.

आपण पाहतो की भारतामध्ये नद्यांचे आरोग्य जलप्रदूषणामुळे बिघडून गेले आहे. प्रदूषित नद्या ही पर्यावरणाची फार मोठी हानी आहे. केवळ मानवी जीवनच नाही तर संपूर्ण सृष्टीला ही फार मोठा धोक्याची घंटा आहे. फार मोठा धोकादायक इशारा आहे.

शाडूची मूर्ती बनवली आणि तिचे आकारमान जरा त्या मानाने लहान ठेवले तर त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टळू शकते.

गणेशोत्सवात सारख्या सणांमध्ये विजेचा अपरिमीत वापर होतो वीज निर्मिती करताना पर्यावरणाची हानी झालेली असते. त्यामुळे विजेचा वापर सुद्धा काळजीपूर्वक केला पाहिजे.

सण आणि उत्सव साजरे करताना मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर लावले जातात. त्यामुळे प्रचंड ध्वनिप्रदूषण होते. महाराष्ट्रात आता डीजेला बंदी आहे. तरीही काही लोक डीजे लावतात. त्यामुळे रक्तदाबासारखे आजार अधिकच बळावतात. विद्यार्थ्यांना अभ्यास करणे मुश्कील होते. आजारी व्यक्तींना त्यामुळे त्रास होतो. यासाठी स्पीकरचा आवाज मंडपाच्या आसपासच राहील अशी व्यवस्था गणेश मंडळांनी केली तर अधिकच चांगले होईल.

नद्यांमध्ये हजारो टन टाकले जाणारे निर्माल्य नद्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. यामुळे फार मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. नद्यांमध्ये निर्माण टाकण्याऐवजी त्याचा खत म्हणून वापर करण्यासाठी व्यवस्था केली तर त्यापासून शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक असणारे कंपोस्ट खत बनवू शकते.

भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव फार धुमधडाक्यात साजरा होतो. गणेशोत्सवाची मजा महाराष्ट्रामध्ये खूप असते. धुम धामही खूप असते. प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सव केव्हा येणार याची वाटच पाहत असतो. पण गणेशोत्सव साजरा करताना आपण पर्यावरणाचे काही नुकसान तर करत नाही ना असा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर येतो आणि मन विषण्ण होते.

गणेशोत्सवामुळे मन विषण्ण होण्याचे तसे काहीच कारण नाही. परंतु गणेशोत्सव साजरा करत असताना जेव्हा थर्माकोल, रासायनिक रंग, प्लॅस्टिक प्लास्टर ऑफ पॅरिस या गोष्टींचा होणारा वापर पाहिला आणि त्यामुळे होणारा पर्यावरणाचे नुकसान लक्षात घेतले तर आपण पुन्हा पर्यावरणाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हा प्रश्न निर्माण होतो.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या जातात. त्या पाण्यामध्ये विसर्जित केल्यानंतर विरघळत नाहीत. त्या मूर्ती पाण्यावर तरंगत राहतात.नद्यांमध्ये अशा असंख्य मूर्ती पडून राहतात नद्यांच्या इकोसिस्टीमचे नुकसान होते. परिणामी पर्यावरणाला हानी पोहोचते.

थर्माकोल आणि प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे विघटन होत नाही. थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा अधिकाधिक होणारा वापर पर्यावरणाला निश्चितच हानी पोहोचवतो. या ऐवजी गणपती मंडपाचे डेकोरेशन करताना आकर्षक सजावट थर्माकोल आणि प्लॅस्टिक शिवाय झाली पाहिजे असे माझे मत आहे. त्यासाठी पर्यायी गोष्टींचा वापर केला पाहिजे.

गणरायाची मूर्ती शाडूची बनवली तर ती पाण्यात विरघळते. पाण्यात विरघळल्या मुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही.

आजच्या काळामध्ये दिखाऊपणाला आणि त्यातून होणाऱ्या चढाओढीला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरण शिल्लक ठेवणे हे आपल्या पिढीचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने काही एक चांगल्या प्रकारची शिस्त प्रत्येक उत्सव साजरा करताना ठेवण्याची गरज आहे.

केवळ गणेशोत्सवच नाहीतर नवरात्र उत्सव, दिवाळी, होळी, दसरा अशा सणांमध्ये सुद्धा इको फ्रेंडली सण साजरे करण्याची गरज आहे. पर्यावरण स्नेही सणांमुळे आपल्या पर्यावरणाचे नुकसान तर होणार नाही. परंतु विविध प्रकारची प्रदूषणे होणार नाहीत. प्रदूषणामुळे होणारे आणि प्रकारचे आजार आणि रोग यांना आळा बसेल मानवी जीवन अधिकच आणि सुखकर होईल.

थोडक्यात काय तर प्रत्येक सण हा इको-फ्रेंडली साजरा केला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाला अनुकूल आणि पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्यासाठी काय काय करता येईल, याचा गांभीर्याने विचार करून सण साजरे केले पाहिजेत.

इको फ्रेंडली गणेशोत्सव Eco friendly Ganeshotsav

 

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment