बैलपोळा मराठीत निबंध Essay on Bailpola in Marathi

बैलपोळा मराठीत निबंध Essay on Bailpola in Marathi

Essay on Bailpola in Marathi.भारत देश हा कृषिप्रधान आहे. भारतामध्ये मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये बारा महिने 18 काळ सतत राबत असतो. विविध प्रकारची धान्ये आपल्या शेतामध्ये शेतकरी पिकवतो. म्हणून आपल्याला पोटभर अन्न खायला भेटते. शेती ही मुख्यतः निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. ही शेती करत असताना शेतकऱ्याला एक अतिशय जवळचा प्राणी एखाद्या मित्रासारखा सहाय्याला धावून येत असतो तो म्हणजे बैल.

“आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा,
हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा,
आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार ”
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी बैलपोळ्याचे हे केलेले वर्णन अतिशय चपखल आहे. शेतकऱ्यांसाठी पोळ्याचा सण अतिशय मोठा असतो.त्याच्या आनंदाला या सणांमध्ये पारावार राहत नाही. तो त्याचे घर सजवतो. घराला तोरणे लावतो आणि बैलांनाही पाहिजे तसे सजवून त्याची पूजा बांधतो.

शेतामध्ये शेतकरी बैलाच्या मदतीने नांगरणी कुळवणी पेरणी मळणी इत्यादी शेतीची कामे करत असतो. बैल हे शेतकऱ्याचे अनमोल असे धन आहे. बैल शेतकऱ्याचे सर्वस्व आहे असे म्हटले तर अधिक योग्य राहील. एखाद्या दैवताप्रमाणे बैलाला शेतकरी मानत असतो. आपली संस्कृती ही कष्टाची पूजा करणारी संस्कृती आहे. बैलाचे कष्ट, त्याची शेतकऱ्याला होत असलेली मदत यांचे ऋण शेतकरी बैलांचा एक आगळावेगळा सण साजरा करून एक प्रकारे मान्य करत असतो. हा सण म्हणजे बैलपोळा होय.

श्रावण महिन्याच्या अमावस्येला बैलपोळा साजरा करत असतात. सातारा सांगली या भागांमध्ये मात्र आषाढ महिन्यात बैल पोळा असतो. त्याला बेंदूर असेही म्हटले जाते. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात श्रावण आणि भाद्रपद या दोन्ही महिन्यांमध्ये अमावस्येला हा सण साजरा केला जातो.

बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी बैल घरी आले की संध्याकाळी शेतकरी आणि त्याची पत्नी पूजेचे साहित्य घेऊन गोठ्यात जातात. बैलाची वेसन काढली जाते. त्याला कसलाही त्रास होणार नाही अशा दाव्याने बांधतात. मग तेलामध्ये हळदीची पूड कालवून बैलाच्या खांद्याला हलक्या हाताने चोळतात.

वर्षभर वेगवेगळी प्रकारची अवघड कष्टाची कामे केल्याने बैलाच्या खांद्याला खूप त्रास झालेला असतो. दुखावलेला असतो.शेतकरी आणि त्याची पत्नी अत्यंत प्रेमाने हलक्या हाताने बैलाच्या खांद्याला हळद लावतात. गरम पाण्याने शिकवतात. बैलाला ओवाळतात.त्याची पूजा करतात.

बैलाच्या पुढच्या पायावर आणि मागच्या पायावर गरम पाणी घालून पूजा केली जाते. बाजरी भरडून केलेला गोड गोड खिचडा खायला देतात.त्याला सांजा असे म्हणतात. त्याला भरपूर ओली वैरण खाऊ घालतात. शेतकऱ्याची पत्नी आणि शेतकरी बैलाला हात जोडून प्रार्थना करतात की,” हे अतिथी देवा, उद्या तुमचा सण आहे; तुमच्यासाठी पुरणपोळी तयार करणार आहोत; म्हणून तुम्ही आमच्याकडे भोजनाला; या पोटभर पुरणपोळी खा; आम्हाला आशीर्वाद द्या.”

बैलाला दुसऱ्या दिवशी नदीवर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते. सुगंधी साबण लावून छानपैकी धुतले जाते. घरी आल्यानंतर शेतकरी ज्वारीच्या पीठाचे किंवा नाचणीचे आंबोण बैलाला खायला घालतात.

यानंतर ला बैलाला अतिशय सुंदर पद्धतीने सजवले जाते. शिंगांना रंग देऊन झाडे लावली जातात. घुंगरे बांधली जातात. गळ्यामध्ये पितळी तोडे आणि घुंगरमाळा घालतात. सुंदर सुंदर फुलांच्या माळा गळ्यामध्ये आणि पायामध्ये बांधल्या जातात. कपाळावर छानसे बाशिंग बांधले जाते. अंगावर खूप सुंदर अशी झूल टाकली जाते. गुलाल आणि भंडारा अंगावर टाकला जातो. यामुळे बैलाचे रूप अतिशय सुंदर होते.

शेतकरी लोक पोळ्याच्या दिवशी पुरणपोळीचा पारंपरिक मिष्टान्न भोजनाचे स्वयंपाक करतात. प्रत्येक बैलाला पोळी खायला दिली जाते. पाहुण्यांना आवर्जून बोलावले जाते. बैलपोळ्याचा सण अतिशय धडाक्यात साजरा केला जातो.

बैलपोळ्याला गावातील पाटलांचा मुख्य मान असतो. गावातील पाटीलकी असलेला व्यक्ती त्याचे बैल सुरुवातीला उभे करतो. ढोल, ताशा, बँड असे वाजंत्री वाजवत असतात.लोक लेझीम खेळत असतात. बैलांची मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत लोकही नाचत असतात. गावातील मुख्य मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते. त्या ठिकाणी पुन्हा एकदा बैलांची पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर वाजंत्री लोकांना शेतकरी बक्षिसे देतात.

यानंतर शेतकरी आपल्या बैलांना सन्मानपूर्वक घरी आणतो व त्याठिकाणी शेतकऱ्याची पत्नी पुन्हा एकदा बैलांना ओवाळून पुरणपोळी अतिशय प्रेमाने खायला देते. बैलही अतिशय आनंदामध्ये ती पुरणपोळी खातो. सर्वांना खूप आनंद होतो. घरातील मुले तर अतिशय आनंदाने मोहरून गेलेली असतात.

या दिवशी कुंभाराकडून आणलेले मातीचे सुंदर असे बहीण सुद्धा पुजण्याची प्रथा आपल्याकडे आहे. मातीचे छोटे छोटे बैल लहान मुलांना खुप आवडतात. शेतकऱ्यांची मुले या बैलाबरोबर खूप दिवस खेळतात काही शेतकरी आपल्या घरामध्ये मातीचे सुंदर बैल सुद्धा ठेवत असतात.

बैलपोळ्याचा सण बैला सारख्या कष्ट देणाऱ्या प्राण्याच्या कष्टाचा ऋणानुबंध म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीमध्ये बैलपोळा या सणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. केवळ शेतकरीच नव्हे तर इतरही लोक बैलपोळ्याच्या सणांमध्ये अतिशय आवडीने सहभागी होतात. बैल पोळा सणाचा आनंद घेतात.

ग्रामीण भागामध्ये सणाचा आनंद हा शहरातल्या आनंदापेक्षा अधिक असतो. भारतीयांचे सण हे ग्रामीण भागामध्ये असलेल्या वातावरणाला साजेसे असतात. बैलपोळा हा सण या गोष्टीला हा अपवाद नाही.

भारतीय लोक गोपुजक आहे. बैल हा गोधनाचाच एक भाग आहे. दिवाळीच्या वेळी गोवत्साची पूजा केली जाते. गाईची पूजा लक्ष्मी म्हणून केली जाते. गाय खूप पवित्र मानली जाते. गाईचा वंश म्हणजेच गोवंश. त्याचा रक्षक बैल शेतकऱ्याचा अतिशय जवळचा आणि खरा मित्र समजला जातो. वर्षभर शेतकरी त्या बैलाबरोबर राहत असतो.बैलाचे पालन-पोषण करत असतो.त्याच्यावर जीवापाड प्रेम करतोय आणि या प्रेमाचा कळस बैलपोळ्याच्या दिवशी होत असतो.

बैलपोळा सण हा खरेतर एक प्रकारची प्रेमाची देवघेव आहे.बैल शेतामध्ये कष्ट करत असतो.शेतकरी त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो. हे शेतकऱ्याला समजते पण बैलाचे प्रेम हे बैल न बोलता आपल्या कृतीने दाखवत असतो. शेतकरी बैलाचे पालनपोषण करतो. या बदल्यात तो बैलाचे कष्ट घेत असतो.

असे असले तरी बैल या प्राण्यावर शेतकऱ्याचे खूपच प्रेम असते. श्रावण किंवा भाद्रपद महिन्याच्या शेवटी शेतात आलेली पिके पाहून शेतकऱ्यांना खूप आनंद होतो. शेतातील ही पिके येण्यामध्ये बैलांचा असलेला वाटा शेतकऱ्याला आठवतो आणि बैलांच्या ऋणात राहण्यासाठी तो बैलांची पूजा करतो. या सणाला पोळा असे म्हटले जाते.

भारताची ग्रामीण संस्कृती अतिशय समृद्ध आहे. सर्वधर्मीय शेतकऱ्यांनी या संस्कृतीत अतिशय गौरवशाली परंपरा निर्माण केलेल्या आहेत.या परंपरा आवर्जून पाळल्या जातात. यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नसते. बैलासारखा प्राणी हा देव नाही आणि शेतकरी बैलाला देव म्हणूनही पूजत नाही. पण ते मित्रत्वाच्या नात्याने आपले प्रेम व्यक्त करत असतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काय करावे शेतकऱ्याला कोणीही सांगू नये. त्याने त्याचे ठरवावे.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत आपल्या देशाने बंद केलेली आहे. खरेतर यामध्ये न्यायालयाच्या हेतू चांगला आहे. असे असले तरी शेतकरी राजाला बैलगाडा शर्यतीत एक वेगळा आनंद मिळत असे. परंतु बैलगाडा शर्यती बंद झाल्या. शेतकरी हिरमुसला. असे असूनही बैल पोळा या सणाने त्याच्या डोळ्याचे अश्रू पुसण्याचे काम केले असे म्हणावे वाटते.

बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने आणि धुमधडाक्यात साजरा होत असला तरी आज बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. शेतकऱ्यांची शेती अधिकाधिक व्यापारी पद्धतीने पिके घेण्यात येईल झुकू लागली आहे. कारण जगाच्या स्पर्धेत टिकताना आर्थिक समृद्धी खूप महत्त्वाची ठरते.हे बळीराजाला समजले आहे.

शेतामध्ये प्रत्येक गोष्टीला बैल उपयोगी पडायचा. आता मात्र बैलाची जागा आहे. निर्जीव यंत्रे घेऊ लागली आहेत. प्रत्येक ठिकाणी निर्जीव यंत्र शेतकऱ्याची मदत करत आहे. पण एका निर्जीव यंत्रावर शेतकरी प्रेम करू शकतो का? त्या यंत्राचाही एखादा बैलपोळा सारखा सण साजरा करू शकतो का? याचे उत्तर नाही असेच आहे.

बैलाची जागा यंत्राने घेतली. बैल पाळणे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना परवडत नाही. वर्षभर वैरणीचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतो. परंतु एक जोड व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनासाठी पाळल्या जातात. तसे दोन बैलही पाळावेत असे मला वाटते. आजच्या डिजिटल युगामध्ये शेतकरी जर यंत्राच्या अधिक आहारी गेला तर तो त्याचा आनंद गमावून बसेल यात शंकाच नाही.

शेतकरी आत्महत्या कारणे निबंध Essay on causes of farmers suiciding

Contiue Reading >>