योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद Awesome essay on swami Vivekananda in Marathi

योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद Awesome essay on swami Vivekananda in Marathi

योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद Awesome essay on swami Vivekananda in Marathi

संपूर्ण भारताला आपल्या आध्यात्मिक वारशाची जाणीव करून देणारा आणि प्रगत जगाला भारताच्या प्राचीन, गौरवशाली धार्मिक, आध्यात्मिक परंपरेचा विचार किती श्रेष्ठ आहे याची जाणीव करून देणारा स्वामी विवेकानंद हा एक संन्यासी योद्धा होता.

स्वामी विवेकानंद या थोर महापुरुषांचा जन्म 12 जानेवारी 1863 या दिवशी दत्त कारण यामध्ये झाला. विवेकानंदांचे बालपणीचे नाव नरेंद्र असे होते. विवेकानंदांना प्रखर आणि कुशाग्र बुद्धी लाभली होती. विवेकानंदांना अभ्यास, व्यायाम, खेळ, हिंदी काव्य,संगीत,पाकशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये रुची होती.

प्रयत्नांती परमेश्वर

नरेंद्रच्या आईचे नाव भुवनेश्वरीदेवी असे होते. भुवनेश्वरी देवी अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. भगवान शंकराची त्या सतत पूजाअर्चा करत. त्यांनी नरेंद्रावर लहानपणापासून धर्म आणि अध्यात्माचे संस्कार केले. नरेंद्रला अभ्यासामध्ये खूप एकाग्रता होती. अभ्यासामध्ये रस होता.

नरेंद्रचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार होते. नरेंद्रला मजबूत शरीरयष्टी लाभली होती. आपले अतिशय बोलके डोळे नरेंद्राच्या व्यक्तिमत्त्वात मोठीच भर टाकत होते. नरेंद्रचा चेहरा हा एक अद्वितीय तेज असणारा भासत असे. नरेंद्राच्या व्यक्तिमत्वाच्या बोलल्याने कोणीही त्याच्याकडे आकर्षित होत असे.

नरेंद्रचे वडील व्यवसायाने वकील होते. त्यांचे नाव विश्वनाथबाबू ते अज्ञेयवादी विचाराचे होते. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने भरपूर संपत्ती मिळवली. नरेंद्रच्या शिक्षणाकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले होते. नरेंद्र सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये पारंगत झाला पाहिजे असे त्यांना वाटे त्यांनी तशी तजवीज सुद्धा केली होती.

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध

नरेंद्रला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्याने काही दिवस संगीताचे शिक्षण घरीच घेतले. नरेंद्रच्या आई वडिलांनी नरेंद्रावर जे संस्कार केले होते, त्यामुळे नरेंद्र काव्यशास्त्रविनोद यामध्ये अत्यंत आवड असलेला व्यक्ती बनला. नरेंद्रचे शिक्षण बीए पर्यंत झाले होते.

नरेंद्र एखाद्या पदवी पेक्षा ज्ञानाची आणि वर्षी कृष्ण होती. औपचारिक शिक्षणापेक्षा खरोखरचे ज्ञान संपादन करणे त्याला आवडे. त्याने विद्यार्थिदशेत असतानाच गीता,उपनिषदे, धम्मपद यांचे वारंवार वाचन केले होते. वेदांच्या काही भागांचा त्याने इंग्रजीत अनुवादित केला होता. महाकवी कालिदास, भवभूती, बायरन यांचे काव्य त्यांने अभ्यासले होते. बुद्ध,शंकराचार्य, हेगेल, मिल, स्पेन्सर यांचे ग्रंथ शोधक बुद्धीने नरेंद्रने वाचले होते.

नरेंद्रला ज्ञानाची आवड होती अर्थात ते ज्ञान केवळ वैज्ञानिक नसून तर अध्यात्मिक ज्ञान होते. या जगात परमेश्वर असेल का आहे? असला तर तो कसा असेल? हे कोणी मला सहज समजावून सांगेल काय? या प्रश्नांच्या उत्तरांचा नरेंद्रला ध्यास लागला होता. अनेकांना तो या प्रश्नाचे उत्तर विचारत असे. परंतु त्याचे समाधान करणारा कोणीही अजूनही नरेंद्राला भेटला नव्हता.

नरेंद्रच्या जिज्ञासेतूनच नरेंद्र आणि राम कृष्ण परमहंस यांची भेट झाली. नरेंद्रने रामकृष्णांना परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी प्रश्न विचारला की,” या जगात परमेश्वर आहे काय?” रामकृष्णांनी सहज उत्तर दिले,” होय, या जगात परमेश्वर आहे. त्याची भेट मला झाली आहे. पण त्याच्या भेटीत तुझ्या भेटीपेक्षा जास्त उत्कटता असते.”

रामकृष्णांच्या उद्देशातून हळूहळू नरेंद्र ईश्वरवादी बनत गेला. त्यातूनच खऱ्या ज्ञानाची प्रचिती नरेंद्र ला आली. अध्यात्माचा खरा अर्थ रामकृष्णांनी नरेंद्रला वास्तव अनुभव आणि समाधीद्वारे प्राप्त करून दिला. नरेंद्र राम कृष्ण परमहंस यांचा पट्टशिष्य बनला. अत्यंत नम्रपणे रामकृष्णांचे सेवा आपल्या गुरुबंधूबरोबर केली.

नरेंद्रला आपल्या जीवनाचा उद्देश जगातील दैन्य आणि दारिद्र्य पाहिल्यावर समजेल असे राम कृष्ण परमहंस यांनी सांगून ठेवले होते.

रामकृष्ण हे कालीमातेचे उपासक होते. तरीसुद्धा सर्व धर्मातील ज्ञान हे त्यांनी त्या धर्माची दीक्षा घेऊन अनुभवले होते.सर्वच धर्म हे सत्य आहेत. सर्वच धर्म एकाच ईश्वरी तत्त्वाची उपासना करतात. सर्वच धर्म एकाच सत्याचा अनुभव देतात. याचा रोकडा अनुभव रामकृष्णांनी घेतला होता. रामकृष्णांनी आपल्या आध्यात्मिक अनुभवांचे अवडंबर माजवले नाही. तर आपल्या शिष्यांना अनुभव घेण्यासाठी मार्गदर्शनही केले होते.

सन 1886 मध्ये रामकृष्ण अनंतात विलीन झाले. रामकृष्णांनी आपल्या शिष्य परिवाराचे नेतृत्व नरेंद्रकडे सोपवले. नरेंद्र संन्याशी झाला आणि आपले नाव बदलले नरेंद्रचा विविदिशानंद झाला. भारत भ्रमण करता करता विविदिशानंद हे नाव बदलून त्यांनी विवेकानंद हे नाव धारण केले. रामकृष्णांच्या निर्वाणानंतर विवेकानंदांनी आपल्या गुरु बंधूंचे शिक्षण पूर्ण केले.

बेलूर मठ येथून विवेकानंदांनी बाहेर पडायचे ठरवले. संपूर्ण भारताची परिक्रमा करावी या उद्देशाने ते भारतभ्रमणाठी निघाले. संपूर्ण भारत देश फिरत फिरत ते कन्याकुमारीला पोहोचले. त्या ठिकाणच्या एका बेटावर जाऊन ध्यानस्थ बसले. त्या ठिकाणी त्यांना आपल्या जीवनाचा उद्देश आणि आयुष्याची दिशा समजली.

भारत भ्रमण करता करता विवेकानंदांना अनेक शिष्य मिळत गेले. या सर्व शिष्यांनी विवेकानंदांचे तेज आणि अलौकिक ज्ञान यातून आपल्या अध्यात्मिक प्रेरणेला दिशा दिली. जीवन सार्थकी लावले.

1893 यावर्षी अमेरिकेमध्ये सर्वधर्मीय परिषद होणार होती. या सर्वधर्मीय परिषदेला विवेकानंदांनी जावे असा त्यांच्या शिष्य वर्गाने त्यांना आग्रह केला. त्यांच्या शिष्यांनी त्यासाठी धन गोळा केले. राजस्थानातील खेत्री संस्थांचे संस्थानिक यांनी सुद्धा विवेकानंदांना सर्वधर्मीय परिषदेत जाण्याविषयी सांगितले. त्यानुसार मुंबईहून स्वामी विवेकानंद अमेरिकेकडे रवाना झाले.

अमेरिकेत गेल्यानंतर मात्र स्वामीजींची खरी परीक्षा सुरू झाली. या नवख्या देशांमध्ये त्यांच्या कोणीही ओळखीचे नव्हते. त्यांच्याकडील पैसे संपत आले होते.सर्वधर्मीय परिषदेची तारीख अजून खूप दूर होती. शिकागो सारख्या शहरांमध्ये त्यांना राहणे परवडणारे नव्हते. त्यामुळे ते बोस्टनसारख्या कमी खर्चिक शहरात गेले. त्या ठिकाणी राहिले.

अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत स्वामी विवेकानंद सर्वधर्मीय परिषदेमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी सर्व धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित झाले होते. आपल्या धर्माची महती सर्व जण सांगत होते. स्वामीजींचे भाषण हे अगदी शेवटी शेवटी झाले. स्वामीजींना मुळातच फार थोडा वेळ देण्यात आला होता. एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांसमोर बोलण्याचा त्यांना यापूर्वी प्रसंग आला नव्हता. त्यामुळे ते आपले भाषण पुढे ढकलत होते.

अखेर स्वामीजी भाषणासाठी उभे राहिले. मनामध्ये आपल्या गुरुदेवांचे त्यांनी स्मरण केले.
“अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो !” अशी वाक्याची सुरुवात होतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

स्वामी विवेकानंद या अचानक झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाने थोडे बिचकले. परंतु हे आपल्या विचारांना केले गेलेले अभिवादन आहे. हे लक्षात येताच त्यांनी आपले भाषण सुरू केले. आपल्या भाषणातून “केवळ माझाच धर्म श्रेष्ठ असे नसून सर्वच धर्म श्रेष्ठ आहेत आणि एकाच परमेश्वरी सत्याकडे नेणारे ते प्रवाह आहेत.” हे सांगितले त्यांचे विचार उपस्थित श्रोत्यांना अतिशय आवडले.भाषणाच्या शेवटी श्रोत्यांनी उभे राहून स्वामीजींना टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये मानवंदना दिली.

यानंतरही सर्वधर्मीय परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांची अनेक भाषणे झाली. यामधून स्वामी विवेकानंदांनी भारत देशाचा अध्यात्मिक वारसा अमेरिकन श्रोत्यांसमोर अतिशय प्रभावीपणे मांडला. त्यामुळे भारत हा अध्यात्मिक दृष्ट्या प्रगत आहे. भारताकडून आपण शिकले पाहिजे ही जाणीव अमेरिकेतील लोकांना यथार्थपणे झाली.

सर्वधर्मीय परिषदेतील आपल्या यशस्वी कार्यानंतर अमेरिकेत अनेक ठिकाणी स्वामी विवेकानंद यांची व्याख्याने आयोजित केली गेली. त्यांच्या शिष्यांनी स्वामीजींना अमेरिकेत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व काही गोष्टी दिल्या. त्या ठिकाणी वेदान्त सोसायटी स्थापन केली. अनेक शिष्य निर्माण झाले. काही दिवस विवेकानंद इंग्लंडमध्येही जाऊन आले. तिथे काही व्याख्याने झाली. युरोपमध्येही अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने झाली. जागतिक दर्जाचे विचारवंत स्वामीजींच्या व्याख्यानांना उपस्थिती लावत.

स्वामी विवेकानंद पुन्हा आपल्या भारतमातेला भेटण्यास आतुर झाले होते. ते पुन्हा भारतात परतले.भारतात आल्यावर त्यांचे फार मोठे असे भव्यदिव्य स्वागत झाले. स्वामीजींनी भारतीयांना आपल्या अमेरिकेतील अनुभवांविषयी सांगितले. कोलकत्याला गेल्यानंतर आपल्या आईची भेट घेतली.

बेलुर मठामध्ये जाऊन रामकृष्ण परमहंस यांच्या सर्व शिष्यांना एकत्र केले आणि रामकृष्ण मिशन नावाची संस्था स्थापन केली.रामकृष्ण मिशन ही संस्था आजही जगभर रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांनी दिलेल्या विचारांचा वारसा आणि कार्याचा वसा चालवत आहे.

दिनांक 4 जुलै 1902 या दिवशी स्वामीजींनी आपले चंदनासारखे झालेले शरीर सोडून आपल्या इच्छेने परमेश्वराच्या स्वाधीन केले.
जाता जाता,” उठा ! जागे व्हा! आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.” हा महान संदेश विवेकानंदांनी आपल्या शिष्यांना आणि देशी बांधवांना दिला.

स्वामी विवेकानंद शरीर आणि आपल्यामध्ये अस्तित्वात नसले. तरी त्यांचे विचार तमाम भारतीयांच्या नसानसामध्ये मिसळलेले आहेत. स्वामी विवेकानंदाचे विचार भारत आणि जगाला तारणारे विचार आहे.स्वामीजींनी भारताचा प्राचीन धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा सर्व भारतीयांसमोर पुन्हा नव्याने, नव्या युगाच्या भाषेमध्ये मांडला आहे. त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ आपण जाणून घेतला पाहिजे.

आपल्या जीवनामध्ये स्वामीजींचे अमर , शक्तिशाली विचार रुजवले पाहिजेत. हीच स्वामीजींना खऱ्या अर्थाने भारतीयांकडून मिळालेली मानवंदना ठरेल.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment