माझे पहिले(1ले) भाषण निबंध मराठी Awesome essay on my first speech in Marathi

माझे पहिले भाषण निबंध मराठी Awesome essay on my first speech in Marathi

Awesome-essay-on-my-first-speech-in-Marathi

आमच्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते .या वक्तृत्व स्पर्धा खरेतर दरवर्षी होतात.अनेक मुले-मुली यामध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवतात.त्यांचा तो बक्षीस समारंभ पाहिला की मलाही वाटे आपणही या भाषण स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळवावे. त्यामुळे मी ठरवले की या वर्षी भाषण स्पर्धेत भाग घ्यायचाच. असा मी चांगला निश्चय केलेला होता.

भाषण स्पर्धेला महिनाभर आधीच भाषण स्पर्धेचे विषय जाहीर झालेले होते. मला स्वतःला काही भाषण छान लिहिता येत नव्हते. मग मी माझ्या ताईची मदत घेतली. तिने मला “माझा आवडता नेता” यावर सुंदरसे भाषण लिहून दिले. भाषण कसे करायचे मला सांगितले होते.मी ते भाषण पाठ करू लागलो. ताई माझा दररोज सराव घेत असे. मी स्वतःही आरशासमोर उभा राहून प्रश्नाचा सराव करीत होतो.

भाषण स्पर्धा जशी जवळ येत होती तसतसा मी सराव वाढवला होता. भाषणाची जोरदार तयारी सुरू केली होती. भाषणामध्ये कुठे आवाज वाढवायचा कुठे कमी करायचा याचा सराव ताईने घेतला होता. कवितेच्या ओळी आणि महापुरुषांची वाक्ये यामध्ये कशी म्हणायची मी शिकलो होतो.

अखेर भाषण स्पर्धेचा तो दिवस उजाडला. सकाळपासूनच माझ्या मनात धाकधूक सुरू होती. भाषणाचा एकदा ताईने सराव घेतला. शाळेमध्ये दुपारी बारा वाजता भाषणाची स्पर्धा होणार होती.सर्व मुले एका हॉलमध्ये बसवण्यात आली होती. सुरूवातीच्या औपचारिक बाबी झाल्यानंतर भाषण स्पर्धेला सुरुवात झाली. एकेका स्पर्धकाचे नाव घेतले जात होते. तो स्पर्धक येऊन भाषण करत होता.

माझे नाव केव्हाही ध्वनिक्षेपकावरून पुकारले जाणार होते. मनामध्ये भीती वाटत होती. मध्येच अंगावर काटा उभा राहत होता. पण आता मी स्पर्धेत भाग घेतल्यामुळे मला त्याकडे दुर्लक्ष करणे भाग होते. माझ्या मनात भाषण कसे होईल याचा विचार चालू होता. इतक्यात अचानक माझे नाव जाहीर झाली. ते वातावरण पाहून मला खरेतर भाषण करावे वाटत नव्हते. माझी जोरदार घाबरगुंडी उडाली होती.

पण आता इलाज नव्हता. मी तसाच उठलो. व्यासपीठाकडे गेलो.ध्वनिक्षेपकाजवळ उभा राहिलो. माझे सर्वांग थरथरू लागले. समोर पाहिले तर शाळेतील मुले मुली आपल्याकडे पाहून हसतात की काय टिंगल करतात की काय असे वाटू लागले. मुलांचा गलका काही चालू होता.

मी भाषणाला सुरुवात केली. अध्यक्ष महोदय….वगैरे. अशी सुरुवात करून भाषण म्हणू लागलो. पाय लटपटत होते. भाषण पाठ केलेले होते. तरीसुद्धा पुढचे भाषण विसरते की काय असे क्षणोक्षणी वाटत होते. तरीही मी माझे भाषण कसेबसे पुढे रेटत होतो.

सगळे सभागृह गोल गोल फिरत आहे की काय असा मला मध्येच भास होत होता. जिथे आवाज वाढायला नको तिथे वाढत होता. जिथे कमी करायला नको तिथे तो कमी होत होता. कवितेच्या ओळी कशाबशा मी म्हणत होतो. कधी कधी माझी बोबडी ही वळत होती. मध्येच एकदा मी भाषण विसरलो. एकच शब्द पुन्हा पुन्हा म्हणू लागलो. काही मुले हसली.

माझ्या पाठीमागे जवळच मुख्याध्यापक वर्गशिक्षक बसले होते. ते मला मध्येच एवढे बोलून… एवढे बोलून असे खुणावतहोते. हळू आवाजात सांगत होते. परंतु अचानक पुढचे भाषण आठवले आणि मी परत सुरू केले. कसेबसे मी माझे भाषण आटोपले आणि जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून खाली बसायला पटकन पळतच गेलो.

काही मुले पुन्हा एकदा माझ्याकडे बघून फिदीफिदी हसली. त्यांना माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगाची काय जाणीव असणार. मला सगळ्यांचा फार राग आला होता. माझ्या भाषणाला हसतात काय? बघूनच घेतो असे मी मनात म्हणत होतो. पण नाईलाज होता.

आयुष्यातील माझे हे पहिलेच भाषण होते. भाषण माझ्या मते पार पडले होते. इतर मुले पाहून मला वाटले की ही मुले कशी भाषण करीत असतात. न घाबरता आणि बिनधास्तपणे कशी बोलत असतात. त्यांचा सभाधीटपणा मला कसा आला नाही याचा मी विचार करीत राहिलो. इतर मुलांच्या भाषणाकडे माझे लक्ष लागेना. इतक्यात माझा मित्र गणू म्हणाला, अरे तुझे भाषण छान झाले आहे. पण सारखे सारखे भाषण केले तर तुझी घाबरगुंडी उडणार नाही. गणूने मला धीर दिला. फार बरे वाटले.

भाषण स्पर्धा संपली. दहा मिनिटांची सुट्टी झाली त्यानंतर आमच्या एका शिक्षकाचे भाषण झाले. मुलांनी भाषणे कशी केली आणि ती कशी करायला पाहिजेत यावर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. पुन्हा पुन्हा सराव केला की, भाषण चांगले होते हेही पटवून दिले.

असे असले तरी इथून पुढे केव्हाही भाषण करायचे नाही. आपले हसू करून घ्यायचे नाही असाच निर्धार मी करीत होतो.शेवटी मुख्याध्यापकांना भाषण करायचे होते.त्यांनी भाषणाचे क्रमांक जाहीर करायला सुरुवात केली. मला माझ्या भाषणाचा कोणताही क्रमांक येणार नाही अशीच खात्री होती. परंतु माझेच नाव सर्वात आधी तिसरा क्रमांक म्हणून पुकारले गेले. खरे तर माझे भाषण चांगली झाले नव्हते. असे मला वाटत होते. परंतु तिसऱ्या क्रमांकाचा मला लाभ झाला. बक्षीस घेण्यासाठी मी व्यासपीठाकडे गेलो आता माझी भीती संपली होती.

तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस घेतले. फोटो काढले गेले. मला खूप आनंद झाला.माझी ताई सुद्धा याच शाळेत होती. तिलाही खूप आनंद झाला. शाळा सुटल्यानंतर मी पळतच घरी गेलो. आईला सगळे सांगितले. भाषणात तिसरा क्रमांक आल्यामुळे मला झालेला आनंद तिने पाहिला. तिलाही खूप आनंद झाला. अशा तऱ्हेने माझे भाषण मला खूप आनंद देऊन गेले. माझ्या दृष्टीने ते अविस्मरणीय ठरले.

कोणतेही पहिले भाषण हे खरेतर असेच असणार. यात शंका नाही. पण पहिले भाषण हे पहिले भाषण असते. त्यामध्ये तुमची घाबरगुंडी, भीतीने गाळण उडणे आलेच. इथून पुढे चांगला सराव करून भाषणे करायची असा मी मनोमन निर्धार केला.

आपल्यासाठी आणखी काही सुंदर निबंध पुढील लिंक ला टच करून आपण वाचू शकता.

स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे मराठी Speeches on Independence day in Marathi

महात्मा गांधीं वर मराठी निबंध व भाषणे Essays and speeches on Mahatma Gandhi in Marathi

लोकमान्य टिळक भाषण Speech on Lokmanya Tilak

बंद शाळेचे आत्मकथन निबंध

माझा आवडता ऋतू पावसाळा वर मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment