बंद शाळेचे आत्मकथन निबंध मराठी Band Shaleche Atmakathan in Marathi

बंद शाळेचे आत्मकथन  निबंध Band Shaleche Atmakathan in Marathi 

Band-Shaleche-Atmakathan

टण्… टण्… टण्…. असे घंटेचे टोल कानावर पडताच….शाळेच्या मैदानावर,व्हरांड्यात खेळत असणाऱ्या मुलांचे घोळके धावत परिपाठासाठी गोळा होत.अन् परिपाठाने हवाहवासा माझा दिनक्रम सुरू होत असे.हो सुरू होत असे….असे मी म्हणत आहे. कारण आता ते दिवस जाऊन कितीतरी दिवस,आठवडे आणि महिने झाले.

आता मी एकटीच असते;  अगदी एकटीच.
हो आणि शिक्षक येतात शाळेत; पण त्यांच्या चेहर्‍यावरील दुःख पाहवत नाही. आणि पूर्वीचा तो घंटानाद,मुलांची धावपळ, परिपाठ, उच्च स्वरातील राष्ट्रगीत आणि मधूर आवाजातील प्रार्थनेचे सूर इतिहासजमा झाले आहेत.इथे एक शाळा होती हा इतिहास होत चाललाय. त्या इतिहास विषयालाही या घटनेची नोंद करताना मान खाली घालावी लागेल की काय असे मला वाटते.

किती छान दिवस होते ते! शाळा एखाद्या मळ्याप्रमाणे बहरलेली असे. सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत असे. शाळेचा घंटा वाजण्याची खोटी विद्यार्थ्यांचे थवेच्या थवे शाळेकडे ओसंडून वहात येत आहेत असे वाटे. शाळेची घंटा देणारा सुद्धा एखादा विद्यार्थीच असे. जो सर्वात लवकर येऊन घड्याळाकडे नजर ठेवून घंटा वाजवी आणि त्याच्या बांधवांना या रे या, शाळेत या अशी जणू हाक देई. ती भिरभिरती फुलपाखरे माझ्याकडे आपले दप्तर पाठीवर टाकून रमत-गमत येत असत.

शिक्षकांच्या चेहर्‍यावरचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर शंभर पटीने वाढत असे. परिपाठ होऊन कधी वर्ग चालू होतात असे त्या शिक्षकांना आणि मुलांना होऊन जात असे. त्यांच्या आनंदाने माझा आनंद गगनात मावेनासा होई.

शालेय परिपाठापूर्वी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मिळून शाळेमध्ये साफसफाई करत. त्यामुळे प्रसन्न वातावरण तयार होई. आता मात्र शाळेला स्वच्छतेसाठी माणसे शोधावी लागतात. परिपाठाची घंटा होताच, माझी सर्व मुलं कशी सरळ रेषेत उभी राहून राष्ट्रगीताच्या आज्ञेची वाट पाहत. देशाच्या सीमेवर उभ्या राहणाऱ्या सैनिकाच्या अंतकरणात असणारी देशभक्ती त्यांच्या अंतकरणाची जागा घेई.

राष्ट्रगीताने मन प्रसन्न तर होईच पण त्यानंतरच्या प्रतिज्ञेने त्यांच्यावरील संस्कारांची दिशा सहज शब्दांतून प्रकट होई. प्रार्थनेचे मंजुळ आणि मधुर सूर कानावर पडताच सारी शाळा जणु ब्रम्हानंदी टाळी लागल्यागत डुलत असे. प्रार्थनेचा तो अमिट संस्कार आता कसा होत असेल? देव जाणे !!!

वर्ग भरत होते जणू फुलपाखरे आपल्या आई सारख्या गुरुजणांकडून विद्येचे मधुर अमृत चाखण्यासाठी उतावळी होत. हजेरीने सुरुवात होई. पण फक्त सुरुवातच नाही; तर आज शाळेत कोण आला नाही? का आला नाही? आजारी होता का? आई वडील कसे आहेत? अभ्यास का केला नाही? काय अडचण आली? किती तरी प्रश्न या सहज हजेरी मधून अंतःकरणाला हात घालीत असत. आणि आता काय राहिले आहे? ना प्रश्न ना उत्तर. सगळेच कसे उदास उदास होऊन गेले आहे.

भाषा विषयांचे अध्यापन चालू असे त्या वेळी होणारे कवितांचे गायन किती सुंदर असे ! मला ते ऐकताना किती आनंद होत असे. काय सांगू? पण त्या आनंदाला आता मी दुरावली आहे.सामूहिक कविता गायन ही गोष्ट संपली आहे.

मैदानावरील शारीरिक शिक्षणाचा तास कसा होत असेल? हवे तसे पळणे, उड्या मारणे हे कसे चालत असेल? खोखो, कबड्डी कोण खेळत असतील ? आट्यापाट्या, लपाछपी, चिल्ली अशा खेळांचा आता मुले कशी आस्वाद घेत असतील? छे छे मला कल्पनाच करवत नाही. किती हिरमुसली असतील माझी लेकरं !

कोरोनाच्या भयंकर साथीने ती घराच्या तुरूंगामध्ये एखाद्या कैद्यासारखी डांबून ठेवल्यागत झाली असतील. किती भयंकर गोष्ट आहे ही ! जगाच्या इतिहासात असे कधी झाले नसेल, होणार नाही.शाळेत येता येता आणि घरी जाता जाता जी मजा येत असे ती तुम्हाला नक्कीच आता मिळत नसणार. कारण शाळेत येणे आणि जाणे हे आता संपले आहे.

हो आणि मी असे ऐकले आहे कि आता काही तरी ऑनलाईन शाळा चालू झाली आहे.ती घरातच . हा काय प्रकार आहे? ही कोणत्या लाईनीत असणारी शाळा ? ती आहे किंवा नाही?ऑन आहे की स्विच आहे तेच कळत नाही. मोबाईलवर भरते म्हणे ती. जेव्हा कधी माझ्या मुलांच्या आई-वडिलांना वेळ असतो, तेव्हा ते आपला मोबाईल मुलाला देतात आणि त्यानुसार शिक्षक त्यांचे तास ठरवतात आणि शिकवतात. मुलेही शिकतात असे मी ऐकले.

मग आता ती कविता कशी म्हणत असतील? प्रश्नांची उत्तरे कशी देत असतील? प्रार्थना सामूहिक रित्या कशी म्हणत असतील? कबड्डी खो-खो कशी खेळत असतील?अरे बापरे ! असे प्रश्न पडले ; की माझा थरकाप उडतो आणि वाटते कुठून आला तो कोरोना? ज्याने माझ्या शाळेच्या सुंदर बागेचं स्मशानात रूपांतर केले आणि माझ्या मुलांना घराच्या कोंडवाड्यात बंदिस्त ठेवले आहे.

“आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा हि तसा माऊली बाळा”
होय, माझ्या बाळांनो, तुम्हाला मी आई सारखा लळा लावते. कारण का तर तुम्हालाही मी खूप खूप आवडते. शाळेसारखा आनंद कुठेही मिळत नाही. हा आनंद तुम्हाला पुन्हा केव्हा मिळेल असे मला झाले आहे. तुमच्या आनंदाने बागडण्यातच माझा आनंद लपलेला आहे. म्हणून माझी दशा आता फार वाईट झाली आहे. मी दुःखाने मनोमन अश्रू ढाळत आहे.

अतिशय दुःखद आणि निराशाजनक असे हे दिवस कधी संपतील असे मला झाले आहे. शाळा सुरू होण्याची आणि पूर्वीची ती लगबग पुन्हा केव्हा सुरू होणार याची मी रात्रंदिवस वाट पाहत आहे.

हे रुक्ष आणि कंटाळवाणे दिवस जेव्हा संपतील तेव्हाच खरा सोन्याचा दिवस उजाडेल असे मला वाटते. आणि नाहीच संपले तर मुलांनो…… काय सांगू माझे अंतःकरण भरून आले आहे… मी आता बोलू शकत नाही… तुम्ही असाल तरच मी बोलेन नाहीतर दुःखाने पिळवटून मनातल्या मनात अशीच रडत राहील, कुढत राहील….

असेच काही सुंदर निबंधांसाठी पुढील लिंकला क्लिक करा.

शेतकऱ्याचे मनोगत Essay on shetakaryache manogat in Marathi

माझी शाळा निबंध मराठी Essay on my school in marathi

माझा आवडता ऋतू पावसाळा वर मराठी निबंध Essay on Rainy Season in Marathi

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

1 thought on “बंद शाळेचे आत्मकथन निबंध मराठी Band Shaleche Atmakathan in Marathi”

  1. अतिशय मार्मिक लेखन.
    वाचकांसाठी दर्जेदार मेजवानी.
    आपला पुढील लेख, आम्हा वाचकांना लवकरात लवकर वाचावयास मिळावा.

Leave a Comment