आषाढी एकादशी पंढरपूरची यात्रा Ashadhi ekadashi Pandharpur yatra

आषाढी एकादशी पंढरपूरची यात्रा

Ashadhi ekadashi Pandharpur yatra

माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा

हा भीमसेन जोशींचा पहाडी आवाजातील भावपूर्ण अभंग ऐकला की मन भरून येते. पंढरपूरची यात्रा (Ashadhi ekadashi Pandharpur yatra )आषाढ महिन्यातील पहिला एकादशीला भरते.लाखो वारकरी आपल्या विठू माऊलीला भेटण्यासाठी पंढरपूरकडे रवाना होतात. वारकऱ्यांच्या मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली सारखे शब्द महामंत्रा प्रमाणे असतात. आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक विश्वातला गौरवपूर्ण कळसाध्याय  समजला जातो.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राच्या धार्मिक राजधानीचे परम पावन असे धर्म क्षेत्र आहे.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
भक्त पुंडलिकाच्या अपार अशा आई-वडिलांच्या भक्तीला पाहून भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाला हवा तो वर देण्यासाठी पंढरपूरला येतात. त्या ठिकाणी भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न असतो. देव म्हणतात पुंडलिका मी तुझी सेवा पाहून प्रसन्न झालो आहे आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे.तुला हवे ते माग. परंतु आई-वडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून भक्त पुंडलिक देवाला म्हणतो , मला आता वेळ नाही आणि जवळची एक वीट भिरकावून आणि म्हणतो जरा या विटेवर उभे राहा.  थोड्या वेळाने जेव्हा फक्त पुंडलिकाला वेळ भेटतो. तेव्हा कोणतेही वरदान मला नको .असे तो म्हणतो. परंतु देव त्यांनी काहीतरी मागावे असा हट्ट करतात. त्यावेळी भक्त पुंडलिक म्हणतो की देवा माझ्यासाठी तू आलास परंतु प्रत्येक सर्वसामान्य भक्ताला तुझी भेट होणे फार अवघड आहे. तेव्हा तू या ठिकाणी तुझ्या भक्तांना दर्शन मिळावे यासाठी येथेच राहा. तेव्हापासून भगवान श्रीकृष्णाचे नाव विटेवरी उभा राहिल्यामुळे विठ्ठल असे पडले आहे.कमरेवरती हात ठेवून भगवान विठ्ठल या ठिकाणी युगे अठ्ठावीस उभा आहे.
महान संत नामदेव, ज्ञानेश्वर माऊली,संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई ,संत सोपानदेव , चोखामेळा, सावता माळी, अशा त्या काळातील संतांच्या मांदियाळीने पंढरपूरची वारी सुरू केली. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचप्रमाणे गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या ठिकाणावरून लक्षावधी देशभक्त आषाढी यात्रेच्या वेळी पंढरपुराकडे आपली पावले वळवतात आणि विठू माऊलीचे दर्शनासाठी व्याकूळ होतात. विठुराया भक्तांच्या हाकेला धावणारा सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे.
कानडा राजा पंढरीचा
वेदानाही नाही कळला अंतपार याचा
वेदांत सारख्या धर्म ग्रंथांमधून परमेश्वराचे खूप वर्णन केले गेले आहे. परंतु पंढरपूरच्या या विठोबाचे वर्णन करण्यास तीही अपुरी पडतात. अठरा पुराणे, सहा दर्शने सुद्धा विठ्ठलाच्या वर्णनाने भरून गेली आहेत.परंतु ती सुद्धा या ठिकाणी कमी पडतात.असा हा परमेश्वर भगवंत विठूमाऊली प्रत्येकाला भेट द्यावी म्हणून युगे अठ्ठावीस पंढरपूरला उभा आहे. पंढरपूरला भीमाशंकरला उगम पावणारी भीमा नदी चंद्राकार वळण घेते म्हणून चंद्रभागा या नावाने प्रसिद्ध पावली आहे. लक्षावधी वारकरी पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करताना आणि पावन होतात.
“यारे यारे लहानथोर याती भलती नारी नर”
महाराष्ट्राच्या सर्वतीर्थ क्षेत्रातून छोट्या-मोठ्या दिंड्या घेऊन वारकरी अतिशय आदराने टाळ-मृदुंगाचा गजर करीत ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय विठ्ठल जय विठ्ठल आता उद्घोष करीत, पंढरपूरला घेऊन आपले जीवन सार्थकी लावतात. पंढरपूरच्या या वारीमुळे वारकरी संप्रदायाचा एक वेगळे तेजोवलय लाभले आहे. अठरापगड जातीतील सर्व माणसे या वारीमध्ये सामील होतात. वारीमध्ये सामील होणाऱ्या माणसांना कोणतीही जात उरत नाही. त्यांची एकच जात असते ती म्हणजे वारकरी होय. पंढरपूरच्या वारीने म्हणजेच वारकरी संप्रदायाच्या या योगदानाने महाराष्ट्रातील जातीभेदाला फार मोठे खिंडार पाडले. चातुर्वर्ण्य व्यवस्था धुडकावून लावली. संस्कृत सारख्या अवघड भाषेला वळण देऊन वारकरी संप्रदायातील संतांनी महाराष्ट्राच्या लावण्यवती मराठी भाषेत वांग्मय लिहिले.
आळंदी, देहू, पैठण ,त्रंबकेश्वर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून पालख्या पंढरपूरला येतात पंढरपूरला जाण्याचे त्यांचे नियोजन ठरलेले असते. गावोगावी मुक्काम असतात. मुक्कामाच्या ठिकाणी गावातील लोक वारकऱ्यांची सेवा करतात खरेतर सेवा करण्याची ही संधी या गावातील लोकांना खूप काही आनंद देऊन जाते. एका ठिकाणी वारकऱ्यांचे खेळ असतात.  धावा असतो,  कुठे रिंगण असते. दररोज संध्याकाळचे किर्तन तर ठरलेले. वारकऱ्यांसाठी सरकार  सेवा देते. पोलिसांचे संरक्षण,  आरोग्य खात्याचे पथकही असते. आपल्या भागातल्या वारकऱ्यांना विश्रांती मिळावी म्हणून गावोगावी जिथे वारीचा मुक्काम असतो अशा ठिकाणी स्थानिक लोक छानसा मंडप उभारून सोय करतात.
संत नामदेवांची अभंगगाथा, संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, अभंग गाथा, चांगदेव पासष्टी, संत एकनाथांचे एकनाथी भागवत,भावार्थ रामायण, संत तुकारामांचे अभंग गाथा आदी ग्रंथांनी महाराष्ट्राचा वारकरी परिपक्व झालेला आहे. ह्या ग्रंथांचे वाचन वारकरी करतो. दररोज हरिपाठ म्हणणे हाच त्याचा स्वाध्याय असतो. कोणतेही कठीण तप आणि जप यज्ञयाग नकोत. फक्त

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

पुण्याची गणना कोण करी

एवढे साधे सोपे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाने दिले आहे. आणि हे तत्वज्ञान वर उल्लेख केलेल्या ग्रंथांमधून सहज सोप्या पद्धतीने सांगितले आहे.
महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या अगोदरच्या काळात होऊन गेलेल्या संतांनी महाराष्ट्र भूमी सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला गौरव वाटेल अशा पद्धतीने जिवंत ठेवली.
आषाढी एकादशी आणि पंढरपूरची यात्रा यानिमित्ताने पंढरपूर क्षेत्रामध्ये फार मोठी बाजारपेठ सुद्धा फुलून येते. या बाजारपेठेमुळे त्या ठिकाणच्या व्यापारी आणि शहरवासीयांना आपली आर्थिक प्रगती साधण्यास हातभार लागतो. त्याचप्रमाणे इतर काही ठिकाणी जिथे जिथे विठ्ठलाची प्रसिद्ध मंदिरे आहेत,तिथेही विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून जातात. एकादशीच्या निमित्ताने उपवास करतात. साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ हे महाराष्ट्रभर वापरला जातो. साबुदाण्याचे बाजार वाढतात. खरेतर साबुदाणे पेक्षा फळांचा वापर,राजगिऱ्याची चिक्की यासारखे पदार्थ वापरले पाहिजेत असे वाटते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर परिसर फुलून गेलेला असतो.  या ठिकाणी अनेक धर्मशाळा आहेत. त्या धर्मशाळांमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. नामवंत हरिभक्त परायण कीर्तनकार यांचे कीर्तन आयोजित केले जाते. ही फार मोठी पर्वणी वारकरी मंडळींना साधायची असते. खरे तर प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाचे दर्शन मिळणे हे सोपे नसते.  तरीही वारकरी दर्शनासाठी वेळ देऊन दर्शन देतात. असे असले तरी बहुतांश वारकरी मंडळी प्रदक्षिणा आणि कळसाचे दर्शन यावरच समाधान मानतात.पंढरपूरला आलेला जनताजनार्दन हाच विठुराया मानून त्याचे दर्शन झाले तरी श्री विठ्ठलाचे दर्शन झाले असे मानतात.

पंढरीच्या लोका नाही अभिमान

पाया पडे जन एकमेका

असे म्हणतात.एका वेगळ्याच विनम्र भावाचे दर्शन या ठिकाणी होते. वारकरी लोक समोरच्या प्रत्येक वेळी व्यक्तीला माऊली असे संबोधतात. ही माऊली कोण?

ज्ञानराज माझी योग्यांची माऊली

येणे निगमवल्ली दाविली जगा

अर्थात संत ज्ञानेश्वर माऊली हे प्रत्येक वारकऱ्यांमध्ये आहे. अशी भगवत भक्तांची भावना असते. या भावनेने ते एकमेकांना वारकरी म्हणतात. असे हे विठ्ठलमय झालेले पंढरपूर पाहणे हा वेगळाच सोहळा असतो.
आळंदी पंढरपुर चे पालखीबरोबर वारी करणे हे प्रत्येक विठ्ठल भक्ताचे स्वप्न असते. काही लोकांना ते सहज शक्य असते. तर काही लोक आवर्जून वेळ काढून वारी करतात. आनंद लुटतात.ही आनंद वारी प्रत्येक भाविक भक्ताला मिळावी अशी विठुरायाच्या चरणी माझी प्रार्थना आहे.

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment