शाळेतील घंटेचे आत्मकथन निबंध मराठी Amazing essay on school bell in Marathi

शाळेतील घंटेचे आत्मकथन निबंध मराठी Amazing essay on school bell in Marathi

 Amazing-essay-on-school-bell-in-Marathi

टण… टण… टण ….माझे टोल माझ्या कानावर पडतात. शाळेच्या संपूर्ण परिसरात घुमतात. क्रीडांगणावर, व्हरांड्यात खेळणाऱ्या,आरडाओरडा करणाऱ्या मुलांचे घोळके धावत परीपाठासाठी व्हरांड्यामध्ये जमा होतात आणि शाळेचा दिनक्रम सुरू होतो. वर्षांमागून वर्षे जातात. शाळांच्या इमारती बदलतात. खेड्यातील कौलारू शाळा सिमेंट कॉंक्रीटमध्ये बदलते. शहरातल्या शाळांच्या टोलेजंग इमारती नवे रूप धारण करतात. परंतु मी आणि माझ्या भगिनी तशाच शाळेच्या दारात निरंतर झुलताना दिसतो.
होय, मी शाळेच्या घंटे बाबतच बोलत आहे.

माझी कुळकथा ऐकायची असेल तर ऐका. तुम्हाला आठवेल देवळातील घंटा आणि गाईच्या गळ्यातील घंटी ! गाईच्या गळ्यातील घंटीची किन-किन माळावर जेव्हा गोरे मुक्तपणे चरत असतात, गुराखी कुठेतरी बसलेला असतो. तेव्हा तिचा आवाज एक सुश्राव्य संगीत निर्माण करतो.

देवघरातील नाजुकशी घंटा, देवपूजा करताना तिचा सर्वांना आवाज येतो. देऊळ आणि चर्चमधील घंटांचा घनगंभीर आवाज सर्व परिसरामध्ये घुमतो. त्यावेळेला पावित्र्याचे एकच गांभीर्य संपूर्ण परिसरात निनादत असते.

ज्यांनी या विविध प्रकारच्या घंटांचा शोध लावला त्याची बुद्धी काही वेगळेच असली पाहिजे. ज्याला शाळेसाठी घंटा वापरण्याची कल्पना सुचली त्याच्या प्रतिभेचा वेगळाच आविष्कार त्याने घडवून आणला असे म्हणावे लागेल. त्याने जणू शाळेमध्ये आमची कायमचीच स्थापना करून टाकली.

हेच पहा ना, शाळेच्या ऑफिसमध्ये माझ्यासाठी एक नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करून ठेवलेले आहे. माझ्या तालावरती शाळेतील शिपाई संपूर्ण शाळेला हा एक प्रकारे नाचत असतो. शाळेतील दिवसभरात सर्वच घटनांची माझ्यापासून सुरुवात होत असते. मधल्या सुट्टीच्या मध्यंतरात देखील माझ्या आवाजाने सगळ्यांचे विश्रांती संपत असते. शाळा सुटतानाही एक प्रकारची भैरवी मीच आळवत असते.

माझ्या आवाजावरच शाळेतील प्रत्येक तास सुरू होतो.शाळेतील प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थी यांचे माझ्याकडे लक्ष असते. मात्र एखादा भाविक भक्त मंदिरामधील घंटा वाजवतो. त्याप्रमाणे शाळेचा शिपाई मामा हे काम शाळेत करत असतो. माझ्यामुळे शाळेचे नियोजन व्यवस्थित चालत असते. शाळेला शिस्त येते.

शाळेतील शिक्षकांच्या आवाजाबरोबर माझा आवाज विद्यार्थीदशेत सर्व मुले ऐकत असतात. परंतु त्यांना माझ्या निर्मितीची कथा ठावूक नसेल. धातूच्या तप्त उकळत्या रसामधून भट्टीमध्ये माझा जन्म होतो. मग मला खूप ओतून आकार दिला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे आकार देऊन, गरजेनुसार त्यांची निर्मिती केली जाते आणि परंपरेनुसार शाळा, मंदिर,चर्च अशा ठिकाणी माझे जाणे होते.

कधी कधी एखादा निरस आणि कंटाळवाणा तास चालू असतो. अशावेळी वर्गातील विद्यार्थ्यांना माझा आवाज कधी कानी पडतोय आणि हा तास केव्हाचा संपतोय असे झालेले असते. दुपारच्या वेळी पोटात कावळे ओरडत असतात. तेव्हाही मुले माझी वाट पाहत असतात. शिक्षक घंटा वाजल्यावर केव्हा वर्गातून बाहेर पडतात आणि आम्ही डबा केव्हा खातो याचा विचार ते करत असतात. हे मनोमन मलाही समजते.

असे असले तरी एखादा शारीरिक शिक्षणाचा म्हणजेच खेळाचा तास सुरू असला,वर्गात अंताक्षरीचा खेळ रंगात आला की हा तास संपूच नये. त्यासाठी घंटेचा आवाज त्या वेळी मुलांना नकोसाही होत असतो. खरे तर मलाही असा रसभंग करणे आवडत नाही.पण काय करणार? मी शाळेच्या वेळापत्रकाशी बांधील आहे. शेवटी तुम्हाला सगळ्या गोष्टी वेळेवर पूर्ण करण्याची शिस्त लावावी लागणार. तुमचे जीवन यातूनच सुंदर होणार असते.

परीक्षेच्या काळात मात्र माझे महत्व वेगळेच असते. दिलेल्या तीन तासात पेपर लिहिण्यात विद्यार्थी गर्क असतात. एक क्षणही वाया न घालवता आपले लक्ष पेपर पूर्ण करण्यात ते गुंतलेले असतात. त्यांचे सारखे लक्ष घड्याळातील काट्याकडे आणि घंटेच्या टोलाकडे असते. शेवटची दहा मिनिटे म्हणजे आवराआवरीचा काळ असतो. मुलांची खूप धांदल उडते. मलाही वाटते की नको वाजायला घंटा. परंतु माझा नाईलाज असतो.

परिक्षा संपताच मे महिन्याची सुट्टी सुरू होते. आता शिपाईमामा मला कुठेतरी एखाद्या पेटीत ठेवून देतो. महिना-दीड महिना खूप शांततेत जातो. ही शांती मला खायला उठते. मला अजिबात करमत नाही. ती निर्जीव शांतता जीवघेणी असते. मला वाटते की संपू दे लवकर एकदाची सुट्टी. खरेतर मुलांना वाटत नसेल सुट्टी संपावी पण मला मात्र इकडे करमत नाही.

जून महिना सुरू होतो. आणि पुन्हा शाळेचे वेळापत्रक नव्याने सुरू होते. शाळेत योजना आखल्या जातात. विद्यार्थी नवे आणि ताजेतवाने होऊन येतात. मला त्या वेळचे वातावरण खूप आवडते. सर्वांच्या चेहऱ्यावरचे ते आनंदी भाव मी मनात साठवून ठेवते आणि पुन्हा माझे कार्य वेगाने सुरू होते. शाळेचा परिसर मुलांच्या आवाजाने आणि माझ्या टण टण टण टोलाने घुमायला लागतो.

आपल्यासाठी आणखी काही निबंध

शेतकऱ्याचे मनोगत

बंद शाळेचे आत्मकथन निबंध मराठी

नागपंचमी हा सण का साजरा करतात?

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment