27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन 27 February Marathi Bhasha Gaurav Din

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन 27 February Marathi Bhasha Gaurav Din

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन(27 February Marathi Bhasha Gaurav Din) दरवर्षी २७ फेब्रुवारी या दिवशी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा.शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा”

असे जाणीवपूर्वक, स्वाभिमानपूर्वक, गौरवपूर्ण  उद्‍गार काढणाऱ्या कुसुमाग्रजांना प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा.

महान कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिन व्यक्तीने नावांनी साजरा होणारा भाषा दिन तमाम मराठी भाषिक लोक साजरा करत असतात.

मराठी भाषेचा हा गौरव दिन शासकीय पातळीवर आणि विविध संस्थांमध्ये त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी अतिशय गौरवपूर्ण रीतीने साजरा केला जातो. विविध प्रकारचे उपक्रम याप्रसंगी आयोजित केले जातात. विविध प्रकारच्या साहित्यप्रकारांच्या स्पर्धासुद्धा यानिमित्ताने होतात. याशिवाय साहित्यकार पुरस्कार सुद्धा दिले जातात.

मराठी भाषेवर  इंग्रजी, हिंदी, अरबी, फारसी, पोर्तुगीज अशा भाषांनी अनेक वेळा मोठे आक्रमण केले. परंतु काळाच्या ओघात या भाषांतील शब्दसंपदा मराठी भाषेने आत्मसात करून आपले वैविध्यपूर्ण रूप टिकवून ठेवले आहे. काळाच्या मोठ्या प्रवासात मराठी भाषा अनेक स्थित्यंतरे बघत आजचे आधुनिक रूप घेऊन ताठ मानेने उभी आहे.

मराठी भाषेला जवळजवळ अडीच हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे हे अनेक संशोधकांनी सिद्ध केले आहे. मराठी भाषा एक प्राचीन परंपरा सांगणारी समृद्ध आणि अभिजात भाषा आहे.

14 सप्टेंबर हिंदी भाषा दिवस

कविवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर हे एक महान कवी होते.महाकवीची प्रतिभा लाभलेले विष्णू वामन शिरवाडकर ज्ञानपीठ पारितोषिक पुरस्कार प्राप्त दुसरे  मराठी भाषिक साहित्यिक ठरले. मराठी भाषेला ययाती कादंबरीच्या रूपाने वि.स.खांडेकर यांनी पहिले ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून दिले.

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला.

विष्णू वामन शिरवाडकर यांना तात्यासाहेब शिरवाडकर म्हणूनही ओळखले जाते.तात्यासाहेब शिरवाडकरांच्या मोठ्या बहिणीचे नाव कुसुम होते त्या नावावरूनच त्यांनी आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले. अर्थातच वि. वा. शिरवाडकर यांची संपूर्ण कविता कुसुमाग्रज या टोपणनावाने प्रसिद्ध झाली आहे.

तात्यासाहेब शिरवाडकर हे कवी, लेखक, समीक्षक, नाटककार,कथाकार अशा विविध रूपांनी मराठी भाषेला परिचित आहेत. कुसुमाग्रजांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीने जागतिक दर्जाचे लेखन केले. कुसुमाग्रजांच्या कविता वाचताना त्यांच्यातील अर्थगर्भ लेखन भावनांचे अनेक पदर उलगडता उलगडता कविता आत्मा कोणत्या विचारांच्या भोवती नांदत आहे,  हे प्रकर्षाने जाणवल्या शिवाय राहत नाही.

मराठी साहित्य विश्वामध्ये जवळ जवळ चार दशके आपल्या लालित्यपूर्ण प्रतिभेने अधिराज्य गाजवणारे सरस्वतीच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेतील एक अनमोल रत्न म्हणजे कुसुमाग्रज होत. कुसुमाग्रजांसारखा दैवी प्रतिभेचा कवी मराठी भाषेला लाभला हे मराठी भाषेचे  सदैव असेच म्हणावे लागेल.

खरेतर तात्यासाहेब शिरवाडकर यांचे मूळ नाव नाव विष्णू वामन शिरवाडकर असे नव्हते. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु त्यांच्या काकाने त्यांना दत्तक घेतले आणि गजाननाचा विष्णु झाला, वि. वा. शिरवाडकर हे साहित्यनाम प्रसिद्ध पावले.

कुसुमाग्रजाचे बालपण पिंपळगाव बसवंत आणि नाशिक या ठिकाणी गेले नाशिक येथे त्यांनी ही पदवी पूर्ण केली सुरुवातीच्या काळामध्ये चित्रपटांच्या पटकथा वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिल्या. याबरोबरच चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका सुद्धा त्यांनी केल्या. त्यामुळे चित्रपटाचे क्षेत्र तात्यासाहेब शिरवाडकरांना सुरुवातीच्या काळात अतिशय मौल्यवान अनुभव देऊन गेले.

सोबत,स्वराज्य,नवयुग,धनुर्धारी,प्रभात वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये शिरवाडकरांनी संपादकाची काम पाहिले. वृत्तपत्रीय लेखन कसे असते त्याच प्रमाणे वर्तमान हातात घेऊन चालणारे आणि भविष्याला दिशा देणारे विचार वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजभर कसे प्रसारित होतात. याचा अभ्यास आणि अनुभव तात्यासाहेब शिरवाडकर यांना संपादक असताना मिळाला. त्याचवेळी त्यांची काव्यप्रतिभा सुद्धा फुलत गेली.

कुसुमाग्रज म्हणजे मराठी काव्यविश्वातील अढळपद  असणारा तेजपुंज ध्रुवतारा होय.कुसुमाग्रजांचे अक्षरबाग,  किनारा, चाफा, छंदोमयी, जीवनलहरी, थांब सहेली, जाईचा कुंज, महावृक्ष, मराठीमाती,मारवा,माधवी, मुक्तायन,मेघदूत, रसयात्रा, विशाखा, वादळवेल,श्रावण, स्वागत, हिमरेषा, प्रवासी पक्षी, समिधा असे एकापेक्षा एक सरस काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

वि. वा.शिरवाडकर म्हणजे मराठी भाषेचे महान नाटककार म्हणूनच आपण त्यांना ओळखतो. मराठी भाषेचे किंवा कालिदास जर कोणी असेल तर ते म्हणजे नाटककार विष्णू वामन शिरवाडकर होत. वि. वा. शिरवाडकर यांची नटसम्राट,वीज म्हणाली धरतीला, कौंतेय, ऑथेल्लो, ययाती आणि देवयानी ही नाटके फार प्रसिद्ध आहेत.

ऑथेल्लो, नटसम्राट, कौंतेय, दूरचे दिवे, आमचं नाव बाबूराव, कैकेयी, जेथे चंद्र उगवत नाही, दिवाणी राजा, दुसरा पेशवा,  नाटक बसते आहे, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, वैजयंती, राजमुकुट, मुख्यमंत्री, महंत, एक होती वाघीण, किमयागार अशी जबरदस्त नाटके प्रसिद्ध आहेत.

वि.वा.शिरवाडकर हे केवळ कवी आणि नाटककार नसून उत्तम कथाकार होते हे त्यांच्या पुढील कथासंग्रहांवरून दिसून येईल.अंतराळ,अपॉईंटमेंट,एकाकी तारा,काही वृद्ध काही तरुण,जादूची होडी (बालकथा),प्रेम आणि मांजर (कथासंग्रह),फुलवाली,बारा निवडक कथा,सतारीचे बोल हे कथासंग्रह कुसुमाग्रजांचे अर्थात वि वा शिरवाडकर यांचे प्रसिद्ध आहेत.केवळ कथा करत नाही तर कुसुमाग्रज यांनी कल्पनेच्या तीरावर, जान्हवी आणि वैष्णव या तीन कादंबऱ्या  लिहिलेल्या आहेत.  त्यामुळे त्यांची कादंबरीकार म्हणून सुद्धा ओळख आपल्याला पाहायला भेटेल.
विष्णू वामन शिरवाडकर यांनी देवाचे घर, प्रकाशाची दारे, बेत, संघर्ष, दिवाणी दावा अशा काही एकांकिका सुद्धा लिहिलेल्या आहेत. या दृष्टीने ते एकांकिकाकार सुद्धा ठरतात.
आहे आणि नाही,एकाकी तारा, एखादं फूल,प्रतिसाद,बरे झाले देवा,मराठीचिए नगरी,विरामचिन्हे वरील प्रकारचे लघुनिबंध वजा पुस्तकेसुद्धा कुसुमाग्रजांच्या अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या नावावर आहेत.
१९६४ मध्ये मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद वि.वा.शिरवाडकर यांनी भूषवले.
१९७० साली कोल्हापूर येथे मराठी भाषेचे ५१ वे संमेलन भरले होते. या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा वि.वा.शिरवाडकर यांनी भूषवले होते.
१९९० साली मुंबई येथे जागतिक मराठी साहित्य परिषद भरली होती.  या साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर  यांना बहुमानाने दिले गेले.

इतके सर्व लेखन वि.वा. शिरवाडकर यांनी आपल्या सिद्ध हस्त  लेखणीने केले आहे. प्रचंड लेखन करणे हे काही साध्यासुध्या या लेखकाचे काम नाही त्यासाठी प्रचंड प्रतिभा लागते. कुसुमाग्रज हे प्रतिभावंत कवी,  नाटककार, कथाकार,कादंबरीकार, समीक्षक,संपादक, एकांकिकाकार, अभिनेते, पटकथालेखक होते.

कुसुमाग्रजांच्या साहित्याची नुसती यादी वाचली तरी, आपली छाती दडपल्याशिवाय राहणार नाही. कुसुमाग्रजांनी इतके प्रचंड आणि प्रतिभेच्या आकाशाला सहजरित्या गवसणी घालणारे वांङ्मय मराठी भाषेच्या इतिहासात अर्वाचीन काळामध्ये कोणालाही निर्माण करता आलेले नाही.  कोणत्याही लेखकाच्या प्रतिभेची उंची इतकी मोठी नव्हती.

कुसुमाग्रजांनी मराठी माणसाच्या जाणिवांची उंची आपल्या या साहित्याने प्रचंड मोठी वाढवली आहे. कुसुमाग्रजांचे साहित्य आपण जर बारकाव्याने वाचले तर इतर कोणत्याही वाचनाशिवाय  आपल्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू एखाद्या पृथ्वीमोलाच्या अनमोल हिऱ्याप्रमाणे पडून वाचणारा वाचक एखाद्या  ताऱ्याप्रमाणे चमकल्याशिवाय राहणार नाही. असे मला वाटते. माझे म्हणणे हा खोटा अभिनिवेश नसून अनुभवाचे बोल आहेत.

मराठी भाषा ही एक आणि समृद्ध भाषा आहे.भाषा अभिजात भाषा आहे.भारताचे केंद्र सरकार विविध भाषांना काही ठराविक निकषांवर आधारित अभिजात भाषेचा दर्जा देत असते. मराठी भाषेचा यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंत्रालयाकडे पडून आहे.परंतु यावर विनाकारण विलंब लावून सरकार चालढकल करीत असल्याचे चित्र मराठी जनमानसात निर्माण झाले आहे.

नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
वरील उद्गार कार्यसम्राट कुसुमाग्रजांचे आहे. कुसुमाग्रजांनी इतिहासाचा दाखला देऊन कोणत्याही सिंहासनापुढे मराठी भाषेने कधीही मान स्वाभिमान गहाण ठेवून दान मागितले नाही की कधी हात पसरला नाही.
कुसुमाग्रजांची ही शिकवण मराठी माणसाला आहे त्यामुळे आपला कणा ताठ ठेवून मराठी भाषिक तटस्थपणे आणि शांततेने या गोष्टीकडे पाहतो.
मराठी राजभाषा दिन साजरा करत असताना कुसुमाग्रजांचे साहित्यिक आणि सामाजिक कार्य यांची पुन्हा पुन्हा आठवण आपण केली पाहिजे. आपण स्मरण ठेवले पाहिजे की कुसुमाग्रजांनी दिलेले संस्कार आणि विचार यांचे आपण फार मोठे ऋणाईत आहोत.

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन 27 February Marathi Bhasha Gaurav Din

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment